श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ पाठवणी… – लेखिका- सुश्री अनघा किल्लेदार ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

फाल्गुनीचे लग्न ठरल्याची बातमी नातेवाईकात पसरली. तसे लपवण्यासारखे काही नव्हतेच. चारचौघासारखे पत्रिका बघून , दोघांच्या पसंतीने ठरलेल लग्न होते. शीतलच्या डोक्यावरचे ओझे उतरले अशी एक सर्वसाधारण प्रतिक्रिया नातेवाईक, शेजारीपाजारी होती.

फाल्गुनीला मोठं करताना, तिचे शिक्षण,  संस्कार याची जबाबदारी एकट्या शीतलनेच पार पाडली होती. प्रसाद बाबा म्हणून घरात होता. तसे तर चारचौघात दाखवण्यापुरता एक बिझनेस होता. जेमतेम उत्पन्न ही होते. पण तरी संसारात शीतल एकटीच होती.

फाल्गुनीचा नवरा ओजस एका साॅफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे. सहा आकडी गलेलठ्ठ पगार, घर गाडी कशालाच कमी नाही. मोठ्या बहीणीचे लग्न होऊन ती तिच्या संसारात रमली आहे. त्याचे आईवडील रत्नागिरीत नोकरी करत असल्याने घरात कायम दोघेच राजाराणी.. हे समजल्यावर शीतलचा प्रवास बघणारे म्हणाले, “पोरीने नशीब काढले.. आईच्या कष्टाचे चीज झाले.”

शीतलला फाल्गुनीचे लग्न वेळेत ठरल्याचा फार आनंद झाला होता. फाल्गुनीचे सासर माहेर यात फारसे अंतर नव्हते ही अजून एक जमेची बाजू होती. शीतलला वाटले आपले माहेर पण जवळ असते तर परिस्थितीत खूप बदल झाला असता.

प्रसादशी लग्न होऊन शीतल पुण्यात आली. तिचे माहेर कोकणातले कुडाळचे. शीतलला लहानपणापासून शहराचे आकर्षण. तिचे शिक्षण झाले. तिच्या आईबाबांनी तिच्याकरता स्थळे बघायला सुरुवात केली.

मध्यम उंचीची, चारचौघींसारखी, सावळा रंग नि तरतरीत नाकाची शीतल स्वभावाने नावासारखीच शीतल होती. तिला वाटायचे, शहरातला नोकरदार मिळाला तर टुकीने संसार करता येईल. छोट्या गावात मोठ्या गावाची काय मजा असणार?

एका मध्यस्थाने पुण्यात रहाणाऱ्या प्रसादचे स्थळ आणले. स्वतःचा रहाता वाडा, सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले वडील, दोन विवाहीत भाऊ, लग्न झालेली एक बहिण ही माहिती घरच्यांना पुरेशी वाटली. पुढे चारेक महिन्यात चांगल्या मुहूर्तावर लग्न करून ती पुण्यात आली.

लग्नाआधी प्रसादचा स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे एवढच तिला माहिती होते. ती एका शाळेत ज्युनियर शिक्षक म्हणून कामास होती. लग्नाआधी दोघे फारसे भेटलेच नाहीत त्यामुळे मनात रंगवलेले चित्र गृहीत धरून शीतलने प्रसादच्या घराचे माप ओलांडले.

हातावरच्या मेंदीचा रंग उतरण्यापूर्वीच तिला जाणीव झाली प्रसादच्या बेफिकीर स्वभावाची. त्याचा व्यवसाय होता पण तो मनापासून काम करत नसे. पोटापुरते मिळेल एवढ्यावर तो मात्र तो नक्कीच कमवत होता.

घरातली कोणतीच जबाबदारी घ्यायला प्रसाद तयार नसे. चार मित्र गोळा करावेत, गप्पा माराव्यात, बाहेर खावे प्यावे हेच त्याचे शौक होते. त्याच्या या बेफिकीर, लहरी वागण्यामुळे त्याला घरीदारी फारशी किंमत नव्हती.

शीतलच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरले. तिने प्रसादला समजवायचा हरप्रकारे प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.

तिने आधीच्या नोकरीच्या अनुभवाच्या जोरावर एका शाळेत नोकरी करायला सुरुवात केली. तिचे नियमीत पैसे येऊ लागल्यावर प्रसाद अधिक बेजबाबदार झाला. दोन वर्षांनी फाल्गुनीचे आगमन त्यांच्या संसारात झाले. जबाबदारी वाढली ती शीतलची! प्रसादच्या वागणूकीत फारसा फरक पडला नाही.

फाल्गुनीच्या तिसऱ्या वाढदिवसाला शीतलच्या मनात फाल्गुनीला सोन्याचे डूल करावे असे होते. तिने हौसेने पगारातून पैसे साठवले होते. बँकेत पैसे काढायला गेली तेव्हा प्रसादने खात्यातून काही पैसे काढले होते. उरलेल्या पैशात फाल्गुनीचे कानातले झाले नसते. शीतलचा पारा चढला. तिने घरी येऊन खूप आदळआपट केली. फाल्गुनीचे कानातले होणार नाही याचे प्रसादला वाईट वाटले पण हे वाईट वाटणे फोल असणार हे तिला समजून चुकले होते.

तिच्या सासूबाई तर हरल्या होत्या मुलासमोर. सासऱ्यांच्या सांगण्यावरून तिने प्रसादच्या नकळत दुसरे खाते काढले. त्याचे चेकबुक,  पासबुक सासूबाईंकडे ठेवले. दर महिन्यात त्या खात्यात ती पैसे साठवू लागली.

प्रसादने चौकशी केली. “एवढे पैसे कशाला लागतात काढायला?” त्याने पासबुक बघत विचारले.

“सलग दोन महिने घर चालवून बघा. किती नि कुठे पैसे लागतात हे समजेल.” तिने पोळी लाटता लाटता त्याला ठणकावून सांगितले.

“जास्त ऐट करू नको पैशाची..”

“पैशाची ऐट म्हणता? माझ्या पैशावर चाललय घर. ना गाठीशी पैसा ना अंगावर दागिना. नवऱ्याच्या जीवावर बायकोला आवडते ऐट करायला, ज्यादिवशी तुम्ही माझी हौस पुरवाल तेव्हा करेन ऐट! समजले? ” तिने हल्ला परतवला.

प्रसाद समजून चुकला होता. बायको बदलू लागली आहे. प्रसंगी उलट उत्तर देऊ लागली आहे. याकरता तोच जबाबदार होता.

मे महिन्याच्या सुट्टीत प्रसादच्या फॅब्रिकेशन युनिटचा एक माणूस प्रसादला शोधत घरी आला. तो घरी नव्हताच. शीतलने फाल्गुनीला घेतले नि गाडीवर काढून ती तिकडे पोचली. यापूर्वी ती तिकडे आली होती. तिला आलेले बघून कामगार चपापले. तिने तिथेच शेडमध्ये बसून काय प्राॅब्लेम झाला आहे हे समजून घेतले. अर्ध्या तासात तिने प्रश्न सोडवला. युनिटचे लाईट बिल भरायचे होते. एकदोघांचे पगार राहिले होते. तिने येणी किती आहेत ते तपासले नि कपाळावर हात मारून घेतला. पुढल्था दोन दिवसात तिने तिथली व्यवस्था लावून दिली. प्रसादला समजले तेव्हा तो खजील झाला. पुढचे दोनचार महिने चांगले गेले. शीतलला वाटले सुधारली परिस्थिती पण अशी इतक्यात तिची सुटका नव्हती.

फाल्गुनी आईची तारांबळ बघत मोठी झाली. ती हुशार होती, मेहनती होती. भरभर शिकत गेली. आईला त्रास होऊ नये याचा फाल्गुनीचा प्रयत्न बघितला की शीतलला रडू यायचे. ‘इतके समंजस बाळ दिलंय देवाने पोटी.. मी कमी पडले आई म्हणून!’ ती सर्वांना डोळ्यात पाणी आणून सांगायची.

फाल्गुनी शिकत असताना शीतलने तिचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मायलेकींच्या जगात प्रसाद आता कुठेच नसायचा. त्याचेही वय होऊ लागले होते पण सवयी, बेफिकीरीत फारसा फरक नव्हता. घरात दोन तट पडल्यासारखे झाले होते. प्रसाद एकाकी झाला होता.

फाल्गुनीचे घरचे केळवण म्हणून घरचे सगळे जमले होते. पंचपक्वान्नाचा बेत होता. लाल रंगाचा सोनेरी जरतारी काम असलेला अनारकली घातलेली फाल्गुनी खरच सुंदर दिसत होती. तिच्या थट्टेला उत आला होता. तिचे हसणे, लाजणे बघून शीतलला भरून येत होते. ही सासरी गेली की मी एकटी पडणार या विचाराने तिचे डोळे पाण्याने भरून येत. तिच्या जावेने तिच्या पाठीवर थोपटताच शीतल तिच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडू लागली. हसरे वातावरण एकदम तंग झाले.

“बाई गं, लेकीची पाठवणी सोपी नसते आईला. जगरहाटी आहे ती. पोटात किती तुटते ते लग्न झालेल्या मुलीची आईच फक्त जाणे.” सासूबाईनी तिची समजूत घालायचा प्रयत्न केला. शीतलने समजून पदराने डोळे पुसले. कोणीतरी पाण्याचा ग्लास आणून दिला त्यातले पाणी प्यायली.

एवढ्यात फाल्गुनी पुढे आली म्हणाली, “आई, आजी, काहीतरी बोलायचंय मला. पाठवणी माझी एकटीची नाही आईची पण होणार आहे..पण ती तयार झाली तर..” सगळे फाल्गुनीकडे आश्चर्याने बघू लागले.

“म्हणजे ग काय? ” शीतलने विचारले.

“आई, पंधरा दिवसांपूर्वी आपण कुडाळला गेलो होतो. तेव्हा तु शिकवायचीस ती शाळा दाखवलीस. मी संध्याकाळी देवीचे दर्शन घेऊन येताना सहजच शाळेत गेले. तिथे योगायोगाने माझी भेट तिथल्या मुख्याध्यापिकांशी झाली. त्यांना वाटले मी शाळेची माजी विद्यार्थीनी आहे. त्यांना तुझ्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांना तुझी प्रगती ऐकून खूप छान वाटले.

त्यांनी रस दाखवला तेव्हा तुझा बायोडेटा माझ्या मोबाईलमधे होता तो दाखवला. तुझ्या इतका अनुभव असणारे शिक्षक शाळेला हवे आहेत असे त्या म्हणाल्या. तु तयार झालीस तर शाळेची दुसरी शाखा या जूनपासून सुरू होते आहे तिकडे तुला पर्यवेक्षिका म्हणून रूजू होता येणार आहे. पगार, महागाई भत्त्यात वाढ आहेच, पण मानही वाढेल.” फाल्गुनी सांगत होती आणि ऐकणारे चकित होत होते.

“आई, खूप केलस घराकरता नि माझ्याकरता. आता स्वतःकरता जगून घे, नवे अनुभव घे. नाही आवडले तिकडे तर मोकळ्या मनाने इकडे परत ये.. पण आलेली संधी घालवू नकोस. तुझ्या माहेरच्या माणसात, तुझ्या लाल मातीत मनमुराद आनंद लुट. तुझा हक्क आहे त्यावर.” फाल्गुनी मनातले बोलत होती.

“कुडाळला? मी अजिबात जाणार नाही. किती छोटे गाव आहे ते.” प्रसाद म्हणाला.

“बाबा, या सीनमध्ये तुम्ही तुमच्या कारखान्यासकट पुण्यातच रहा. आईला एकटीलाच जाऊ दे.” हे ऐकताच प्रसादला खूप राग आला.

फाल्गुनी आणि शीतल वगळून त्याला फारसे कोणी कधी मोजलेच नव्हते. त्याला अजून एकटेपणाच्या झळांची जाणीव नव्हती. शीतल थक्क झाली. जे घडत होते ते अविश्वसनीय  होते. शीतलचे सासूबाई नि सासरे यावेळीही तिच्या पाठीशी होते. ते दोघे फार थकले होते. सूनेने आनंदी रहावे असे मात्र त्यांना वाटत होते.

फाल्गुनीच्या लग्नाबरोबरीने शीतलच्या पाठवणीची पण तयारी सुरू झाली. नव्या जोमाने शीतलने जमवाजमव केली.

फाल्गुनी आणि ओजस पुण्यात परत आल्यावर मे महिन्याच्या  शेवटच्या आठवड्यात शीतलने पुणे सोडले नि डोळ्यात स्वप्न घेऊन कुडाळच्या गाडीत पाऊल ठेवले.

लेखिका- सुश्री अनघा किल्लेदार

 पुणे, २४/०२/२०२३

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments