डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
( तिकडे काहीच पैसे सेव्ह नाही झाले.मला दुसरा फ्लॅट घेणं शक्य नाही. आणि औंधचा माझा फ्लॅट किती लहान आहे. मी कसला तिथे रहातोय. आजींचा केवढा प्रशस्त आहे ग !” रमाला हे ऐकून भयंकर संताप आला.) इथून पुढे —
तिला हे ऐकू गेलंय, हे सुदैवाने अखिलला समजले नव्हते. रमा उठून संध्याकाळी वीणाकडे गेली. वीणाला हे सगळे सांगितलं तिने. म्हणाली, “ वीणा मी आत्तापर्यंत तुला काही सांगितलं नाही ग. आपलेच दात आणि आपलेच ओठ ! माझ्याच मुलीचा मुलगा ग हा … पण काय वागते त्याची ती बायको ! आणि कसली ती मॉंटेसरीतली नोकरी आणि काय तो रुबाब.. वीणा, हे लोक आल्यापासून माझं स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य हरवून गेलंय. तुला सांगितलं नाही मी, पण अखिलने घरात एक पैसाही दिला नाही, की किराणा, दूध किती लागतं तेही विचारलं नाहीये. मला कशालाच कमी नाहीये ग, पण हा युरोमध्ये पैसे मिळवून, परदेशी राहून आलेला मुलगा ना ? इतकी स्वार्थी असतात का ग आपली मुलं?” .. रमाच्या डोळ्यात पाणी आलं. वीणाने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. “ रमा, तू का रडतेस? हे बघ! कित्ती शहाणपणा केलाय आपण, की पूर्वीच मृत्युपत्र करून ठेवलं. तेही रजिस्टर केलं, म्हणजे कोणतीही कायदेशीर त्रुटी नको. त्यात तू स्पष्ट लिहिलं आहेस ना, की हा तुझा फ्लॅट, तुझ्या पश्चात मुलगा आणि मुलीला जावा ! मग आता या नातवाचा संबंधच येतो कुठं? मुळीच देऊ नकोस. हा तुला घराबाहेर काढायलाही कमी करणार नाही रमा. त्यातून तुझ्याच मूर्ख लेकीची फूस आहेच त्याला. तू आता शांतच बस. नुसती गम्मत बघ आता, काय काय होते ते. मग बघू या त्याची चाल. मी आहे ना तुझ्यासाठी ? कशी ग ही आपलीच म्हणायची माणसं … अजिबात खचून जाऊ नकोस तू. घर आपलं, पैसा आपला … का म्हणून भ्यायचं ग यांना. जा निवांत घरी ! काहीही समजलंय असं दाखवूच नकोस. येऊ दे त्यांच्याचकडून पहिली खेळी.” …. वीणाकडून रमा मानसिक बळ घेऊनच आली.
महिना काही न होता गेला आणि एक दिवस अखिल म्हणाला, “आजी, तू अशी एकटी किती दिवस राहू शकणार? आता सत्तरी उलटली की तुझी ! मी काय म्हणतो, आता गेले वर्षभर आपण एकत्र राहतोय, तसं कायम राहायला काय हरकत आहे? मामाच्या मुलाला या घरात इंटरेस्ट नाही. तो परदेशातून काही परत येत नाही बघ. मग राहिलो मीच ! मी कायम राहीन तुझ्याजवळ !” .. रमा धूर्तपणे म्हणाली,” हो रे अखिल, किती छान होईल तू शेवटपर्यंत माझ्याजवळ राहिलास तर ! मलाही नातवाचा आधार होईल.”
— अखिल आणि रेणूची नेत्रपल्लवी रमाच्या लक्षात आलीच.
अखिल म्हणाला, “आजी, मग तू हा फ्लॅट माझ्या नावावर कर ना ! म्हणजे मलाही कायदेशीर हक्क राहील ग … तुला खात्री आहे ना, आम्ही तुला कधीच अंतर देणार नाही याची ? तुझं दुखलं खुपलं, म्हातारपण नीट बघू?” …. “ होय रे अखिल. मला तू आणि शिरीषमामाची दोन, अशी तिघेच तर आहात तुम्ही. ”
अखिलच्या कपाळावर आठी उमटली. “ मामाची मुलं? अमोल आणि अपूर्व? छेछे.. ती काय करणार तुझं ? इथंआली तर करतील ना ! कायम एक दुबईला दुसरा फ्रान्स ला! काय कमी आहे त्यांना? आणि इथं कशाला येतील ती दोघे? अग आजी, मीच बघणार तुझं सगळं ! तू माझ्या नावावर करून दे फ्लॅट. मी फुलासारखा जपेन तुला ! “ रमा तिथून निघून गेली, काहीही न बोलता !
एक महिना तसाच गेला. रमा सगळे अपडेट्स वीणाला देत होतीच. एक दिवस अखिल म्हणाला, “आजी, उद्या आई येतेय. कित्ती दिवसात आलीच नव्हती. मध्यंतरी आम्हीच आईबाबांना भेटून आलो, त्यानंतर ती कुठे आलीय ना पुण्याला? आता खास आपल्या सगळ्यांना भेटायला येतेय आई.” … ‘ आता ही कोणती नवी चाल ‘ असं मनात आलंच रमाच्या ! ठरल्यादिवशी माया बंगलोरहून आली. आल्याआल्या आईच्या गळ्यात पडली ! ‘ किती ग आई तू करतेस, किती पडतं तुला सगळं ‘ , असं म्हणून झालं. चार दिवस लेक सून नात यांच्याबरोबर फिरण्यात गेले.
जायच्या चार दिवस आधी म्हणाली, “आई, किती म्हातारी होत चाललीस ग तू. बरं झालं ना देवानेच अखिल ला पाठवलं,तुझ्यासाठी ! तू आता असं कर.. हा फ्लॅट अखिलच्या नावाने करून टाक. ती शिरीषची पोरं कशाला येतात इकडं आई? आपला अखिलच तुला सांभाळेल बरं! कधी करूया ट्रान्सफर मग डॉक्युमेंट्स? म्हणजे हे पण येतील बंगलोर हून. “
रमा हे ऐकून थक्क झाली. स्वतःच्या पोटची मुलगी इतकी स्वार्थी होऊ शकते? हा अखिल आणि त्याची ती आळशी उनाड बायको काय सांभाळणार मला? देवा ! मी हे जर प्रत्यक्ष माझ्या कानांनी ऐकलं नसतं तर माझाही विश्वास बसला नसता यांच्या मनातल्या स्वार्थी हेतूवर. रमा म्हणाली, “ माया उद्या बोलूया आपण हं.”
दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी हॉलमध्ये जमली. रमाची अशी सुटका होणार नव्हती.
रमा म्हणाली, ” कालपर्यंत तुम्ही सगळे बोलत होतात आणि मी ऐकत गेले, पण आता माझं नीट ऐका. अखिल,आज दीड वर्ष झालं, तू तुझी बायको, मुलगी इथं रहाताय. किती खर्च केलात घरात? परदेशी राहून आलेले लोक ना तुम्ही? साधं दुधाचं बिल, सुलूबाईंचा तुमच्यासाठी वाढवलेला पगार, किराणा, भाजी, याची तरी कधी चौकशी केलीत का? नशीब मला भरपूर पेन्शन आहे. नाहीतर मी कुठून केला असता हा डोईजड खर्च रे? तू खुशाल म्हणतोस, मामाच्या मुलांना गरज नाहीये या फ्लॅटची. हे तू कोण ठरवणार रे? जसा मला तू नातू, तसेच तेही नातूच. कधी पाच वर्षात म्हणालास का, ‘आजी लंडनचा काही फार मोठा प्रवास नाही, ये ना माझा संसार बघायला.’ मी सहज येऊ शकले असते रे,,स्वतः तिकीट काढून ! तू तरी म्हणालीस का ग माया? उलट अपूर्वने मला दुबईला स्वतः बरोबर नेऊन आणले. सगळी दुबई दाखवली. मी फ्रान्सलाही गेलेली आठवतेय का रे? अमोलकडे? काडीची तोशीस पडू दिली नाही मला पोरांनी. आणि किती गोड त्यांच्या बायका… खरोखर सांगते, मला इकडची काडी नाही तिकडे करू दिली त्या मुलींनी ! दुबईची सून तितकीच गोड आणि फ्रान्सची पण अशीच लाघवी. यात तुझी सून कुठेतरी बसते का माया? तूच बघ ना. मारे लंडनहून आजीकडे हक्काने आलात, काय आणलेत आजीला? हे बघ.. मला तुमच्याकडून खरंच काहीही नकोय. इथे सगळं मिळतं. पण तुमची नियत समजली मला ! अनेकवेळा हॉटेलमध्ये जाऊन जेवून येता तुम्ही, कधीही वाटलं नाही का, आजीलाही न्यावं ? मस्त आहे अजून मी तब्बेतीने ! विचारलंत का कधी एकदा तरी?— मी तुमचे दोष उगाळायला इथं बसली नाहीये. खूप दुनिया बघितलीय बरं मी ! म्हणूनच तुमच्या धोरणी आजोबांनी हा फ्लॅट फक्त माझ्याच नावावर केला. मी भाबडी आहे, व्यवहारी नाही, हे त्यांना माहीत होते. किती उपकार फेडू त्यांचे मी? “—- रमाने डोळे पुसले…. “ तर बरं का मंडळी, आहे हे असं आहे. स्वतःचा औंधचा तो तीन खोल्यांचा फ्लॅट भाड्याने दिला आहेस ना, तो लगेचच रिकामा करायला सांग. मला काही माहीत नाही असं वाटलं का? आजीने सुद्धा बँकेत 30 वर्ष नोकरी केलीय आणि ती एम.कॉम. पण होती, हे विसरू नका. जवळजवळ दोन वर्षे आजीकडे अलिशान चार बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहिलात. आता चार महिने मुदत देतेय. लवकरात लवकर तिकडे शिफ्ट व्हा. नाहीतर मग कुठं जायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. माया, तुझ्या ह्यांना इथे यायची काहीही गरज नाहीये. मुळीच नको बोलावू त्यांना. मी आत्ता हा फ्लॅट तुझ्याच काय, कोणाच्याच नावावर करणार नाही. माझ्या नंतरच तुम्हाला समजेल, त्याचे काय करायचे ते. सहा वर्षाची ही तन्वी मला विचारते — ‘ आजी तू इथे का राहतेस? दुसरीकडे का नाही जात?’ हिचा बोलविता धनी कोण आहे, हे समजायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. माझं बोलून संपलं आहे. चार महिन्यात गाशा गुंडाळायचं बघा. माझ्या म्हातारपणाची नका बरं काळजी करू! तीही व्यवस्था केलीय मी.”
— रमा स्वतःच्या बेडरूममध्ये निघून गेली आणि सगळे अचंबित होऊन एकमेकांची तोंडे बघत बसले.
— समाप्त —
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈