सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

“दहा -पंधरा मिनिटात आटपेल माझं. मग बरोबरच जाऊया.” अचला अभिजितला म्हणाली.

“नको. मी निघतो. वेळेवर पोचलं पाहिजे.”

अभिजित निघाला. त्याच्या वक्तशीरपणाचं नवीनभाईंना कौतुक होतं. आणि नवीनभाईंना खूष करायची एकही संधी अभिजित सोडत नव्हता.

व्यावसायिक चित्रपटसृष्टीत नवीनभाईंमुळेच ब्रेक मिळाला होता त्याला. स्क्रिप्टरायटरच्या टिममधला एक होता तो. सर्वांचे तुकडे जोडून एक प्रेमकथा  तयार झाली होती. पण ती नेहमीसारखीच वाटत होती. काहीतरी वेगळेपणा हवा होता.

“ट्रॅजिक एन्ड करूया,”एकाने सुचवलं, “हिरो हिरोईन मरतात.”

“कशी?”

“कोणीतरी त्यांना मारतं. किंवा आत्महत्या, नाहीतर  ऍक्सीडेन्टमध्ये… ”

“ऍक्सीडेन्ट हा शेवट नवीनच आहे.”

“पण त्याला तसा अर्थ वाटत नाही. उगीचच मारल्यासारखं वाटतं त्यांना.”

“मग घरचा विरोध असल्यामुळे आत्महत्या… ”

“हीपण आयडिया घिसीपिटी आहे. ”

इतका वेळ गप्प  राहून विचार करत बसलेल्या अभिजितला एकदम सुचलं -“मला एक आयडिया सुचतेय.”

“बोला.”

“ते आत्महत्या करतात ;पण घरच्या विरोधामुळे नव्हे.

आपण असं करूया. हिरो, हिरोईन थोडे लहान दाखवूया. म्हणजे इनोसन्ट, भावुक वगैरे. त्यांचं एकमेकांवर खूप खूप प्रेम असतं. घरच्यांचा सुरुवातीला विरोध असतो;पण नंतर ते लग्नाला संमती देतात.”

बोलताबोलता अभिजित  थांबला. त्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता न्याहाळली. नवीनभाई गोंधळात पडल्यासारखे वाटत होते; पण अभिजितच्या बोलण्याकडे  त्यांचं पूर्ण लक्ष होतं.

“तर लग्नाचं नक्की होतं. पण हिरो -हिरोईनलाच वाटतं, की लग्न झालं, संसाराची रुक्ष जगरहाटी सुरु झाली, की त्यांचं एकमेकांवरचं  हे गाढ प्रेम कमी होईल. ओहटी लागेल त्याला. कोणी सांगावं, पुढेमागे त्यांच्या आयुष्यात तिसरी किंवा तिसरा ‘वो’ डोकावण्याचीही शक्यता आहे. एकंदरीत आत्ताचं हे प्रेम जन्मभर एवढंच उत्कट राहील, याची गॅरंटी नाही. एकदा का व्यवहाराचा सूर्य तळपायला लागला, की प्रेमाचं धुकं विरायला कितीसा वेळ लागणार?”

“तुम्ही बोलताय त्यात पॉईंट आहे.”

“ह्याs!मला तर ही आयडिया आऊटडेटेड वाटते. हल्ली प्रेमाला एवढं सिरीयसली  घेतं कोण? तू नहीं और सही, और नहीं….. ”

“तसं असतं, तर एवढ्या प्रेमकथा चालल्याच नसत्या. अजूनही आपला नव्वद टक्के सिनेमा  प्रेमाभोवतीच फिरतोय.”

मुख्य म्हणजे नवीनभाईंना अभिजितची आयडिया ‘एकदम ओरिजिनल’ वाटली. त्यांनी ती उचलून धरल्यावर विरोधाच्या जिभा गप्प झाल्या.

‘मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम’ चित्रपटाचं नाव ठरलं. लगेचच कामही सुरु झालं.

हिरो, हिरोईन दोघंही लहानच होती. दोघांचाही डेब्यू होता. पण त्यांनी कामं मात्र ताकदीने केली.

चित्रपट भराभर पूर्ण झाला. प्रोमो, साउंड ट्रॅक, पार्ट्या, प्रीमियरची तयारी…..

जाहिरातीचा केंद्रबिंदू ‘शेवट एकदम ओरिजिनल’ हाच होता.

चित्रपट सुपरहिट ठरणार, असा रंग दिसत होता.

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments