जीवनरंग
☆ कडुलिंबाची फांदी… ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆
“हे घे अमृता” म्हणत त्यांनी लोणच्याची वाटी त्या भगदाड पडलेल्या भिंतीवरून दिली. हसत त्या अमृताला म्हणाल्या, “काय ग, वर्ष झालं असेल नाही का आपल्या मैत्रीला?”
अमृता म्हणाली, “नाही, वर्ष नाही झालं. पण होत आलं असेल. मागच्या लॉकडाऊन नंतर त्या तुफान पावसात पडलेली ही भिंत आणि मग दिसणारे आपले चेहरे.”
काकु म्हणाल्या,” कधी मन एकरूप होत गेले कळलंच नाही. पण बरं त्या कोरोनाच्या दुष्ट काळात जरा सोबत असल्यासारखं वाटलं. गप्पांमुळे मन मोकळं होत राहीलं ना. एकतर सगळेच घाबरत होते एकमेकांकडे जायला आणि फोनवर पण तोच विषय. कोरोनाचा. त्यापेक्षा आपलं मस्तच जमलं. दुपारी दासबोध काय, संध्याकाळी रामरक्षा, आणि तू ही तुळस इथे ठेवलीस हे बरं केलंस. तुझं माझं अंगण जोडलं ना तिने. पण परत तुझं ऑफिस, मग भेटी कमी झाल्या पण ओढ कायम हं.”
त्यांचं वाक्य तोडत अमृता म्हणाली, “आणि ह्या खाऊने तर अजूनच लज्जत वाढवली जगण्याची. किती चव आहे काकु तुमच्या हाताला. मला एकदा घरी येऊन गरमगरम पोटभर जेवायचं आहे तुमच्या हातचं. पण अजून घरी येण्याचे काही योग दिसत नाहीत. तुमच्या त्या रस्त्याचं काम किती रखडलं आहे. तुम्ही कसं करता काही लागलं तर?”
काकु म्हणाल्या, “अग लागतंच किती दोघांना, आणि फोनवर मागवतो किराणा, भाजीपाला, दूध. आम्ही कुठे जात नाही आणि इथून तुझं घर मला बऱ्यापैकी दिसतं. माझंच ह्या भिंतीआड असल्याने लक्षात येत नसेल तुझ्या. थोडं खोलवर पण आहे ना आमचं घर. जाऊ दे आपले चेहरे दिसतात हेच खूप आहे…”
“हो ना काकु, आणि माझे डोहाळे तुम्ही ह्या चार महिन्यात हा खाऊ देऊन पुरवत आहात, मला तर आईच्या रुपात भेटल्या तुम्ही.”
हे असं सगळं चालु होतं आणि पाडव्याची चाहूल लागली. पलीकडची काकूंच्या घराची योजना नेमकी लक्षात येत नव्हती, पण एक कडुलिंबाची फांदी काकूंच्या डोक्यावर होती. अमृताने आदल्या दिवशीच सांगुन ठेवलं, “काकू, उद्या ती फुलं असलेली फांदी मला द्या हं तोडून.” काकूंनी फक्त फांदीकडे बघितलं आणि काहीच बोलल्या नाहीत.
सकाळी सकाळी अमृताने सुंदर रांगोळी काढली, सुंदर जरीची साडी नेसली. नवरोबा सुद्धा तयार झाले. मंद मोगऱ्याचा गजरा केला. गुढी उभारताना सुंदर जरीच्या साडीवर गाठी, गजरा सगळं घातलं आणि कडुलिंब राहिला की!
अमृताच्या लक्षात आलं तशी तिने भिंतीकडे हाक मारली, “अहो काकू, मला तेवढी कडुलिंबाची डगळी द्या ना. माझी गुढी उभारणं थांबली आहे.”
काकूने, “नाही जमणार गं ..” असं उत्तर दिलं आणि अमृताला संताप आला, “अरे काय कमाल आहे ह्या काकूंची. ह्यांना आवडतात म्हणून मोगऱ्याची फुलं रोज देते मी ह्यांना. तुळस त्यांना प्रसन्न करते म्हणून मी ती दोघींच्या मधल्या भिंतीवर ठेवली आणि ह्या एवढी छोटी गोष्ट का देत नाहीत.”
तिची ही बडबड ऐकून नवरा तिला म्हणाला, “अगं, तू जरा शांत हो. नसेल जमत तोडायला त्यांना. म्हणून लगेच, तू केलेल्या उपकारांची लिस्ट काय वाचतेस तू. त्या मोठ्या आहेत वयाने. तुझे तर किती लाड करतात, आणि तू एवढ्या छोट्या गोष्टीवरून लगेच त्यांना वाईट ठरवतेस?? बघू,मी शोधून आणतो.”
अमृता म्हणाली, “नाही. तू थांब. अरे आपल्या कॉलनीत झाडच नाही आहे कडुलिंबाचे. माझं सर्व सर्च करून झालं आहे दोन दिवसांपासून, मॉर्निंगवॉकला गेले होते तेंव्हा. म्हणून तर ह्यांना सांगून मोकळी झाले. चांगल्या ठसठशीत तर दिसतात. एक लांब कडी घेऊन जरा टाचा वर केल्या कि तोडू शकतील त्या फांदी.”
नवरा म्हणाला, “वाद नको, आणि ह्या छोट्या गोष्टीवरून संबंध सुद्धा खराब करू नकोस. जोडायला वेळ लागतो, तोडायला नाही. चल काही बिघडत नाही कडुलिंब नसेल तर. गाठी आणि आंब्याची पानं आहेत ना. तीच बांधू.”
अमृता दिवसभर डोक्यात राग घेऊन होती. आज खरंतर काकु तिला बासुंदी पुरी देणार होत्या. त्यांनी हाक मारली पण अमृताने दारच उघडलं नाही. तिच्या नवऱ्याला मात्र हे वागणं पटलं नाही, आणि काकुंचंही कारण कळेना. खरंच थोड्या उंचीवर ती फांदी होती.
दुपारी जेवण आटोपल्यावर त्याने अमृताला बळेच बाहेर काढलं आणि तो काकूंच्या कॉलनीकडे वळला. रस्त्याच्या कामामुळे तसं चालणं अवघड होतं, पण त्याला भीती होती सोक्षमोक्ष जर झाला नाही तर गैरसमजाच्या जाळ्यात हे नातं अडकून संपून जाईल.
अंदाज घेत ते त्या जुन्या इमारतीत शिरले. अमृता म्हणाली “कशाला जायचं पण आपण. त्यांनी कधी बोलवलं नाही आपल्याला..”
त्यावर तो म्हणाला, “अमृता, अगं खाल्ल्या मिठाला तरी जाग. ज्या काकू तुला घासातला घास देतात त्या काकु एका छोट्या गोष्टीला तुला नाही म्हटल्या तर तू इतकी विरोधात गेली त्यांच्या. असा स्वभाव जर राहिला तर आयुष्यात आपण माणसं जोडू शकणार नाही गं. माझ्या आईने मला सांगितलंय कि, कोण्या माणसाचा कधी राग आला तर त्याने आपल्यासाठी जे चांगलं केलं ते आठवायचं.”
बोलत बोलत ते वरच्या मजल्यावर गेले. जरा पडका जुना जिना होता. जुनं कुजलेलं लाकूड असलेली बाल्कनी, त्यात प्लास्टिकच्या डब्यात हिरवागार मरवा सजला होता. दाराशी रांगोळी नव्हती. ‘एवढा सण पण साधी रांगोळी काढली नाही. नुसतं आपल्याला शहाणपण शिकवतात ह्या’ असं अमृताच्या मनात पण आलं.
“काकू” म्हणत दोघांनी हाक मारली. दरवाजा बंद होता. कडी वाजवली तरी बराच वेळ लागला दरवाजा उघडायला. दरवाजा उघडला पण समोर कोणी दिसलं नाही.
एकदम खालून आवाज आला, “या या. अहो, लेक आणि जावई आलेत.” म्हणत त्यांनी बाजेवर पडलेल्या काकांना हाक मारली आणि त्या खरकत खरकत बाजेकडे गेल्या.
अमृता आणि तिचा नवरा सुन्न होऊन बघत होते. काकूंना गुढग्यापासुन पायच नव्हते.
काका खूप आजारी दिसत होते पण खोलीत प्रसन्नता होती. छोटयाशा देवघरात छोटी गुढी उभी होती. लहानसा दिवा तेवत होता.
अमृताला रडूच आलं आणि ती काकूंच्या गळ्यात पडून रडायला लागली. काकूंनी तिला रडू दिलं. डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, “दोन वर्षांपूर्वी पोरगी गरोदर राहिली. तिला डोहाळजेवणाला आणण्यासाठी मी गेले आणि येताना अपघातात माझे पाय गेले आणि माझी पोटूशी पोरगी जागेवरच गेली गं.
ह्यांच दुखणं खूप जुनं. त्यात मी अशी झाले. निराशेचे ढग दाटले, पण पालवी फुटावी तशी तू जीवणात आली. कदाचित देवाची मर्जी.
तुला हे सगळं सांगावसं वाटत होतं. पण ओळखीनंतर तू काही दिवसात गोड बातमी दिलीस. मग वाटलं आता काही सांगितलं तर तू दयाळू नजरेने बघशील. काही दिला खाऊ तर तो तुला मला होणारा त्रासच वाटेल. कदाचित तू जसं हक्काने सांगत होतीस ‘मला हे खावं वाटतंय’ तसं तू बोलली नसतीस. मला माझी लेक दिसते ग तुझ्यात. हे काय तुझ्या डोहळजेवणाची हळूहळू तयारी करतेय.” म्हणत काकूंनी पुठ्ठ्याचे हरिण बनवलेले दाखवले. “बघ हरणाच्या गाडीत बसवते तुला.”
आता तर अमृताच्या नवऱ्यालाही रडू आलं. काका निपचित पडून होते पण ते तोडके मोडके शब्द जोडत बोललेच, “आयुष्यात कितीही संकटं आली तरी हिच्या आनंदाची, उत्साहाची, चैतन्याची गुढी कायम उंच असते. म्हणून तर कठीण काळातही ती छान जगते.”
काकूंनी पटकन दोन वाट्यात बासुंदी दिली. काकूंचं ते पाय नसतानाही सहजतेने जगणं अमृता आणि तिच्या नवऱ्याला पुढच्या जगण्यासाठी खूप काही शिकवून गेलं होतं. “काकू, आज खरा गुढी उभारण्याचा अर्थ कळला हो. खरंच आभार तुमचे.”
काकू म्हणाल्या, “आपल्यातील आत्मविश्वास असा उंच ठेवायचा. स्वतःच्या मनाला असं आनंदाचं रेशीम वस्त्र गुंडाळत रहायचं. आपल्या ऊर्जेची गुढी मग लहरत राहाते.”
दोघे निघाले. काकू निरोपासाठी दरवाज्याकडे येणार तेंव्हा अमृता म्हणाली, “मागूनच या आपल्याच जागी. दासबोधाची वेळ झाली ना.
“हो ना!” म्हणत काकू खरंच मागच्या दरवाज्यात गेल्या. दगड रचून केलेल्या खुर्चीवर अश्या जाऊन बसल्या. अमृताला वाटलं आपण फक्त तो हसरा चेहरा बघत होतो. आता कळलं, हि गुढी किती अवघड मार्गातून तिथे सज्ज असते.
तिने काकूंच्या देवघरातील गुढीकडे बघितलं. कुठलाही थाटमाट नसताना गुढी छोटीशी पण प्रसन्न आणि आंनदी दिसत होती.
अमृताने दिलेलं छोटंसं मोगऱ्याचं फुल सगळा आसमंत दरवळून टाकत होतं. अमृताला जणू सांगत होतं, तू ही आता ह्यांचं आयुष्य दरवळून टाक.
© स्वप्ना अभिजीत मुळे (मायी)
औरंगाबाद
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈