सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ अनुवादित कथा – “देवकी अजून जीवंत आहे” – सुश्री अनघा जोगळेकर ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मूळ हिंदी कथा – “देवकी अभी मरी नही‘”)
रात्रीचा पहिला प्रहर सरलाय. अंधार गडद होत चाललाय. टेबलावर ठेवलेल्या कादंबरीची पाने हवेतील पंखांप्रमाणे फडफडत आहेत. या आवाजात माझ्या मनाचा आवाजदेखील मिसळत चाललाय. झोप डोळ्यांपासून कित्येक योजने दूर आहे. तुटलेल्या मनाचे तुकडे जुन्या जखमांना चिरताहेत. गेल्या तीन-चार वर्षातली ती हृदयद्रावक घटना माझ्या डोळ्यांपुढे फिरते आहे. या दु:खद आठवणी विसरण्यासाठीच मी ती कादंबरी हातात घेतली आणि एवढ्यात माझ्या खोलीत आवाज आला, ‘ शिवाला नीलकंठ का म्हणतात, माहीत आहे?
त्या आवाजाने मी थबकले. खोलीत इकडे तिकडे पाहिले. खोलीत कुणीच नव्हते.
‘इकडे-तिकडे काय बघतेस? मी तुझ्यासमोरच तर आहे. मी आहे देवकी.’
‘देवकी.’
‘होय. देवकी. तुला माहीत आहे शिवाला नीलकंठ का म्हणतात, माहीत आहे?’
‘नीलकंठ. होय. माहीत आहे. … कारण त्यांनी वीष प्यालं होतं॰’
‘एकदा की पुन्हा पुन्हा?’
‘…..’
‘सांग ना! एकदा की पुन्हा पुन्हा?’
‘ए….एकदा ….’ मी चाचरत म्हंटलं॰
‘आणी मी?’ देवकीचा कंठ अवरुद्ध होत चालला.
‘…..’
(सुश्री अनघा जोगळेकर)
‘तू मलाच वाचत होतीस ना! ती बघ. टेबलावारच्या कादंबरीची पाने अजूनही फडफडताहेत.
मी पुतळा बनून देवकीकडे बघत राहिले. तिची वेदना अनुभवू लागले.
‘आपल्याच प्राणनाथाद्वारे आपल्याच पुत्रांना आपल्याच भावाकडे , त्यांच्या मृत्यूसाठी सोपवणं…’ देवकीला वेदना असह्य झाली. ती विव्हळली.
‘मला माहीत आहे.’ मी धीर करून म्हंटलं.
‘नाही. तुला काही माहीत नाही. माझा एक नव्हे… सहा सहा मुलं….’
‘ मी तुझी वेदना समजू शकते.’ तिचं बोलणं मधेच तोडत मी म्हंटलं.
‘काय, खरोखरच तू माझी वेदना समजू शकतेस?’ तिचा आवाज करुणार्द्र झाला होता. ती हळू हळू हुंदके देऊ लागली. ‘माझ्यासमोर माझ्या मुलांना शिळेवर आपटलं गेलं… ओह!’ यापुढे ती काहीच बोलू शकाली नाही. तिचे अश्रू खोलीतील हवा आर्द्र बनवू लागले होते. खूप वेळ अश्रू ढळल्यानतर ती काहीशी संतुलित झाली. म्हणाली,
‘तू खरंच बोलली होतीस. तू माझी व्यथा समजू शकतेस. एक स्त्रीच दुसर्या स्त्रीची पीडा समजू शकते.’
‘ हं! खरच एक स्त्री दुसर्या स्त्रीची पीडा समजू शकली असती तर …. ‘ मी उदास होऊन म्हंटलं.
“म्हणजे …” देवकी चमकून म्हणाली.
मी उगीचच तिच्यावर संतापले. ‘तुला काय वाटतं, तू इतिहासातील एक मात्र स्त्री आहेस, की जिच्या मुलांना मारून टाकलं गेलय.’
मी क्षणभर थांबले आणि दीर्घ श्वास घेतला. माझ्या मनातील व्यथा माझ्या डोळ्यात उतरली.
‘तू आजसुद्धा जीवंत आहेस. तू मेली नाहीस देवकी. तू कधीच मेली नाहीस. देवकी कधी मरत नाही. ती प्रत्येक युगात जीवंत असते. हां! तुझ्या मुलांच्या मृत्यूमुळे त्या घृणीत कामाला सुरुवात झाली आणि वर्तमान काळात त्याचं स्वरूप बदललं. एवढंच!’
‘तुझं बोलणं कळलं नाही मला!’ देवकीच्या स्वरात आश्चर्य होतं आणि वेदनाही. ‘देवकी’, मी माझे अश्रू पुसत म्हंटलं, ‘ तुझ्या मुलांना जन्म घेतल्यानंतर मारलं गेलं आणि माझ्या…’ खोलीत माझे हुंदके घुमू लागले. त्यातच देवकीची पीडाही मिसळली. खूप वेळपर्यंत आम्ही दोघींनी गुपचुपपणे आपआपल्या दु:खाला वाट मोकाळी करून दिली.
हे मौन देवकीनेच प्रथम तोडलं. नऊ महीने गर्भात रक्ताचं तीळ तीळ सिंचन करून झाल्यावर ते रक्त आपल्यासमोर शिळाखंडावर वाहाताना बघणं… ओह! केवढी असह्य वेदना होती ती… आपल्याच पुत्राचा सुकोमल देह छिन्न भिन्न होताना बघणं… मी माझ्याच मृत्यूची कामना करत होते तेव्हा…’ देवकीची पीडा मुखरीत झाली होती.
देवकीच्या या बोलण्याने माझ्या न जन्मलेल्या दोन भ्रूणांची आठवण झाली.
देवकी तू निदान नऊ महीने त्यांना आपल्या गर्भाशयात ठेवलंस. वाढवलंस. त्यांना आनुभवलंस. त्यांच्या जन्माच्या प्रसववेदना सहन केल्यास. त्यांचा सुंदर चेहरा बघितलास. एक क्षणभर का होईना, पण त्यांना आपल्या उराशी कवटाळलंस… पण मी… मला तर हेही सुख अनुभवायला मिळालं नाही.
‘…..’ देवकी आता काही न बोलता माझ्या व्यथा ऐकून घेत होती.
‘मला तर मुलगाच पाहिजे, असं काही नव्हतं. मी गर्भवती झाले, यातच मी खूश होते. ‘पण….’
‘पण…. काय?’ देवकीच्या अधीर स्वरात करूणा मिसळली होती.
‘देवकी तुझ्या पतीने तुझ्या मुलांचा बळी मान्य केला, कारण त्याला तुझे प्राण वाचवायचे होते. कारण तुझा आठवा पुत्र जन्माला येईल आणि विश्वाचे कल्याण होईल. आपले प्राण वाचवण्यासाठी तुझ्याच भावाने तुझ्या मुलांना मारलं. ते सारं अतीव दु:खदायक होतं, खूप दु:खदायक, पण…. ‘ माझ्या आसवांनी माझा सारा चेहरा भिजून गेला होता. भावनेच्या प्रवाहात मी वहात चालले होते. ‘पण माझा गर्भ तर तीन महिन्याचाही झाला नव्हता. त्याची हत्या करणारा दुसरा कुणी नव्हता. माझाच नवरा होता. त्याला मी जीवंत रहाण्याची वा मरण्याची पर्वा नव्हती आणि मारणारा पौरुषहीन होता. या घृणीत कामात स्त्रीसुद्धा सामील होती.’
‘काय? ‘ देवकीचा स्वर कारूणामिश्रित झाला. त्यात अविश्वास होता.
‘होय देवकी! आता तुझ्याबाबतीत घडलेल्या अपराधाचं स्वरूप बदललय. आता जन्म घेण्यापूर्वीच भ्रूणाला मारून टाकलं जातं. भ्रूणाचं मुलगा होणं अपराध नाही. मुलगी होणं हा अपराध आहे. आज पती, पत्नीला वाचवण्यासाठी नाही, आपला वंश वाचवण्यासाठी पत्नीला जिवंतपणीच मारून टाकतो आणि त्याला अन्य कुणी पुरुष नाही, घरच्या स्त्रियाच साथ देतात.’
देवकी स्तब्ध उभी राहिली मग म्हणाली, ‘म्हणजे …’
‘म्हणजे… देवकीची पीडा सरलेली नाही. उलट बदलत्या स्वरुपात अनेक पटींनी वाढलेली आहे. मग माझ्याकडे बघत म्हणाली, ‘मला वाटलं होतं, माझ्या पश्चात दुसरी देवकी होणार नाही. व्हायला नको. … ओह!’
मी माझ्याच दु:खात गुरफटून राहिले. तुझं दु:ख समजूनच घेतलं नाही.’
मी आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी देवकीकडे बघत राहिले. आज देवकी माझ्यापुढे स्वत:ची पीडा कमी लेखू लागली होती. पण खरोखरच आईची पीडा समजून घेणं इतकं का सोपं आहे? जिचं एक अंग कापलं गेलय, तिचं दु:ख, दुसर्या कुणाचं दुसरं अंग कापलं गेलय, त्यापेक्षा कमी का असणार आहे? वेदनेला परिभाषित करणं इतकं का सोपं आहे? वेदना ही वेदनाच असते. तिची कुठलीच परिभाषा नसते.
मी आणि देवकी आपल्या आपल्या दु:खात बुडून गेलो आणि एक दुसरीचे सांत्वन करत राहिलो. मला वाटलं, देवकीचं दु:ख माझ्यापेक्षा मोठं आहे. देवकीला वाटलं, माझं दु:ख तिच्यापेक्षा मोठं आहे.
एवढ्यात टेबलावर ठेवलेल्या कादंबरीची पाने फडफडू लागली. त्यातून आणखी एक स्त्री बाहेर पडून आमच्या दोघींमध्ये उभी राहिली.
‘रोहिणी तू?’ त्या स्त्रीकडे बघ देवकी आश्चर्याने म्हणाली.
‘हो. मीच! तुम्ही दोघींनी आपापलं दु:ख वाटून घेतलंत, पण माझं दु:ख…’
‘तुझं दु:ख?’ तू तर गोकुळात मजेत, सुखाने राहिलीस. बळिरामासारखा पुत्र तुला होता. तुला कसलं दु:ख?’
माझं बोलणं ऐकून क्षणभरासाठी रोहिणी हसली, पण त्याचबरोबर तिचे डोळेही डबडबून आले.
‘जिला हेही माहीत नसेल की कधी, कुणाचा भ्रूण तिच्या गर्भात रोपित केला गेलाय, ते गोपनीय ठेवणेही अनिवार्य आहे आणि माहीत झाल्यावरही ती त्याबद्दल कुणालाच काहीच सांगू शकत नाही, तिचं दु:ख…’
‘ओह!’ माझ्या तोंडून आपोआपच बाहेर पडलं. रोहिणीचं बोलणं अर्धवटच राहिलं. माझा सुस्कारा ऐकून देवकीने पुढे होऊन रोहिणीला सांभाळलं.
‘ती वेळच अशी होती रोहिणीची गोपनीयता आवश्यक होती आणि बळिरामाचा जन्मही।‘
‘माहीत आहे. मी आपल्याला दोष देत नाही, पण पतीच्या दीर्घकालीन अनुपस्थितीत पत्नीचं गर्भवती होणं आणि दुसर्याला खरंही सांगता न येणं…. माझं दु:ख कुणाला कळेल?
मी त्या दोघींकडे बघत राहिले. एक आपल्याच मुलांच्या हत्येन तडफडत होती, तर दुसरीने किती कलंक माथ्यावर झेलले होते. सहन केले होते. पण माझी खात्री आहे, शेवटी दोघीही जणी संतुष्ट झाल्या असणार. कारण…. कारण कृष्णाचा जन्म नेहमीच शुभ करून जातो. पण…. पण कृष्ण काय माझ्या उदरातून जन्म घेऊन मला माझ्या दु:खातून वर काढेल? हा प्रश्न माझ्या मानात यक्षप्रश्नाप्रमाणे विक्राळ रूप धारण करून उभा आहे.
देवकी आणि रोहिणी कादंबरीच्या आपापल्या पानात गुप्त झाल्या आहेत आणि … मी आणखी एक देवकी बनण्याच्या दिशेनेपुढे निघाली आहे आणि कदाचित रोहिणी बनण्याच्या दिशेनेही….
मूळ कथा – ‘देवकी अभी मरी नही’ – मूळ लेखिका – अनघा जोगळेकर मो.- 9654517813
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170 ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈