डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ उथळ पाणी — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
काशीबाईंच्या चाळीत चार मजले होते. मध्ये मोठा चौक आणि चारी बाजूना तीन तीन मजली बिल्डिंग्ज.चाळ आता अगदी जुनी झाली होती आणि बरेच लोक ती सोडून दुसरीकडे रहायलाही गेले होते.अमोल आणि संध्या यांच्या खोल्याही अगदी लागून लागूनच होत्या. दोघांच्या शाळा वेगळ्या,वेळा वेगळ्या.अमोल नऊ वर्षाचा आणि संध्या सातची. अमोल अभ्यासात अतिशय हुषार ! संध्याला सतत म्हणायचा, “ किती उनाडक्या करतेस संध्या. देवाने चांगली बुद्धी दिलीय,तर वापर कर की तिचा. छान मार्क्स मिळव.”
संध्या मान उडवून म्हणायची, “ नको रे बाबा. मला कुठे स्कॉलर व्हायचंय तुझ्यासारखं? मी आहे अशीच बरी आहे. पोटापुरते मार्क्स मिळवून पास होतेय ना, बस झालं की.”
संध्याला आरशात बघण्याचा विलक्षण सोस. घरी असलेल्या पारा उडालेल्या आरशात सतरा वेळा, माना वेळावून बघणे आणि पावडर लावून नाना नखरे करणे, हाच छंद संध्याचा. संध्याची आई वैतागून जायची. बिचारी चार घरी पोळ्या आणि स्वयंपाक करून महिना कडेला न्यायची. संध्याचे वडील एका दुकानात साधे सेल्समन होते. अमोलची घरची परिस्थिती मध्यमच होती, पण संध्याइतकी वाईट नव्हती.
त्यादिवशी अंगणात खेळ अगदी रंगात आला होता. अमोल गॅलरीत उभा राहून बघत होता. संध्या भान विसरून खेळत होती .अमोलने संध्याला हाक मारून वर बोलावले.
“का रे बोलावलेस? किती रंगली होती आमची लगोरी.”
अमोल म्हणाला, “ एवढी मोठी झालीस तरी अक्कल नाही अजून. खुशाल मुलांच्यात खेळतेस? मूर्ख कुठली. एक तरी मुलगी आहे का बघ तुझ्या बरोबर? किती मूर्खपणा करशील संध्या? नीट अभ्यास कर. तोच येणार आहे आयुष्यात उपयोगाला. कधी समजणार हे तुला?”
“ तुला काय करायचंय रे ? माझं मी बघून घेईन.” संध्या मान उडवत म्हणाली.
मुलं मोठी होत होती. संध्या वयात आली आणि आणखीच सुरेख दिसायला लागली. अल्लडपणा मात्र तिळमात्र कमी झाला नव्हता. अमोल उत्तम मार्क्स मिळवून कॉलेजला गेला. त्याला हे चाळीत राहणे,सतत आयुष्याशी तडजोडी करणे झटकून टाकायचे होते. त्यासाठी एकच उपाय म्हणजे सपाटून अभ्यास करणे आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे. त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिवसाचे चोवीस तास कमीच पडत अमोलला. संध्याने आर्टस् ला प्रवेश घेतला. काहीच ध्येय नसताना आणि कोणतेही प्रयत्न न करता,कसे उत्तम मार्क्स मिळणार होते संध्याला?
अमोलला ती भेटली तेव्हा मनापासून हळहळला अमोल. “ काय हे मार्क्स संध्या ! अग, जरा लक्ष दिले असतेस तर सुरेख मार्क्स मिळून सायन्स ला नसती का मिळाली ऍडमिशन?”
संध्या म्हणाली, “ छे रे.कोण करणार ती मगजमारी.मी बरी आहे रे ! तू उगीच नको काळजी करू माझी.”
अमोल उत्तम मार्क्स मिळवून पवईला गेला. फार अभिमान वाटला, त्याच्या आई वडिलांना. आता अमोल मागे वळून बघणार नाही,ही खात्रीच झाली त्यांची ! अमोलने संध्याला गाठले, आणि म्हणाला,” आज येशील माझ्या बरोबर हॉटेलमध्ये? माझ्या रिझल्टची पार्टी करू आपण.”
… संध्या अमोलबरोबर आनंदाने हॉटेलमध्ये गेली. अमोलने तिला विचारले, “संध्या तू खूप आवडतेस मला. मी आवडतो का तुला? अजून आपण लहान आहोत, पण मोठे होऊन मी सेटल झाल्यावर लग्न करशील माझ्याशी?”
संध्या म्हणाली, “ काय ? लग्न ? आणि तुझ्याशी?.. काहीही काय…. माझ्या आयुष्याच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. तुला त्यात जागाच नाही. मी माझ्या रूपाच्या बळावर बघच कसा रिची रिच नवरा पटकावते ते… मला उबग आलाय या दरिद्री भिकार आयुष्याचा. आणि देवाने दिलेले हे रूप हीच माझी जमेची बाजू आहे. मी त्याचा वापर करणार आणि श्रीमंत नवरा पटकवणार. माझी स्वप्न पुरी करायला तुला सात जन्म लागतील. मी कधीही तुझा विचार करणार नाही लग्नासाठी. एका चाळीतून उठून पुन्हा दुसऱ्या चाळीतच जाणार नाही मी ! थँक्स फॉर पार्टी हं। पण तुला बेस्ट लक तुझ्या भविष्यासाठी.” — अमोलचा अपमान करून संध्या तिथून गेली.
अमोलने आपले लक्ष पूर्णपणे अभ्यासावर केंद्रित केले. स्कॉलरशिप टिकवायची तर त्याला उत्तम ग्रेडस मिळायलाच हव्या होत्या ना. त्याला संध्याच्या उथळपणाचा संताप आला आणि कीवही आली. आयुष्यात असे शॉर्टकट्स शोधून हिच्या हाती काहीही लागणार नाही, हे त्याने ओळखले. त्याने तिचा विचार मनातून काढून टाकला. अमोल बीटेक् उच्च श्रेणीत पास झाला. संध्या एव्हाना बी.ए.. होऊन कुठेतरी नोकरी करत होती. अमोलला खूप छान नोकरी मिळाली आणि अमोलने मोठा ब्लॉक बुक केला. अमोल आणि त्याचे आईवडील चाळ सोडून ब्लॉकमध्ये राहायला गेले. चाळीशी त्यांचा मग संबंधच उरला नाही. अमोल आता त्याच्या नोकरीत खूप व्यग्र होता.
काळाची बरीच पाने उलटली मग…….
अमोलने त्याच्याच कंपनीतल्या हुशार आणि इंजिनिअर असलेल्या मुक्ताशी लग्न केले. मोठी मोठी पदे भूषवीत अमोल आता एका मोठ्या कंपनीचा एम डी झाला होता.
त्याच्या कानावर गोष्टी येत होत्या पण चाळीशी त्याचा काहीच संबंध येत नव्हता. मध्यंतरी त्याने ऐकले, संध्याने एका गुजराथी मुलाशी लग्न केले,आणि खूप श्रीमंतीत ,सुखात आहे ती. अमोलला बरे वाटले, आणि संध्याचे स्वप्न पुरे झाल्याचा आनंदही त्याला मनापासून झाला. अमोलची मुलं मोठी झाली. मोठा आशिष उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला आणि मुलगी लग्न होऊन सासरी दिल्लीला गेली.
मध्यंतरी अमोलला मुंबईला कामानिमित्त जावे लागले. मुक्ता आणि अमोल दोघेही ऑफिसचे काम संपवून, फोर्टमधल्या पॉश हॉटेल मध्ये जेवायला गेले. पलीकडच्या टेबलावरची बाई त्यांच्याकडे निरखून बघत होती. तिच्याबरोबर तिचा नवरा असावा बहुतेक. न राहवून ती अमोलच्या टेबल जवळ आली आणि म्हणाली, “तुम्ही अमोल ना?”
“ अरे.. तू संध्या ना ? कित्ती वर्षांनी भेटतोय ग आपण ! मुक्ता,ही संध्या. आम्ही अगदी बालमित्र आहोत हं,चाळीत रहात होतो तेंव्हापासूनचे ! “
संध्याला भेटून अमोलला मनापासून आनंद झाला. संध्या मजेत दिसत होती. पक्की शेठाणी झालेली दिसत होती.भरपूर मेकअप,दागदागिने,लठ्ठ सुटलेले श्रीमंत शरीर.
“ या तुझ्या मिसेस ना? काय करतात या?”
मुक्ताला जरा राग आला ,पण ती म्हणाली, “ संध्याताई, मीही तुमच्या मित्राच्याच कंपनीत आहे हं।आम्ही दोघांनी आठ वर्षांपूर्वी, अमोल एक्स्पोर्ट-इम्पोर्ट कंपनी सुरू केली आहे.
संध्याचा नवराही एव्हाना त्यांच्याजवळ आला होता.
“ बाप रे ! ती इतकी मोठी इम्पोर्ट एक्स्पोर्ट कंपनी तुमची आहे? अमोलभाई, ग्रेटच. संध्या, अगं केवढे मोठे नाव आहे यांच्या कंपनीचे मार्केट मध्ये. खूप छान वाटले,तुम्हा दोघांना भेटून.” संध्याचा नवरा अगदी सरळपणे म्हणाला.
“असेल बाई! मला त्यातले काही समजत नाही. आपल्याला आज पार्टीला जायचंय, लक्षात आहे ना?आणि खरेदीही करायचीय अजून !” संध्याने दुर्लक्ष करत म्हटले, आणि निरोप घेऊन ती निघून गेली.
मुक्ताला अगदी संताप आला तिचा.
“अमोल, अशी काय रे ही तुझी मैत्रीण? कशी वागते बोलते. नवरा बिचारा बरा वाटला.”
अमोल हसत म्हणाला, “ मुक्ता,अशीच आहे ग ती लहानपणापासून.”
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈