जीवनरंग
☆ अखेर जमलं आमचं लेखिका – सुश्री अनिता मेहेंदळे ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆
एकदा घरात समजलं की माझे काही प्रेम बिम नाहीये.सो हिला मुलगा बघायला हरकत नाही.तेव्हा माझे नाव दोन तीन वधुवर सूचक मंडळात घातले.आईचे फोन चालू झाले तिथे ,पत्रिका शिक्षण घरची माहिती वगैरे वगैरे.त्यात एक स्थळ बरे वाटले म्हणून मग मुलाच्या घरी फोन लावला.मुलाचे वडील प्रसिद्ध नाट्य अभिनेता असल्याने त्यांचे प्रयोग बाहेरगावी असत. सो ते असतील तेव्हा शक्यतो मुलीला बघणे कार्यक्रम करू असा तिकडून निरोप आला.
अत्यंत बोअर अशी सकाळी ८,३० ची आणि रविवारची वेळ घेतली.मी साडी नेसणार नाही या विषयावर वाद झाल्याने आई आधीच चिडली होती आणि बाबांना सांगितलं होतं की तुम्ही उगीच फार बडबड करू नका.ते खूप बोलतात कारण.आणि मुलगा आवडला तर मी रुमालाची घडी घालीन आणि नाही आवडला तर रुमाल चुर्गळून टाकीन मग तुम्ही समजाल की किती वेळ बसायचं तिथे ते.
हे सगळं ठरवून आम्ही तिघे मुलाच्या घरी पोचलो .मुलाला बघून माझी विकेट गेली होती.त्याची आई खूप प्रश्न विचारत होती आणि त्या गोंधळात माझा रुमाल कुठेतरी पडला.
आता बाबांची मात्र झाली पंचाईत त्यांना कळेना की मुलगा आवडला का नाही.मुलगा इतका शांत होता आणि मी पहिल्यांदा च भेटल्याने मी नेहमी सारखी बोलत नव्हते.मुलींनी फार बोलायचं नसतं . शास्त्र अस्ताय ते …… बऱ्याच साधेपणानं कार्यक्रम झाला.निघताना आम्ही काय ते कळवू असे कोणीच कोणाला म्हटले नाही.
तिथून येताना या मुलाच्या घराजवळ आमचे एक जोशी नावाचे काका ओळखीचे होते.एक म्हणजे चौकशी पण होईल आणि उद्या मुलीशी बोलून तुला सांगतो असे ठरवून त्यांच्याकडे निरोप देऊन आम्ही घरी आलो.
घरी आधी रुमालाने दगा दिला आणि म्हणून मला काहीच कळू शकले नाही म्हणून बाबा चिडले होते.आणि मुला ने काहीच प्रश्न विचारले नाहीत म्हणजे नकार असणार हे आईनी पक्कं केलं होतं. पण मला मुलगा मनापासून आवडला होता. बाबांनी त्या जोशी काका ना आमचा होकार सांगितला फोन करून.नेमके त्याच दिवशी त्यांचे वडील आजारी झाले आणि त्यामुळे जोशी त्या मुलाकडे आमचा होकार न कळवताच गावाला गेले.
मुलाकडे आम्ही काहीच निरोप न दिल्याने मुलीकडून नकार असेल असे ते समजून गेले.मध्ये ३ दिवस गेले . कोणाचा च कोणाला काही निरोप नसल्याने हा विषय थांबला.
माझा मात्र संयम सुटत चालला होता. मी ठरवले की किमान नकार तर येऊ देत म्हणून मी मुलाच्या घरी फोन केला.मुलाच्या आईने फोन घेतला.मी वेगळं नाव ,मुलीचे नाव शिक्षण सांगितले.कधी येऊ आम्ही मुलीला घेऊन असे विचारले.तर तुम्ही २ दिवसांनी या.असे त्या बोलल्या.म्हणजे आम्हाला नकार होता हे ओघाने आलेच पण प्रयत्न सोडला नाही दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी फोन केला .मुलीचे नाव मधुरा आहे. लेले आडनाव आहे. आम्हाला पत्रिका बघायची आहे.तर ऊद्या येऊ का.आणि आम्ही बाहेर गावचे आहोत.सो नकार असेल तरी लगेच सांगा.म्हणजे आम्ही इथली पुढची मुलं बघू.तरी मुलाची आई ही हो हो करत होती.आपण परवा भेटू असे सांगून मुलाच्या आईने फोन ठेवला.आता मात्र मला रडू यायला लागले.
शेवटचा प्रयत्न करून बघू म्हणून मी रात्री ८ ला फोन केला.अपेक्षा अशी होती की ,,तो,, फोन घेईल.तर पुन्हा आईसाहेब च फोन वर.मग मी उगीच तुमच्या इथले जोशी आहेत ना त्यांचे आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. मुलगी पुण्यात असते आणि आम्ही दोघे नगरला असतो.आणि काहीतरी नाव ठोकून दिलं. पण परिणाम चांगला झाला ,लगेच त्याच दिवशी मुलाच्या आईसाहेब तिथल्या जोशी काकांच्याकडे गेल्या आणि ८ वाजता जो फोन केला त्यांची तुम्हाला काय माहिती आहे.आणि ते तुमच्या कशा ओळखीचे हे विचारू लागल्या तेव्हा ते म्हणाले, की मी नाही ओळखत कोण सांगताय त्यांना.त्या आधी जे अमुक तमुक होते, ते माझ्या परिचयाचे आहेत. मग माझ्या बाबांचे नाव सांगितले,तेव्हा ते म्हणाले की दुसऱ्या दिवशीच ते होकार सांगून गेले होते पण मी नेमका गावाला गेलो आणि निरोप देणे राहिले.
आता सगळी चक्र फिरली मग मुलाच्या वडलांचा आमच्या घरी फोन आला की जरा निरोपाचा गोंधळ झाल्याने आम्हाला काही समजले नाही. मुलाला पण मुलगी आवडली आहे तर एकदा भेटू.
एकदा कशाला मी तर माळ घेऊनच तयार होते.तरी शक्य तितके नम्र भाव ठेवून मी ‘तुम्ही म्हणाल तसं …’ असलं काही तरी उत्तर दिलं.
दुसऱ्याच दिवशी मुलाकडे गेलो .मला तर आपण काय भारी काम केलं याचा फील होता.पण मुलाची आई मात्र ,माझ्या आईला ,,अहो याचा की नाही जबरदस्त योग होताच लग्न ठरायचा .कित्ती फोन आले तुम्ही येऊन गेलात तेव्हापासून आणि माझ्याकडे बघत मीच सांगितलेली नावं आणि माहिती सांगू लागल्या. मला किती हसू आणि किती नको असं झालं. पण आमच्या स्मार्ट फादरांच्या लक्षात आले.त्यांनी घरी आल्यावर विचारलं की काय आहे भानगड? मग मी सगळं खरं काय घडलं ते बाबांना आणि आईला सांगून माफीसुद्धा मागितली.
याच मुलाशी पुढे लग्न झाल्यावर त्यालासुध्दा सगळं सांगून टाकलं. त्याची तर हसून हसून पुरती वाट लागली. त्यानंतर सुद्धा सासूबाई हा किस्सा पुन्हा पुन्हा सांगत असत आणि कित्ती हो डिमांड होता तुमच्या मुलाला म्हणून मी कौतुक करत असे .आणि नंतर जाम हसत असे.
विशेष टिप्पणी –
सून झाल्यावर काही दिवसांनी सासूबाई आणि सासरे यांना माझा हा कारभार सांगितला. सासरे खूप हसले पण सासूबाई मात्र जरा चिडल्या.( पुढे मात्र सगळे गोष्टीत सांगतात त्या प्रमाणे आम्ही सुखाने राहू लागलो.)
लेखिका – सुश्री अनिता मेहेंदळे
संग्राहिका – सुश्री पार्वती नागमोती
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈