श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
जीवनरंग
☆ पासिंग द पार्सल – लेखिका – सुश्री प्रतिभा तरवडकर ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
राजेशने बेलवर ठेवलेला हात काढलाच नाही.बेलचा टिंग टॉंग टिंग टॉंग असा कर्कश्श आवाज घुमतच राहिला.रंजना कणकेने भरलेले हात धुवून येईपर्यंत बेल अधीरपणे वाजतच राहिली.
‘हो हो,आले आले’म्हणत रंजनाने येऊन दार उघडले.राजेश उत्फुल्ल चेहऱ्याने उभा होता.सॅटीनच्या रिबिनचा बो बांधलेले, सुंदर वेष्टनातील एक भलेमोठे खोके त्याच्या पायाजवळ होते.राजेशचे डोळे आनंदाने चमकत होते.’सरप्राईज गिफ्ट?’रंजना कोड्यात पडली.राजेशचा स्वभाव कधीच रोमॅंटिक नव्हता.त्याच्याकडून असं सरप्राईज गिफ्ट वगैरे?रंजनाचा बुचकळ्यात पडलेला चेहरा पाहून राजेशने खुलासा केला,’अगं मागच्या वर्षीचा माझा परफॉर्मन्स बघून ऑफिसने गिफ्ट दिलंय.तसं प्रत्येकालाच गिफ्ट दिलंय पण मला सगळ्यात मोठं मिळालंय.’सांगतांना त्याची छाती आनंदाने फुलली होती.रंजनाच्या डोळ्यात आपल्या नवऱ्याच्या कौतुकाने चांदणं फुललं.राजेश आणि रंजनाने मिळून तो खोका घरात आणला.
‘सान्वी,सुजय बाबांनी काय गंमत आणलीये पहा,’बेलचा आवाज कानावर पडूनही न उठलेले सान्वी आणि सुजय ‘ गंमत’ हा परवलीचा शब्द ऐकून पळत आले.नाहीतरी एव्हढं महत्वाचं काम थोडंच करत होते?आईच्या मोबाईलचा ताबा सान्वीने घेतला होता तर सुजय लॅपटॉप वर कार्सच्या मॉडेल्स मध्ये बुडाला होता.दोघेही पळतच आले.त्या आकर्षक अशा वेष्टनात काय बरं दडलं असेल याबद्दलची सर्वांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती.खोक्याचं वरचं पुठ्ठ्याचं झाकण उघडून सर्वजण आत डोकावले आणि त्यांचे डोळेच विस्फारले.
आत अतिशय सुंदर, नाजूक असा काचेचा डिनर सेट होता.रंजना काळजीपूर्वक एक एक प्लेट काढून खाली ठेवू लागली.उत्कृष्ट दर्जाची पांढरी शुभ्र काच,त्यावर कडेने निळसर फुलांची नाजूक वेलबुट्टी….. सहा मोठ्या प्लेट्स, सहा छोट्या प्लेट्स,छोटे बाऊल्स,मोठे बाऊल्स, सर्व्हिंग बाऊल्स, ट्रे…. प्रत्येक वस्तू काढतांना रंजना अगदी नाजूक हातांनी काढत होती.मध्येच अधीरपणे सुजय एक प्लेट उचलायला गेला तशी रंजनाने त्याच्या हातावर चापट मारली.’उगाच धुसमुसळेपणा करशील आणि प्लेट फोडून ठेवशील.’
‘आई,आज आपण या प्लेटमध्ये जेवायचं का?’
‘गुड आयडिया,आई आपण आज याच प्लेट्स मध्ये जेवू या नं’सान्वी आईला लाडीगोडी लावत म्हणाली.
रंजनाच्या डोळ्यासमोर रात्रीच्या जेवणाचा मेन्यू आला.त्या नाजूक, सुंदर प्लेट्स मध्ये वाढलेली चटणी, कोशिंबीर,शेपूची भाजी, भाकरी आणि बाऊलमध्ये वाढलेली आमटी….. आणि तिने जाहीर केले,’आज नको, काहीतरी स्पेशल मेन्यू केला की या प्लेट्स काढू.’आणि रंजना सगळ्या काचेच्या वस्तू परत खोक्यात भरु लागली.
‘काय गं आई,’सान्वी हिरमुसली.’बाबांना एव्हढं छान गिफ्ट मिळालंय आणि तू ते वापरत नाहीस’
‘अजिबात नाही.’रंजना आपल्या मतावर ठाम होती.’आपल्या भाजी,आमटीच्या तेल आणि हळदीचे डाग पडून त्या पांढऱ्याशुभ्र प्लेट्स खराब झाल्या तर! शिवाय या प्लेट्स,बाऊल्स आपल्यालाच धुवायला लागणार.तुम्ही तयार आहात का ती क्रोकरी धुवायला?’
त्याबरोबर जादू व्हावी तशी दोन्ही मुलं तिथून अदृश्य झाली.त्यांच्या बाबांनी म्हणजे राजेशने नेहमीप्रमाणे तटस्थ भूमिका घेतली.
डिनर सेटचे खोके कोपऱ्यात पडून राहिले.
‘काय गं,काल राजेश कसलं खोकं घेऊन आला होता?’शेजारच्या अरुणाताईंनी चौकशी केली.
‘त्यांना बेस्ट परफॉर्मन्स साठी ऑफिसकडून काचेचा डिनर सेट मिळाला.’रंजना थंडपणे म्हणाली.’एव्हढी सुंदर,महागडी क्रोकरी कशी वापरणार? धुताना साबणामुळे हातातून प्लेट निसटून फुटली तर? म्हणून तो खोका तसाच ठेवून दिलाय.’
‘बरं केलंस, अजिबात वापरू नकोस!’अरुणाताई गूढपणे म्हणाल्या तशी रंजनाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले.अरुणाताईंनी तिला त्यांच्या घरात येण्याची खूण केली.
‘ही बघ गंमत,’एक कपाट उघडत अरुणाताई म्हणाल्या.रंजनाचे डोळे विस्फारले.एखाद्या गिफ्ट शॉप मध्ये शिरावे तसे तिला वाटले.लाफिंग बुद्धाच्या अंगठ्या एव्हढ्या मूर्तीपासून ते फूटभर उंचीच्या सोनेरी मूर्ती, काचेच्या छोट्या ट्रे मधील काचेचे कासव,तोंडात नाणं धरलेला बेडूक, फोटो फ्रेम्स, चिनी तोंडवळा असलेल्या गणपती आणि राधाकृष्णाच्या मूर्ती,स्टफ्ड टॉईज…..
‘हे कपाटभर सामान का बरं ठेवलंय?’रंजनाने आश्चर्याने विचारले.
‘गिफ्टस् म्हणून मिळाल्यात’,अरुणाताई नाक वाकडं करत म्हणाल्या.’मला सांग,यातील एक तरी वस्तू उपयोगाची आहे का?या मूर्ती धूळ बसून एका दिवसात खराब होतात.कोण पुसत बसेल रोज रोज?या फोटो फ्रेम्स तर इतक्या आहेत की सगळ्या लावायच्या म्हटल्या तर घराच्या एकूण एक भिंती भरुन जातील.अजून एक कारंजं मिळालं होतं विजेवर चालणारं.म्हणे समृद्धी येते त्याने.इतकं भलंमोठं की एक कोपरा व्यापेल खोलीचा!’
‘मग कुठंय ते?दिसत नाहीये इथं?’
‘अगं पासिंग द पार्सल केलं त्याचं!’अरुणाताई परत गूढपणे हसत म्हणाल्या.
‘म्हणजे?’
‘म्हणजे इधरका माल उधर करायचं.आपण लहानपणी नाही का तो खेळ खेळायचो, जोपर्यंत गाण्याचा आवाज ऐकू येतो तोपर्यंत आपल्या हातातील वस्तू शेजारच्याकडे सरकवायची.’
‘हां, आलं लक्षात.’रंजनाने मान डोलावली.
‘कपाटावर सगळी खोकी सोडवून,सपाट करून ठेवली आहेत.’कपाटाच्या छताकडे निर्देश करीत अरुणाताई म्हणाल्या.’कोणाकडे काही फंक्शन असलं की यातील एक एक वस्तू पुढे करायची.लहान मुलाचा वाढदिवस असला तर स्टफ्ड टॉय, नवीन घर घेतलंय…. फोटो फ्रेम वगैरे.छानपैकी चकचकीत कागदात गुंडाळून,सॅटीनच्या रिबिनीने सजवून द्यायची.पंधरा वीस रुपये खर्च येतो फक्त आणि महत्वाचं म्हणजे घरातील अडगळ कमी होते.’
रंजनाला अरुणाताईंचा सल्ला एकदम पटला.तिनेही तो डिनर सेट कपाटात ठेवून दिला.
तिच्याच गावातील सुनंदावन्संच्या अनिलचे लग्न ठरले.तसं लांबचं नातं असलं तरी गावातच असल्याने बऱ्यापैकी येणं जाणं होतं.सगळ्यांनाच अहेर करायला हवा होता. रंजनाने डोकं लढवून काचेचा तो सुंदर डिनर सेट अहेर म्हणून पुढे केला आणि सुटकेचा निःश्वास टाकला.
हळूहळू तिच्या कडे सुद्धा अरुणाताईंसारख्या निरुपयोगी भेटवस्तू जमा होऊ लागल्या पण त्यांची हुशारीने विल्हेवाट लावण्यात रंजना एक्सपर्ट झाली आणि ‘पासिंग द पार्सलचा खेळ’ ती लीलया खेळू लागली.
रंजनाची सान्वी मोठी झाली.शिक्षण पूर्ण करुन नोकरीला लागली.ऑफिसमधल्याच एका मुलाशी तिचा प्रेमविवाह जुळला.सान्वीला तो सर्वप्रकारे अनुरूप असल्याने नकाराचा प्रश्नच नव्हता.लग्नाचा मुहूर्त काढला,खरेद्या झाल्या.लग्न समीप आले.लग्नाआधी घरी करायचे धार्मिक विधींची गडबड सुरु झाली.बरेच पाहुणे आले होते.रंजना धार्मिक विधी आणि येणाऱ्या पाहुण्यांची उठबस यात पार बुडून गेली.विधींनंतर अहेरांची देवाण घेवाण झाली.पाहुणे आपापल्या घरी गेले.रंजनाला जरा निवांतपणा मिळाला.राजेश,सान्वी,सुजय, रंजना सारेजण उत्सुकतेने एक एक अहेर पाहू लागले.कोणी भरजरी साड्या,शर्ट पँट चं कापड दिलं होतं तर कोणी चांदीच्या छोट्या मोठ्या वस्तू, कोणी काही तर कोणी काही.सारेजण अहेर पहाण्यात पार रंगून गेले होते.
‘हे खोकं अमिताकाकूने दिलं’,सुजयने एक जड खोकं ढकलत आणलं.’बघू बघू,उघड तो खोका,’सारेजण एक्साईट झाले होते.सुजयने कात्रीने त्या खोक्यावरची रिबिन कापली आणि खोकं उघडलं आणि रंजनाचा चेहरा पडला.
तिने सुनंदावन्संना दिलेला काचेचा डिनर सेट फिरत फिरत परत तिच्याकडे आला होता.
‘पासिंग द पार्सल’ चं एक राऊंड पूर्ण झाले होते.
लेखिका – सुश्री प्रतिभा तरबडकर
प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.
मो. – 9561582372, 8806955070.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈