? जीवनरंग ❤️

☆  पोपट – भाग – 1 – लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर 

१९९५ साल असावे. तेव्हा लॅण्डलाइन फोनचा जमाना होता. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्हा तिघांना ( मी, बायको, आई ) आत्याने फराळाला बोलावले होते.  दरवर्षी दिवाळीचा एक एक दिवस आम्ही एकमेकांकडे जात असू.

सकाळी आठ वाजता नितीनने दरवाजा उघडताच त्याची साडेतीन वर्षांची गोड मुलगी बब्ली हाॅलमधेच खाली फुलबाज्यांच्या पेट्या, सापाच्या गोळ्या, रंगीत काडेपेट्या वगैरे फटाके मांडून बसलेली दिसली. श्रेया बेलचा आवाज ऐकून लगबगीने बाहेर आली. आत्या किचनमधे देवपूजा करत असावी. कारण देव्हार्यातल्या घंटेचा किणकिणाट ऐकू येत होता.

“काल सकाळी आत्या घरी नव्हती का?” मी श्रेयाला विचारले.

” परवा त्या त्यांच्या नणंदेकडे गिरगावात राहिल्या होत्या, काल संध्याकाळी आल्या.” श्रेयाने सांगितले.

” तरीच!” मी हसत उद्गारलो.

” काय झाले?”

” ते आता नितीन सांगेल.”

मी हसू आवरत म्हणालो, “नितीन, काल सकाळी साडेसातला मी तुला आमचे आजचे येणे कन्फर्म करायला फोन केला. तू बर्‍याच वेळाने फोनवर आलास.”

” काल वसूबारस होती. मी  बब्लीला उटणं लावून आंघोळ घालत होतो. दिवाळीत ही ड्यूटी माझी असते.” नितीनने श्रेयाकडे बघत उत्तर दिले. यावर तिने फक्त मान उडवली.

“नितीनराजा फोन आधी तुझ्या बब्लीनेच उचलला, मी तिला, ‘तू काय करतेस’ हे विचारले, तर तिने ‘कार्टून बघतेय’ असे उत्तर दिले. त्यानंतर माझ्या सांगण्यावरून ती तुमच्यापैकी कुणाला तरी बोलवायला गेली.” आता खर सांग, “तू कुणाच्या बब्लीला उटण लावून आंघोळ घालत होतास?”

नितीनचा चेहेरा पहाण्यासारखा झाला. श्रेया उठून घाईघाईने किचनमधे गेली. आईने न ऐकल्यासारखे केले आणि माझ्या बायकोने मला एक करकचून चिमटा काढला!

” तूला काय करायचय?” बायको पुटपुटली.

” मला फक्त खात्री करायचीय!”  मी साळसूदपणे म्हणालो.

“तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही,” असे म्हणून तीही किचनमधे आत्या आणि श्रेयाशी बोलायला निघून गेली.

बाहेर टिव्हीवर कार्टून चालू होते आणि नितीन गप्प राहून ते बघण्यात गुंग आहे असे दाखवत होता. अशीच दहा मिनीटे गेली.

तेवढ्यात आत्या किचनमधून श्रेया आणि बायकोला घेवून बाहेर आली. आम्ही सर्वजण डायनिंग टेबलवर फराळासाठी बसलो. श्रेया खालमानेने सर्वांच्या डिशेश भरू लागली. आई म्हणाली, ” काय रे तूम्ही दोघं आता बब्लीच्या भावंडाचा विचार करताय ?”      

” नाही मामी.” दोघेही ठामपणे एकाच सुरात म्हणाले. नितीनचा हात अभावितपणे पोटावर गेला. मला श्रेयाने मारलेला तो प्रसिद्ध गुद्दा आठवलाआणि हसू आले

” अरे मग निदान बब्लीला खेळायला एखादं कुत्र- मांजर तरी आणा.” आईने सल्ला दिला. 

“काही नको वहिनी, हे दोघे रोज सकाळी नोकरीसाठी बाहेर पडणार. मग मलाच त्याचे सर्व करावे लागणार.” आत्याने नाराजी दर्शवली.

” नितीन त्यापेक्षा तू पूर्वीसारखा पोपट का आणत नाहीस? त्याचे फार काही करावे लागत नाही.” मी अल्टरनेटिव्ह दिला.

“पूर्वी तुमच्याकडे पोपट होता?’

श्रेयाला आश्चर्य वाटले.

“एवढंच नाही तर बालपणी नितीनला चाळीत नीतीनशास्त्री म्हणायचे.”

“आता हे काय नवीन? मला कळलेच पाहिजे.” श्रेया लगेच सरसावून बसली.

“तो बराच मोठा किस्सा आहे.”

पुढच्या आठवड्यात आपण चौघे महाबळेश्वर ट्रिपला जाणार आहोत तिथे आम्ही तो दोघे मिळून सांगू.”

हे ऐकताच नितीनच्या चेहेर्‍यावर त्याचे सिग्नेचर (बनेल) हास्य उमटले आणि मी समाधान पावलो.” 

**** 

त्यापुढच्या आठवड्यात आम्ही चौघेजण आमच्या मुलांना त्यांच्या आज्यांकडे सोपवून तीन दिवसासाठी महाबळेश्वरला आलो. छान थंडी पडली होती. रात्री हाॅटेलच्या आवारात मोठी शेकोटी पेटलेली होती. जेवणे झाल्यावर त्या शेकोटी भोवती आम्ही गप्पा मारत बसलो. श्रेयाने लगेच पोपटाचा विषय काढला.

नितीन सांगू लागला, ” मी प्रायमरी शाळेत असताना आम्हाला हिरव्या रंगाचे आणि लाल चोचीचे पोपटाचे पिल्लू कोणीतरी आणून दिले. ते इतके लहान होते की त्याला उडता देखील येत नव्हते. त्यामुळे त्याच्या पिंजऱ्याचे दार आम्ही उघडेच ठेवत असू. पिलू घरभर फिरे. ते कधी खांद्यावर बसून हातातली हिरवी मिर्ची खाई तर कधी वाटीतली कच्ची डाळ खाई. ते नर आहे की मादी हे न कळल्याने  त्याचे आम्ही तेव्हा नामकरण केले नाही.”

“मी तेव्हा अभ्यासाची एक रंजक पद्धत शोधली होती. शाळेची सर्व पुस्तके मी पिला पुढे पसरून ठेवे. मग चोचीने जे पुस्तक ते पहिल्यांदा पुढे ओढे त्याचाच मी अभ्यास करीत असे. यामुळे माझे कित्येक विषय मागे पडत. मग वर्षाअखेरी ते कव्हर करताना आईचा घाम आणि माझी सालटे निघत.”

नितीन थांब, मी उत्साहाने म्हणालो, “याच्या पाचवीच्या व माझ्या नववीच्या उन्हाळी सुट्टीत आम्ही नाशिकला आजी- आजोबांकडे एकत्र गेलो होतो. तिथे महिनाभर खूप मजा केली. रोज गंगेवर फिरायचो, पोहायचो, सरकार वाड्यातल्या वाचनालयात जायचो.”

“पण इच्छा असुनही आम्हाला अकबर सोडा वाॅटर फॅक्टरीचा काश्मीरी सोडा, भगवंतरावची दुध-जलेबी  आणि पांडे मिठाईवाल्याचे गुलाबजाम रोज खाणे परवडत नसे. याला कारण अपुरा पॉकेटमनी! त्यावेळी मुलांचा पॉकेटमनी ही आमच्या नोकरदार वडिलांसाठी खर्चाची लास्ट प्रायोरिटी असायची. तेव्हा वाटायचे हे जर व्यवसाय करत असते तर अशी वेळ आमच्यावर आली नसती. मला त्यावेळी प्रथमच समाजशास्त्राच्या सरांनी म्हटलेल्या, “मराठी माणूस हा मुळातच व्यवसायाभिमुख नाही” या वाक्यातील कळकळ कळली. मग  नितीनचे बौद्धीक घेत त्याला, “कोणत्याही व्यवसायास वयाची अट नसते, ती फक्त नोकरीसाठी असते,” हे सरांचे वाक्य गंभीरपणे ऐकवले.

मला तिथेच रोखत नितीन पुढे सांगू लागला, “मग असे मन मारून जगण्यापेक्षा काहीतरी व्यवसाय करून पैसे मिळवावे असे आम्ही ठरवले.”

“गंगेवर अनेक ज्योतिषी पोपट घेवून भविष्य सांगायला बसलेले असत. बाया- बापड्या त्यांना हात दाखवून आपल्या भविष्याचा वेध घेत. मी ते कुतुहलाने पहात असे. दोन रूपये घेतल्यावर ते ज्योतिषी पत्त्यांसारखी बरीच पाने पसरत. त्यानंतर पिंजर्‍यातल्या पोपटाला बाहेर सोडत. पोपट रूबाबात त्यातला एक पत्ता चोचीने पुढे ओढे. मग त्या पत्त्याच्या मागच्या बाजूला छापलेले भविष्य वाचून दाखवले जाई.”

” बराच काथ्याकूट केल्यावर दादाने वाचनालयाचा तर मी ज्योतिषाचा व्यवसाय करायचे ठरवले! हे दोन्ही धंदे आमच्या बजेटमधे बसत होते.”

“दादाच्या घरी विकत घेतलेली आणि लोकांची वाचायला आणून परत न दिलेली अशी शंभरहून अधिक पुस्तके होती तर माझ्या घरी वेल ट्रेंड पोपट होता.”

” सर्वप्रथम आम्ही दोघांनी काळ्या रामाच्या मंदिरात जावून, मराठी माणसा सारखे कूपमंडूक वृत्तीने न वागता, गुजराथी समाजाचा आदर्श ठेवून, व्यवसायासाठी जमेल तितकी मदत एकमेकांना करायची अशी शपथ घेतली.”

” मग पुढील दोन आठवडे सरावासाठी दादा वाचनालयात आणि मी ज्योतिष वृंदात जावून बसू लागलो.”

नितीनला थांबवून त्यापुढील गंमत मी सांगू लागलो, “पुस्तकांचे नंबरींग, रेकॉर्ड, जतन, नियोजन तसेच वाचकांचे रजिस्टर, ‘फी’चे हिशोब हे तिथल्या काकांकडून मी नीट शिकून घेतले. तर नितीनने भविष्य कथनातील ग्यानबाची मेख ठरेल अशी ‘चपखल भविष्यवाणी’ शिकून घेतली. अशा रितीने आमचा धंद्याचा क्रॅश कोर्स पुर्ण झाला. परत आल्यावर मी वाचनालय सुरू करायचे ठरवले. नितीनने कुठूनतरी एका नामशेष झालेल्या राजकीय पक्षाच्या कार्यालयाची जीर्ण पाटी शोधून आणली आणि तिच्यावर ‘विद्यार्थी वाचनालय’ असे रंगवले. त्याबदल्यात मीही नितीनला जुन्या बाजारातून एका बाजूला भविष्य छापलेला पत्त्यांचा कॅट आणून दिला. अशा रितीने आमच्या व्यवसायाची सामग्री पूर्ण झाली. मग एक नवीनच अडचण उद्भवली. लोकांकडून आणलेल्या प्रत्येक पुस्तकांवर त्यांच्या नावापुढे ” xxx याजकडून विद्यार्थी वाचनालयास सप्रेम भेट” असा मजकूर लिहूनही काही उपयोग झाला नाही. लबाड वाचक आपल्या पुस्तकांवर मालकी हक्क सांगून व्यवसायात भागीदारी मागू लागले. शेवटी नाईलाजाने सर्व भागधारकांना फी माफ करावी लागली. मग माझ्या पॅसीव्ह स्वभावानुसार फक्त पैसे देणार्‍या गिर्‍हाईकांची वाट बघणेच उरले. पण नितीन ॲक्टीव्ह होता. त्याने जणू व्यवसायाचे व्रत घेतले होते. नाशिकहून आल्यापासून नितीनने वागणे बदलले. तो सकाळी सात वाजता आंघोळ आटपून, त्याला मुंजीत घेतलेला जांभळा कद नेसून, उघड्या अंगाने देवपूजा करू लागला. ओल्या केशरी गंधात धागा बुडवून त्याच्या तीन रेषा जेव्हा तो आपल्या गोर्‍या कपाळावर ओढे तेव्हा साक्षात सोपानदेवच आळंदीहून अवतरलेत असे वाटे. आत्या नितीनच्या ह्या नव्या रूपाने चकित झाली. खूप खोदून विचारल्यावर नितीनने आत्यास त्याला पंचवटीतल्या  धुम्डूम महाराजांनी दीक्षा दिल्याचे सांगितले. आत्याला दीक्षा (आपणहून) घेतात हे माहीत होते पण हा (न मागता) देण्याचा प्रकार नाशकात नव्याने सुरू झाला असावा असे वाटले.

एके दिवशी त्याचे बाबा घरात नसताना नितीनने देवपूजा आटोपल्यावर ज्योतिर्विद्येचा पहिला प्रयोग आत्यावर केला. तिला समोर बसवून, धुपाच्या धुरात डोळे झाकून पाच मिनीटे ध्यान लावले. मग आवाजाच्या एका वेगळ्याच टिपेत त्याच्या रूपाने पंचवटीतील ध्यानस्थ धुम्डूम महाराज बोलू लागले –

” माई, तुझा भूतकाळ मला स्पष्ट दिसतोय… तुझं आयुष्य फार खडतर गेलं … संसारात सूख नाही… कष्टाला फळ नाही… तू सगळ्यांसाठी खूप केलेस… पण कुणाला त्याची जाण नाही… काम झाल्यावर ते मिरवले… तूला खड्यासारखे बाजूला काढले… तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला … तुझ्या सरळ बोलण्याचा तिरका अर्थ काढला … वाईट घटनांचा दोष तुझ्या माथ्यावर लादला … तुझ्या पायात लक्ष्मी आहे … गृहकलहामुळे ती उंबर्‍यापाशी अडली आहे … पण लवकरच इडा-पिडा टळणार आहे… तुझे ग्रह बदलणार आहेत… त्यासाठी येत्या चंद्र नवमीला कडक उपास ठेव… गुळ घालून केलेल्या रव्याच्या खिरीचा नैवेद्य सायंकाळी शनिपारापाशी ठेव…  मगच अन्न ग्रहण कर… ओम शांती… सुखी भव!”

एवढे बोलून झाल्यावर नितीनने सावकाश डोळे उघडले व तो  आत्याची प्रतिक्रिया पाहू लागला. आपल्या पूर्वजीवना विषयीचे असे अचूक भाष्य ऐकल्यावर आत्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. तिने उठून नितीनला  पोटाशी धरले. त्याला सिद्धी प्राप्त झाली आहे याची तिला खात्रीच झाली. आपण गरोदर असताना एकदा आळंदीला गेलो होतो हे तिला आठवले. तिथेच कुणातरी पुण्यात्म्याने आपली कुस धन्य केली असावी असे तिला वाटले.  

क्रमश: भाग –१

लेखक – श्री रविकिरण संत

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments