सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ एका कर्जाची परतफेड – भाग १– सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆
डिसेंबरची एक थंड संध्याकाळ. हॉस्टेलमध्ये सात ते नऊ अभ्यासाची वेळ होती. वातावरणात एक सुखद शांती होती. दिवसभरच्या धबडग्यानंतर मी आरामखुर्चीत विसावले होते. पायांवर पातळशी वुलन शाल होती आणि हातात हर्मिनाब्लॅकचं`गोल्डन मून ऑफ आफ्रिका’ हे पुस्तक.
एवढ्यात वाटलं, दरवाजात काही तरी खुस-फुस चालू आहे. पुस्तकांवरून नजर न हलवता मी म्हंटलं `येस कम इन..’
रोहिणी आणि सुजाता घाबरत घाबरत आत आल्या.
`हं! बोला!’
दोघी एकमेकींच्या तोंडाकडे पाहू लागल्या. `अग, ब! म्हणजे सकाळी मनीऑर्डर आली, ते तर नव्हेत?’
होय! तेच. मनीऑर्डर घेऊन तिने ते पैसे लगेचच डेस्कमध्ये ठेवले होते. शाळेची बस चुकेल म्हणून.
`वेडीच आहे, माझ्याजवळ द्यायचे ना! तिला म्हणावं, नीट बघ. एखाद्या पुस्तकात ठेवले असतील.’
`संध्याकाळपासून आत्तापर्यंत सगळी पुस्तके, सगळ्या वह्या तिने पुन्हा पुन्हा बघितल्या. बिछाना, पेटी काही सोडलं नाही.’ सुजाता म्हणाली.
`ठीक आहे. जा तू! तिला माझ्याकडे पाठव.’ मी वैतागून म्हंटलं. इतका चांगला प्रसंग चालू होता पुस्तकात. यांनी सगळी मजाच घालवून टाकली.
दोघी जणी दरवाजापर्यंत गेल्या. रोहिणी जराशी थबकली आणिम्हणाली,
`आम्ही तिच्या रूममध्ये राहणार्या मुलींवर तर संशय येणार नाही ना?’ तिचा चेहरा मोठा करुण झाला होता. स्वाभाविकच होतं. बड्या बापाची बेटी होती ती.
`ते बघू या नंतर. तुम्ही तिला इकडे पाठवा.’
त्या दोघी गेल्या. आता मी रामकुँवरची वाट पाहत होते. सकाळी मनीऑर्डर घेताना तिचा सावळा चेहरा कसा प्रफुल्लित झाला होता, ते मी विसरले नव्हते. पुढच्या आठवड्यातच हायर सेकंडरी परीक्षेचा फॉर्म भरायचा होता. फॉर्म फीची रक्कम ४८रुपये तिचा शिपाई असलेला भाऊ एकदम पाठवू शकेल, यावर तिचा विश्वासच नव्हता. मॅडम म्हणाल्या होत्या, की फॉर्म फीची व्यवस्था होईल. नंतर हप्त्या-हप्त्याने पैसे परत देता येतील.
मला खरोखर तिचे पैसे घेणार्या, या नीच मनोवृत्तीच्या व्यक्तीचा भयंकर राग आला. अनुसूचित जातीतील मुलांना मिळणार्या शिष्यवृत्तीच्या आधारे ती आमच्या शाळेत शिकत होती. घराकडून दर महा येणार्या १०-१५ रुपयांमध्ये ती तेल, साबण, वह्या, पुस्तकांचा खर्च मोठ्या कुशलतेने भागवत असे आणि महत्वाचं म्हणजे तिच्या कपाळावर कधी आठी म्हणून नसे.
हे नुकसान मात्र खूप मोठं होतं. त्यामुळे तिच्या धैर्याचा बांध तुटून गेला होता.
१०-१५ मिनिटे झाली असतील. रामकुँवर दरवाजाशी उभी होती. साधी साडी. डोकं, हात पदराने झाकलेले. एखाद्या गाठोड्यासारखीच दिसत होती.
`तू स्वेटर नाही घातलास?’
`स्वेटर मी शाळेत जाताना घालते. रात्रंदिवस घातला, तर मळतो ना!’ तिने दबलेल्या आवाजात म्हंटलं.
हे उत्तरही नेहमीचच. पण कर्तव्य म्हणून मला कधी कधी टोकावं लागे. जास्त जोरात विचारलं असतं, तर म्हणाली असती, इथे चादर पांघरूनही काम भागतं, किंवा मग आमच्या गावाकडे इतकी थंडी असते, की त्यापुढे ही काहीच नाही. तिचं एक तत्व होतं. इथे कसं का दिसेना, शाळेतनीट-नेटकं, व्यवस्थित दिसलं पाहीजे.
`हे रुपये हरवल्याचं काय चक्कर आहे?’ मी मूळ विषयाकडे येत विचारलं.
अश्रूंचा महापूर पुन्हा उसळला. माझ्या सांत्वनेच्या शब्दानंतर तिने पुन्हा तीच हकिकत सांगितली. मी तिच्या निष्काळजीपणाबद्दल हळुवारपणे एक उपदेशाचा डोस तिला पाजला, पण तरीही समस्या आपल्या जागी तशीच होती. प्रश्न केवळ हरवलेल्या पैशांचाच नव्हता. पैशाची पुन्हा व्यवस्था व्हायला हवी होती. मी म्हंटलं, ’ फॉर्म भरायला अजून एक आठवडा आहे. तुझ्या भावाला पत्र लिहीलंस तर पोचेल नं?’
तिने आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहीलं. `आपण इथेही शोध घेऊच या!’ तिला आश्वस्त करत मी म्हंटलं. `पण तुझ्या भावाला वेळेवारी माहीत होणं गरजेचं आहे.’
`दीदी’, तिने थोडं थांबून म्हंटलं, `मी परीक्षा पुढल्या वर्षी देईन, पण घरून पुन्हा पैसे मागवण्याचा विचारही करू शकत नाही.’ आणि तीपुन्हा स्फुंदून स्फुंदून रडू लागली. ही समस्या तिच्यासाठी खरोखरच मोठी असणार, अन्यथा घराच्या बाबी ती कधी जिभेवर आणत नसे. सहनशीलता हे तिचं मोठं वैशिष्ट्य होतं. त्यामुळेच ती आपल्या मैत्रिणींमध्ये प्रिय झाली होती.
या वसतीगृहात दोन जागा आदीवासी आणि अनुसूचित जाती-जमातीच्या मुलींसाठी आरक्षित होत्या. माझ्यासाठी या मुली म्हणजे डोकेदुखीच होती. बिचार्या एकदम वेगळ्या वातावरणतून, वेगळ्या संस्करातून इथे आलेल्या असायच्या. या नव्या वातावरणात काहीशा विक्षिप्तासारख्या वागायच्या. कुणी आपला वेगळा ग्रूप बनवत. कुणी अॅडजेस्ट होऊ न शकल्याने भांडखोर बनत.
रामकुँवर या सगळ्यांपेक्षा वेगळी होती. ती सहावीत असताना आमच्याकडे आली. तिने लवकरच हे नवं वातावरण आपलसं केलं. तिची भाषा बदलली. रहाणी नीट-नेटकी झाली पण तिने आपली वेशभूषा बदलली नाही. आपल्या बरोबरीच्या मुलींशी कधी ईर्षाही केली नाही. आपल्या आनंदी स्वभावामुळे ती सगळ्यांची लवकरच लाडकी बनली.
तिला खोलीत परत पाठवून मीपुन्हा या समस्येबद्दल विचार करू लागले. सगळ्यात आधी विचार आला, तो म्हणजे खोल्या-खोल्यात जाऊन झडती घेण्याचा. परंतु तो विचार लगेचच सोडून दिला, कारण नोटांचे नंबर काही टिपून ठेवलेले नव्हते. मग त्याच त्या, असं कसं ओळखणार? या शिवाय झडती घेण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. मागच्या वर्षी राधिका त्रिवेदीचा वुलनचा बेबी सेट सापडत नव्हता. आठ दिवसानंतर शहरातून रोज शाळेत येणार्या तिच्या एका मैत्रिणीने तो परत केला. राधिकेने स्वत:च तो तिला दिला होता आणि ती विसरून गेली होती.
पण या गोष्टीबाबत आम्हाला अनेक पालकांच्या नाराजीच्या पत्रांशी सामना करावा लागला होता. रामकुँवरच्या खोलीत एक कलेक्टरची मुलगी होती, तर दोघी जणी एका सुप्रसिद्ध वकिलाच्या बहिणी होत्या. त्यांच्याबाबतीत ही फारशी चिंतेची बाब नव्हती, पण तिच्या जातीच्याच विद्यार्थिनी हे शत्रुत्व गावा-घरापर्यंत न्यायच्या.
१० -१५ रुपयांची गोष्ट असती, तर मीपण दिले असते, पण ५०रुपये खूप मोठी रक्कम होती. माझा पगार सगळा माझा नव्हता. घरात अनेक डोळ्यांच्या जोड्या त्याची प्रतिक्षा करत.
दुसर्या दिवशी मी सगळ्या नोकरांची फौज जमा करून विचारणा केली. पण सगळ्यांनी डोळ्यातून पाणी काढून आणि शपथा घेऊन अशी नाटकं केली, की मीच घाबरून गेले. मग मीस्वैपाकघरात सगळ्या एकत्र जमल्यावर रागावून एक भाषण दिलं. मग म्हंटलं, की चुकून किंवा चेष्टा करायची म्हणून, किंवा दुष्ट बुद्धिने का होईना, पण जर कुणी पैसे घेतले असतील, तर दोन दिवसातमाझ्या टेबलाव रआणून ठेवावे. याबद्दल कुणालाही काहीही कळणार नाही. माझ्यावर विश्वास नसेल, तर गुपचुप माझ्या टेबलावर ठेवून जा. मी त्यातच समाधान मानीन. दोन दिवस मोठ्या आशेत आणि उत्कंठेत सरले. मी खोलीच्या बाहेर बाहेरच जास्त वेळ राहिले, म्हणजे चोराला पैसे ठेवण्याची संधी मिळेल. पण निराशाच पदरी पडली.
तिसर्या दिवशी मी प्रिन्सिपॉल मॅडमकडे गेले. त्यांचा बंगला हॉस्टेलच्या परिसरातच होता. जेव्हा माझ्यापुढे काही समस्या निर्माण होते, तेव्हा मी त्यांच्याकडेच जाते. इतक्या मोठ्या चोरीची गोष्ट तशीही लपून राहणं शक्यच नव्हतं.
त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. मग रामकुँवरला बोलावून विचारलं की तिचं कुणाशी भांडण तर झालं नाही? किंवा कुणाला तिच्यबद्दल ईर्षा तर वाटत नाही? पैसे ठेवताना खोलीत कोण कोण होतं, आठवतय का?
तिने सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक दिली.
ईर्षेबद्दल विचारलं असता ती थोडीशी हसून म्हणाली, ‘माझ्याशी कोण ईर्षा करणार? आणि कशासाठी्?’
ती गेल्यानंतर मॅडम म्हणाल्या, `ही चोरी आहे. विशुद्ध चोरी. पैसे परत नाही मिळणार. लिहून ठेव. आता प्रश्न असा , की पुढे काय करायला हवं?’
क्रमश: १
मूळ लेखिका – सुश्री मालती जोशी
मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈