डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ उथळ पाणी — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(“अमोल, अशी काय रे ही तुझी मैत्रीण? कशी वागते बोलते. नवरा बिचारा बरा वाटला.”
अमोल हसत म्हणाला, “ मुक्ता,अशीच आहे ग ती लहानपणा पासून.) — इथून पुढे —-
अमोलने मुक्ताला तिची आणि आपली सगळी हकीगत सांगितली. अगदी,मी तिला लग्नाचे विचारले होते,हेही त्याने खुलेपणाने सांगितले मुक्ताला.
मुक्ता हसली,आणि म्हणाली, “ अमोल कठीणच झाले असते तुझे.. ही तुझ्या आयुष्यात आली असती तर.. काय रे तो मेक अप आणि उथळ रहाणी. अमोल, पश्चाताप तर नाही होत ना, माझ्या सारख्या साध्यासुध्या मुलीशी लग्न केल्याचा?”
अमोल गंभीरपणे म्हणाला, “ मुक्ते,तू आयुष्यात आलीस आणि मला कळून चुकले की,संध्याला विचारणारा मी किती मूर्ख होतो ग त्यावेळी. पण ते काफ लव्ह ग. काही तरी समजतं का त्या वेड्या वयात? देवानंच वाचवलं बरं मला.”
मुक्ता हसली आणि म्हणाली, “ गम्मत केली रे. पण खरोखरच काही माणसे किती उथळ असतात ना… विशेषतः बायका ! मेकअप, साड्या, खरेद्या, पार्ट्या,,यापलीकडचं जगच माहीत नसतं त्यांना. बुद्धी, व्यवहार हेही आयुष्यात महत्वाचे असते, बाईला स्वतःची आयडेंटिटी हवीच, हे कसे रे लक्षात येत नाही त्यांच्या? मग आपण,आपली मुले फारच वेगळे आहोत .. यांच्या बेगडी जगापेक्षा.”
” नाही मुक्ता. तू फार सुंदर आहेस. किती साधी पण सुरेख राहतेस. काय सुरेख चॉईस असतो तुझा. माझे कपडेही तूच निवडतेस. परवा आपल्या ऑफिसमध्ये आलेल्या डेलिगेट्समधला परेरा विचारत होता
‘ सर,हा शर्ट फार सुंदर दिसतोय तुम्हाला. आणि मुक्ता मॅडम ची साडी काय सुरेख दिसतेय त्यांना’ .”
मुक्ता म्हणाली, “ बरं बरं !उठा आता. मैत्रीण बघून पोट जरा जास्तच भरले की काय? “
दोघेही हसतहसत हॉटेलबाहेर पडले.
अमोल मुक्ताची कंपनी खूपच सुंदर जम बसवू लागली होती. आता त्यांना कंपनी वाढवायची वेळ आली. रिक्रुटमेन्ट करताना, त्यांनी ऍड दिली आणि होतकरू हुशार मुलं इंटरव्ह्यूसाठी येऊ लागली. त्यांचे सीव्ही, जॉब एक्सपिरिअन्स बघून अमोल प्रभावित झाला. खरोखरच योग्य अशी सहा मुलंमुली त्यांनी शॉर्टलिस्ट केली. आता दोनच पोस्ट शिल्लक होत्या.
अचानक रिसेप्शनिस्टने कॉल करुन सांगितलं, “ सर, कोणीतरी संध्या कपाडिया म्हणून मॅडम तुम्हाला भेटायचं म्हणताहेत. आधी अपॉइंटमेंट घेतली नाहीये.”
अमोल म्हणाला, “ बाहेर कोणी आता नाहीये ना? मग पाठव त्यांना आत.”
संध्या ऑफिसमध्ये.. अमोलच्या केबिनमध्ये आली.
अमोलने अदबीने म्हटले, “ बस ना संध्या. काय काम होतं?”
संध्या म्हणाली, ” वावा! मस्तच आहे रे तुझा थाटमाट. छानच सजवलीय तुझी ही केबिन.”
“अग, कराव्या लागतात या गोष्टी संध्या. पण मी मात्र आहे तसाच आहे अजूनही. बरं, बोल. काही काम होतं का? “
“ अरे, परवा आपली भेट झाली ना, तर माझे मिस्टर म्हणाले, बडी असामी दिसते ही, तुझा मित्र.
आपल्याला आपला माल एक्स्पोर्ट करायला हे मदत करतील का? “
अमोल विचारात पडला.
“ कसले आहे तुमचे मॅन्युफॅक्चरिंग संध्या? मला मिस्टर कपाडियांशी बोलावे लागेल. “
“ हो हो जरूर. कधी पाठवू त्यांना?”
अमोलने त्यांचा सेल नंबर लिहून घेतला, आणि म्हणाला, “ मीच कॉन्टॅक्ट करीन त्यांना.”
अमोलने त्यांना फोन केला आणि त्यांच्या मालाची सॅम्प्लसही घेऊन यायला सांगितले. मिस्टर कपाडिया त्याला अजिबात आवडले नाहीत. ती त्यांची बोलण्याची पद्धत, सतत मी मी करण्याची वृत्ती त्याला मुळीच आवडली नाही. त्यांनी मशिनरीच्या पार्टसची आणलेली सॅम्पल्स त्याने ठेवून घेतली आणि म्हणाला , ” मी ही माझ्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडून तपासून घेईन आणि मगच त्याबद्दल बोलूया.”
लोचट हसत कपाडिया म्हणाले, ” काय साहेब ! कुठे एवढी बारीक झिगझिग करता? तुमचे कमिशन आपण जास्त देऊ की.”
अमोलला संताप अनावर झाला, पण तो आवरत अमोल म्हणाला, “ असे होणार नाही. तुमचा माल उत्कृष्ट असेल तर तसे समजेलच. या तुम्ही.”
अपेक्षेप्रमाणे कपाडियांचे पार्टस अत्यंत निकृष्ट होते. अमोल ते कधीही परदेशातच काय, पण इथेही कोणाला विकू धजला नसता. त्याने कपाडियाना ते परत घेऊन जायला सांगितले, आणि गोड बोलून आपली असमर्थता व्यक्त केली.
दुसऱ्याच दिवशी त्याच्या ध्यानीमनीही नसताना, अचानक संध्या त्याच्या केबिनमध्ये वादळासारखी घुसली.
अमोल अवाकच झाला तिला बघून.
“बस संध्या, बस ना.”
“ नको! तुझ्याकडे बसायला नाही आले मी. माझ्या नवऱ्याचा अपमान केलास तू काल? आमचे प्रॉडक्ट निकृष्ट आहे असे म्हणालास? आज आम्ही बाजारात केवढी पत राखून आहोत, आणि हेच पार्टस सगळीकडे विकले जातात, हे माहीत नाही का तुला? काय रे ? मोठा बिझनेसमन आहेस ना तू? उलट तुलाच मदत होईल म्हणून आम्ही हे प्रपोजल दिले तुला.”
अमोलला भयंकर संताप आला. “ संध्या ज्यात तुला काडीची अक्कल नाही, त्यात तू बोलूच नकोस.तुझ्या नवऱ्याने आणलेले प्रॉडक्ट अत्यंत भिकार आहे आणि ते कोणीही एक्स्पोर्ट करणार नाही. मला माझी एवढे वर्ष कमावलेली पत घालवायची नाहीये.”
संध्या आणखीच संतापली आणि म्हणाली, ” मी तुला नकार दिला म्हणूनच ना तू आता सूड उगवतो आहेस? असा इतका तरी काय मोठा झाला आहेस श्रीमंत? त्याहीवेळी बरोबरच होता माझा निर्णय.. तुला नाही म्हणण्याचा.”
आता मात्र अमोलला हसायलाच आले.
” संध्या, तुझ्यात काहीही बदल झाला नाही. आहे तशीच अजूनही महामूर्ख आणि पैशाच्या मागे लागलेली अत्यंत उथळ बाई राहिलीस. वयाबरोबर माणसाला समजूतदारपणा, गांभीर्य येते म्हणतात. पण तुझ्यात मात्र एक कणही नाहीये ते. मला राग नाही , पण कीवच येते आहे तुझी. अजून शहाणी हो. डोळे उघडून, मिस्टर कपाडिया नक्की काय करतात ते बघ. तू तर शिकली नाहीसच, पण निदान नवऱ्यावर आंधळा विश्वास ठेवू नकोस. त्यांना किती कर्जे आहेत, हा पोकळ डोलारा कधी कोसळेल तेही माहीत नाही, तरी तू मला दोष देतेस? खूप ऐकून घेतले आत्ता तुझे, पण ते केवळ आपण बालमित्र आहोत म्हणून. बस झाले. होती तशीच मूर्ख राहिलीस तू. जा आता.”
संध्याच्या चेहऱ्यावर राग, आश्चर्य, दुखावलेपण अशा संमिश्र भावना होत्या. पण अमोलने त्याकडे अजिबात लक्ष न देता, तिला ताबडतोब जायला सांगितले. त्यावेळी तिने नकार देऊन आपल्यावर उपकारच केले असेच वाटले त्याला.
शांतपणे त्याने मुक्ताला आपल्या केबिनमध्ये बोलावून, हा सगळा प्रकार सांगितला.
मुक्ता म्हणाली, “अमोल,अगदी उत्तम केलेस तू. जिवापाड मेहनत घेऊन आपण ही कंपनी उभी केलीय. असल्या लोकांकडे लक्ष देऊन तू तुझे मनस्वास्थ्य बिघडून देऊ नकोस. सोडून दे रे. हाही एक अनुभव यायचा होता तुला. अरे आपल्या म्हणवणाऱ्या लोकांकडून असेही धडे मिळायला हवेतच ना !”
अमोलने कृतज्ञतेने मुक्ताकडे पाहिले… “ किती शहाणी आणि समंजस आहेस मुक्ता तू.”
मुक्ता हसली आणि म्हणाली, “ बरं बरं. पुरे आता माझी स्तुती. चल आपण मस्त बाहेर जाऊया. तुला बरं वाटेल.”
“आम्ही आज लवकर जातोय. पुढच्या अपॉइंटमेंट्स उद्या घे “ असे रिसेप्शनिस्टला सांगून मुक्ता आणि अमोल ऑफिस बाहेर पडले.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈