सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 3 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
पण कुठे काय बिनसलं कोणास ठाऊक !तिकिटं खपेनातच. एका आठवड्यातच चित्रपट थिएटरवरून काढावा लागणार, अशी चिन्हे दिसायला लागली.
अभिजित तर नवीनभाईंपेक्षाही जास्त अपसेट झाला. इंडस्ट्रीतल्या त्याच्या करियरचं काही खरं नव्हतं.
दिवसभर तो डोकं धरून बसला होता. अचला जेवायला बोलवायला आली, तर”भूक नाही म्हटलं ना?”म्हणून वस्सकन ओरडला तिच्या अंगावर.
तेवढ्यात बाहेर सुजयने टीव्ही ऑन करून चॅनल सर्फिंग सुरु केलं. एकमेकांत मिसळलेले ते कर्कश आवाज कानावर आले मात्र, अभिजित चवताळलाच.
“बंद कर बघू आधी तो टीव्ही. आधीच डोक्यात घण घातल्यासारखं……. ”
सांगितलेलं ऐकेल तो सुजय कसला !त्याने फक्त व्हॉल्युम थोडा कमी केला.
“आय डोन्ट नो व्हॉट यू से….. ”
हे सूर कानावर आले आणि कुठचंतरी दार किलकिलं झालं.
अभिजितने लगेचच नवीनभाईंची अपॉइंटमेंट घेतली.
पाच मिनिटांच्या आत तयार होऊन तो बाहेर पडलेला बघून अचलाला धक्काच बसला.
अभिजितची कल्पना ऐकून नवीनभाई उडालेच, “तुमची आयडिया म्हणजे सोना हाय सोना. अरे, आपल्या पिक्चरवर पोरांच्या उड्या पडणार. कॉलेजं ओस पडणार आणि थिएटरवर ब्लॅक चालणार. मी तुमच्या या आयडियावर वर्क करेल. तुम्हाला तुमचं पर्सेंटेज मिळेल. ”
दुसऱ्याच दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात बातमी झळकली –‘ ‘मौत से…. ‘ या चित्रपटाने प्रेरित होऊन एका प्रेमी युगुलाची आत्महत्या. ‘
बातमी एवढी तपशीलवार लिहिली होती, की ती फक्त आपल्या कल्पनेतूनच जन्माला आली आहे, यावर खुद्द अभिजितचाही विश्वास बसला
नाही. अर्थात खाली तळटीप होती -‘मृतांच्या निकटवर्तीयांच्या विनंतीवरून व त्यांच्या भावनांचा आदर करून मृतांची नावं तसंच त्या गावाचंही नाव बदललं आहे.’
त्या बातमीने खरंच जादूची कांडी फिरवली. चित्रपटाचा धंदा एवढा प्रचंड झाला की……
अभिजितला घसघशीत रकमेचा चेक मिळाला.
नवीनभाईंनी ग्रँड पार्टी दिली.
पार्टीहून घरी परतताना अचलाने धीर करून अभिजितला विचारलं,”अभि, एक विचारू?”
“काय? ”
“ती बातमी खरी होती का रे?”
अभिजित मोठ्याने हसला.
“तुझ्याच सुपीक डोक्यातून निघालेली?”
एरवी अभिजित चिडला असता ; पण आज तो जाम खुशीत होता.
“कशावरून?”
“नवीनभाई ज्या प्रेमाने तुझ्याशी बोलत होते ना, त्यावरून अंदाज केला मी.”
पुन्हा अभिजित हसला.
अचलाला आपल्या नवऱ्याच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटलं.
दुसऱ्या दिवशी अचलाने वर्तमानपत्र उघडलं. तिसऱ्या पानावर वरच्या उजव्या कोपऱ्यात बातमी होती – तशीच.यावेळी फोटोही होता. एकमेकांचे हात घट्ट धरलेल्या दोन निरागस मुलांच्या प्रेताचा. खाली नावं बदलल्याची टीपही नव्हती.अचलाच्या अंगावर काटा आला.
क्रमश: ….
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈