सौ. सुचित्रा पवार
☆ दिवा अन उदबत्ती… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
वादळात अडकलेल्या एका पांथस्थाने जवळच्याच एका भग्न मंदिराचा आसरा घेतला.काळ्याकुट्ट ढगांनी सर्व परिसर झाकोळून गेलेला होता.कोणत्याही क्षणी आभाळ भुईवर उतरणार होतं अन कडाडणाऱ्या विजा प्रकाशाची वाट दाखवत त्यांना भुईवर उतरवणार होत्या.कुट्ट त्या अंधाराच्या मंदिरात पांथस्थास काहीच दिसेना.अडखळत चाचपडत तो कसाबसा गाभाऱ्याशी पोहचला.खिशातली काडीपेटी काढून तो काडी ओढायचा प्रयत्न करू लागला पण सर्द पडलेला तो गुल पेटण्याचं नावच घेत नव्हता.अथक प्रयत्नाने एका काडीने शेवटी पेट घेतला.पांथस्थाला हायसे वाटले.त्याने इकडे तिकडे शोध घेतला. एका कोनाड्यात त्याला तेलाने भरलेला दिवा दिसला.हातातील आगीने त्याने दिवा पेटवला अन मूर्तीच्या पायाशी ठेवला.काळ्याकुट्ट पाषाणातील ती मूर्ती दिव्याच्या प्रकाशात उगीचच हसल्याचा त्याला भास झाला.त्याची नजर आता उदबत्तीस शोधू लागली ” दिवा आहे तर उदबत्तीही असणारच !” तो स्वतःशी पुटपुटला, इतक्यात मूर्तीच्या मागे त्याला उदबत्ती सापडलीच.दिव्यावर उदबत्ती पेटवून त्याने शेजारीच असलेल्या कपारीत खोचून दिली अन देवाला हात जोडून तो गाभाऱ्याबाहेर आला.गाभारा प्रकाश अन सुगंधाने भरुन गेला.त्या भयाण रात्रीत त्याला देवाचा सहारा मिळाला.थकलेला तो लवकरच निद्राधीन झाला.
सोसाट्याचा वारा ,कोसळता पाऊस अन विजांचे कल्लोळ चालूच होते.मध्यरात्र उलटली. दिव्याचे लक्ष सहजच स्वतःकडे गेले.रत्नजडित खड्यांनी मढलेले त्याचे रूप खासच सुंदर होते.त्याहून खूप सुंदर नाजूक नक्षी,उठावदार रंग, सुबक आकार त्याला खूपच आवडला.स्वतःच्या रूपाचा त्याला खूपच आनंद झाला आणि सौंदर्याचा अभिमानही !
शेजारी उदबत्ती जळत होती तिचं अस्तित्व काही क्षणांचं होतं. दिव्याला उदबदत्तीची कीव आली.
” काय ही उदबत्ती ! ना प्रकाश ना रूप ! काळा देह, हिला मुळी देखणेपण नाहीच!” तो स्वतःशीच पुटपुटला.त्याने उदबत्तीला न राहून विचारलेच,”काय गं उदबत्ती तुला माझ्या देखणेपणाचा जरासुद्धा मोह होत नाही का ? माझ्या सौंदर्याचा हेवा वाटत नाही का?”
तिने हसून उत्तर दिले ,” बिल्कुल नाही.ईश्वराने जे रूप मला दिलेय त्यात मी समाधानी आहे.प्रत्येकाला इथं नेमून दिलेले काम आहे अन आपण ते करायचे आहे ,एवढेच मला माहित आहे ;त्या पलीकडे मी जास्त विचार नाही करत.”
दिव्याला तिचं म्हणणं तितकंसं पटलं नाही तो तिला काही न काही म्हणतच राहिला अन उदबत्ती मौन बाळगून ऐकत राहिली.
इतक्यात सोसाट्याचा वारा सुटला आता मात्र दिव्याला आपला तोल सांभाळता येईना.उदबत्ती स्थिरपणे मंद मंद सुगंध दरवळत होती, अन …वाऱ्याचा प्रचंड झोत गाभाऱ्यात शिरला ! फडफडणारा दिवा क्षणात विझला.उदबत्ती शेवट पर्यंत जळत राहिली .
उत्तररात्री वादळ शांत झाले.पहाट होताच पक्ष्यांनी पंख झटकले.आभाळ निवळून निरभ्र शांत झाले.पांथस्थ उठला त्याला आता पुढं जायचं होतं.रात्रभर जीविताचं संरक्षण केल्याचे उपकार मानायला तो देवाच्या गाभाऱ्यात गेला. दोन्ही हात जोडून नतमस्तक होत उदबत्तीची राख त्याने भाळावर लेपली.बाजूच्या दिव्यावर काजळी साचली होती.त्याने दिवा उचलला व पुन्हा कोनाड्यात ठेऊन दिला .
रात्रभर प्रभू चरणाची सेवा करून कुणा सज्जनाच्या भाळावर मिरवत उदबत्ती दिमाखात पाऊले चालत राहिली अन दिवा अंधारल्या कोनाड्यात कुणा अवचित पांथस्थाची अभावीत पणे वाट पहात एकटाच राहिला…
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈