सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ एका कर्जाची परतफेड – भाग 2 – सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिले – या अनोख्या जिद्दीची गोष्ट मॅडमच्याही कानावर गेली. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मग मला म्हणाल्या, `जया तिच्या अबोध मनात सगळ्यांसठी काही ना काही करण्याची इच्छा घर करून राहिलीय. तिचं मन मोडू नको. . तिला सांग, की तिने तिच्या वर्गातील मुलींना अभ्यासात मदत करावी.’ आता इथून पुढे )
ही व्यवस्था सगळ्यांनाच आवडली. रामकुँवर जशी वॉर्डाचीच झाली. दिवसभर हिंदी, इंग्रजी, इतिहासाची प्रश्नोत्तरे वाचून दाखवायची. कुणी सांगितलं, तर सायन्समधला भागही पुन्हा वाचून दाखवायची. खरं तर तो काही तिचा विषय नव्हता. कधी कुणासाठी डेस्कमधली वही शोधून आणायची. कधी कुणासाठी लायब्ररीच्या पुस्तकातील काही भाग लिहून काढायची. याशिवाय जरा करमणूक म्हणून मासिकांचं वगैरे वाचन व्हायचं. औषध देणे, मोसंब्याचा रस काढून देणे, ताप बघणे, कपाळाला बाम लावणे याही गोष्टी साईड बिझनेसप्रमाणे चालू असायच्या.
परीक्षा सुरू होईपर्यंत सगळ्या बिछान्यातून उठल्या होत्या. तरीही आजारी असताना जो अभ्यास झाला होता, त्याचा खूपच आधार वाटत होता. जेव्हा त्या मुक्तकंठाने रामकुँवरला धन्यवाद देत, तेव्हा तिचा चेहरा आनंदाने फुलून यायचा.
२२ मार्चला परीक्षा संपल्या. मुली हॉस्टेल सोडून जाण्याच्या दोन दिवस आधी अश्रू आणि विषदात बुडून गेले. दर वर्षी मला या करुण प्रसंगातून जावं लागतं. मुलीची सासरी पाठवणी करण्याचं दृश्य डोळ्यापुढे येतं. पण चुकूनही मनात अशी इच्छा होत नाही की या नापास होऊन पुन्हा अभ्यासाठी इथे याव्या.
रामकुँवरने जाण्याची कोणतीच घाई दाखवली नाही. विचारलं, `दीदी मी तीन-चार तारखेला गेले तर चालेल?’
`माझी काय अडकाठी असणार? पण बोअर होशील. तुझ्याबरोबरीच्या सगळ्या निघून जातील.’
`जाऊदेत. मला हे जीवन पुन्हा कधी जगायला मिळणार, म्हणून जास्तीत जास्त इथे राहू इच्छिते’.
माझं मन भरून आलं. माझी सम्मती घेऊन तिने ४ एप्रीलला भावाला नेण्यासाठी पत्र लिहीलं. मग माझ्याकडे येऊन म्हणाली, `दीदी बाकीच्या मुलींच्या परीक्षा अजून व्हायच्या आहेत. मी त्यांच्या कामात थोडी मदत करू?’
`काय विचार करून मी तिला हो म्हंटलं कुणास ठाऊक? मग एक आश्चर्य माझ्यापुढे आलं. तीन पावलात पृथ्वी व्यापणार्या वामनाची कथा अनेक वेळा ऐकली होती. पण दोन हातात सगळं हॉस्टेल व्यापणारं आश्चर्य माझ्या डोळ्यांनी पाहू लागले.
प्रथम तिने हॉस्टेलचे सारे नियम लक्षात घेऊन आशाकडून भोजन कक्षाची, मीनाकडून प्रार्थना कक्षाची, सुलभाकडून घंटा देण्याची…. अशी सारी कामे आपल्या हातात घेतली. सकाळी पाच वाजता उठायची आणि रात्री साडे दहा वाजता घंटा देऊन झोपायची. लहान मुलींच्या वेण्या घालायची. बिछाने स्वच्छ करायची. नंतर टेबल, ड्रॉवर वगैरे ब्रासोने पॉलीश करायची. मग त्यांना हिशोब समजावत माझ्या खुर्चीच्या कव्हरवर भरतकाम करायची.
`अग, जरा आराम कर!’ मी म्हणायची. `घरी जाऊन आरामच तर करायचा आहे.’
खुर्चीचंकव्हर तयार झालं. खुर्ची झाडून पुसून तिने नवीन कव्हर घातलं. टेबलक्लॉथदेखील नवीन घातला.
मॅडम खूप दिवशांनी त्या दिवशी राउंडलाआल्या. बहुतेक कुठे तरी एक्झॅमिनर म्हणून गेल्या असाव्यात. माझ्या खोलीपुढून जाताना थबकल्या.
`जया काय आहे? तुझी खोली एकदम चमकतेय!’
`जी. हे सगळं रामकुँवरचं कर्तृत्व आहे. तिला भीती वाटली, की मी तिला विसरून जाईन, म्हणून माझ्या कपाटापासून दरवाजापर्यंत तिने सारी खोली आपल्या रंगात रंगवली. आता सकाळ संध्याकाळ तिची आठवण केल्याशिवाय इलाज नाही!’ मी म्हंटलं.
`व्हेरी गुड’ मॅडमनी तिच्या भरतकामाची प्रशंसा करत म्हंटलं. `पण दीदीवर मेहेरबानी आणि आमच्यासाठी काहीच नाही! खरं सांग, माझ्यापेक्षा यांचाच आरडा-ओरडा तुला जास्त ऐकून घ्यावा लागलाय नं?’ मॅडम हसत हसत म्हणाल्या.
रामकुँवर जशी संकोचाने धसून गेली होती. मग हळूच म्हणाली, `आपल्याला… आपल्याला काही देण्याचा विचार तर मी करूच शकत नाही!’
श्रद्धेने ओतप्रोत भरलेलं हे वाक्य ऐकून मॅडमनी तिला जवळ घेतलं आणि मिठी मारली. रुबाबदार गौरवर्णीय व्यक्तिमत्वापुढे तिचं बुटकं, सावळंसं शरीर मोठं गमतीदार वाटत होतं.
मॅडम दाटलेल्या गळ्याने म्हणाल्या. `आम्ही रामकुँवरला यासाठी लक्षात ठेवू, की तिने आम्हाला काहीच दिले नाही.’ आणि त्यांनी तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकले.
मॅडमना इतकं भावविव्हळ झालेलं मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं.
– समाप्त –
मूळ लेखिका – सुश्री मालती जोशी
मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈