? जीवनरंग ❤️

☆ मळभ – भाग 2 ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(मागील भागात आपण पाहिले, – सौमित्र कॅनडाला रवाना झाला. वेळ मिळेल तसा फोन, व्हिडिओ कॉलवरून सावनी आणि नुपुरची खबरबात घेऊ लागला. आता इथून पुढे)

तीन महिने झाले की सावनी आणि नुपुर मुंबईला येणार होत्या. तिचा भाऊ आणि आई-बाबा  येणार होते पोचवायला. इकडचे आजी-आजोबा पण नातीच्या आगमनाच्या तयारीत गुंतले होते. पण त्याआधीच दोन दिवस फोन आला सौमित्रच्या  बाबांना. सावनीच्या बाबांनी त्यांना ‘तुम्ही लवकरात लवकर इकडे या, सावनीची तब्येत खूप बिघडली आहे. बाकी इकडे आल्यावर सांगतो. ‘ असं म्हणून फोन ठेवला. तात्काळद्वारे  रिझर्वेशन करून सौमित्रचे आई-बाबा दुसर्‍या दिवशी सकाळी रतलामला पोचले.

काय आहे ते बघून मग सौमित्रला  कळवू, असं त्यांना वाटलं पण ते तिथे पोचले तेव्हा सावनी घरी नव्हतीच. तिचे आई-वडील डोक्याला हात लावून बसले होते. काही न बोलता त्यांनी सौमित्रच्या बाबांच्या हातात एक चिठ्ठी दिली. ती सावनीची होती. ‘ मला डान्समध्येच करिअर करायचं आहे. त्यासाठी मी घर सोडून सुमंतकडे चालले आहे.’ चिठ्ठी वाचून सौमित्रचे बाबा एकदम खालीच कोसळले. सौमित्रच्या आईदेखील हतबुद्ध झाली. डाॅक्टरना बोलावलं, त्यांनी हार्ट अ‍ॅटॅकचं निदान करून सौमित्रच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितलं. सौमित्रला हे कळवणं भागच होतं. रजा घेऊन आणि तिकिट मिळवून दोन दिवसांनी तो रतलामला पोचला. त्याचा मित्र सलील त्याच्याबरोबर आला होता.तोच या सगळ्यांना मुंबईला परत घेऊन आला.

बाळाच्या अंघोळीसाठी बाई येणारच होती. थोडी खटपट करून स्वैपाकालाही बाई मिळाली. या धक्क्यातून सावरून नुपुरकडे दिवसभर बघणं, शिवाय बाबांचं पथ्य-पाणी, औषध हे सर्व सांभाळणं सौमित्रच्या आईसाठी खूपच अवघड काम होतं. पण या परिस्थितीत ते निभावणं भागच होतं. सौमित्रलाही हा आघात पचवणं सोपं नव्हतं. त्याची मनःस्थिती पार बिघडून गेली होती. त्यानं कंपनीकडे महिनाभर रजेसाठी अर्ज केला. कंपनीला कॅनडात त्याच्या जागी दुसर्‍या माणसाची नेमणूक करावी लागली. त्यामुळे कंपनीने त्याची रजा मंजूर केली पण प्रमोशन रद्द केलं.  नुपुरसाठी वेळ देता यावा म्हणून सौमित्रने इतरत्र नोकरी शोधायला सुरुवात केली. सात-आठ महिन्यांनंतर त्याला तशी नोकरी मिळाली. आठवड्यातून एक दिवस ऑफिस आणि बाकी घरून काम. त्यामुळे आईलाही थोडी स्वस्थता मिळाली.

पण दैव माणसाची सत्त्वपरीक्षाच घेत असतं. सौमित्रच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला. त्यांची ट्रिटमेंट सुरू झाली. नुपुरला पाळणाघरात ठेवायची वेळ आली. पण तिची तब्येत खूप नाजूक होती. ती वारंवार आजारी पडायची.मग तिच्यासाठी काही दिवस घरी बाई ठेवली.

सौमित्रची खूपच ओढाताण होत होती. मित्रांनी, नातेवाईकांनी दुसर्‍या लग्नाचा सल्ला दिला. पण आधीच्या कटू अनुभवामुळे त्याचं मन या गोष्टीला तयारच होत नव्हतं. शिवाय नुपुरला तो तळहाताच्या फोडासारखं जपत होता. तिला सावत्रपणाचा त्रास झाला, तर त्याला ते अजिबात सहन झालं नसतं.

सौमित्र आत्ताशी बत्तीस वर्षांचा होता. त्यानं एकट्यानं उभं आयुष्य काढावं हे त्याच्या आई-बाबांना देखील पटत नव्हतं.

‘सगळीच माणसं वाईट नसतात रे! शिवाय आम्ही थोडेच तुझ्या आयुष्याला पुरणार? आमच्या तब्येती या अशा! नुपुरलाही आईची गरज आहेच.’ असं हरप्रकारे समजावून त्यांनी त्याला परत लग्न करायला तयार केलं.

मिथिलाचं स्थळ सलीलनं, त्याच्या मित्रानं सुचवलं.

मिथिला त्यांच्याच एका मित्राची चुलत बहीण. बी. कॉम. झाली आणि लग्न ठरलं. एकुलता एक मुलगा इंजिनिअर, अमेरिकेत नोकरीला. आई-वडील पुण्यात. एका मध्यस्थामार्फत माहिती कळली, नाव ठेवण्यासारखं काही नव्हतंच. पण लग्नानंतर सहा महिन्यांनी अमेरिकेला पोचल्यावर खरी परिस्थिती उघड झाली. तो आपल्या मैत्रिणीबरोबर रहात होता आणि त्यांना एक मुलगाही होता. मिथिला भारतात परतली आणि दोन वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. सध्या ती घरीच ट्यूशन्स घेत होती. तिचे आई – वडीलही तिनं दुसरं लग्न करावं म्हणून प्रयत्नशील होते.

सलीलकडून एकमेकांची पूर्ण हकिकत दोघांना कळली होती. त्यानंतर अनेकदा फोनवर बोलून आणि प्रत्यक्ष भेटून सौमित्र आणि मिथिलानं लग्न करण्याचा निर्णय घेतला. मिथिलानं नुपुरला पोटच्या पोरीसारखंच वाढवलं. आईशिवाय तिचं पानच हलत नव्हतं. ती नुपुरची सख्खी आई नाही हे सांगूनही कोणाला पटलं नसतं. आई-बाबांचंसुद्धा ती प्रेमानं करत होती. सौमित्र आणि ती एकमेकांना समजून वागत होते.

आणि आता हा बाॅम्ब येऊन आदळला होता. 

सावनी सुमंतकडे पुण्यात निघून गेली. त्यानं मुंबईतून आपलं बस्तान पुण्यात हलवलं होतं. मुंबईत कार्यक्रमाच्या आणि  सरावाच्या निमित्ताने त्यांना एकमेकांचा सहवास घडला होता आणि जवळीक निर्माण झाली होती. तिचं नृत्यातलं आणि शिकवण्याचं कौशल्य त्यानं जवळून पाहिलं होतं. त्याच्या क्लासमध्ये मुलींना शिकवायला घरचीच आणि नृत्यनिपुण शिक्षिका मिळणार होती. सौमित्रशी घटस्फोट झाल्यावर त्यांनी लग्न केलं. पण आपल्या या व्यवसायात अडथळा नको, म्हणून काही वर्ष मूल होऊ द्यायचं नाही, यासाठी त्यांनी खबरदारी घेतली.

सहा-सात वर्षांत त्यांनी पुण्यात चांगलाच जम बसवला. पण सततच्या गर्भनिरोधक औषधांचा सावनीच्या गर्भाशयावर अनिष्ट परिणाम झाला होता. उपाय चालू होते, पण तिला मूल होणं अवघड होतं. काळ पुढे सरकत राहिला. नंतर आलेल्या कोरोनानं सगळं चित्रच पालटून टाकलं. दोन वर्षांत होत्याचं नव्हतं झालं. क्लास बंद ठेवावा लागला. ऑनलाईन क्लासमधून जेमतेमच पैसा मिळत होता. अशात कोविडनं सुमंतचा बळी घेतला. त्याच्या उपचारासाठी होती-नव्हती ती सर्व शिल्लक खर्च झाली. सुमंतच्या घरच्यांना हे लग्न फारसं पटलं नव्हतंच. त्यांनी सावनीशी असलेले जुजबी  संबंधही तोडून टाकले. मधल्या काळात सावनीचे वडीलही वारले होते. आई भावाकडे राहात होती. सावनी घर सोडून निघून गेल्यामुळे माहेरच्यांशीही संबंध दुरावले होते. सावनी एकटी पडली होती.

करोनाचं सावट ओसरल्यावर तिनं परत डान्स क्लास सुरू केला होता. तिच्या नृत्य नैपुण्यात काही उणेपणा नव्हता. म्हणूनच ती ‘नृत्य-मयूरी या मानाच्या पुरस्कारास पात्र ठरली होती. पण आता पहिली उमेद राहिली नव्हती. एकटेपणाची जाणीव प्रकर्षाने व्हायला लागली होती. म्हणून नुपुरच्या आधारासाठी तिनं चाचपणी सुरू केली होती.

नुपुरवर दुसर्‍या कोणी हक्क सांगणं ही कल्पनाच मिथिलाला सहन होत नव्हती. ती म्हणूनच अस्वस्थ होती. सौमित्रही गोंधळून गेला होता. नुपुरला हे सगळं कसं सांगायचं, हा तर खूपच मोठा पेच होता. पण सांगावं तर लागणारच होतं. त्यानं आपल्या मनाची तयारी केली होती.

नऊ वाजता नुपुर उठली. आवडता नाश्ता बघून तिची कळी खुलली. पण आईला बरं नाही हे कळताच, नाश्त्याची प्लेट हातात घेऊन, ती तशीच तिच्यापाशी गेली. मिथिलानं तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळयांना धार लागली. गोंधळलेल्या नुपुरला जवळ घेऊन सौमित्रनी तिला आधी नाश्ता करायला लावला. मग हळूवारपणे  त्यानं तिला सगळं काही सांगितलं. काही वेळ नुपुर स्तब्ध बसून राहिली. मग तिचे डोळे अश्रूंनी डबडबले, तिनं उठून सौमित्रचे हात घट्ट पकडले. त्याने तिला प्रेमाने कवेत घेतले. मग मुसमुसतच तिने मिथिलालाही मिठी मारली.

मग अचानक आपलं रडं आवरून ती सौमित्रला म्हणाली, ‘ बाबा, मी तयार आहे तिला भेटायला. असं कर ना तिचा मोबाईल नंबर आहे का? आपण इथूनच व्हिडिओ कॉल करूया. बघ ना नंबर मिळतोय का? तोवर मी आजी-आजोबांना पण इकडे घेऊन येते.  सौमित्र संभ्रमात पडला. तिचे वकिल फोनवर डायरेक्ट बोलायला देतील की नाही याची त्याला शंका होती.   

तेवढ्यात नुपुर आजी-आजोबांना तिथे घेऊन आली देखील आणि सौमित्रकडे नंबरची विचारणा करू लागली. मिथिलानं हळूच सौमित्रला आजच्या पेपरमध्ये आलेली बातमी सांगितली होती. त्याला एकदम शशिकांतची आठवण झाली. त्याचा हा आतेभाऊ प्रेस रिपोर्टर होता. सौमित्रनी त्याला फोन करून, सावनीचा नंबर मिळवायला सांगितला. पाच मिनिटात त्याचा मेसेज आला आणि सौमित्रनी फोन लावला. नुपुर तुला व्हिडिओ कॉल करतेय, एवढं सांगून त्यानं फोन नुपुर कडे सोपवला. नुपुर काय बोलणार याकडेच सगळ्यांचे कान लागले होते.

नुपुरचा व्हिडिओ कॉल सुरू झाला होता.

‘ सावनीमॅडम तुमचं अभिनंदन ! आपल्या तीन महिन्याच्या मुलीची पर्वा न करता, तिला सोडून जाणाऱ्या बाईला,’ हिरकणी’च्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळावा हे गौरवास्पदच आहे नाही का? मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मिथिलाच माझी आई आहे आणि मी तिची मुलगी. इतर कोणीही केवळ जन्म दिला म्हणून माझ्यावर हक्क दाखवू शकत नाही. आमच्या या कुटुंबात तुम्हाला कोणतंही स्थान नाही आणि यापुढेही मिळणार नाही. मला तुम्हाला भेटण्याची अजिबात इच्छा नाही. ‘

सावनीच्या हातून फोन गळून पडला होता. मिथिलानं अश्रू भरल्या डोळ्यांनी नुपुरला कवेत घेतलं होतं. सौमित्रही त्यांना सामील झाला. आजी-आजोबांचा आनंद डोळ्यांतून पाझरत होता. भरून आलेलं आभाळ मोकळं झालं होतं.

 – समाप्त –

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – प्रणिता प्रशांत खंडकर.

Mob. 98334 79845    Email.. [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments