जीवनरंग
☆ मळभ – भाग १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
मिथिलाचे हात यांत्रिकपणे काम करत होते, पण मन मात्र सैरभैर झालं होतं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली म्हणून मिथिला किचनमधून पटकन बाहेर आली आणि दार उघडून तिनं पेपर आत घेतला. टिपॉयवर पेपर ठेवताना, सवयीनं तिची नजर हेडलाईनकडे वळली. ‘ पंतप्रधानांची पाकिस्तानला ताकीद’, आणि त्याच्या बाजूलाच दुसरी बातमी आणि फोटो.. ‘सावनी सुमंत यांना नृत्य मयूरी पुरस्कार ‘ बाजूला हातात चांदीची मोराची प्रतिमा असलेला सावनीचा हसरा फोटो . हिरकणी या नृत्य नाटिकेतील उत्कृष्ट नृत्याभिनयाबद्दल, सावनीला हा विशेष पुरस्कार देण्यात आला होता.
हं, पेपर बाहेर ठेवायलाच नको, असा विचार करून तिनं तो चक्क आपल्या वॉर्डरोबमध्ये कोंबला.’ निदान सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांचा मूड खराब व्हायला नको.’
कालच लेकीची- नुपुरची आठवीची परीक्षा संपली होती. मग संध्याकाळी ती मैत्रिणींबरोबर सिनेमा बघायला गेली होती. सिनेमा संपल्यावर पावभाजी आणि आईस्क्रीम हादडून घरी पोचायला साडेदहा वाजले होते. सुट्टी लागल्यामुळे बाईसाहेब काही आज लवकर उठणार नव्हत्याच. दुसरा शनिवार म्हणून सौमित्रलाही सुट्टी होती.
मिथिलाला रात्री नीट झोप लागलीच नव्हती. पण सातला ती उठलीच. नुपुरच्या फर्माइशीनुसार नाश्त्यासाठी सँडविचची सर्व तयारी तिनं करून ठेवली. काकडी, कांदा, टोमॅटोच्या चकत्या, हिरवी चटणी टेबलवर नीट झाकून ठेवली. मिथिलाचे सासू-सासरे मॉर्निंग वॉक करून घरी येण्याची वेळ झाली होतीच. त्यांच्या चहाचं आधण ठेवावं म्हणून भांड्यात पाणी घ्यायला ती वळली आणि तिच्या डोळ्यांपुढे एकदम अंधारी आली. कशीबशी ती जवळच्या खुर्चीवर टेकली. तेवढ्यात सासू-सासरे घरात आलेच.
‘काय ग, बरं वाटत नाही का? चल आतमध्ये जाऊन जरा पड बघू. आराम कर, मी बघते चहाचं.’, असं म्हणत त्या तिला हाताला धरून बेडरूममध्ये घेऊन गेल्या.
त्यांच्या चाहुलीनं सौमित्र जागा झाला.
‘आई, काय झालं?’ म्हणत त्यानं मिथिलाला हात धरून बिछान्यावर झोपवलं.
‘ झोप झाली नसेल रे नीट टेंशनमुळे! आधीच खूप हळवी आहे ती!’
काल रात्री नुपुर घरी आली, तेव्हा मिथिलानं तिची तब्येत बरी नाही, असं तिला सांगितलं. त्यामुळे बाईसाहेबांचा मूड खराब झाला होता.कारण उद्या आई-बाबांबरोबर बाहेर पडून धमाल करायचा प्लॅन होता तिचा. परीक्षेच्या आधीपासून ठरलंच होतं मुळी त्यांचं. ‘दोन दिवस ताप येतोय, तुझी परीक्षा चालू होती म्हणून बोलले नाही , हे स्पष्टीकरण देताना मिथिलाचा चेहरा कावराबावरा झाला होता. पण परीक्षा संपल्याच्या आनंदात नुपुरच्या ते लक्षात आलं नाही.
असं काही होईल याची मिथिलानं स्वप्नातही कल्पना केली नव्हती. सावनीनं तिच्या वकिलामार्फत नुपुरला भेटण्याची मागणी केली होती. सावनी ही सौमित्रची पहिली बायको. सौमित्र मुंबईत राहणारा तर सावनी रतलाम.. मध्यप्रदेशची. सौमित्रच्या नात्यातल्या कोणीतरी स्थळ सुचवलं आणि हे लग्न जमलं. सावनी संगीत विषय घेऊन बी. ए. झाली होती आणि कथ्थकही शिकत होती. रंगानं गोरी, चारचौघांत उठून दिसणारी! ‘मला नोकरी करायची इच्छा नाही’, हे तिनं लग्नाआधीच सौमित्रला सांगितलं होतं. सौमित्र , मेकॅनिकल इंजिनिअर होता आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च अधिकारी. त्यामुळे बायकोनं नोकरी करावी, असा त्याचा आग्रह नव्हता. दादरला त्याचा चार खोल्यांचा प्रशस्त फ्लॅट होता. सौमित्र एकुलता एक मुलगा. त्याच्या आई-बाबांबरोबर एकत्र राहायची सावनीची तयारी होती.
कामानिमित्त सौमित्रला अनेकदा बाहेरगावी जावं लागत असे. मुंबईत असला तरी सकाळी साडेआठला तो कंपनीत जाण्यासाठी बाहेर पडायचा. घरी परत यायला आठतरी वाजायचे. कधीकधी त्याहीपेक्षा उशीर व्हायचा. शनिवार-रविवार मात्र सुट्टी असायची. मग दोघांची भटकंती चालायची. सावनीला मुंबई-दर्शन घडवायला सौमित्र घेऊन जायचा. कधी कारमधून, कधी ट्रेन तर कधी बस. सासू-सासरेही सूनबाईंचे लाडच करायचे.
एक वर्ष कसं उडून गेलं ते कोणाला कळलंच नाही. नव्याची नवलाई संपली आणि रूटिन सुरू झालं.
सौमित्रला प्रमोशन मिळालं आणि त्याच्या परदेश वाऱ्याही सुरू झाल्या. आठ-आठ दिवस तो घरी नसायचा. सावनीला मग कंटाळा यायचा. घरात सासूबाई पण सगळं करणाऱ्या होत्या. वरकामाला बाई होती. त्यामुळे सावनीला काम तरी किती असणार ?
एक दिवस दादरला बाहेर फिरता फिरता कथ्थक नृत्य मंदिराची पाटी दिसली आणि तिच्या मनात आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचा विचार आला. येऊन-जाऊन दीड-दोन तासच वेळ जाणार होता. बरं क्लासही चार ते सहाच्या वेळेत. तिला तेवढाच विरंगुळा,म्हणून घरात कोणी विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. सावनीचा क्लास सुरू झाला. सावनी अधून-मधून क्लासमध्ये किंवा मुंबईत नृत्याच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागली. अजून सुटवंग असल्याने सरावासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागला, तरी सावनीला ते जमत होतं. शक्य असेल तेव्हा, सौमित्र आणि त्याचे आई-बाबा कौतुकाने या कार्यक्रमांना हजेरीही लावत.दोन वर्षांनी सावनी कथ्थक विशारदही झाली. सुमंतसरांनी गळ घातल्यामुळे, तिच्या क्लासमध्येच ती नवीन विद्यार्थ्यांना शिकवायला जाऊ लागली. तिचा बराच वेळ क्लास आणि कार्यक्रम यातच जाऊ लागला.
आता सौमित्रच्या आई-बाबांना आपलं नातवंड यावं, असं वाटायला लागलं. सौमित्रलाही बाबा व्हायचं होतंच. त्यानं सावनीजवळ तसं बोलूनही दाखवलं. आणि लवकरच ती गोड बातमी आली. घरात आनंदाला उधाण आलं. सासू-सासरे, सूनबाईंचे आणखीनच लाड करू लागले, काळजी घेऊ लागले. सौमित्रही खूष होता. मुंबईबाहेर जाणंही तो शक्यतो टाळू लागला. सावनीचे डोहाळे पुरवण्याचा, तिला खूष ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू लागला. पण मध्येच ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटायची. ‘ या अवस्थेत कधीकधी बायका तऱ्हेवाईकपणे वागतात, मनावर ताणही असतोच ‘, असं आईनं म्हटल्यावर, त्याने याबाबत तिला फारसं छेडलं नाही.
सातव्या महिन्यात डोहाळजेवण झालं आणि सावनीचे आई-बाबा तिला बाळंतपणासाठी माहेरी घेऊन गेले. सावनीनं एका गोड छोकरीला जन्म दिला. सौमित्र , आई-बाबांसह लेकीला भेटायला लगेच रतलामला गेला. तिथून घरी परततअसताना वाटेतच, त्याला फोनवर, पुढच्या प्रमोशनची बातमी मिळाली. पंधरा दिवसांनी त्याला कंपनीच्या कॅनडाच्या युनिटमध्ये हजर व्हायचं होतं. मग सर्वानुमते बाराव्या दिवशीच बारसं करून घ्यावं, असं ठरलं. सगळी धावपळच होणार होती. पण बारसं थाटात पार पडलं. बाळाचं नाव ‘नुपुर’ ठेवलं. सावनी जरा नाराज वाटली,’ पण तू आता कॅनडाला जाणार नं’ असं तिनं म्हटल्यावर, त्याला पटलं. लेकीला लवकर भेटता येणार नाही, याचं त्यालाही वाईट वाटत होतंच. पण प्रमोशन कसं नाकारणार? पॅकेजमध्येही जबरदस्त वाढ मिळणार होती. ‘ पहिली बेटी, धनाची पेटी’, असं म्हणत सगळ्यांनीच आनंद साजरा केला. सौमित्र कॅनडाला रवाना झाला. वेळ मिळेल तसा फोन, व्हिडिओ कॉलवरून सावनी आणि नुपुरची खबरबात घेऊ लागला.
क्रमश: भाग १
© सुश्री प्रणिता खंडकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈