डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

शलाका आज मैत्रिणीकडे गेली होती. मैत्रिणीचा मुलगा आता बारावीला होता. जोरात अभ्यास चालला होता त्याचा. “ काय रे, तूही आईबाबांसारखा डॉक्टर होणार का? आमचा नितिन बघ. गेला बाबा मलेशियाला. छान चाललंय त्याचं अगदी ! “ शलाकाने ध्रुवला सांगितलं. ध्रुव म्हणाला, “ मावशी, माझं असं काहीही नाही. मी डॉक्टरच व्हावं असा काही आईबाबांचा आग्रह तर बिलकूल नाही. आणि मी सगळे ऑप्शन्स ओपन ठेवलेत. मार्क्स काय मिळतील त्यावर आहे सगळे अवलंबून.  प्रयत्न करणं फक्त माझ्या हातात ! ” ध्रुव शांतपणे म्हणाला.  

शलाका आणि सुशील दोघेही डॉक्टर होते.शलाका स्त्रीरोग तज्ञ आणि सुशील  सर्जन ! शलाकाला नितिन आणि नीति अशी दोन मुलं ! शाळेत असताना दोन्ही मुलं अतिशय हुशार होती. मुलांचे आजोबा त्या दोघांचा ठाकून  ठोकून अभ्यास करून घ्यायचे. हाडाचे शिक्षक होते आजीआजोबा दोघेही ! मुलांना सुरेख मार्क्स मिळाले, पहिले नंबर आले की आजी आजोबांना धन्य धन्य व्हायचे. सुशील त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मध्यमवर्गात सगळे बालपण गेले, पण सुशीलची कशाबद्दलही कुरकुर नसायची कधी. नेहमी अभ्यासात पहिलाच नंबर. अकरावीला बोर्डात आला होता सुशील आणि इंटरला  त्याला नामांकित  मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्याच लिस्टमध्ये सहज प्रवेश मिळाला होता. आईवडिलांना धन्यधन्य झाले… हा घराण्यातला पहिला डॉक्टर मुलगा. त्याने सहज पूर्ण केले शिक्षण आणि एम एस ला प्रवेश घेतला. सर्जन झाल्यावर एका मोठ्या हॉस्पिटलला नोकरी घेतली त्याने आणि मोठा फ्लॅटही लगेचच घेतला. पण तोपर्यंत चाळीत रहाण्यात मात्र कोणताही कमीपणा वाटला नाही कधी सुशीलला !

आता राहणीमान सुधारले होते, आणि  मुलीही सांगून यायला लागल्या होत्या. सुशीलने त्याच्याच वर्गातल्या शलाकाशी लग्न ठरवलं. चांगलीच होती तीही, स्त्रीरोगतज्ञ आणि हुशार. पण श्रीमंत घरातून आल्यामुळे जरा गर्विष्ठ सुद्धा. पण सुशीलची पसंती महत्वाची होती. शिवाय त्याच्याच व्यवसायातल्या साथीदाराचा त्याला हॉस्पिटलमध्येही खूप उपयोगही झाला असताच.   सुशील शलाकाचे हॉस्पिटल छान चालू लागले. आजी आजोबांनी लेकाचे वैभव मनसोक्त उपभोगले. त्यांच्या समवयस्क लोकांबरोबर विमानाने प्रवासही केले,आणि तृप्त झाले.

 नीति नितीन– ही दोन्ही नातवंडेही अभ्यासात चांगलीच होती. पण आजी आजोबांनी सतत त्यांचा अभ्यास  करून घेतल्यामुळे त्यांची स्वतः नोट्स  काढणे, आपला अभ्यास आपण करणे, कोणते चॅप्टर्स महत्वाचे असतात हे सगळे स्वतःचे स्वतः जाणून घेणे, अशा महत्वाच्या आणि आवश्यक गोष्टींची सवय गेलीच होती… म्हणजे खरंतर तशी सवय लागलीच नव्हती. सगळे घरीच आयते सांगितले जात असे, आणि ते फक्त  घोकंपट्टी करून उत्तम मार्क्स मिळवत असत. 

पण शाळेत असेपर्यंत हे सगळे ठीक होते. दहावी पर्यंत पहिल्या तीन नंबरात येणारी नीति, कॉलेजच्या पहिल्या वर्षात कशीबशी फर्स्ट क्लास टिकवू शकली.कॉलेजचा अभ्यास तर आजी आजोबा घेऊ शकत नव्हते, आणि यांची आत्तापर्यंतची स्पून- फीडिंग ची सवय आता एकदम जाणार तरी कशी होती? परिणामी नीतिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं लक्षण काही दिसत नव्हतं. तिने बीएस्सी ला प्रवेश घेतला. शलाकाची अतिशय इच्छा होती– म्हणजे अशी महत्वाकांक्षाच होती.. की दोन्ही मुलं  डॉक्टरच झाली पाहिजेत. पण नीतिला कुठेही प्रवेश मिळाला नाही आणि भरमसाट पैसा देऊन कसातरी प्रवेश मिळवला असता, तरी ती हे शिक्षण पूर्ण करेलच याची खात्री तरी कुठे वाटत होती शलाकाला? 

काहीवेळा सुशीलला वाटायचं, ‘ या मुलांना वाढवण्यात आपण कुठे चुकलोय का ?’  एकदा तो आपल्या वडलांजवळ बसला आणि म्हणाला, ” बाबा, आपण चाळीत राहिलो, अगदी सामान्य परिस्थितीत सुद्धा  मी शिकलो, कुठेही डोनेशन न देता डॉक्टर झालो, मग ही मुलं अशी कशी?”

आजोबा म्हणाले, “राग येईल तुला, पण याला तुम्हीच कारणीभूत आहात. आणि शलाकाचे तरी ‘आई’ म्हणून किती लक्ष आहे सांग मुलांवर? सतत तुम्ही हॉस्पिटलमध्ये असता, आणि त्याला पर्याय नाही हेही बरोबरच आहे.  पण म्हणून ती मुलं मागतील त्या गोष्टी तुम्ही त्यांच्या हातात देता हे बरोबर आहे का ? विचार कर जरा. नुसते बाहेरचे भरमसाट क्लास लावून काय उपयोग? मुळात एक गोष्ट लक्षात घे..  तुमची मुलं तुमच्यासारखी हुशार नाहीत.. दुर्दैवाने ! त्यांच्याकडून उगीच भलत्या अपेक्षा ठेवू नका. खरं सांगू का, मला नाही वाटत नितिनलाही मेडिकल झेपेल. करू दे की त्याला जे हवं ते ! त्यात कमीपणा मानायचे काय कारण आहे? करील तो पुढे पीएचडी सुद्धा. त्याचा कल कशाकडे आहे ते बघा ना ! तुम्ही डॉक्टर म्हणून त्यानेही डॉक्टरच  व्हायला हवे का? संगळ्यांचीच नसते तेवढी कुवत हे लक्षात घ्या रे जरा. “ 

सुशीलला बाबांचं म्हणणं तंतोतंत पटलं. तो लगेच शलाकाशी हे बोलला.. पण तिला ते अजिबात पटले नाही. “ हे बघ सुशील, नितीन डॉक्टरच झाला पाहिजे. आपले एवढे मोठे हॉस्पिटल….  आपल्यानंतर बघणार कोण मग ते ? आजोबा  आहेत जुन्या पिढीचे ! त्यांचं काय ऐकत बसतोस? हल्ली पैसे टाकले की कुठेही मिळते ऍडमिशन. आपण पाठवू त्याला परदेशात. आणि आता तू मध्येच असा नकारार्थी विचार करू नकोस.” पण सुशीलला तिचे म्हणणे अजिबात पटले नाही.  तो त्याच्या इतर डॉक्टर मित्रांशीही बोलला. मनोज म्हणाला, “ अरे आपल्या मुलांनी आपलाच व्यवसाय पुढे चालवला पाहिजे असं कुठंय ? आता माझेच बघ की. आमच्या किरणला मेडिकलला मुळीच नव्हते जायचे. तो इंजिनिअरिंगला गेला आणि छान चाललंय की त्याचं. उत्तम नोकरी मिळालीय. आम्ही कधीही त्याच्यावर आमची मतं लादली नाहीत. न  का होईनात मुलं डॉक्टर. आपल्यानंतर आपल्या व्यवसायाचे काय..  हा विचार आपल्या मुलांनी केलाच पाहिजे हे मला तरी नाही पटत. सुशील रागावू नकोस, पण तुझी शलाका जरा वेगळीच आहे. बघ बाबा, तिच्या हट्टापायी मुलांचं भलतंच काही नुकसान होऊ नये याचा तू विचार करावास असं मी सुचवेन तुला.” मनोजने सुशीलला सावध केलं.  

एकदा सुशीलने  नितीनला विचारलंही होतं, “ नितिन, तुला काय व्हायचंय पुढे? मी तरी तुझ्यावर माझी मतं लादणार नाही. तुझा कल कशात आहे? “

नितिन म्हणाला होता,” बाबा, मला आर्टिस्ट व्हायचंय. माझं ड्रॉईंग बघा ना किती छान आहे. मला जेजे  स्कूल ऑफ आर्टस्ला जायला आवडेल. पण आईला  ते आवडणार नाही हे मला माहिती आहे. ती म्हणेल तेच मला करावे लागणार बाबा.” 

नितिनला  बारावीला खूप कमी गुण मिळाले आणि भरपूर पैसे खर्च करायला लागून मलेशियाला मेडिकलला प्रवेश मिळाला त्याला.

–क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments