सौ. दीपा नारायण पुजारी
जीवनरंग
☆ संगम… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
“ग्रॅनी, ग्रॅनी”, अशा हाका ऐकू आल्या आणि वंदनाच्या गळ्यात दोन लाडिक हात पडले. गळामिठी घालत इरानं वंदनाच्या गालावर ओठ टेकले.
“इथं काय करतीस? कम कम मीट माय फ्रेंड्स.”, म्हणत इरानं तिला ओढतच हॉलमध्ये आणलं. हॉलमधल्या प्रशस्त सोफ्यावर तिच्या दोन फ्रेंड्स बसल्या होत्या. वंदनाच्या मते पसरल्या होत्या. त्यांचे आधुनिक कपडे त्यांना पसरू देत नव्हते. तरीही त्यातल्यात्यात त्या पसरल्या होत्या. काव्या आणि सौम्या अशा नावांनी स्वतःची ओळख त्यांनी सांगितली खरी. पण आवाजात माधुर्य नव्हतं ना वागण्यात मार्दव. दोघींनीही ‘हाय’ म्हणून हात हालवला. वंदना देखील ‘हाय’ असं म्हणत एका बाजूच्या खुर्चीवर टेकली. त्या मऊ आलिशान खुर्चीवर बसताना ती थोडी सुखावलीच. पाठ आणि मान छान टेकवता येत होती. खांद्यांना रग लागत नव्हती. शिवाय खुर्चीची उंची अशी होती की तिचे गुडघेही कुरकुरले नाहीत. शेजारीच बसलेल्या माधुरीला ती म्हणाली देखील,” हा तुमचा सोफा छान आहे हो.” “आई,अहो सोफा नाही बरं,काऊच म्हणायचं.”, त्यांच्याकडं हलकेच हसून बघत माधुरीनं सांगितलं. वंदनानं हसून मान हलवली.
वंदना मुंबईत राहणाऱ्या आपल्या लेकाच्या, मोहनच्या घरी आली होती. आल्यापासून ती बघत होती. वंदना तशी सुशिक्षित होती, समंजस होती. हिरानंदानी संकुलातला हा फ्लॅट आलिशान होता. कोल्हापूरातील तिचं घर काही तसं लहान नाही. पण ते तसं साधंसुधं आहे. बाहेरच्या खोलीत ठेवलेल्या खुर्च्या उठता बसता तिच्या गुडघ्यांसारख्याच कुरकुरतात. तिला दाखवायला नेलं तेव्हा तर सतरंजीवर मांडी घालून बसली होती ती. इरा अशी खाली बसेल का? ‘मॉम आय वोंट. माझा ड्रेस स्पाॉईल होईल ना.’ इरावर चुकुन कुठं तरी खाली बसायचा प्रसंग आला तर ती कशी बोलेल या कल्पनेनं तिला हसू आलं. ओठांवर आलेलं हसू दाबून ती माधुरीला म्हणाली, “अगं यांच्यासाठी काही खायला आणते.” “आई,” माधुरी म्हणाली, “तुम्ही आणलेला चिवडा लाडू देऊ यांना. चला, मी पण येते.”
दोघी किचनमधे आल्या. वंदनानं डबा काढेपर्यंत माधुरीनं प्लेट्स काढल्या. फराळाचे पदार्थ छान मांडले. ट्रेमधून ते बाहेर गेले. सेंट्रल टेबलवर विराजमान झाले. चिवचिवाट करत त्या दोघींनी आनंदानं त्यांचा स्वाद घेतला. मग काचेच्या ग्लासमधून आलेल्या विकतच्या बाटल्यांमधल्या रंगीत सरबताचा रसास्वाद घेऊन त्या गेल्या. जाताना एकमेकिंना शेकहॅंण्ड देऊन, गळामिठी घालायला त्या विसरल्या नाहीत. वंदनाच्या गळ्यात पडून तिलाही चिवडा खूप टेस्टी होता सांगायला विसरल्या नाहीत. अंधार पडू लागला होता. पण ‘हा s s य’ ‘ बा s s य’, ‘सी यू टुमारो s s ‘ करत बाळ्या पळाल्या.
‘टेक केअर’, असं म्हणत माधुरीनं पसारा आवरायला घेतला. काही वेळानं वंदनाच्या लक्षात आलं की काव्या आणि सौम्याच्या आईचे मुली घरी पोचल्याचे मेसेजेस माधुरीला आले आहेत. पिढी बदलली, राहणीमानात बदल झाला, वागण्या बोलण्यात आधुनिकता आली तरी मनातली काळजी तीच आहे. वंदनाचे ओठ समाधानानं हसले.
रात्री जेवणं झाल्यावर ओटा-टेबल आवरताना वंदनाच्या शब्दकोशात भर पडली. किचन कॅबिनेट, बोऊल, स्पून, डस्टबीन, थ्रॅश. . .
दोन चार दिवसात तिचा शब्दकोश समृद्ध झाला. दोन चार दिवसात ती या जीवनपद्धतीला काहीशी सरावली. घरातील प्रत्येक सदस्याला स्वतंत्र खोली. अर्थात कपडेपट, कॉट, अभ्यासाचं टेबल, बाथरूम सगळंच स्वतंत्र. मोहनची दोन्ही मुलं आपापल्या खोल्यांमध्ये. मुलांना माधुरीनं तशी शिस्त चांगली लावली होती. सवयी चांगल्या लावल्या होत्या. पण एकूणच आधुनिकतेचं वारं वहात होतं.
शुक्रवारची सकाळ आली तसं विकेंड प्लॅनिंग सुरू झालं. शनिवार रविवार वेळ कसा घालवायचा याचा विचार. एक दिवस आऊटिंग!! घरातली चूल बंद. भटकंती, मूव्ही, ट्रेकिंग, रिसॉर्ट, वॉटर गेम्स् इ. इ. कधीतरी यायचं आणि उपदेश करत रहायचं. नको गं बाई. असा विचार करत वंदना या सगळ्यात सामिल झाली. जमेल तेवढ्यात सहभागी झाली. छोटा नऊ वर्षांचा नातू चिंटू तिच्या जास्त जवळ आला. दोस्तीच झाली त्याची आजी बरोबर.
ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलेला मोहन रविवारी रात्री परत आला. रात्री तो वंदनाच्या खोलीत आला. काहीतरी वेगळं सांगायचं असलं की आईच्या मांडीवर डोकं ठेवून सांगत असे. तो खोलीत आला तेव्हा चिंटू आजीच्या मांडीवर झोपला होता. वंदनानं ओठावर बोट ठेवून चिंटूला हळूच खाली ठेवलं.
“अरे व्वा! साहेबांनी माझी उशी पळवली वाटतं.”असं म्हणत त्यानं आईच्या मांडीवर डोकं टेकलं आणि काही न बोलताच तो झोपी गेला. त्याच्या चेहऱ्यावर शांत, समाधानी भाव होते. गप्पा मारत मारत झोपायची त्याला सवय होती. काल आल्यापासून तो बघत होता. बऱ्याच गोष्टींमधला बदल त्याला जाणवला.
संध्याकाळी जेवताना इरा आणि चिंटू टेबलवर जेवायला बसले होते. गरम गरम भाकरी,पिठलं, लसूण चटणी, भात असा साधा बेत. पण आजी बरोबर गप्पा मारत चवीनं जेवण चालू होतं. महत्त्वाचं म्हणजे टी. व्ही. बंद होता. इरा तिच्या शाळेत शिकवलेल्या कवितेविषयी सांगत होती. आणि चिंटू लक्ष देऊन ऐकत होता. जेवल्यानंतर आजीच्या पदराला हात पुसत चिंटूची गोष्टीसाठी गडबड सुरू झाली. इरा आईला ओटा आणि टेबल आवरायला मदत करू लागली.
माधुरीनं त्याला सांगितलं की, “आई आल्यापासून सगळे एकत्र जेवतात. शिवाय आजीला चालत नाही तर तू आजीसाठी करशील तेच आम्हालाही दे असा आग्रह धरतात. काही तरी जादू आहे हं आईंच्या कडं. आजीची आणि नातवंडांची गट्टी जमलीय अगदी.” माधुरीचा सूर थोडा चेष्टेचा असला तरी ती खूष होती हे लक्षात येतंच होतं.
बघता बघता वंदनाला मोहनकडं येऊन पंधरा दिवस झाले. आज ती परत जाणार होती. महालक्ष्मीसाठी घरातून बाहेर पडण्याची वेळ होईपर्यंत दोन्ही नातवंडं आजी भोवती फिरत होती. त्यांनी बाबांच्या कडून दिवाळीला कोल्हापूरला जायचं कबूल करून घेतलं होतं. आजीकडून शिवाजीच्या गोष्टी ऐकायच्या होत्या. किल्ला करायचा होता. इराला मोठी रांगोळी काढायला शिकायचं होतं. इथून पुढं प्रत्येक दिवाळी कोल्हापूरला साजरी होणार होती आणि मे महिना मुंबईत, हो. . पण दरवर्षी निदान एक तरी किल्ला बघायला जायचंच. . अशा अनेक नवीन गोष्टी पक्क्या वदवून घेऊनच वंदनाला कोल्हापूरला परतायची परवानगी मिळाली होती. या पंधरा दिवसांत आधुनिक राहणीमान आणि जुन्या सवयींचा प्रयत्नपूर्वक मेळ घालण्यात वंदनाला थोडंसं यश मिळालं होतं. दोन पिढ्यांचा संगम झाला होता. नातवंडांच्या साखरगप्पा आठवत वंदनाचा प्रवास सुरू झाला.
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
फोन नं : 9665669148 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈