सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ बेघर भाग – 1 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
एका गेटपासून दुसर्या गेटपर्यंत बारीक मुरुमाने बनलेल्या `ड्राईव्ह वे’ वर मी रोज सकाळी पंचवीस चकरा मारते. एका बाजूने एकशे चाळीस पाउले…. एकूण मोजले तर साडे तीन हजार पाउले. किती लांब अंतर? कल्पना नाही, पण माझं फिरणं असं बंगल्याच्या आतच होत होतं. रोजचं फिरून झाल्यावर मी व्हरांड्यात ठेवलेल्या आरामखुर्चीत हात-पाय पसरून आरामात बसते. जुगनीने तोपर्यंत कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून ठेवलेलं असतं. मी ते हळू हळू घोट घोट पीत राहते.
सकाळी लवकर उठण्याचा फायदा असा असतो, की स्वत:जवळ बसण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. नाही तर एकदा युनिव्हर्सिटीत जाण्यासाठी तयार झालं, की डिपार्टमेंट आणि घर या सार्यातून फुरसत कुठे मिळते? पहाटे पहाटे काहीसा अंधार असताना उठण्याची ही सवय मी माझ्या पापांकडून घेतली. मम्मी या सवयीबद्दल पापांना हसत असे आणि हा त्यांचा `मिडिल क्लास हँगओव्हर’ आहे, असं म्हणून त्यांची चेष्टाही करत असे. तिच्यासाठी तर सकाळचे साात ही वेळदेखील `मिड नाईट’ असायची.
एकटी बसून रोजच मी स्वत:शी बोलते. विचार करण्यासारखं किती किती म्हणून आहे? पुरी पंचावन्न वर्षांची जीवनयात्रा. चौतीस वर्षं या घरातच काढलेली. अठरा वर्षाची असताना या ई. ब्लॉकच्या मोठ्या घरात राहायला आले होते. चोवीसाव्या वर्षी लग्न. त्यानंतर तीन वर्षं सुधीरबरोबर राहिल्यानंतर पुन्हा इथे आले होते. तेव्हापासून इथेच तर आहे. माझं हे घर, माझं हे जीवन, माझी ही दिनचर्या सगळ्याचीच मला सवय होऊन गेलीय. पण कालपासून असं वाटतय, सगळं हे जीवनच उलटं-पालटं होऊन गेलय. काल अप्पूने येऊन जशी काही खूप जुनी जखम उकरली. डिपार्टमेंटमध्ये पोचल्यावर खांद्याला लावलेली पर्स काढून समोरच्या टेबलावर ठेवली. एवढ्यात अप्पू आत आली. गोरा रंग. छान भरलेलं शरीर. वाटलं हिला कुठे तरी पाहिलय. माझ्या चेहर्यावरचे गोंधळलेले भाव पाहून ती म्हणाली, `भाभी, मी अप्पू.’ तिच्या चेहर्यावर असमंजसता, भीती, वेदना सगळं काही होतं. तिचा आवाज कापत होता.
काही क्षण मी गोंधळात पडले, पण तिने मला भाभी म्हंटलं आणि मला लक्षात यायला वेळ लागला नाही. मी आश्चर्यचकित झाले. `अरे, अप्पू तू?’ वाटलं, या क्षणी मला कसं वाटायला हवं, याबद्दल माझं मन निर्णय घेऊ शकत नाही आहे. मग वाटलं, अश्रूंचा एक महापूर छातीत उसळतोय.
आम्ही दोघी खूप वेळपर्यंत एकमेकींसमोर गुपचुप बसून राहिलो. वाटलं, मी काही तरी बोलायला हवं, पण काय बोलावं, तेच कळेना. खूप वेळानंतर मी विचारलं, `कशी आहेस अप्पू?’
अप्पूने खाली घातलेली मान वर केली आणि म्हणाली, `मी ठीक आहे.’ मग ती काही क्षण गप्प बसली आणि म्हणाली, `भाभी तुम्ही कशा आहात?’ वाटलं, तिचा आवाज कापतोय. `भाभी आपली आठवण अजूनही येते.’ मग पुन्हा काही काळ गप्प बसली, जशी काही आपल्या येण्याची माफी मागते आहे. `लखनौला आले, तेव्हा कुणी तरी सांगितलं, आपण युनिव्हर्सिटीत अध्यापन करता आहात. मनाने मानलं नाही आणि खूप हिम्मत धरून आपल्याला भेटायला आल!’ अप्पूचे डोळे पाणावले होते. काळाच्या थरांआड दबलेलं खूप काही एकदम उसळून वर आलं. स्वत:ला संयत करण्यासाठी मला खूप प्रयत्न करावा लागला. माझ्या स्वरात तक्रार उमटली. `अप्पू सुधीरने डायव्होर्सचे कागद पाठवले, तेव्हा कुणाला माझी आठवण झाली नाही. बाबूजी, अम्माजी, छोटे भैया, तू , तुम्हाला कुणलाच माझी आठवण झाली नाही? काय मी काहीच डिझर्व्ह करत नव्हते की काय?’
ती माझ्याकडे अशा नजरेने पाहत होती, की जसं कही तिला माझं बोलणं समजतच नव्हतं. त्यानंतर ती बोलू लागली. तिच्या आवाजात कंप होता. `भाभी, भैया तर आपल्या पाठोपाठ आपली मनधरणी करायला लखनौला आले होते. ..अम्मा, बाबूजींनी तर तुमच्याशी बोलण्याचा किती प्रयत्न केला, पण अंकल म्हणाले, आपण कुणालाच भेटू इच्छित नाही आणि कुणाशी बोलूही इच्छित नाही.’ अप्पूच्या डोळ्यात अश्रू गर्दी करू लागले. `भैयाने आपल्याला बाबूजी गेल्याचे कळवले होते, पण…’ तिचा गळा एकदम दाटून आला. डोळ्यात थबकलेले अश्रू गालांवरून ओघळू लागले.
मी सुन्न झाले. मनात अनेक प्रश्न उभे राहिले. सगळ्या प्रश्नांची उत्तरेही मला समजू लागली होती, पण आता सांगून तरी काय उपयोग? किंवा विचार करूनदेखील? `बाबूजींना काय झालं होतं?’
अप्पूने माझ्याकडे पाहीलं, पण माझ्या कुठल्याच प्रश्नचं उत्तर दिलं नाही. माझ्या काळजात एक कळ उठली…. पापा हे काय केलंत तुम्ही.. अप्पूचा आवाज कापत होता. `आई शेवटपर्यंत या दु:खातून वर आली नाही. ‘ काही अश्रू पुन्हा तिच्या गालावर ओघळले.
माझ्या जिभेवर आलं होतं, की विचारावं, `आणि सुधीर?’ पण गप्प बसले. आता काय बोलणार? कोणती तक्रार करणार? आणि कुणापाशी? सुधीर आता दुसर्या कुणाचा तरी पती आहे आणि पापा आता या जगातच नाही आहेत. मन वेदनेने भरून गेलं…. हे काय झालं? मी का होऊ दिलं असं? आता मी काहीच करू शकत नाही. त्यावेळी माझ्या हे का लक्षात आलं नाही, की जावई होण्यापूर्वी सुधीर एक फक्त ज्युनियर आय. ए. एस. ऑफीसर होता. त्याच्या उद्धटपणसाठी ते त्याला माफ करू शकत नव्हते. कदाचित पापा सुधीरला अद्दल घडवू इाfच्छत होते. पण त्यासाठी माझा बळी गेला. पापांच्या कदाचित मनातही आलं नसेल, की त्यांनी वारंवार झिकारल्यानंतर सुधीर मौन साधेल आणि आपला मार्ग बदलेल. सुधीरशिवाय माझं जीवन किती अपूरं अपूरं होईल, हे पापांच्या लक्षातच आलं नाही.
सुधीरशी माझा विवाह हा पापांच्या जीवनातला पहिला पराभव होता. सुरुवातीपासूनच हे नातं म्हणजे आपल्याला मिळालेला शह आहे, असं ते मानत होते. पण संबंधांच्या बुद्धिबळाच्या पटावर ते अजाणतेपणेच मात खात होते. जीवनाच्या गणितात पहिल्या प्रथमच त्यांची अशी गडबड झाली होती. पापा माझा विवाह नक्की करून आले होते. आमचे मावसोबा, म्हणजे माझ्या मावशीचे यजमान हैराण झाले होते. `हे काय केलत भाऊसाहेब आपण? आपल्या वसुला आपण इतक्या लाडा-कोडात वाढवलय… नाकावर माशी नाही बसू देत ती… आपण बरेलीत संबंध जोडून आलाय. आपण तो भग बघितलात? घाणीचं साम्राज्य आहे तिथे!’
पापांनी हसून बोलणं टाळलं. `अरे अनील, मुलगा बघितलास, तर एकदम खूश होऊन जाशील. दरवाजात तेज फाकेल. गोरा-चिट्ट, सहा फूट उंची, हसरा चेहरा. पहिल्या अटेंम्टमध्ये आय. ए. एस. पास झालाय. सबंध भारतात तिसरा आलाय. ज्या दिवशी तो माझ्याकडे कर्टसी कॉल द्यायला आला, त्या दिवशीच मी वसुसाठी त्याची निवड केली. परिस्थिती, दर्जा, प्रतिष्ठा मुलाची बघायची असते. बापाची नाही. पापांनी आमच्या मावसोबांकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. `आपले विवाह याच आधारावर झाले होते नं? …. आणि आपण खूश आहोतच का…. आणि आपल्या बायकासुद्धा… ‘ ते थोडा वेळ गप्प बसले. मग हळून म्हणाले, जशी काही एक महत्वाची गोष्ट सांगताहेत, `जर स्टेटसमध्ये खूप फरक असेल, तर मुलंसुद्धा कुठे आपल्या घरच्या लोकांशी जास्त काळ संबंध ठेवतात?’ मावसोबा चमकले. त्यांनी खजील नजरेने माझ्याकडे बघितले आणि ते गप्प बसले. बोलणार तरी काय? आमचे नाना म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील, आय. सी. एस. होते. आपल्या काळातले नामवंत कीर्तिवंत ऑफिसर. बजरंगी लालच्या चर्चा अजूनही ब्युरोक्रसीमध्ये चालतात. त्यांनी मम्मी आणि दोन मावशा यांचा विवाह गरीब घरातील कर्तृत्ववान मुलांशी लावून दिला. कदाचित हा त्यांच्या प्रखर बुद्धीच्या, कौटुंबिक प्रशासनाचा भााग असेल. त्यांच्या तीनही जावयांनी आपल्या परिवाराशी काही संबंध ठेवला नव्हता. तिघेही बजरंगी लालचे आज्ञाधारक राहिले. तिघांच्याही घरात त्यांच्या पत्नीचं शासन चालत होतं. पण सुधीरने अतिशय प्रामाणिकपणे आणि समजूतदारपणे मला त्याच्या परिवाराविषयी, त्यांची ऐपत, त्याच्या मर्यादा, समस्या, असुविधा, दोन्ही परिवारातील अंतर, आपल्या शिक्षणासाठी आई-वडीलांनी केलेला त्याग, सगळ्या गोष्टी नीटपणे समजावून सांगितल्या होत्या. आपल्या पत्नीकडून आपल्या कुटुंबाविषयी काय अपेक्षा आहेत, हेही मला स्वच्छपणे सांगितलं होतं. तेव्हा मला सुधीर खूपच आवडला होता.
विवाहानंतर बरेलीला गेलं की त्रास तर व्हायचा, पण तिथल्या गैरसोयींबद्दल मी कधी तक्रार केली नव्हती. तसंही सुधीरनं माझ्या मनाची तयारी आधीच करून ठेवली होती, त्यामुळे तक्रार करण्याचं काही कारणही नव्हतं. पण एक वर्ष होतं न होतं, तोवरच पापांनी आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. त्यांच्या संयमाचाा बांध तुटू लागला. बरेलीवाल्यांनी माझ्याकडे येऊन रहावं, हे त्यांना पसंत नव्हतं, तसंच सुधीरने मलाा घेऊन वारंवार बरेलीला जााणंही त्यांना पसंत नव्हतं. मी मोठ्या मुश्किलीने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण कुठपर्यंत करू शकणार होते?
आज जीवनाचे तुकडे तुकडे माझ्या डोळ्यासमोर गरगरू लागले आहेत. कधी वाटतं, किती काळ झाला हे सगळं घडून? कदाचित तो मागचा जन्म असेल. कधी वाटतं, सगळंच डोळ्यासमोर आहे. आता-आताच तर घडलं आहे. पापा,मम्मी, सुधीर आणि माझं लग्नं. वाटतय, सुधीरची जाणीव मनाच्या आस-पाास कुठे तरी स्पर्श करते आहे. सुधीरच्या आठवणी मन विंधून टाकताहेत, जशा काही त्या कुणा परपुरुषाच्याच आठवणी आहेत. जी व्यक्ती आपल्या जवळ होती, अगदी जवळ… अचानक ती परकी कशी होऊन गेली? कुठे गेला तो? याच दुनियेत कुठे तरी … पण त्याला हाका नाही माारू शकत…. त्याला स्पर्श नाही करू शकत. सुधीरच्या जवळिकीची इच्छा मनाला उध्वस्त करू लागली. मनात अजब अशी तडफड सुरू झाली. वाटू लागलं, कुठूनही, कसंही सुधीरला मिळवावं. आज नव्याने मनात विषाद दाटून आला. जेव्हा मी त्यालाा बोलावू शकत होते, तेव्हा का अभिमान धरून बसले. सुधीर आणि अम्मा, बाबूजी बोलवायला येण्याची वाट का पाहत राहिले? तेव्हा का नाही मनात विचार आला, की पापा असं करू शकतात. त्या एका क्षणाने सगळंच कसं नष्ट, उध्वस्त करून टाकलं, ते लक्षातच येत नाही…. आणि मी गप्प बसले. ते होऊ दिलं. का? का? अखेर का? आता काहीच करता येणार नाही. माझ्या आणि सुधीरमध्ये मोठा मधुर संबंध होता. माझं जग तर सुधीरच्या आस-पासच फिरत होतं. तेव्हा वाटत होतं, शंभर वर्षं जगलो, तरी असंच प्रेम करत राहू. अगदी ताजं. प्रत्येक क्षणी नवं नवं. तेव्हा वाटलं, माझं प्रेम कधीच म्हातारं होणर नाही. तणाव पापा आणि सुधीर यांच्यात झाला होता. वâदाचित् पापांनी सुधीरच्या वडलांविषयी काही तरी अशोभनीय वक्तव्य केलं होतं. त्याला असंही बजावलं होतं, की त्या घाणेरड्या घरात त्याने वसूला घेऊन वारंवाार जाऊ नये. त्याक्षणी सुधीर आपलं भान हरवून बसला. तो त्या क्षणी हे विसरला, की ते माझे पापा आणि या प्रांताचे सिनियर सेक्रेटरी आहेत.
पापांना खूप काही बोलून सुधीर घरात आत आला. मीही मागोमाग आत आले. आत येऊन रागारागाने सुधीर खूप काही बडबडत राहिला. मला चांगलं वाटलं नाही. तीन वर्षानंतर आज प्रथम आमच्या स्वरात विसंवाद निर्माण झाला होता. माझाही आवाज चढला. `सुधीर माईंड योर लँग्वेज…’
क्रमश: १
मूळ कथा – बेघर – मूळ – मूळ लेखिका – सुश्री सुमति सक्सेना लाल
मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈