☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 5 ☆ सौ. सुनिता गद्रे☆
चाचा विचार करत माहित आहेत. ते फॅक्टरी वरचे साहेब लोक आहेत ना.. हॉं तेच… ज्यांनी पंचवीस हजार रुपये दिले होते. ते भैय्याचा जवळजवळ अर्धा माल खरेदी करतात. निवडक माल, महॅंगे महॅंगे फल भैय्या त्यांना घरपोच करायचा… ते आहेत..इतरही लोक आहेत त्यांच्या मदतीने सगळं काम मार्गी लागेल. कॉलेज असेल तेव्हा सकाळी संध्याकाळी केव्हाही तो माल सप्लाय करू शकेल….. अच्छा, तुमचा ‘ मधला’ सकाळी पेपर टाकायचं काम करायला तयार असेल तर ते काम मी त्याला जोडून देईन. ‘तो’ आणि धाकटा सुट्टीच्या दिवशी गाड्या, मोटारी धुवायचं, साफ करायचं काम करणार असतील तर काही दिक्कत नाही. मी मिळवून देईन त्यांना काम.
आपल्या मुलांना लहान वयात काम करावं लागणार या कल्पनेने सुशीलेला रडूच फुटलं.
थोड्या वेळाने मन घट्ट करून ती म्हणाली, “माझ्या मेली च्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदू वाढलाय…. अंधुकच दिसतंय… माझं शिवण काम ही तीन-चार महिने थांबलंय… ऑपरेशनचा खर्च आहे, बँकेत पैसाही नाहीय. ‘हे’ असते तर…. फुटक्या नशिबाची मी… माझ्या लेकरांना घर चालवण्यासाठी काम करावी लागणार.”
तिचे डोळे पाझरू लागले. विजयनं पुढे होऊन आईचे डोळे पुसले. पाठीवर हात फिरवून तिला सांत्वना दिली. अन् तिची समजूत घातली.
तो म्हणाला, “आम्ही इतके लहान नाहीयेआता. घर चालवायचं तर पैसे मिळवायलाच हवेत. कुठलंही काम हलकं मानून कसं चालेल.?.. आणि तिघं समजूतदार भावंडं कामाला लागली.
– – — – –
उन्हाचा चटका लागला तशी विजय एकदम भानावर आला.विचारात गुरफटून आपण गाडी बाजूला लावून फुटपाथवर बसून राहिलोय याची त्याला जाणीव झाली. आपण कित्ती वेळ वाया घालवला. अजून ‘बोहनी’ पण नाही झाली. मनात विचार येताच तो थोडासा खजील झाला… उठला… गाडी घेऊन पुढे जायला निघाला…
पण एकदम त्याला थांबावं लागलं. एका लाठीनं त्याची गाडी अडवली होती. लाठी वाल्याच्या केसाळ हाताकडे पाहून तो घाबरला. तो एका वर्दी वाल्या पोलिसाचा हात होता.
“काय रं पोरा, कसलं बारकं बारकं आंबं ठेवलंयस. “एक आंबा चाकूनं कापता कापता तो म्हणत होता.” पण बरं हाय. फळ गोड दिसतंय. चल दे “विजयच्या कानावर शब्द आदळले.
दर किंवा किती हवेत हे न विचारता विजय दचकून त्याच्याकडे पाहू लागला. ‘पुनश्च,… पुनश्च तोच प्रसंग समोर उभा ठाकला आहे याची थरकाप उडवणारी जाणीव त्याला झाली. ज्या प्रसंगानं त्याच्या लाडक्या बाबांचं आयुष्य संपवून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. त्याला त्या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊन द्यायची नव्हती. सावध, सजग होऊन पोलिसाकडे पाहून तो कसंनुसं हसला. खाली वाकून मोठ्या अनिच्छेनं त्यानं एक मोठा बॉक्स गाडीच्या कप्यातून बाहेर काढला…. त्यात थोडं गवत टाकलं… आणि एक एक आंबा काढून तो बॉक्समध्ये भरू लागला.
© सौ. सुनिता गद्रे,
माधव नगर. मो – 960 47 25 805
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈