सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ एका कर्जाची परतफेड – भाग २ – सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले –  ती गेल्यानंतर मॅडम म्हणाल्या, `ही चोरी आहे. विशुद्ध चोरी. पैसे परत नाही मिळणार. लिहून ठेव. आता प्रश्न असा , की पुढे काय करायला हवं?’  आता इथून पुढे)

‘ती पुन्हा पैसे मागवायला तयार नाही.’ मी म्हंटलं.

‘ती तयार झाली,  तरी मी तिला मागवू दिले नसते. असा विचार करा, हा आपल्या संस्थेवर कलंक आहे.’  त्या म्हणाल्या.

`मग काय करायचं?  दहा –पंध्रा रुपयाची गोष्ट असती, तर…’

`तू पण दिले असतेस, होयनं?  मग मी नाही का देऊ शकणार?  पण हा काही समस्येवरील उपाय नाही झाला. बरं असं करा,  प्रार्थनेनंतर सगळ्या मुलींना थांबायला सांग. मी येईन.’

मी घाईघाईने हॉस्टेलवर परत आले आणि प्रार्थना हॉलचं निरीक्षण केलं. या महिन्यात प्रार्थना हॉलची जबाबदारी किरणवर होती. ती मोठ्या भक्तिभावानेसगळी तयारी करत होती. मोठ्या मॅडम येणार आहेत हे कळल्यावर तिने धूप-दीप पात्र आणखी चमकवली. दोन-चार उदबत्त्या जास्तीच लावल्या. भजन करण्यासाठी निशा आणि माणिकची निवड केली. त्यामुळे भजन जरा नीट ताला-सुरावर म्हंटलं जाईल. मॅडमचं काय सांगाव? कधी गुपचुप येऊन बसतील कळणारही नाही. कारण प्रार्थनेच्या वेळी कुणी तरी उठून त्यांना सन्मानाने बसवावं,  हे त्यांना आवडतनसे. नेहमी गुपचुप येऊन बसायच्या.

प्रार्थना संपल्यावर बघितलं,  मॅडम येऊन खिडकीत बसल्या आहेत. ती त्यांची आवडती जागा होती. त्यांनी तिथूनच बोलायला प्रारंभ केला. प्रथम या चोरीसाठी त्या सगळ्यांवर खूप रागावल्या. रामकुँवरच्या निष्काळजीपणाबद्दल तिलाही थोड्याशा रागावल्या. सदाचाराबद्दल एक चांगलंसं भाषण दिल्यानंतर म्हणाल्या, ` चोरी हॉस्टेलमध्ये झालेली आहे आणि चोर सापडला नाही. तेव्हा ही आपल्या सगळ्यांची सामुहिक जबाबदारी आहे. याचा दंड आपल्या सर्वांना द्यावा लागेल. सगळ्यात आधी तुमच्या दीदीला या दंडात सहभागी व्हावं लागेल. त्या असताना अशी घटना घडली, ही मोठी शरमेची गोष्ट आहे. माझी अशी इच्छा आहे, की त्यांनी दहा रुपये माझ्यापाशी जमा करावे.’

मुली अगदी स्तब्ध, शांत झाल्या. मला जरा तिरक्या मजरेने मॅडमकडे पहावसं वाटलं, पण हसू फुटलं, तर सगळा मुद्दामहून केलेल्या बनावाचा प्रभाव संपून जाईल.

`तुम्हा मुलींनाही या नुकसानीतला थोडा वाटा उचलावा लागेल. आपल्याकडे ७२ मुली आहेत. एक रामकुँवर आणि प्रायमरी स्कूलमधल्या मुली सोडल्या,  तर संख्या होते ६०. प्रत्येक मुलगी उद्या सकाळी आठ आठ आणे दीदीपाशी जमा करेल.’ आणि मग माझ्याकडे बघत म्हणाल्या, `उद्या नऊवाजेर्पंत माझ्याकडे पैसे आले पाहिजेत. दहा रुपये दंड मी भरेन. माझ्या अनुशासनात जरूर काही तरी कमतरता राहिली असणार, म्हणून आपल्याला अशी खोडी काढाविशी वाटली. मी आशा करते, की भविष्यात मला भारी दंड भरावा लागणार नाही.’

मॅडम जाताच मुलींच्यात खुसफुस सुरू झाली. कुणी मॅडमची प्रशंसा करत होतं, कुणी चोराला शिव्या-शाप देत होतं. कुणी कुणी ही रामकुँवरचीच चलाखी आहे असे म्हणत होत्या. कुणी कुणी हे अन्यायकारक आहे, असेही म्हणत होत्या पण मॅडमनी खरोखरच इतकी सुंदर व्यवस्था केली होती,  की दुसर्‍या दिवशी ९ वाजेपर्यंत सगळी रक्कम जमा झाली आणि रामकुँवरच्या फॉर्म भरण्यात कुठलीच  अडचण आली नाही.

त्या दिवशी मॅडमच्या भाषणानंतर रामकुँवरच्या चेहर्‍यावर विषादाचे जे ढग जमा झाले, ते हटले नाहीत. तिच्या चेहर्‍यावर नेहमी विलसणारा प्रसन्नपणा कुठे तरी लोप पावला होता. ती विझल्या विझल्यासारखी झाली होती. मॅडमनी आपल्या कल्पनेप्रमाणे सर्वांना सांकेतिक शिक्षा केली होती,  पण प्रत्यक्षात रामकुँवरच केवळ शिक्षा भोगत होती. असहाय्य मानसिक व्यथेने तिचं व्यक्तिमत्व करुण बनलं होतं. माझ्या अनुपस्थितीत मुली काही उपहासदेखील करत असतील, पण माझ्यापर्यंत काही तक्रार आली नाही.

जानेवारीच्या  दुसर्‍या आठवड्यात, दर महिन्याप्रमाणे तिच्या भावाची दहा रुपयाची मनीऑर्डर आली. तोच मालगाडीसारखा पत्ता.    

`मुक्काम इंदूरला पोचल्यावर…मेट्रनबाईसाहेबांकडून रामकुँवरला मिळावी.’

नेहमीप्रमाणे मी हसत हसत रामकुँवरला बोलावलं. तिने सही केली. नोट घेतली. पण आपल्या खोलीत न जाता तिथेच उभी राहिली.

मी नेहमीप्रमाणे टेबलवर हिशेबाचं रजिस्टर पसरून बसले होते.

`दीदी’ तिने माझं लक्ष वेधून घेतलं.

`काय?’

तिने काही न बोलता पैसे टेबलावर ठेवले.

`हे काय?’

`आपले पैसे. आपण माझ्या फीसाठी त्यावेळी दिले होते.’ ती चाचरत म्हणाली.

`वेडीच आहेस! अग, तो तर माझा दंड होता. तो काय कुणी परत देतं? ‘

`मला माहीत आहे,  तो कसला दंड होता. ती माझ्यासाठी वर्गणी गोळा केली जात होती. आपण माझे पैसे नाही ठेवून घेतलेत, तर मला खूप वाईट वाटेल.’

`तुला वेड लागलय. मला पैसे देऊन तू तुझा खर्च कसा चालवशील? आणि असं बघ, मी एकटीनं तर दिला नाही नं? बरोबर आहे नं?’

मी कदाचित तिच्या मर्माला स्पर्श केला. ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली. `सगळ्यांनी दिले. मला माहीत आहे. मी त्यांच्यासाठी काही करू शकणार नाही. त्यांच्या उपकाराची फेड कधीच करू शकणार नाही. दीदी,  आपल्याला कल्पना नाही,  मी या गोष्टीचा किती विचार करते. मी खरोखर कशाच्या तरी लायक असते…’

बाप रे! ही गोष्ट तिच्या मनात इतकी आतपर्यंत जाऊन बसली असेल, याची कल्पना नव्हती. योयोगाने मॅडम त्याच वेळी राउंडला आल्या होत्या आणि माझ्या खोलीच्या उंबरठ्याशी उभं राहून सगळं दृश्य बघतहोत्या.

`आता काय?’  माझ्या नजरेला नजर भिडवत त्यांनीविचारलं.

` या बुद्दूरामला समजावत होते. कशी बहकल्यासारखी बोलते आहे.’ असं म्हणत मी सगळी स्थिती समजावून सांगितली.

राउंड अर्धवट टाकूâन त्या माझ्या खोलीत येऊन बसल्या.

`रामकुँवर’  

`जी…’

`वाल्मिकी रामायण वाचलयस?’

`अं… नाही.’  ती म्हणाली.

मला आश्चर्य वाटलं. आता हे रामायण मधेच कुठून टपकलं. मॅडम विनाकारण तर काही बोलणार नाहीत.

`आणखी थोडी मोठी झालीस की जरूर वाच. खूप चांगलं काव्य आहे्. अनेक हृदयस्पर्शी प्रसंग त्यात आहेत. जसं हा एक प्रसंग! हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेऊन लंकेतून परत येतो,  तेव्हा श्रीराम गद्गद् होऊन म्हणतात, याच्या उपकाराची फेड कशी करावी?  त्यांना काही कळत नाही. शेवटी ते म्हणतात, ‘उपकाराचं ओझं वागवत राहणंच चांगलं, कारण जेव्हा आपण उपकाराची  परतफेड करू इच्छितो, तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे उपकारकर्त्यावर विपत्ती,  संकट येवो,  अशी कामना करतो,  कारण का, तर उपकाराची परतफेड करता येईल. म्हणून उपकाराच्या परतफेडीची भावना सोडून दिली पाहिजे.’

‘कळलं ना रामकुँवर!’  मॅडम बोलायचं थांबताच मी म्हंटलं. `आता असले मूर्खपणाचे विचार मनातून काढून टाक आणि आभ्यासाला लाग. यावेळी टेस्टमध्ये तुला कमी मार्क मिळाले होते. ही काही चांगली गोष्ट नाही.’

यावर काहीच न बोलता ती हळूहळू खोलीबाहेर पडली. मला वाटलं, मॅडमनी किती सुंदर शब्दात तिला समजावून सांगितलं,  कारण यानंतर हळूहळू तिचा चेहरा,  तिचा व्यवहार पहिल्यासारखा सहज होऊ लागला. तिचं मनमोकळं हसू हॉस्टेलभर गुंजत राहिलं. मलाही सुटका झाल्यासारखं वाटलं.

फेब्रुवारीत अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी लिव्ह सुरू झाली होती. तसंही फायनलला असलेल्या मुलींवर माझा जीव जरा जास्तच जडतो. या सुट्टीच्या काळात चांगलं रामराज्य स्थापन व्हायचं. दिवसाचे चोवीस तास तर अभ्यास करणं शक्य नसायचं. मोठ्या मुश्किीलीने त्या दोन वाजेपर्यंत अभ्यास करायच्या. मग तर्‍हेतर्‍हेचे नाश्ते बनत, किंवा मग मागवले जात. छोटी छोटी प्रहसनं,  नाटकं,  नकला होत. रामकुँवर नेहमी मोठा घुंघट ओढून एक लोकनृत्य करायची,  तेव्हा मुलींची हसून हसून पुरेवाट व्हायची. मला वाटलं,  ती आता वर्गणी एकत्र केल्याची गोष्ट विसरून गेलीय. पण तो माझा भ्रम होता. लवकरच ही गोष्ट माझ्या लक्षात आली.

छोट्या वर्गातली एक मुलगी कुठून कुणास ठाऊक गालगुंडाचा आजार घेऊन आली. बघता बघता वसतिगृहात अजाराची रिले रेस सुरू झाली. त्यासगळ्यांची सुश्रुषा करता करता  माझी आणि इतर स्टाफचीदमछाक झाली. खूप प्रयत्न करूनही आम्हाला प्रायव्हेट नर्स मिळाली नाही आणि सरकारी हॉस्पिटलच्या नरकात मुलींना पाठवायला मॅडम तयार नव्हत्या.

एक दिवस रामकुँवर मला म्हणाली, `दीदी,  मला आपली मदत करू द्या नं!’

मी नेहमीप्रमाणेच तिला मधुर असं फटकारत म्हंटलं, `तुझी परीक्षा डोक्यावर येऊन ठेपलीय. अभ्यासाठी तसाही वेळ पुरेसा होत नाही आणि तुला इन्फेक्शन झालं तर?’

`आपण इन्फेक्शनची चिंता करू नका. मी या बाकीच्यांच्या प्रमाणे नाही. मला आजपर्यंत कधी ताप आला नाही. राहिली अभ्यासाची गोष्ट. मला फर्स्ट क्लास आजपर्यंत कधी मिळाला नाही. आताही मिळणार नाही. सेकंड क्लासची गॅरेंटी देते.’

तरीही नकारार्थी मान हलवली,  तर ती धरणंच धरून बसली.

`ठीक आहे. मग मी पण अभ्यास करणार नाही. फेल झाले,  तरी चालेल.’

या अनोख्या जिद्दीची गोष्ट मॅडमच्याही कानावर गेली. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मग मला म्हणाल्या, `जया तिच्या अबोध मनात सगळ्यांसठी काही ना काही करण्याची इच्छा घर करून राहिलीय. तिचं मन मोडू नको. . तिला सांग, की तिने तिच्या वर्गातील मुलींना अभ्यासात मदत करावी.’

क्रमश: २

मूळ लेखिका – सुश्री मालती जोशी  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments