श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

?जीवनरंग ?

☆ रानपाखरू – भाग १  – लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

बांधावरला आंबा मव्हारला तवाच आती म्हनली ,

“यंदाच्या वर्साला मोप आंबे येतीन..पोरीचं हात याच वर्सी पिवळे केले पायजेल…बिना आईबापाचं लेकरू त्ये. मव्हारला आंबा लगेच डोळ्यात भरतोय.गावात  कुतरमुतीवानी ठाईठाई माजलेल्या रानमुंज्यांची काई कमी नाई..”

चुलीपुढं बसलेल्या आतीच्या तोंडातून काई शब्द

मामांशी आन् सोत्ताशी निगत व्हते.आविष्याला पुरलेल्या भोगवट्यामुळं तिला अशी मोठ्यांदी बोलायची सवय लागली व्हती. ती बोलत असली की, मामा जराजरा ईळानं आपसूक ‘हुं, हूं’ करत पन तंबाखू मळायच्या नादात नेमकं कायतरी मत्त्वाचं हुकून जाई आन आती पिसाळल्यागत करी.

“या मानसाला मुद्द्याचं बोलनं कवाच ऐकू जायचं नाई “.

बारीक असतांना संगीला त्यांच्या या लुटपुटच्या तंट्याची लय गंमत वाटायची पन जशी ती शानी व्हत गेली तसतशी तिला आती आन मामांच्या डोंगरावरढ्या उपकाराची जानीव झाली. म्हनूनच मग

हुशार असूनबी धाव्वीतूनच तिचा दाखला काडला , तवा ऊरी फुटुन रडावा वाटलं तरीबी ती रडली नाई.तसं ऊरी फुटून रडावं असे परसंग आतीमामांनी येऊ दिलेच नव्हते तिच्यावर. लोकंबी नवल करीत,

‘भाची असूनबी पोटच्या पोरीसारखी वाढीवली शांताबाईनं संगीला’ असं म्हनत. 

कोनी म्हनायचं , ‘ माह्यारचं तर कुत्रं बी गोड लागातंय बायांना.ही तर आख्खी रक्तामांसाची भाची.खरा मोठेपना असंल तर तो तिच्या नवऱ्याचा.’

‘अवो! कशाचं काय? त्याला सोत्ताचं पोरच झालं नाई. त्याचा कमीपना झाकायला म्हनून त्यानं बी मोडता घातला नसंल.’

‘ खरंय बया तुजं.त्याचं सोत्ताचं पोर झालं असतं तर कशाला त्यानं बायकूच्या माह्यारचं मानूस संभाळलं असतं?’

लोक धा तोंडांनी धा गोष्टी बोलत पन संगीसाठी तर ती दोघं विठ्ठलरुक्माईच व्हती.संगीचा बाप घरच्याच बैलानं भोसकला..समदी आतडी चिरफाडली गेली. त्या दुखन्यातच त्यो गेला आन् त्याच्यामागे दोनच वर्सांत मायबी. कुरडईचा घाट घेता घेता अचानक पेटली.कांबळं टाकेपर्यंत अर्धीनिर्धी करपली व्हती.शेवटी गेलीच.संगी तवा तीन वर्सांची व्हती. मायबाप आठवतबी नव्हती तिला.पन तरीबी कदीतरी ‘मायबापं कशानं गेली’ हे कुन्या नातेवाईकानं भसकन सांगितल्यावर तिला रडू आलं व्हतं.

साळंच्या पैल्या दिशी मामांनी साळंत नेऊन घातलं, तवा तर तिनं रडून हैदोस घातला व्हता. वर्गात मुसमुसत असलेल्या संगीला मास्तरीन म्हनली व्हती, ” सख्खी पोर नसूनही शाळा शिकवत आहेत.किती मोठी गोष्ट आहे ही.” समदं तिला समजलं नाई पन रडू आपोआप थांबलं ह्येबी खरं… 

आतीमामांनी घातलेल्या मायेच्या पायघड्यांवरून संगी चालत राहिली.दुडदुडत पळत जानारी तिची चाल जलम येईस्तवर नागिनीसारखी तेज व्हत गेली. 

आज आतीच्या तोंडून अवचित सोत्ताच्या लग्नाची बोलनी ऐकल्यावर, बांधावरच्या आंब्यावानी संगीच्या मनातबी मव्हर डवारला व्हता.निराळ्याच तंद्रीत आता तिची कामं व्हत व्हती. रामाकिसनाच्या काळापासून तिच्या रक्तात भिनल्यालं बाईपन आता ठसठशीत व्हत चाललं. सोत्ताच्या नकळत ती आतीचा सौंसारातला वावर निरखू निरखू बघू लागली व्हती.

आतीबी ‘ पोर आता शानीसुरती झाली,तिला सौंसारातलं बारीकनिरीक कळाया पायजेल.कुडं अडायला नकं’ या इचारानं येवढीतेवढी गोष्ट तिला दाखवू दाखवू करीत व्हती. आत्तीच्या अनभवांच्या ठिपक्यांवरून संगी भविष्याची रांगुळी वढत चालली व्हती.

” हे बघ!! हे आसं करायचं..दानं आसं पाखडायचं.. समदं सुपातून वर उधळायचं, वाऱ्यावर झूलवायचं..वाईट-साईट, कुचकं-नासकं टाकून द्यायचं आन निर्मळ तेवढंच पोटात ठिवायचं. बाईच्या जातीला पाखडाया आलं पाहिजेल…”

आती काई सोत्ताशी, काई पोरीशी, काई चार भितीतलं तर काई पोथीतलं ती बोलत व्हती.संगी जशी उमज पडंल तसं समदं साठवून घेत व्हती. 

‘शांताबाईची संगी लग्नाची हाये’ आसं समद्या भावकीत आता म्हाईत झालं व्हतं.येक दिस सांजच्याला मामा हातावर मशेरी मळत असताना आतीनं ईषय काडला,

“काय कुठे उजेड दिसतोय का?”

मामांनी वर न बघताच मशेरीची यक जोरदार फक्की मारून तोंडात कोंबली आन् सावकाशीनं सांगितलं,

” यक जागा हाये. महिपत्या नाय का? खंडोबाचा साडू, त्या जनाबाईच्या चुलतभावाचा पोरगा..”

” हा मंग!! चांगला लक्षात हाये तो.

गिरजीच्या पोरीच्या लग्नात त्यानीच तर देन्याघेन्यावरून गोंधूळ घातला व्हता.लय वंगाळ मानूस…”

आतीला मधीच थांबवीत मामा म्हनले,

” त्याचा पोरगा हाये लग्नाला..”

आतीला जरा ईळ काई बोलायलाच सुधारलं नाई. उलसंक थांबून ती म्हनली,

“तसा येवढाबी वंगाळ नाई .गिरजी तरी कुठं लय शानी लागून चालली??”

आतीचा उफराटा पवित्रा पाहून मामांना मिशीमंदी हसाया आलं.

” बरं ते हसायचं नंतर बघावा.. पोरगा कसाय? काय करतो? “

” लय भारी हाय म्हंत्यात दिसायला. घरची पंचवीस येकर बागायती शेती, पोटापुरतं शिक्षेनबी हाये. सोभावबी त्याच्या आईसारखा हाये.. गरीब.महिपत्यासारखा नाई.

…पोर सुंदर पाहिजेल पोराला फक्त”

संगीचं समदं काळीज त्या बोलन्याकडं लागून रायलं व्हतं.तिच्या मनात बागायती शिवार डोळ्यांपुढं नाचत व्हतं. बांधावर असलेल्या आंब्याच्या बुडी बसलेल्या आपल्या रांगड्या नवऱ्याला ती न्याहारी घेऊन जायाचं सपान बघू लागली.मनातल्या कोऱ्या चेहऱ्याला आकार येऊ लागला. तेज तलवारीवानी नाक आन् काळ्याभोर मधाच्या पोळ्यासारखा दाट मिशीचा आकडा आसं काईबाई तिच्या मनात उगवत व्हतं,मावळत व्हतं.

आतीमामांनी लय जीव लावला पन समज आल्यापासून मिंधेपनाची जानीव संगीचा पिच्छा करीत व्हती. सख्ख्या मायबापापाशी जसा हट्ट करता आला असता तसा तिनं आतीमामांपाशी कदीच केला नाई. जे हाय ते गोड मानून घेत रायली. आता नवरा नावाचं हक्काचं मानूस तिला मिळनार व्हतं..ज्याला ती सांगू शकनार व्हती, कच्च्या कैर्‍या पाडायला. ज्याच्या मोठाल्या तळव्यात चिचाबोरं ठेवून येक येक उचलून खायला, दोघांनी मिळून बांधावर मोकळ्यानं फिरायला, मास्तरांच्या इंदीकडे हाये तशी झुळझुळीत पोपटी रंगाची साडी घ्यायला, इहिरीत पवायला शिकवायला. राहून गेलेल्या कितीतरी हौशी..ज्या आतीमामांनी भीतीपोटी आन् संगीनं भिडंपोटी कधीच पुरवून घेतल्या नव्हत्या.

तिच्या मनातल्या मव्हरलेल्या आमराईवर आता रानपाखरं गाऊ लागली व्हती‌. 

तंद्रीत हरवल्यानं तिला आतीमामांचं पुढचं बोलनं ऐकाया गेलं नाई.

आती काळजीच्या आवाजात म्हणत होती,

“महिपत्याचं काई सांगता येत नाई.त्याला आपली संगी पसंत पडती,ना पडती?”

“लगीन महिपत्याच्या पोराला करायचंय का महिपत्याला? आन काय म्हनून नाकारतीन?अशी कंच्या बाबतीत डावी हाये आपली पोर? गोरीदेखनी हाये,घरकामात चलाख, शेतीत घातली तर सोनं पिकवील..अजून काय पायजेल? आन तुला वाटत असंल आपल्या परस्थितीचं…तर महिपत्यापासून काय आपली परस्थिती लपून नाई.. जिरायती का व्हईना पन जमिनीचा टुकडा हाये..लय डामाडौलात नाई पन पावन्यारावळ्यात कमीपना येनार नाई असं लगीन लावून द्यू.”

” या वरसाला पावसानं दगा दिला नाईतर..”

” रीनपानी करू सावकाराकडून..नायतर म्हैस हायेच आपली.बघता यील कायतरी”

“अवो पन..म्हैस हाये म्हनून दुधदूभतं तरी मिळातंय..ती इकल्यावर कसं व्हायचं?”

“त्ये बघू अजून..पावनी अजून यायचीत,त्यांनी पोर पसंत करायची..मग पुडलं बोलनं.लय हुरावल्यासारखं नको करू”

“लगीन तर लावू कसंबी पन देन्याघेन्यावर अडून बसले मंग..?”

“नाईतर त्याचा बाप दुसरा.. एवढं काय पानी पडलंय त्या पोरावर?त्याला काय सोन्याचा पत्रा बशिवलाय? आपल्या पोरीसारखी  पोर कुठं घावनारे त्यान्ला?”

यावर आतीनं मान डोलावली.बोलनं तिथच थांबलं खरं ,पन दोघांन्लाबी आशा लागलीच व्हती. 

दुसऱ्या दिशी सक्काळ सक्काळ आती म्हनली,

“मळ्यातला आंबा तरी उतरून घ्या तेवडा. जमलंच संगीचं लगीन तर लोनचं-बिनचं घालता नाई यायचं.थोडं वडं,पापड,शेवया केल्या पायजेल. यावर्साला पोर हाये हाताखाली.पुडल्या वरसाला कसंबी होवो.”

संगीच्या रूपाकडं पाहून ‘पावनी नाई म्हननार नाईत.लगीन जमल्याशिवाय रहायचं नाई’ असं तिला मनापासून वाटत व्हतं.बोलता बोलता आती मशेरी थुकायला म्हनून भाईर गेली आन डोळ्याचं पानी पुसून आली ह्ये कोनलाच कळलं नाई.

संगी कुरडयांसाठी गहू भिजू घालीत व्हती.कुरडयचा ढवळासफीद, ऊन ऊन चीक साखर टाकून खायला तिला लय आवडायचा.तिच्या जोडीदारनी तिच्यासाठी ध्यान करून चीक आनीत.तिची आवड माहित असूनबी आतीनं कुरडयांचा घाट घरी कदीच घातला नव्हता. वानळा आलेल्या कुरडयांवरच त्यांचं वरीस निघून जाई.पन् यावर्षाला मातूर आतीनं कुरडयांचं मनावर घेतलं व्हतं.संगीला प्रश्र्न पडला.तिनं विचारलंबी,सावकाशीनं आती बोलली,

“इतके दिस तुला काई म्हनले नाई..पन माझी वयनी,तुझी माय कुरडयाचा घाट घेता घेता भाजली त्ये मीच पाह्यलं व्हतं डोळ्यानं..मोप हाकबोंब केली पन वयनी नाई वाचली.तवापासून कुरडया करूशीच वाटल्या नाई कदी.”

संगी गुमान ऱ्हायली..

“आता तू म्हनशील..मग या वर्सालाच का घाट घातला? तर बयो त्याचं असंय..सांजसकाळ तू लगीन करून दुसऱ्याच्या घरला जाशीन. उद्याला तुझ्या सासूनं म्हनाया नको, का ही पोर बिनआईची म्हनून हिला कुरडया येती नाईत.तिच्या आतीनं येवढंबी शिकवलं नाई..”

बोलता बोलता आतीचं हुरदं दाटून आलं. 

क्रमश: भाग १

लेखिका – डॉ. क्षमा शेलार

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments