श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ ☆ तहान – भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

फादर फिलिपनी क्रेश सुरू करायचं ठरवल्यावर एका लेप्रसी झालेल्या भिकारी जोडप्याकडून त्यांची साडे-तीन, चार वर्षाची मुलगी दत्तक घेतली.

‘आम्ही तिचा नीट सांभाळ करू. तिला खूप शिकवू. पुढचं शिकायला जर्मनीला पाठवू. पण एकच अट आहे. तुम्ही तिला आजिबात भेटायचं नाही. ओळख द्यायची नाही. पुन्हा क्रेशाकडे फिरकायचच नाही.’

भिकारी जोडप्याने ते मान्य केलं. ‘मुलीच्या आयुष्याचं तरी कल्याण होईल’ , असा त्यांनी विचार केला असावा. फादरनी डॉ.थॉमसना मुलीचं कंप्लीट चेकअप करायला सांगितलं. मुलीला महारोगाचा संसर्ग झालेला नव्हता. ‘प्रभूची लीला… ‘ हाताने छातीवर क्रॉस करत ते म्हणाले. नंतर तिचा बाप्तिस्मा झाला. सिस्टर नॅन्सीने नाव सुचवले, ’जस्मीन’ … प्रसन्न, सुंदर, टवटवीत… आपल्या अस्तित्वाने सारे वातावरण सुगंधित करणारं फूल, जस्मीन.

जस्मीन…. क्रेशने अ‍ॅडॉप्ट केलेली पहिली मुलगी. सुरूवातीला रस्त्यावर वाढणारी जस्मीन त्या बंदिस्त वातावरणात इतकी भेदरून जायची, कुणीही अंगाला हात लावला, नुसतं जवळ जारी आलं, तरी आपलं अंग आक्रसून घ्यायची. पुढे ती तिथे रुळली.

जस्मीनने वेळोवेळी, क्रेशमधील इतरांच्या बोलण्यातून आपल्या जीवनासंबंधीचे गोळा केलेले हे तुकडे. एकटी असली की ते मांडून आपला जीवनपट जुळवण्याचा तिच्या मनाला छंदच लागून गेला होता. प्रत्यक्षात मात्र कुणाला काहे विचारायची तिची कधीच हिंमत झाली नाही. अगदी सशासारखी भित्री आणि बुजरी होती ती. जसजशी ती मोठी होत गेली, तसतसे तिच्या मनात विचार येऊ लागले, कोण असतील बरं आपले आई-वडील. फादरनी आल्याला प्रथम केव्हा, कुठे पाह्यलं असेल? त्यांच्या मनात केव्हा, कसं आलं असेल, आपल्याला अ‍ॅडॉप्ट करावं म्हणून? त्यांच्या मनात तसं आलंच नसतं तर? किंवा आई-वडलांनी आपल्याला द्यायचं नाकारलं असतं तर? आज आपण कुठे असतो? आपलं आयूष्य कसं जगत राहिलो असतो?

कल्पनेनेही तिच्या अंगावर शहारे येत. कदाचित् या समोरच्या भिकार्‍यांसारखाच आपलाही देह नासून गेला असता. कदाचित का, नक्कीच! त्यांच्यासारखीच लकतरे लेवून नासका देह फरफटत जगलो असतो आपण. काय वाटलं असतं त्या स्थितीत आपल्याला? की जीवन तसंच आहे, तेच जगणं स्वाभाविक आहे असं वाटलं असतं आपल्याला? कुणाच्या तरी दयेला, करुणेला आणि बर्‍याच वेळा घृणेला आवाहन करत जगत राहिलो असतो का आपण?

अनेक प्रश्न… प्रश्न… प्रश्नांचं चक्रव्यूह. प्रत्येक प्रश्न चक्रावून टाकणारा… ती आपल्या मनाशी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येक वेळी वेगळं उत्तर. त्या स्थितीतलं आपलं रूप ती नजरेसमोर आणून पाही आणि तिच्या अंगावर शहारा उठे.

शाळेत जाता- येता रस्त्यात दिसणारे भिकारी, रेड टेंपल चर्चच्या आसपास वावरणारे महारोगी ती आसासून पाहत राही. चपटी नाकं, थोटकी बोटं, सुजून धप्प झालेले हात-पाय , धूळ माखलेले विटके कपडे… कधी कुणी चाकाच्या गाडीवर, दुसरं कुणी गाडी ओढणारं… किंवा बसूनच फरफटणारे महारोगी, त्या प्रत्येकाचे चेहरे ती लक्षपूर्वक न्याहाळी. त्यांच्यापैकी कुणात आपलं साम्य आहे का, हे शोधायचा प्रयत्न करी. कुणाचे डोळे तिला आपल्यासारखे वाटत. कुणाची हनुवटी, कुणाचा रंग. यापैकी कोण असतील आपले आई-बाप. विचाराने तिचा थरकाप होई. अंगावरची सारी लव ताठ उभी राही.

शाळेत जाताना ती त्यांच्याकडे पाहत, थबकत, रेंगाळत जाई. तिचे त्यांच्याकडे लक्ष जाताच सारे भिकारी कलकलाट करू लागत, काही तरी मिळेल, या आशेने.

‘ताई, गरिबाला दोन पैसे द्या. देव तुम्हाला श्रीमंत करेल. सुखी ठेवेल.‘

क्रमशः … भाग 3

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments