जीवनरंग
☆ 🔸 ऐसे हळूवारपण 🔸 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझी एक लग्न झालेली मैत्रीण सुमती, तिच्या घरी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो. नागपूरचे उन्हाळ्याचे दिवस. कडक उन्हाळा पण कुलरमध्ये आम्हाला दोघीनाही घुस्मटल्यासारखं व्हायचं, म्हणून चक्क खिडक्या उघड्या ठेऊन आम्ही पंखे लावून बसायचो.
ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अध्यायात सांगतात,’ अध्यात्म शिकायला पाहिजे ते ‘चकोर तलग्यासारखं’ – चकोराच्या पिल्लासारखं! त्याप्रमाणे हळूवार मन करून ही कथा ऐका.
चांदणं पिऊन जगणारा हळूवार चाकोर, त्याची पिल्लं– म्हणजे किती नाजूक कल्पना. हळूवारपणाच्या या व्याखेनेच वाचतावाचत्ता आम्ही मुग्ध झालो. क्षणभर स्तब्ध होऊन बाहेर पहात होतो.
रस्यावर शुकशुकाट होता. काम्पौडच्या बाहेर एक बाई होती. नऊवारी पातळाचा पदर डोक्यावरून घेतलेला. डोक्यावर पाटयाचा दगड, हातात अवजारांची पिशवी, पायात टायरच्या रबराच्या केलेल्या चपला. उन्हाने दमली होती. घामाघूम झाली होती. बाहेरच्या झाडाशी ती थांबली.
डोक्यावरचा पाटा खाली ठेवला. पदराने घाम पुसत व त्यानेच वारा घेत ती उभी होती. रस्त्यावरच्या त्या झाडाजवळ बसायला जागा नव्हती. ती तशीच उभी राहिली.
सुमती पटकन उठली, बाहेर जाऊन त्या बाईला घरात बोलावून आणलं. बाई व्हरांड्यात आली. उन्हातून आल्यावर नुसतं पाणी पिऊ नये, म्हणून सुमतीने तिला गुळ आणि पाणी दिलं. बाई खुश झाली. ‘बाई, केव्हढं उन्ह आहे बाहेर…’
बाईच्या रापलेल्या चेहऱ्याकडे आणि घट्टे पडलेल्या हातांकडे पहात सुमती म्हणाली. बाईचं जळून गेलेले नाजूकपण ती न्याहळत होती. छिन्नी हतोडा घेऊन दिवसभर काम करणारी ही बाई वयाने फार नसावी, पण उन्हाने का परीस्थीतीने वाळली होती. पाटा फार घासला की त्याला पुन्हा ठोके पाडून घेतात ते ‘पाटे टाकवण्याच’ काम ती करीत होती.
‘किती घेता पाटयाचे?’
‘दोन रुपये.’
‘अशी किती कामं मिळतात दिवसाची तुम्हाला?‘
‘दहा मिळाले तर डोक्याहून पानी’ ती
‘नवरा आहे?’
‘नाही, सोडचिट्ठी दिली त्याने, दुसरा पाट बी मांडला.’
किती सहज ती ‘डिव्होर्स’ बद्दल बोलत होती? उन्हात रापता रापता हिच्या संवेदनाही रापल्या असतील का?
‘मुलं आहेत?’ सुमती.
‘दोन हायेत.’ ती
‘शाळेत जातात?’
कधी मधी! पाऊस झाला, अन् शेण गोळा कराया न्हाई गेले, तर सालेत जातात कारप-रेशनच्या’
२० रुपये रोजात दोन मुलं आणि ही बाई रहातात. त्यासाठी ही बाई दिवसभर उन्हात हिंडते. मुलं जमलं तर जातात शाळेत. नवरा नाही. किती अवघड आयुष्य!
सुमतीच्या डोळ्यात पाणी आलं. ‘ऐसे हळूवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल…’ चा मला साक्षात्कार होत होता.
सुमतीची सहृदयता मला माहीत होती. घरची मोलकरीण, पोळयावाली, धोबी हे सगळे जणूकाय तिचे ‘कुटुंबिय’च होते. पण ही कोण कुठली बाई, तिच्या कष्टांचाही सुमतीला ताप होत होता. ‘केळीचे सुकले बाग असुनिया पाणी’ तशी इतरांच्या दु:खात ही कोमेजते.
‘पन्ह घ्याल?’ सुमतीने तिला विचारलं.
‘नाही बाई, काम शोधाया पाहिजे. ‘येर’(वेळ) घालवून कसं व्हईल?’
‘एक मिनिट थांबा, माझा पाटा टाकवून द्या’ सुमतीने आतून पाटा आणला. तिच्यासाठी काम काढलं. त्याचे २ रुपये झाले. सुमतीने तिला पाच रुपये दिले.
‘नको बाई, कामाचे पैशे द्या फक्त.’ ती म्हणाली. बाईच्या स्वाभिमानाचं कौतुक वाटलं.
‘बर, थांबा एक मिनिट’ आणखी काम द्यायचं, म्हणून सुमतीने आतून वरवंटा आणला.
‘याला टाकवा.’ तिने वरवंटा पुढे केला.
बाईने तो वरवंटा चटकन जवळ घेतला. छातिशी घट्ट धरला. आणि म्हणाली,
‘लेकरू आहे ते! त्याला टाकवत नाही’
जणू काय एखाद्या बाळाला गोंजारावं तशी ती त्याला गोंजारत होती.
बारशाच्या वेळी गोप्या म्हणून वरवंटा ठेवतात, तो संदर्भ! अशा ‘लेकराला’ छिन्नी हातोड्याचे घाव घालायचे, या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारे आले होते.
अक्षरशः दगड फोडण्याचे काम करणारी ही बाई- हळूवारपणे गोप्याला गोंजारत होती. त्या दगडाकडे मायेनं पहात होती. जसं काही झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागत होती. नमस्कार करावा तसा तो वरवंटा तिने डोक्याला लावला व नंतर परत दिला.
‘ऐसे हळूवारपण जरी येईल’ … चकोरतलग्याचं हळूवारपण त्या दोघींच्या रुपाने माझ्यापुढे जिवंत उभं होतं.
लेखक – अज्ञात
संग्राहिका – सुश्री पार्वती नागमोती
मो. ९३७१८९८७५९
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈