सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ शिवोsहम्… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागच्या भागात प्रेम कथा लिहिणारी लेखिका, प्रेम कथा तिच्या पठडीतली कशी असावी हे सांगते…. आता पुढे)

३०—४० वर्षांपूर्वीची, सरू आणि विजयची प्रेम कहाणी माझ्या मनात अजून आहे. सरुने  हलकेच माळलेलं सोनचाफ्याचं पानासकट असलेलं फुल, चेहऱ्यावरचे लाजरे, बुजरे, काहीसे धुंद भाव आणि आतुरतेने त्या गावकुसाकडच्या पुलाखाली, खिशात हात घालून वाद घालणारा विजय. .या प्रेमात, लपून-छपून भेटी होत्या, चोरुन पाठवलेली पत्रं होती,चुंबने होती, धाकधूक होती, दु:खं होती,  घरच्यांनचा  विरोध होता,  वियोग ही होता!  पण तरीही ती  एक सफल प्रेम कथा होती. चारी अंगाने फुललेली  आणि विवाह बंधनात सुखरूप परिणती झालेली, सुरेख, गोजिरवाणी, स्वच्छ!

कल्पनांना एकसारखे धक्के बसत होते!  कधी कधी तर माझंच मला आतून ठकठकायचं.  हे सारे प्रवाह जुनाट, आऊटडेटेड वाटायला लागायचे.  माझे मलाच वाटायचे,  ज्या पिढीचं मी प्रतिनिधित्व करते, त्या पिढीच्या विचारांना, कल्पनांना, अनुभवांना आजच्या या नव्या बदलत चाललेल्या समाजाला खरोखरच काही महत्त्व आहे का? त्याहीपेक्षा काही उपयोग आहे का? आपण त्यांच्या पाठी की  पुढे आहोत? हा  एक गोंधळ वाढवणारा प्रश्न. पण मनाच्या एका अदृश्य पडद्यावर मला स्पष्ट दिसायची ती फक्त या नव्या समाजाची पाठच.  मीच आपली धावते त्यांच्या मागे.  माझ्याकडे जे काही थोडेफार आहे, त्याचं गाठोड घेऊन.  कधी कधी माझं मलाच ते जीर्ण, सुकलेलं, रसहीन, बेचव वाटते.  माझी प्रेम कथा तर अगदीच मुळमुळीत आहे असे वाटते. काही गरम मसाला नसलेलीच जाणवते.

प्रेमाचे रंग बदलत आहेत.  ते, अधिक उग्र, गडद डोळ्यांना सुखद वाटण्यापेक्षा, भयभीत,करणारे  रौद्र, भीषण, अचकट —विचकट झालेत. सूत्र प्रेमाचं आहे, गाभाही  प्रीतीचा आहे, पण ती मृदूता, तो मुलायमपणा कुठेतरी हरवलाय.

हे सगळं वाटायचं एक  कारण होतं.  अंतर्बाह्य ढवळून काढणारं,  हादरवणारं, धक्का देणारं, अगदी जवळच घडलेलं असं काही.  याच काळातली ती घटना.

त्याचं म्हणे तिच्यावर प्रेम होतं! वय वर्ष १९ . ती ही त्याच्याच वयाची. एकाच कॉलेजमधले, एकाच वर्गातले.  तिला तो आवडायचा म्हणे.  पण मित्र म्हणून.  तसे तिला मित्र खूपच होते.  ती होतीच छान!  आकर्षक,  गोरी, उंच,  सडपातळ, शिवाय हुशारही, पैसे वाली.  थोडक्यात अगदी सिनेमातल्या हिरोईन सारखी.  तशीच लांबलचक  गाडीतून यायची, शोफरने दार उघडल्याशिवाय गाडीतून उतरायची नाही. दिमाख, डौल होताच तिच्यात. 

त्याची नजर तिच्यावर गेली.  आणि त्याने ठरवलं,

” लग्न करायचं ते हिच्याशीच. नव्हे! ती आपली झालीच पाहिजे.”  तिच्या मनाचा विचार त्याच्या खिजगणतीतही  नव्हता.  ती दुसऱ्या कुणात गुंतली होती असेही काही म्हणता येणार नाही, पण त्याला मात्र ती सांगायची, अगदी विनवून विनवून,

” अरे मला तू आवडतोस! पण मित्र म्हणून.  मी काही तुझ्याशी लग्न वगैरे करणार नाही.”

त्याचे मित्रही त्याला चिडवायचे.  त्याची टिंगल करायचे.  त्याला आव्हान द्यायचे.  त्याच्या स्वप्नांना डिवचायचे.  तो तो त्याचा राग सळसळायचा.  अधिक चीड, अधिक संताप,  अधिक उद्रेक. टोकाची इर्षा. मनात अक्षरश: तांडव.

आणि एके दिवशी कॉलेजच्या आवारात ते घडलं. त्या कॉलेजच्या आवारातली जुनी वठलेली झाडंही थरथरली. किती युवा पिढ्या त्यांच्या छायेत वावरल्या  असतील! प्रेमाची कुंजनं, वियोगाचं कारुण्य, मनोभंगाची दुःखं, अश्रू सारं पाहिलं असेलच त्यांनी.  पिढ्या पिढ्यांच्या नात्यांचे, भावबंधांचे, अनुबंधांचे ते साक्षीदार होते. पण त्या दिवशी त्यांनी जे पाहिलं, अनुभवलं, त्यामुळे ते स्तब्ध झाले असतील.  मुळापासून कळवळले असतील.  त्यांची पानंफुलं मिटून गेली असतील. विदीर्ण झाली असतील.

तिचा आणि त्याचा बराच वेळ वाद झाला म्हणे! हिसका हिसकी झाली. तिने पाठ फिरवली  तरी त्याने तिचे हात खेचले.  तिने त्याला झटकलं. कडवट, कठोर तिरस्काराचे शब्द वापरले.  जळजळीत प्रतिकार केला तिने. त्याने डोळे विस्फारले.  छाती फुगवली. त्याच्यात बळ होतं.  शक्ती होती. त्याच्या नसानसात बेदरकारपणा  होता. संहार स्फुरत होता.  मग काही उरलं नाही. ना प्रेम ना ओलावा! ना दया ना करुणा. फक्त अहंकार, दुराभिमान, एक प्रचंड विकृत आत्मकेंद्रीतपणा.  सारं उपटून फेकून देण्याची वृत्ती.  एक विनाश.  एखाद्या प्रेमाचा फक्त एकच रंग.  लाल. लबलबीत, चिकट मनाची दुर्गंधी.

आता ती त्याचीही नव्हती आणि कुणाचीच नव्हती. सारं काही संपलं होतं.  उरल्या होत्या त्या फक्त चर्चा. सुरुवातीला दबक्या,  कळवळून केलेल्या आणि मग हळूहळू विरत जाणाऱ्या.  नव्हे! पुन्हा अशाच प्रकारच्या घटनांना बोथटपणे सामोऱ्या जायला लावणाऱ्या.

अशा साऱ्या पार्श्वभूमीवर, सामाजिक विकृतीच्या संदर्भात, माझी जन्माला येणारी प्रेमळ, लडिवाळ, हसरी रुसवी, राग —अनुरागाची प्रेम कथा एक सारखी हिंदकळत होती.  डळमळत होती. वास्तवतेच्या आणि अवास्तवतेच्या सूक्ष्म रेषेवर चक्क मरगळून गेलेली दिसत होती. 

एक दिवस सहज मनातलं कुणाजवळ तरी बोलावं म्हणून माझ्याच उमलत्या वयातल्या लेकीला मी म्हणाले,

” किती भयंकर घडलं नाही ग त्या कॉलेजमध्ये!”

तिच्या हातात भलं मोठं बर्गर होतं!  ते अख्खच्या अख्ख तोंडात घालतच तिने विचारलं,

” कशाबद्दल म्हणतेस मम्मी तू.?”

” अगं तुला माहित नाही? इतकं पेपरात रोज येत होतं ते! टीव्हीवरही तुम्हा कॉलेज तरुण— तरुणींच्या प्रतिक्रियांचाही कार्यक्रम झाला.  सूर हाच  होता, त्यानं तिची अशी हत्या करायला नको होतं. “नाही”म्हणायचा तिचा नैतिक अधिकारच होता.

” त्या दोन-तीन महिन्यापूर्वीच्या घटनेबद्दल बोलतेस का तू? काय मम्मी” अजुन तुझ्या डोक्यात तेच विचार आहेत? तू इतकी सेंटी होऊ नकोस. हे असं नेहमीच घडतं. एखादी घटना जरा जास्तच डिस्कस होते.  आजकाल हे काही नवीन नाही.  आधी प्रेमात पडायचं, फसवणूक झाली तर आत्महत्या करायची, नाहीतर तिचा किंवा त्याचा खून करायचा. सट्टॅक. फिनिश!  धिस इज लाईफ. आणि तू मला हेच का विचारतेस, त्याचाही मी अंदाज करू शकतेच. पण मी तुला सांगते, तू एवढा विचार नको करूस.  तुझी मुलं तशी नाहीयेत.  चांगली, विचारी, अभ्यासू, सरळ मार्गी सुसंस्कृत, आणि काय काय… तुला जशी हवी तशी आहेत. एवढं पुरे नाही का तुला?”

तिने ते भलं मोठं बर्गर संपवलं.  पाणी प्यायली आणि टीव्ही ऑन केला.  कुठला तरी इंग्लिश चॅनेल सेट करून त्यावरचं कार्टून पाहण्यात, ती पुढल्या काही सेकंदातच रमून गेली.

मी मात्र पहात राहिले तिचा कोरडेपणा. अलिप्तपणा. आपल्याच विश्वात मस्तपैकी रमायला लावणारा बिनधास्तपणा. 

सारं काही शांत झाल्यावर मी देव्ह्यारात  सांजवात केली. मंदपणे तेवणारी ज्योत, अन्  उदबत्तीचा संथ  सुगंध माझ्या डचमळणाऱ्या मनाला कुठेतरी आधार देत असल्यासारखं वाटलं. 

 मी पुन्हा घेऊन बसले, माझं अर्धवट राहिलेलं लिखाण. माझ्या कहाणीतल्या त्याला आणि तिला क्षणभर सुन्नपणे पाहिलं. मला त्यांच्याबाबतीत असं काही घडू द्यायचं नव्हतं पण  डोकं बधिर झालं होतं. शब्दसुद्धा सोडून गेलेत आपल्याला, असं वाटत होतं.  मी म्युझीअम मधल्या वस्तु जशा आपण कुतुहलाने पाहतो ना तशा सार्‍या घटनांना पाहत बसले.  माझ्या या कथेतल्या प्रेमिकांचा सारा अभिनिवेश जुनाट, मळका, गढूळ, धुळकट वाटला. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेले प्रेमाचे भावही अगदी शामळु वाटायला लागले.  एखाद्या कृष्णधवल चित्रपटातल्या नायक नायिके सारखे. केवळ गिमीक्स. वास्तवापासून दूर.अगदीच कृत्रीम. अनैसर्गिक.

पण का कोण जाणे! लिहूच नये  असेही वाटेना. या काळाचीच  प्रेमकथा मी  लिहावी का? वाचकांना तीच अधिक रुचेल. पण म्हणून, वास्तवाचा आग्रह धरुन समाजाला हे विकृत द्यायचं का? नाही.  हा  धुरळा जरा झटकता आला तर आतमध्ये अजूनही खूप काहीतरी शिल्लक आहे. जे मला जाणवत होतं. एक शांत, सुखावणारं, शीतल असं प्रेमरंगाचं मधुर मिश्रण!  तेच उलगडून दाखवायची गरज आहे. फक्त भडक, गर्द डोळ्यांना, केवळ रुद्रताच भासवणाऱ्या रंगात ते मिसळायला हवं, म्हणजे भीषणतेची, रौद्रतेची दाहकता कमी होईल. प्रेम म्हणजे नक्की काय असतं, याचा अविष्कार झाला पाहिजे. प्रेम म्हणजे हत्या नव्हे. प्रेम म्हणजे त्याग..

मी पुन्हा लेखणी हातात घेतली.  माझी प्रेम कथा सुंदर, स्वच्छ ,निर्मळ शब्दांची गुंफत गेले. मोगर्‍याच्या गजर्‍यासारखी. रुसणं, फुगण,! राग अनुरागात बांधलेली.  संहारापासून तर कितीतरी दूर. फक्त भावबंध जपणारी, गोड, मिठ्ठास. हातात हात गुंफणारी. जन्मोजन्मीची. साथसोबतीची.

मनाच्या गाभार्‍यात सहज एक ध्वनी घुमला.

कोहं? शिवोsहं!

शिव म्हणजे सुंदरही आणि संहारकही.

मला सुंदर लिहायचं होतं आणि संहारही करायचा होता.

विकृतीचा. अनैतिकतेचा, ओंगळतेच्या वास्तवाचा.

  – समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments