श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ ☆ तहान – भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
करुणा निकेतन क्रेशच्या पायर्या उतरून जस्मीन खाली आली आणि पाठोपाठ क्रेशमधील सारी जणही आली. गेटपर्यंत. तिला निरोप द्यायला. गेटच्या बाहेर सुनीता केव्हाची टॅक्सी थांबवून उभी होती. जस्मीनचे पाय मात्र तिथून निघता निघत नव्हते. पावले काशी जडशीळ झाली होती. क्रेशच्या दृष्टीने आत्ताचा क्षण ऐतिहासिक महत्वाचा होता.पंचवीस वर्षापूर्वी क्रेशने आपल्यात सामावून घेतलेली छोटी चिमखडी बघता बघता एम.बी.बी. एस. झाली होती आणि आता पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला निघाली होती. क्रेशमधल्या सगळ्यांनी तिला निरोप दिला. निरोप आणि हार्दिक शुभेच्छा. तिच्या शिक्षणासाठी …तिच्या भावी आयुष्यासाठी… तिच्या लोककल्याणकारी ध्येयासाठी…. त्या सार्यांच्या आत्मीयतेचं, सदीच्छांचं आपल्यावर खूप दडपण आलय, त्या दडपणाखाली आपण गुदमरत चाललोय, असं जस्मीनला वाटू लागलं. त्या सार्यांच्यामधून लवकर बाहेर पडावं, असं एकीकडे तिला वाटत असतानाच, दुसरीकडे पाय आणि मन मात्र त्यांच्यातच घोटाळत होतं. जितका वेळ त्यांच्या सहवासात राहता येईल, तेवढं बरं, असही तिला वाटत होतं. मनाच्या या द्विधा अवस्थेने ती भांबावून गेली होती. आज सकाळपासून क्रेशमधील प्रत्येक व्यक्ती तिच्याशी काही ना काही बोलावं म्हणून धडपडत होती. वेळ थोडा होता. बोलणं संपत नव्हतं. सर्वांनाच गहिवरून आलं होतं.
‘आज सिस्टर नॅन्सी हवी होती.’ सिस्टर मारियाच्या मनात आलं. जस्मीनला शिकवायचं, उच्च शिक्षणासाठी जर्मनीला पाठवायचं हे सिस्टर नॅन्सीचं स्वप्न… अनेकांना अनेक वेळा तिने बोलून दाखवलेलं… तिला खूप आनंद झाला असता. धन्यता वाटली असती. तिला आणि फादर फिलिपला. ‘गॉडस् ग्रेस’ ते म्हणाले असते.
क्रेशने अॅडॉप्ट केलेली जस्मीन ही पहिलीच मुलगी. तीन साडे तीन वर्षांची असेल तेव्हा ती. आज क्रेशचा परिवार खूपच वाढलाय. तीनशे, साडे तीनशे मुली आहेत. वेगवेगळ्या वयाच्या. वेगवेगळ्या इयत्तेतल्या. कुणी पोरक्या, कुणी टाकून दिलेल्या. कुणी आई-वडलांना परिस्थितीमुळे सांभाळणं अशक्य असलल्या, आणि म्हणून त्यांनी इथे आणून सोडलेल्या. कुणी गुन्हेगार, रिमांड होममधून पाठवलेल्या, कुणी घरातून पळून आलेल्या, इथे-तिथे भरकटत असलेल्या. क्रेशने सर्वांवर मायेचं छ्प्पर घातलय. त्यांना जीवन दिलय. संरक्षण दिलय. त्यांच्या शिक्षणाची सोय केलीय. जिच्या तिच्या कुवतीप्रमाणे. शहरातील अत्यंत मागास वस्ती असलेल्या ठिकाणी रेड टेंपल चर्च आहे. चर्चला जर्मन मिशनची मदत आहे. फादर फिलिप जर्मनीहून या चर्चचे मुखी बिशप म्हणून आले. दीन-दुबळ्यांची सेवा करणे हे प्रभू येशूचेच कार्य होय, या श्रद्धेने इथे काम करत राहिले. आस-पासच्या लोकांना मदत करत राहिले. दारीद्र्याने, लोकभ्रमाने अकाली खुडून नष्ट पावणार्या कळ्यांना जीवन द्यावं, कृतीने प्रभू येशूचा संदेश लोकांपर्यंत पोचवावा, या हेतूने चर्चची सिस्टर इन्स्टिट्यूशन म्हणून त्यांनी करुणा निकेतन क्रेश सुरू केले. मग सिस्टर नॅन्सी, सिस्टर मारीया , सिस्टर ज्युथिका जर्मनीहून आल्या आणि इथल्याच होऊन गेल्या. आणखीही कुणी कुणी स्थानिक ख्रिश्चनांनी मदतीचा हात पुढे केला. करुणा निकेतन क्रेश नावा-रूपाला आलं.
क्रमशः … भाग 2
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈