श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ कथा एका पत्राची – भाग १ ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

—–पूर्ण प्राथमिक मराठी शाळा , कोर्ले, तालुका- देवगड, जिल्हा -रत्नागिरी. ही माझी लाडकी शाळा.तिथे माझं पहिली ते सातवी (म्हणजे त्यावेळच्या भाषेत- “फायनल”.) पर्यंत शिक्षण झालं. विंदा करंदीकरनी पण इथेच श्री गणेशा गिरवला बरंका. आईशप्पथ. आमच्या त्या गावाची त्यावेळची लोकसंख्या फक्त पाच हजार. आणि सातवीपर्यंत शाळा! गावातल्या काही हुशार मंडळींचं ते कर्तृत्व. खाडीकिनारीच्या  सगळ्या म्हणजे अगदी पोंभुर्ल्यापासूनची मुलं आमच्या शाळेत यायची. आमची काही नात्यातली मुलं शाळेसाठी आमच्याकडे रहायलाच  आलेली. त्यामुळे आम्ही भावंडं नि ती मुलं मिळून चांगली दहाची क्रिकेटची  टीम होती. माझा भावंडात खालून दुसरा नंबर. पुस्तकं माझ्यापर्यंत  गलितगात्र , म्हातारी होऊनच यायची.

—–शाळा सात वर्गांची, पण इमारतीत चारच खोल्या .मग काय,  चौथी सोमेश्वराच्या देवळात, पाचवी जुगाबाईच्या देवळात नि  सहावी भरडाईच्या देवळात.  प्रत्येक वर्गाला सर्व विषयांना एकच गुरुजी. हायस्कूल सारखे तासा तासाला  गुरुजी बदलत नसत. म्हणजे त्यांना फेऱ्या घालाव्या लागत नव्हत्या.  हे त्यातल्या त्यात  चांगलं.  मुलांना पांच गणितं घालायची .नि होई पर्यंत एखादी डुलकी काढायची संधी त्याना मिळे. असं सगळं बेजवार चाललेलं.

—–मी पाचवीत होते. त्यामुळे वर्ग जुगाबाईच्या देवळांत. देऊळ अगदी ऐसपैस. एका बाजूला पाच काळ्या कुळकुळीत  देव्या उभ्या. मधली जरा मोठी, ऊंच. नि डाव्या, उजव्या बाजूला तिच्या दोनदोन मैत्रिणी किंवा बहिणी. सगळ्यांचे कमरेवर हात. डोक्यावर मुकुट, गळ्यात भरपूर दागिने. सगळं दगडात कोरलेलं. डोळे मोठमोठे. धाक, भीती  दाखवणारे. वर्गात आल्याबरोबर आधी पाची देव्यांना नमस्कार करायचा.

एका खिडकी खाली खुर्ची आणि टेबल. टेबलावर मोजून चार  खडू नि डस्टर. वेताची छडी सुध्दा. खडूपेक्षा छडीचा वापर गुरुजी जास्त करायचे.

—–पुजारी पूजा करायला यायचा तेव्हढी पंधरावीस मिनिटं आमचा अभ्यास बंद असायचा. एरव्ही आमचे पाढे नि कविता इतक्या जोरजोरात घुमायच्या की दगडाच्या देव्यानी सुद्धा म्हटल्या असत्या.

—–आमच्या गुरुजींचं नांव होतं ‘रामकृष्ण रामदास गोरे.’  नांवात दोन राम असूनही गुरुजी शांत स्वभावाचे नव्हते. अगदी जमदग्नीचा अवतार. गोरे या आडनांवाला तर त्यांनी काळिमाच फासला होता. पण ते आमच्या वर्गाचे गुरुजी होते त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान होता आणि  मुलांचं मानसशास्त्र असं असतं की  कडक गुरुजीच मुलांना आवडतात. सगळे त्यांना रामगुरुजी म्हणायचे.. आम्हीही तसंच म्हणायचो. 

—–तर माझं सुदैव की दुर्दैव , आमच्या आगबोटीसारख्या  चिरेबंदी घराचे तीन भाग पडलेले. शेवटच्या भागांत माझ्या चुलत भावाचं कुटुंब रहायचं. गावातलं पोस्ट त्याच्या पडवीत होतं. म्हणजे तो पोस्टमास्तर होता. तिथे पोस्टाची लालभडक पेटी. खाडीकाठच्या दहा गावांना जशी एक पूर्ण प्राथमिक शाळा. तसंच सर्वांना एक पोस्ट. पस्तीस रुपये पगारात आमचा दादा पेटीतल्या पन्नासभर  पत्रांवर शिक्के मारायचा. कधीतरी ते काम आम्हालाही सांगायचा.  आम्हाला मजाच. एका सरकारी पोत्यात सर्व पत्र भरून, पोत्याला सील  करून दादा रनरकडे द्यायचा.  रनर खारेपाटणला पोतं पोचवायचा नि तिकडचं पोतं  संध्याकाळी घेऊन यायचा. तो चालतच जायचा, तरी त्याला रनर का म्हणत कोणाला ठाऊक?

—–आमची शाळा सकाळी नि दुपारी दुबार भरायची. त्यादिवशी सकाळची शाळा सुटली . आम्ही दप्तरं खांद्याला लावून घाईने निघालो. रामगुरुजी म्हणाले, “रानडे, इकडे ये.”

—–बापरे!मी घाबरले.  छाती धडधड करू लागली. काय झालं? आपलं काय चुकलं? कालची गणितं तर सगळी बरोबर आली होती. शुध्दलेखन दहा पूर्ण ओळी लिहिलेल्या. घंटेच्या आधी वर्गात येऊन पोहोचले होते. का बोलावलं असेल गुरुजीनी? छडी मारणार की काय?

पाय लटपटत होते. रडक्या चेहऱ्याने मी गुरुजींसमोर उभी राहिले. गुरुजींच्या हातात एक पोस्टकार्ड होतं.

“हेबघ, हे कार्ड–पोस्टाच्या पेटीत नीट टाकायचे, दादा शिक्के मारत असला तर  त्याच्या हातात द्यायचे,  टपाल पोत्यात भरले असेल तर ते शिक्का मारून रनरच्या हातात द्यायला दादाला सांगायचे, पत्र महत्वाचे आहे. आज गेले तर चार दिवसांनी मालवणात पोचेल. काय?”

गुरुजी इतकं भराभरा  बोलत होते की मला काही समजतच नव्हतं. तरी मी मान  डोलावली. ”  धावत जा. काय?”

—–मी खरंच धावत निघाले. हातात घट्ट धरललं पत्र. कडक रामगुरुजींचं काम म्हणजे रामायणातल्या त्या रामाचंच काम. देसाई भाऊंच्या दुकानापर्यंत आले. मला धाप लागली होती. ऊन्ह गुरुजींसारखंच कडक होतं. पण रस्त्यावर गर्दी जमली होती. माणसं गोल करून काही तरी बघत होती. मी त्या गोलात शिरले. माकडांचा खेळ चालला होता. आमच्या त्या ठार खेड्यात असले खेळ क्वचितच यायचे. डोंबारी, गारुडी, अस्वलवाले आले की सगळा गाव तिथे जमायचा. करमणुकीचे हे खेळ बघताना आम्ही मुलं तर तहानभूक विसरायचो. मी तशीच विसरले. नि खेळ संपेपर्यंत बघतच राहिले. विसरलेली भूक आता जागी झाली. नाही, खवळलीच. धावतच घरी़ आले. मोठ्यांची नि सगळ्या भावंडांची पंगत बसलेली. आई     म्हणालीच,”अगो,कुठे होतीस इतका वेळ? नानू शोधायला येणार होता”.

” माकडांचा खेळ बघत होती.” सहावीतल्या बापूने चहाडी  केली आणि एकदमच पत्राचं लक्षात आलं. हातात पत्र नव्हतं.

बापरे. मी दादाकडे धावले. “दादा, रनर गेला?”

“अगो , केव्हाच. अजून राहिला जायचा? तुला कशाला हवा तो? खारेपाटणातून काय आणायला सांगायचेय काय? उद्या सांग हो बाबी.”

क्रमश: – भाग १

©  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments