डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 3 ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
(आपला एवढा श्रीमंत मुलगा असल्या साध्या पायजमा शर्टात बघून पोटात तुटले शलाकाच्या…) इथून पुढे —
नितिन समोर आला आणि म्हणाला, “ बाबा, जरा आत या.” त्याच्या वॉर्डमध्ये नितीनने त्याला नेले. सगळ्या भिंती सुंदर सुंदर चित्रांनी सुशोभित झाल्या होत्या. “ बाबा, हे मी काढलंय. आवडलं का?” डोळ्यात पाणीच आलं शलाका आणि सुशीलच्या. लहान मुलाच्या डोळ्यात असते तशा अपेक्षेने नितीन आईवडिलांकडे बघत होता. सुशीलने त्याला पोटाशी धरले. “ किती रे सुंदर काढलं आहेस बाळा ! अजूनही वेळ गेली नाही. तू होऊ शकतोस चांगला आर्टिस्ट.” नितिन काहीच बोलला नाही,आणि निघून गेला तिथून. सुशील तिथल्या संचालकांना भेटला. ते म्हणाले,” नितीन सुधारतोय आणखी वेळ लागेल, पण नक्की बाहेर येईल यातून तो. नक्की बरा होईल. मग ठरवू त्याचे काय करायचे ते.”
नितीनला पूर्ण एक वर्ष लागलं यातून बाहेर यायला. तो पूर्ण वर्षभर त्या संस्थेत राहिला. तिथल्या साध्या सुध्या लोकांत अगदी मिसळून गेला. त्याला घरची आठवणही आली नाही कधी. एकदा अचानक आजोबा आजी त्याला भेटायला आले. नितिनला इतका आनंद झाला. आजोबांना मिठी मारून तो रडायला लागला.
“ आजोबा, मला माफ करा. मी तुमच्या कोणत्याच अपेक्षा पुऱ्या नाही करू शकलो. बहकत गेलो आणि स्वतःच्या हाताने नुकसान करून घेतलं. तुम्ही परोपरीने सांगत होतात, “ नितीन, तुला हवं तेच करिअर कर . आयुष्य तुझं आहे,, तुला हक्क आहे हवं ते करायचा. ” पण मी ऐकलं नाही. आईच्या महत्वाकांक्षेपुढे माझं काही चाललं नाही .अर्थात मी तिला दोष देत नाही. माझ्याच भल्यासाठी ती हे सांगत होती ना. पण मला ते झेपलं नाही आजोबा !” आजोबांनी नितीनला जवळ घेतलं. त्याचे डोळे पुसले. “ नितीन, मागचं सगळं आता विसरून जायचं. तू आणखी एक वर्ष असा छान राहिलास, तर मी तुला सरप्राईज देणार आहे.” आजोबांना बरे वाटले. आपला नातू आता नक्की मार्गी लागणार याची खात्री वाटत होती त्यांना. ते संचालकांना भेटून आले. त्यांनीही नितीनबद्दल समाधान व्यक्त केले. म्हणाले, “आजोबा, या मुलांवर लक्ष ठेवावे लागते. कधी ती पटकन पुन्हा व्यसनाकडे झुकतील, सांगता येत नाही. सलग पाच वर्षे गेली की मग बहुतेक तो धोका टळतो. मला खात्री आहे, तुम्ही त्याला नक्की वर काढाल. “
शलाका घरी आली की अतिशय निराश होई. बाकीच्या डॉक्टरांची मुले बघितली की ती अस्वस्थ होई. कुणालचा मुलगा लंडनहून एफ.आर. सी.एस. होऊन आला.
नीलिमाची पूर्वा डेंटिस्ट झाली.. या बातम्या ऐकून कासावीस व्हायची शलाका. यात आपला मुलगा कुठेच नाही याचे शल्य तिला टोचत राही. आपलं काय चुकलं याचा विचार करून वेड लागायची पाळी येई शलाकाला. सुशीलने तिला समजावणेही हल्ली सोडून दिले होते. दोन वर्षांनी नितीन घरी आला. एक महिना त्याला सगळ्यांनी त्याचा स्वतःचा वेळ दिला. तो अगदी पूर्वीचा नितीन झालाय, ही खात्री पटली सगळ्या घराला. एक दिवस नितीन आजोबांच्या खोलीत गेला आणि म्हणाला, “ आजोबा, मला तुम्ही सरप्राईज देणार होतात ना? तुम्हाला मी आता त्यासाठी योग्य झालोय असं वाटतंय का? “ आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं.. “. हो रे माझ्या बाळा. आपण उद्याच जाऊया तुझं सरप्राईज बघायला !”
दुसऱ्या दिवशी गाडी काढून सगळे कुटुंब एका इमारतीपाशी गेले. आजोबा म्हणाले,” नितिन, इथेच रहात होतो बरं का आम्ही पूर्वी ! इथे चाळ होती, तिथेच तुझे बाबा डॉक्टर होईपर्यंत राहिले. ती चाळ पडली आणि ही मोठी इमारत उभी राहिली, त्यात मला तीन खोल्या मिळाल्या. आम्ही आमच्या जुन्या खोल्या विकल्या नव्हत्या. चल आत !”
दुसऱ्या मजल्यावर नवीन कोरा ब्लॉक तयार होता. “ नितीन, इथे तू तुझा स्टुडिओ काढ. तू उत्तम आर्टिस्ट आहेस. अरे, तुझ्या हातातली कला तर नाही ना कोणी काढून घेतली? नसली डिग्री तुला तर नसली ! ही तुला आजोबा आजीची भेट ! “ सुशील शलाका थक्क झाले. त्यांच्या आणि नितीनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “ आजोबा, मी जिवापाड मेहनत करीन. तुम्हाला अपयश कधीही देणार नाही.” नितीनने आजोबांना मिठी मारली. “ बाबा, कमाल आहे तुमची हो ! मलाही पत्ता लागू दिला नाहीत कधी? किती ग्रेट असाल बाबा “ सुशीलने साष्टांग नमस्कार घातला आईवडिलांना. शलाकाने आजींना मिठी मारली. “ आजी, कसे फेडू उपकार तुमचे मी? माझा मुलगा तुमच्यामुळे माणसात आला.”
या गोष्टीला आता सात आठ वर्षे झाली. आज नितीनचा स्टुडिओ नाव कमावून आहे. खूप मोठ्या पुस्तकांची कव्हर्स तो करतो. त्याच्या हाताखाली आणखी दहा आर्टिस्ट काम करतात. नितिनच्या, ‘ विनायक आर्टस् ‘ च्या कामासाठी लोक सहा सहा महिने थांबायलाही तयार असतात. पूर्वीचा नितीन आता कुठे गेला, हे कोणालाही आठवत नाही. नितीनने आपल्या आजोबांचे नाव स्टुडिओला दिलंय. ‘ विनायक आर्टस् ‘ . आजोबा आजी नितीनचं यश बघून सुखासमाधानाने देवाघरी गेले. नितीन त्यांना कधीही विसरू शकत नाही. आज नितीन प्रतिष्ठित जाहिरात स्टुडिओ असलेल्या लोकांमध्ये गणला जातो. त्यानेच मुखपृष्ठ करावे म्हणून लेखक हटून बसतात. त्याच्या सुंदर म्यूरल् नी मोठ्या उद्योगपतींचे हॉल सुशोभित झाले आहेत. कधी नितीन एकटा असला, की आपले मागचे दिवस आठवतो, सरळ उठून त्या व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन तिथल्या मुलांना भेटतो. त्यांना आपली कहाणी न लाजता सांगतो, आणि ‘ कधीही असे व्यसनात अडकू नका रे मुलांनो,’ असे कळवळून सांगतो.
नितीनने चोवीस तास आपल्या कलेला वाहून घेतले आहे. त्याने लग्न केले नाही, आणि करणारही नाही. तो म्हणतो, ‘ मला आता वेळ नाही, आणि त्या व्यापात पडायचेच नाही मला.’
शलाका सुशीलने हॉस्पिटल चालवायला दिले आणि सुशील हौसेने नितीनच्या स्टुडिओचे सगळे आर्थिक व्यवहार बघतो.
एका अक्षरशः मातीमोल होणाऱ्या आयुष्याचे, शंभर नंबरी सोने होण्याची किमया नितीनच्या आयुष्यात घडली….. फक्त त्याच्या आजी आजोबांच्या दूरदृष्टीने….. त्यांनी त्याच्यावर टाकलेल्या गाढ विश्वासाने !
नितीन कायम त्यांच्या ऋणातच आणि स्मृतीतच रहाणे पसंत करतो.
— समाप्त —
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈