श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
सुजाता दारातच उभी राहून कुणाशी तरी बोलत होती, “काय काम काढलंस? त्यांनी बोलवलं होतं काय?” तिच्या या प्रश्नावर दबल्या आवाजात तो माणूस काही तरी सांगत होता.
“ते बॅंकेतून रिटायर झाले म्हणून काय झालं, एवढे पैसे काय घरात असतात होय?” सुजाताचं बोलणं तेवढं सतीशच्या कानावर आलं.
“ठीक आहे वहिनी, फक्त साहेबांना एकदा भेटून जातो.” असं म्हटल्यावर सुजाताने त्या गृहस्थाला आत बसायला सांगून सतीशला आवाज दिला, “अहो, ऐकलंत काय, जावेद आला आहे तुम्हाला भेटायला.” सुजाता आत निघून गेली.
सतीश दिवाणखान्यात येताच जावेद पटकन उठून उभा राहिला. सतीशने त्याला खुणेनंच बसायला सांगितलं आणि लगेच विचारलं, “किती पैसे हवे आहेत तुला?”
त्यानं चमकून वर पाहिलं. सतीश हळूच म्हणाला, “मी ऐकलं आहे सगळं. किती हवे आहेत सांग.”
इकडे तिकडे पाहत तो हळूच बोलला, “साहेब, पाच हजार रूपयाची नड आहे. मुलाला दवाखान्यात अॅडमिट करावं लागेल. तापानं फणफणला आहे तो. काल भारत बंद असल्याने माझा चेक वटला नाही. उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचे पैसे परत करतो.”
सतीश पटकन आत गेला. पैसे आणून त्याने जावेदच्या हातात ठेवले. जावेदही तेवढ्याच घाईत निघून गेला.
हा सगळा प्रकार सुजाताच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ती कमरेला पदर खोचत बाहेर येत म्हणाली, “काय हो, हा जावेद चार वर्षापूर्वी आपल्याकडे फर्निचरचं काम करून गेला होता ना ! त्यानंतर आजच दिसला. आजवर त्याने कितीतरी ठिकाणी कामं केली असतील. पण पैशासाठी त्याला तुमचाच भाबडा चेहरा बरा आठवला. आणि बघाच तुम्ही, उद्या तो तुमचे पैसे परत करायला फिरकणारच नाही. मी अगदी खात्रीने सांगते.” सतीशने तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं.
सतीशच्या फ्लॅटमध्ये जेव्हा फर्निचरचं काम करायचं होतं, तेव्हा जावेद पहिल्यांदा सतीशला भेटला होता. त्यानं एकंदर पंचेचाळीस हजाराचं एस्टिमेट सांगितलं होतं. काटेकोर मोजमापासहित आयएसआय मार्कचा कुठला प्लाय, कुठले लॅमिनेशन वापरणार हे सगळं सतीशला त्यानं समजावून सांगितलं. जावेद त्याच्या एस्टिमेटवर ठाम होता. सतीशला बजेट जास्त वाटत होतं म्हणून विचार करीत होता.
जावेद म्हणाला, “साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर, काम अगदी चोख करून देईन. दोन चार हजाराकडे पाहू नका. निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून हेच काम तीस हजारात देखील होईल. मला क्वालिटीत तडजोड करायला आवडत नाही. या उपर तुमची मर्जी !”
सतीश पटकन म्हणाला, “अरे त्याचं काही नाही. माझं बजेटच तीस हजाराचं आहे.”
“साहेब उरलेले पंधरा हजार दोन चार महिन्यानंतर तुमच्या सवडीने द्या, मी अॅडजस्ट करीन.”
फर्निचरच्या कामामुळे सतीशच्या घरातल्यांची कसलीही गैरसोय झाली नाही. जावेदने सगळी मापं काटेकोरपणाने घेतलेली होती. त्यानं सगळं वूडवर्क बाहेरच करून घेतलं. एका रविवारी येऊन फिटींग आणि लॅमिनेशन करून गेला. सतीशने देखील राहिलेले पैसे जावेदला लगेच देऊन टाकले. जावेदने काम सुरेखच केलं होतं.
थोड्याच वेळात सुजाता सतीशच्या समोर चहाचा कप ठेवत म्हणाली, “तुम्हाला आठवतं का, मध्यंतरी तुमच्या नात्यातला कुणी तरी आठवड्यात देतो म्हणून दोन हजार रूपये घेऊन गेला, परत फिरकलाच नाही. आता कुठल्याही कार्यक्रमात दिसला तरी तो न तुम्हाला ओळख दाखवतो न मला. तुमच्या एका मित्राचा जावई ‘लगेच परत करतो’ म्हणून एक हजार रूपये घेऊन गेला. फिरकला का तो इकडे?”
सतीश शांतपणे सुजाताला म्हणाला, “हे बघ, हे पैसे परत येणार नाहीत, हे समजून उमजूनच मी दिले होते. आपल्याकडून त्यांना केलेली ही एक नगण्य मदत आहे असं समज, हे तुला त्यावेळीच बोललो होतो. तुला ती कविता आठवतेय का? ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे !’”
सुजाता पटकन म्हणाली, “ते कवी महाशय असं का म्हणाले मला मुळात तेच कळलेलं नाहीये. देणारा देतो आहे तर घेणाऱ्याने त्याचे हात सुद्धा कशाला घ्यावेत? त्याचे हात त्यालाच राहू द्यावेत ना !”
सतीश हसत हसत म्हणाला, “अगं, देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्या देणाऱ्या माणसाची दानत घ्यावी आणि घेणाऱ्यांनी देखील कुणाला तरी देत जावे असा त्याचा अर्थ आहे.”
“ते असू द्या, पण हा जावेद तुमचा कोण लागतो बरं?”
या तिच्या प्रश्नावर सतीश म्हणाला, “अग, जावेद आणि माझ्यात कसलंही नातं नाही हे खरं असलं तरी किमान माणुसकीचं नातं तरी आहे ना? तूच म्हणालीस ना, त्याला तुमचाच भाबडा चेहरा का आठवला म्हणून? कदाचित जावेदने माझ्यात माणुसकीचा ओलावा पाहिला असेल म्हणून तो माझ्याकडे आलाय…
सुजा, अग पैसे उसने मागण्यासाठी मुलगा आजारी आहे असं कारण कुणी सांगेल का? क्षणभर समज, तो खोटेही सांगत असेल. ते खोटंच आहे असं मी कशाला समजू? कदाचित खरं देखील असेल. एक वेळ बेगडी श्रीमंती दाखवता येईल पण सच्चेपणा कसा दाखवता येईल? ती सिध्दच करावी लागते. गरिबांच्यावरच विश्वास टाकता येतो याचा प्रत्यय मला खूप वेळा आलेला आहे….. एका कवीने किती छान सांगितले आहे, ‘ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत. आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना थोडे उचलून घ्यावे !’ .. कळलं?”
“सगळ्यांना मदत करायला आपण काही धनाढ्य लागून गेलो नाही. जग हे या कवींच्यामुळे चालत नाही. माणूस थोडा व्यवहारीदेखील असावा लागतो.” असं बडबडत सुजाता आत गेली.
— क्रमशः भाग पहिला
© श्री व्यंकटेश देवनपल्ली.
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈