सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कुंदन भाग- १… लेखक – श्री अनिरुद्ध  ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

जरा घाबरतच बेल वाजवली, आतमधे धीरगंभीर असा पोकळ नळ्या एकमेकांवर आपटून आवाज येतो तसा आवाज आला. दोन मिनटं गेली. मला बधिर झाल्यासारखं वाटायला लागलं म्हणजे नक्की हेच घर आहे ना असा सुद्धा विचार मनात येऊन मागे फिरले पण नेमप्लेट तर तीच होती. अजून एकदा बेल वाजवावी का? मजल्यावर तीन फ्लॅट दिसत होते, खूप मोठा पॅसेज होता, हा फ्लॅट ह्या कोपऱ्यात, त्या बाजूला सुद्धा डेकोरेट केलेला दरवाजा दिसत होता. मधे सुद्धा एक फ्लॅट असावा. आत मधे हालचाल जाणवली बहुतेक कोणीतरी दार उघडायला येत असावं, मी सावरून उभी राहिले. मुद्दामून ड्रेस घातला होता म्हणजे मला खरं तर जीन्स टॉप्स वगैरे आवडतं, पण मावशी चिडते। म्हणते तुझं हे वय वाईट असतं ड्रेस घालत जा आजकालचे दिवस खराब आहेत.

दार उघडलं आणि मी स्तब्ध उभी राहिले समोर मध्यम वयाची सुंदर म्हणण्याइतपत एक बाई उभी होती. मी लीना, माझा आवाज एकदम घोगरा झाला म्हणजे खरंच मी घाबरले होते, कोणाकडे मेड म्हणून काम करण्याची माझी पहिलीच वेळ. म्हणजे आयुष्यात मावशीचं घर सोडून पहिल्यांदा अशी मी दुसरीकडे आले होते.

बस, त्या आवाजात जरब होती म्हणजे सुंदर बाईचा आवाज वाटत नव्हता तो.  तर हुकूमत गाजवणारा आवाज वाटत होता. कधी काम केलंयस का मुलांना सांभाळायचं? मी दचकले.  म्हणजे मावशीने सांगितलं होत एकट्या बाई आहेत हेल्पर म्हणून त्यांच्या घरात काम करायचंय. जे पडेल ते. पण मुलांना सांभाळायचं माहिती नव्हतं. मी बावरलेली पाहून त्या बाई म्हणाल्या म्हणजे तुला तसं कुंदनला बघावं लागणार नाही पण कधी गरज पडलीच तर ते सुद्धा करावं लागेल. माझ्या तोंडावर पडलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत त्या म्हणाल्या, ये तुला घर दाखवते, मी यंत्रवत उठले आणि त्यांच्या मागे निघाले. दारातून आत मधे आल्यावर मोठा लांब पॅसेज, नंतर हॉलचा दरवाजा डाव्या बाजूला पुढे पॅसेज कंटिन्यू टॉयलेट बाथरूम्स, पॅसेजच्या टोकाला किचन. हॉल मधून दोन बेडरुम्सना दरवाजे. बेडरूम्स प्रशस्त म्हणजे सगळं घरच स्पेशिअस. मावशीच्या वनरुम किचन मधे राहण्याची सवय असल्याने हे एकदम अंगावर आल्यासारखं वाटत होत. बाईंनी थंडगार सरबत दिलं म्हणाल्या आता दिवेलागणी झालीये. तू निघ उद्या सकाळी सहाला ये, मी दचकले सहाला म्हणजे माझ्या दृष्टीने खूपच लवकर,  मनात विचार आला नको यायला उद्या॰ सहापासून किती वाजेपर्यंत कोणास ठाऊक असं वाटायला लागलं।  त्याचवेळेस बाई म्हणाल्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबायला लागेल.’ बाई मनातलं ओळखतात की काय असं वाटून गेलं. बाई छद्मी हसल्या म्हणाल्या, ‘ये उद्या आणि मला बाई म्हण्टलंस तरी चालेल,मी तुला लीना म्हणत जाईन.’ बाप रे सगळंच ओळखतात ह्या माझ्या मनातलं? मी मेन दरवाजाजवळ आले लॅच सिस्टीम माहिती नसल्याने मी तशीच उभी राहिले, बाई पुढे आल्या माझ्या अंगावरून जाताना त्यांच्या अंगाचा मंद सुवास जाणवला. त्या दार उघडत असताना माझं अचानक लक्ष पॅसेजच्या ह्या कोपऱ्यात गेलं तिथेसुद्धा एक दरवाजा होता म्हणजे एखादी खोली असावी. म्हणजे हॉल, किचन, दोन बेडरूम्स, दोन टॉयलेट बाथरूम्स, आणि ही खोली मला बाईंनी दाखवलीच नाही?

दाराचं लॅच सोफिस्टिकेटेड आवाज करत बंद झालं आणि मी मोकळा श्वास घेतला आणि मी दचकले आत बाई बोलत होत्या “कुंदन आले रे थांब.”मघाशी त्यांनी कुंदनचा उल्लेख केला होता पण कुंदन कोण हे सांगितलं नव्हतं आणि तो घरात आहे हे सांगितलं पण नव्हतं. आणि ती खोली? त्याबद्धल सुद्धा काही म्हणाल्या नाहीत? खूपच विचीत्र वाटलं खरं. सांगून टाकूया मावशीला नको म्हणून? तशीच घरी आले मावशी वाट बघत बसली होती, माझ्या जिभेवर अजून त्या थंडगार सरबताची चव रेंगाळत होती आणि बाई दिसत होत्या नजरेसमोर, बाईंची नजर गूढ वाटली मला काहीतरी लपवून ठेवल्यासारखं चोरटी पण हुकूमत गाजवणारी नजर, बाईंना नवरा नाहीये का? मी माझ्या विचारातच चपला काढल्या, मावशी म्हणाली, ‘लीना काय झालं? मी काही न बोलता पलंगावर बसले मघाशी नको वाटत होत त्या बाईंकडे जाणं पण ती खोली आणि कुंदन माझ्या मनात घोळत होते. पगार खूप देणार होत्या, बारा तास चांगल्या घरात वावरायचं, जेवणखाण होणार होतं म्हणजे तक्रारीला जागाच नव्हती शिवाय सगळंच पॉश असल्याने साफसफाई वगैरे फारशी करावी लागणार नव्हती हे नक्की, हल्ली ग्रॅज्युएट होऊन काय मिळतंय बाहेर त्यापेक्षा इकडे सुरक्षित आणि चांगला पगार, माझ्या तोंडातून आपसूक बाहेर आलं, “छान आहे.” मावशी खुश झाली. म्हणाले, ‘उद्या सकाळी सहाला जायचंय त्यांच्या घरी,’ मावशी सुद्धा आश्चर्यचकित झाली म्हणाली, ‘इतक्या लवकर?’

वॉचमनशी कालच ओळख झाली होती त्यामुळे त्याने मी बिल्डिंगच्या गेटमधून शिरल्यावर नुसती मान हलवली, मी लिफ्टपाशी आले पाचवा माळा  दाबला लिफ्टच्या पंख्याच्या आवाजात मनात विचार येत होते कुंदनबद्धल, कोण असेल हा कुंदन? बाई तर मध्यमवयीन वाटत होती॰ म्हणजे कुंदन असला तर निदान पंधरा सोळा वर्षांचा तरी असावा. कुंदनला काही आजार असेल का? का अपंग? लिफ्टचा दरवाजा उघडला आणि उजव्या बाजूला आले बेल वर हात ठेवला इतक्यात आतून कुजबुज ऐकू आली म्हणजे बाई मोठ्यांदीच बोलत होत्या पण सागाचा जाड दरवाजा असल्याने बाहेर खूप कमी आवाज येत होता. मी दाराला कान लावला आणि कानोसा घेऊ लागले. बाई, कुंदन कुंदन हाका मारत होत्या बहुतेक त्याला उठवत असाव्यात. अचानक त्या समोरच्या फ्लॅट च्या सेफ्टी डोअर मधून कोणीतरी बघत असावं असं जाणवलं मी झटक्यात दारापासून लांब झाले आणि बेल वर हात ठेवला.

आतमध्ये लगबग झाली असावी, मी श्वास का कोणास ठाऊक रोखल्यासारखा केला, बाईंनी दार उघडलं, बाई गाऊनमधे होत्या, मध्यमवयीन असल्या तरी तरुणीला लाजवतील अशी फिगर होती त्यांची. ‘ये’ म्हणाल्या मी का कोणास ठाऊक त्यांच्या आवाजाखाली संमोहित होत होते की काय कोणास ठाऊक? मी आतमधे आले, मला डायरेक्ट स्वयंपाकघरात घेऊन आल्या बाई. म्हणाल्या, ‘चहा येतो ना करता? दोघींचा कर आणि हो दूध सुद्धा. दे, त्यांनी एक मग दिला काढून. म्हणाल्या, ‘भरून दे साखर कमी टाक कुंदनला साखर कमी लागते.’ मी दचकले म्हणजे हा कुंदन कोण हे काही समजत नव्हते कदाचित आज दिसेल कुंदन असा विचार करून मी हो म्हणाले. पटपट चहा केला, बाईंनी चहाचा कप आणि दुधाचा कप एका ट्रे मधे घेतला आणि त्या पॅसेजच्या त्या कोपऱ्यात असणाऱ्या बंद खोलीच्या दिशेने निघाल्या, मी किचनमध्ये डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसले चहाचा कप हातात घेऊन, बाईंनी हळूच ते दार ढकललं आणि त्या आतमध्ये शिरल्या दार बंद करून घेतलं. मी चहाचा घोट घेतला आणि त्या बंद दाराकडे बघत राहिले. अर्ध्या तासांनी बाई आल्या बाहेर, मी इकडची तिकडची कामं करण्याचा प्रयत्न करत होते. बाईंनी सगळं समजावून सांगितलं, अधूनमधून कुंदनचा उल्लेख करत होत्या. मला चैन पडत नव्हतं कुंदन काही दिसत नव्हता. जेवणं झाली. बाई अधून मधून त्या खोलीत जात येत होत्या, आतमधे गेल्यावर आतून बाईंची कुजबुज जाणवत होती पण कुंदनचा आवाज काही येत नव्हता.

करकरीत दुपार झाली बाई मला म्हणाल्या, ‘तू पडू शकतेस पाहिजे तर  हॉलमधे,’ मी तुम्ही काय करणार ह्या नजरेने त्यांच्याकडे बघितलं, जणू माझ्या मनातला प्रश्न ओळखून त्या म्हणाल्या, ‘कुंदनजवळ पडते जरा नंतर मला दुपारी क्लब मधे जायचंय, मला झोप लागली तर अर्ध्या तासानी उठव मी जास्त झोपत नाही दुपारची.’

हे कुंदन प्रकरण मला खूपच गूढ वाटायला लागलं होत. बाई गेल्या त्या खोलीत आणि मी विचार करायला लागले कुंदनचा. दहा एक मिनीटांनी मी उठले हळूच आवाज  न करता त्या खोलीच्या दाराजवळ गेले आणि कान लावला, बाईंचा कोणाशी तरी बोलण्याचा स्पष्ट आवाज येत होता. माझ्याबद्धलच सांगत होत्या कुंदनला, मी थरारले. कोण आहे हा कुंदन म्हणजे दिसतच नाहीये बाई सुद्धा काही सांगत नाहीयेत त्याच्याबद्धल आणि माझ्याबद्दल त्याला सांगतायत? मी नीट कानोसा घेतला म्हणत होत्या ती लीनाताई राहील तुझ्याबरोबर उद्यापासून, तिला त्रास द्यायचा नाही. मी दचकले बाप रे म्हणजे कुंदनला आपल्याला सांभाळायला लागणार आहे? आतून हालचाल जाणवली मी झटक्यात हॉलमध्ये आले. बाई बाहेर आल्या. म्हणाल्या मी आज जरा बाहेर जाणार आहे. बहुतेक उद्यापासून दुपारी मी घरात नसेन, तुला सांभाळावं लागेल सगळं, मी सगळं म्हणजे काय हे विचारणार इतक्यात त्याच म्हणाल्या कुंदनकडे लक्ष द्यावं लागेल. त्या सारखं कुंदन चा उल्लेख करत होत्या पण माझं धैर्यच होत नव्हतं कुंदन कोण, कुठे आहे म्हणून विचारायचं?

क्रमश: भाग १

मूळ लेखक – श्री अनिरुद्ध

प्रस्तुती – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments