श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘भय…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी ☆
त्याला जाग आली तर ती शेजारी नव्हती. तो झटकन उठला. त्याने घड्याळात पाहिले. साडेचार वाजून गेले होते. ‘बाबा उठले असतील ..’ मनात विचार येऊन त्याने.बाबांची चाहूल घेण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या आणि तिच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. तो बाहेर आला.
“ आता मी आलेय ना बाबा ? मग आता पहाटेचा चहा मी करून देणार हं तुम्हाला.. तुम्ही नाही स्वतः करून घ्यायचा. ”
“ अगं, पण मला सवय आहे त्याची.. उगाच तुझी झोपमोड कशाला ? जा. झोप जा तू.. घेईन मी करून चहा. “
“ ते काही नाही हं …बाबा, मी असताना तुम्ही चहा करून घेतलात तर मला ते नाही हं आवडणार. आजवर तुम्ही खूप केलेत…पण आता नाही. आता तुम्ही फक्त आराम करायचा, तुमच्या आवडी-निवडी जपायच्या, छंद जोपासत राहायचे. आता कुठल्याच कामाला मी नाही हं हात लावू देणार तुम्हांला. चला, तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा बघू, मी आणते लगेच चहा करून.. अगदी तुमच्या आवडीचा.. आलं घालून .”
‘ बरं. तू आण चहा करून..’ असं म्हणून बाबा किचन मधून बाहेर येऊन हॉलमध्ये बसले..’ किती चांगली सून मिळालीय आपल्याला.. आपण खूप नशीबवान आहोत..’ बाबांच्या मनात आले. तो हे सारे ऐकत होता.. तो हॉल मध्ये आला.
“ अरे, तू ही उठलास? ये. “
तो हॉल मध्ये आला. बाबांच्याशेजारी बसला. ती चहा घेऊन आली तेव्हा तिने त्याच्यासाठीही चहा आणला होता.
“ तुमचा आवाज आला म्हणून तुमच्यासाठीही आणलाय चहा.. घ्या. “
ती ओठातल्या ओठात हसत त्याच्या हातात त्याचा चहाचा कप देत म्हणाली.
चहा पिऊन झाल्यावर बाबा फिरायला बाहेर पडले.
बाबा रोज पहाटे साडेचारला उठून, सारे आवरून स्वतःचा चहा स्वतः करून घेऊन पाचला फिरायला जात असत. गेल्या कित्येक वर्षाचा त्यांचा तो नेमच होता. आधी आईही लवकर उठायची, बाबांना तीच चहा करून द्यायची पण तिची झोप पूर्ण होत नाही हे लक्षात येताच बाबांनीच तिला लवकर उठायला मनाई केली होती..
बाबा फिरायला निघून गेले आणि ती आणि तो, दोघेही त्यांच्या बेडरूम मध्ये आले. त्यांच्या लग्नाला काही दिवसच झाले होते पण तिने आपल्या वागण्याने घरच्यांचीच नव्हे तर शेजार-पाजाऱ्यांचीही मनं जिंकली होती.. तोही खुश होता.
“ उद्यापासून तूही उठायचंस लवकर.. मी उठवेन तूला ..”
बेडरूममध्ये शिरताच बेडरूमचे दार लोटून आतून कडी लावत ती त्याला म्हणाली. आईबाबांसमोर, इत्तरांसमोर ती त्याला अहो s जाहो म्हणत असली तरी दोघंच असताना मात्र ती त्याला अरेतूरे करत होती आणि त्यालाही ते खूप आवडत होते.
“ अरे वा ss! पहाटे पहाटे? नेकीं और पुछ पुछ ? “
तो मिश्कीलपणे डोळा बारीक करत म्हणाला. त्यावेळी तिच्या आवाजातला कोरडा आणि हुकमी स्वर त्याच्या ध्यानातच आला नाही.
“ उगाच लाडात येऊ नकोस.. उठून तू बाबांसाठी चहा करायचा आहेस.. मी कितीही तुला ‘नको,नाही म्हणले तरीही.. ‘ तू कशाला चहा करतोयस? आता मी आहे ना..मी करते चहा ‘ असं म्हणलं तरीही… चहा तूच करायचा आहेस हे लक्षात ठेव. “
“ए, मी नाही हं करणार चहा..”
ती आपली मस्करी करत आहे असे वाटून तो काहीसा लाडात येऊन, काहीसा चेष्टेने म्हणाला.
“ म्हणजे ? एकच लक्षात ठेव.. तू करणार आहेस म्हणजे करणार आहेस.. “
ती काहीशा कठोरपणे म्हणाली .तिच्यातल्या या बदलाने तो आवाक होऊन तिच्याकडे पहात असतानाच ती हसत हसत म्हणाली,
“ कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे ठाऊक आहे ना..? आत जायचं नाही ना तुला ?”
त्याने दचकून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. ती नेहमी जशी दिसते त्याहून वेगळीच भासली त्याला. तो अंतर्बाह्य थरारला. ‘ ही अशी काय वागतेय ? हिच्याशी एवढे प्रेमाने, समजुतीने वागूनही अगदी शांतपणे धमकी काय देतेय ?.. काही वाद, भांडण झाले असते आणि रागाच्या भरात बोलली असती तरी एकवेळ ते समजून घेण्यासारखं होते पण तसे काहीच नसताना, हे काय म्हणायचं ?…’ त्याच्या मनात विचार आला. त्याला तिच्या अशा वागण्याचं काहीच कारण कळेना पण तिच्या त्या वाक्याने त्याच्या मनात भीतीने घर केलं. तो मनोमन काहीसा घाबरलाय हे तिला जाणवले.. ती स्वतःशीच हसल्यासारखं हसून त्याला म्हणाली,
“ अरे, गंमत केली तुझी..”
ती ‘गंमत’ म्हणाली असली तरी ती गंमत नाही हे त्याच्या ध्यानात आलं होतं.
” आणि आपली ही गंमत कुणाला सांगायची नाही हं ! कुणाला म्हणजे कुणालाच. तुझ्या आई-बाबांनाही नाही. राहील ना हे तुझ्या लक्षात ? “
तो तिच्या बोलण्याने, तिच्यातील बदलाने अवाक होऊन तिच्याकडे पहातच राहिला होता.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈