सुश्री शांभवी मंगेश जोशी
जीवनरंग
☆ ‘तो रस्ता, ती भेट…!.’- भाग १ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆
सूर्य पश्चिम क्षितिजाकडे कलू लागला होता. पश्चिम क्षितिजावर रंगांची उधळण होऊ लागली होती. त्या रंगात प्रियम् चालली होती. गेल्या सहा महिन्यांपासून जवळ जवळ रोजच या नागमोडी रस्त्यावरून चालत जाण्याचा तिचा शिरस्ता होता. हा रस्ता तिला भयंकर आवडायचा! कुठेतरी जगाच्या पल्याड, स्वप्नांच्या गावाला घेऊन जाणारा!
तिच्या खोलीच्या टेरेसवरून हा रस्ता तिला दिसत राहायचा. एका अनामिक ओढीनं, ती त्याकडं बघत राहायची. भान विसरून! अभ्यासाचं टेबलच तिनं असं ठेवलं होतं की, मान वर करताच तिला हा रस्ता दिसायचा. शांत, निर्मनुष्य, थोडासा गूढ, पण रमणीय! डाव्या बाजूला एक छोटीशी टेकडी, उजव्या बाजूला हिरवंगार शेत. मधून नागमोडी वळणं घेत जाणारा हा शांत रस्ता. खूप लांबपर्यंत दिसायचा. जिथं दिसेनासा व्हायचा, तिथं पुन्हा दाट झाडी. त्यामुळं त्याची गूढता अधिकच वाढत होती. टेकडीच्या जवळून एक छोटासा ओढाही वहात होता. त्यामुळं त्याची रमणीयता वाढत होती. पुढं गेल्यावर एका वळणावर एक छोटासा कट्टा होता. मनातल्या मनात त्या कट्ट्यावर ती कितीदा तरी येऊन बसत होती. लहानपणापासून या रस्त्यानं थेट चालत जावं, असं तिला वाटायचं. आईजवळ तिनं तसा हट्टही केला अनेकदा, पण कधी मनावर घेतलं नाही.
शेवटी एकदा तिने पप्पांनाच विचारलं. तेव्हा पप्पांनी तिला समजावून सांगितलं, ‘‘पियू बेटा, तिथं जायला बंदी आहे. हा रस्ता आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जातो ना?’’
‘‘मग तिथं जायला बंदी का बरं?’’
‘‘अगं तिथं संशोधन चालतं! अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ तिथे काम करत असतात, संशोधन करत असतात. संशोधनाबद्दल फार गुप्तता पाळली जाते. तिथं अनावधानानं छोटीशी जरी चूक झाली, तरी दुर्घटना घडू शकते. सामान्य नागरिकाला यातलं काहीही माहीत नसतं. काही शोधही फार महत्त्वाचे असतात. त्याबद्दल गुप्तता पाळणं अपरिहार्य असतं. ’’
‘‘पण मग पप्पा तुम्ही कसे तिथं जाता? कधी कधी तर रात्र-रात्र?’’
ते ऐकल्यावर पप्पांना तिच्या निष्पाप, निरागसपणाची गंमत वाटली. ते मोठमोठ्यानं हसू लागले. त्यांच्या हसण्याने छोटी पियू मात्र गोंधळून गेली. आपलं काय चुकलं तिला कळेना. तिचा चेहरा उतरला. डोळे पाण्यानं भरून आले.
ते पहाताच पप्पांनी तिला जवळ घेतलं आणि तिचे डोळे पुसत म्हटले, ‘‘अगं वेडे, तुझा पप्पा शास्त्रज्ञ आहे ना! तुला माहीत नाही का?’’
‘‘अय्या खरंच? मग तुम्ही न्या ना मला तिकडे. ’’
‘‘हो हो जरुर जरुर, पण तू थोडी मोठी झाल्यावर’’
हे सगळं बोलणं प्रियमने आपल्या मेंदूत पक्क नोंद करून ठेवलं. खरंचच ग्रॅज्युएट झाल्यावर तिनं पप्पांना आठवण करून दिली. पप्पांनीही लगेच स्पेशल परवानगी काढून तिला इन्स्टिट्यूटमध्ये नेण्याचं ठरवलं.
इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याच्या कल्पनेनेच प्रियमच्या काळजात अनामिक धडधड होऊ लागली. अपार उत्सुकता वाढू लागली. ‘‘उद्या मी तुला घेऊन जाणार बरं का इन्स्टिट्यूटमध्ये’’ असं पप्पांनी सांगितल्यावर रात्रभर तिला झोपच आली नव्हती. सकाळी 10 वा. जायचं होतं तर ही 9 वाजल्यापासून तयार होऊन बसली होती.
10 वाजता पप्पांची कार आली. आवडत्या रस्त्यावरून गाडी धावू लागली. प्रियम् हरखून गेली. आता या जगापल्याड वेगळ्या जगात आपण जाणार, असं तिला सारखं वाटत होतं. नेहमीच जिथं रस्ता संपल्यासारखा वाटायचा, त्याच्याहीपुढं लांबच लांब रस्ता होता. तोही तेवढाच सुंदर, शांत, निर्मनुष्य! गंमत म्हणजे संपूर्ण रस्त्यावर अनेक छोट्या, छोट्या टेकड्या होत्या. दुतर्फा सुंदर, सुंदर वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. कधी न पाहिलेली. बघता बघता इन्स्टिट्यूटच्या गेटपाशी गाडी उभी राहिली. भक्कम दगडी कंपाऊंड आणि त्यावर काटेरी तारा होत्या. बंदूकधारी सुरक्षारक्षक गेटपाशी उभा होता. त्यानं कारपाशी येऊन पाहिलं. पप्पांना सॅल्यूट ठोकला. पप्पांचं एंट्रीकार्ड गेटवर स्वाईप करताच गेट उघडलं. गाडी आत शिरली. आतमध्येही पुन्हा मोठा रस्ता होता. आकर्षक फुलझाडांचा कलात्मक बगीचा होता. या आकर्षक दुनियेत विरघळून जावं असं प्रियमला वाटत होतं.
पुढं जाऊन एका भव्य इमारतीपाशी कार थांबली. ड्रायव्हरने तत्परतेने उतरून पप्पांचा न् तिचा दरवाजा उघडला. सारी निरीक्षणं करीत पप्पांच्या मागे ती चालत राहिली. प्रचंड मोठमोठी यंत्र, असंख्य वायर्स, स्तब्ध शांतता, अन् स्वतःला विसरून काम करणारी माणसे. कमालीची स्वच्छता अन् टापटीप.
या वातावरणाची नकळत प्रियमला भीती वाटू लागली. पण पप्पा बरोबर होते. पप्पांवर तिचा गाढ विश्वास होता, त्यामुळे आश्वस्त होऊन त्यांच्यामागून ती चालू लागली.
चालता चालता एका ठिकाणी पप्पा थांबले. ज्या ठिकाणी पप्पा थांबले तिथे डेंटीस्टकडे असते, तशी खुर्ची होती. त्या खुर्चीला असंख्य वायर्स अन् बटणं होती. त्या खुर्चीवर एक माणूस झोपला होता. त्याच्या डोक्याला असंख्य वायर्स अन् इलेक्ट्रोड्स लावलेले होते. त्याच्या हातात एक रिमोट होता. त्यावर अनेक बटणं होती. ती तो मधून मधून दाबत होता. समोरच्या स्क्रीनवर काही आलेख, आकडे दिसत होते.
तिथंच बिपीन उभा होता. पप्पांना पाहताच त्याने कमरेत वाकून ‘सर’ म्हणून आदराने नमस्कार केला. त्याला पाहताच प्रियमच्या मनात असंख्य सतारीच्या तारा झंकारू लागल्या. बिपीनने हॅलो म्हटले. प्रियमने फक्त हसून मानेनं नमस्कार केला.
‘‘येस बिपीन काय रिझल्टस्’’
‘‘येस सर! सकाळपासून मी बरीच ऑब्झर्वेशन्स घेतोय पण अजून तरी म्हणावा तसा रिझल्ट मिळत नाही. ’’
‘‘तो माणूस पूर्णपणे तयार आहे ना प्रयोगासाठी?’’
‘‘येस सर त्याने तसं रिटनमध्ये दिलं आहे. शिवाय त्याला पैशांची फार गरज आहे. त्यामुळे त्याची काही तक्रार नाही. ’’
‘‘ओ. के. कॅरी ऑन. मला अपडेट्स देत रहा. त्याच्या टेस्टस्चे काय?’’
‘‘झाल्यात! पण काही निगेटिव्ह आहेत. ’’
‘‘अच्छा. देन ट्राय अनदर पर्सन’’
‘येस सर हा रिटर्न आला की बघतो. ’’
त्यानंतर संपूर्ण इस्टिट्यूट पप्पांनी तिला दाखवली. पण बिपीन आणि त्याचा प्रयोग यातच ती अडकून पडली. पुढे फारसं काही तिला लक्षात राहिलं नाही. त्या प्रयोगाबद्दल अनेक प्रश्न तिला पप्पांना विचारायचे होते. पण त्यानंतर दोनच दिवसांनी आईला हार्टअॅटॅक न् तिचा मृत्यू. यामुळे सारंच बदलून गेलं. हसतं खेळतं घर गप्प-गप्प झालं. पप्पाही गप्प गप्प झाले.
प्रियमसाठी हा धक्का फार मोठा होता. सारं घर अनोळखी वाटत होतं. तो एक रस्ता तेवढा आपलासा वाटत होता. का कुणास ठाऊक खुणावत होता.
पौर्णिमेची रात्र होती. चंद्रप्रकाशात न्हालेली. पप्पा अजून आले नव्हते. एकटीला घरात बसणं असह्य झाले. पायात चपला सरकवून प्रियम निघाली. कट्ट्यावर जाऊन बसली. पहिल्यांदाच एकटी या रस्त्यावर आली होती प्रियम! पुढे त्या दिवशापासून बहुतेक रोजच येत होती. येऊन कट्ट्यावर बसत होती.
कट्ट्यावर बसल्यावरही आईची आठवण येत होती. आईचा मृत्यू, बिपीनचा प्रयोग न् हा रस्ता यात काहीतरी कनेक्शन आहे असं तिला वाटत होतं.
अचानक एक मोटारसायकल तिच्यासमोर थांबली. मोटारसायकलवर बिपीन होता. खाली उतरून तो तिच्याजवळ आला.
‘‘मिस रंगराजन? तुम्ही? आत्ता? इथं एकट्या’’
प्रियम काहीच बोलली नाही.
‘‘येस मिस रंगराजन’’
‘‘प्रियम नाव आहे माझं’’
‘‘हो! प्रियम्! तुम्ही काय करताय इथं’’
प्रियमच्या मनात दुःख दाटलेलं होतं. त्याचवेळेस बिपीन तिची चौकशी करत होता. तिचा बांध फुटला. डोळ्यांना धारा लागल्या. हुंदक्यांनी तिचं शरीर गदगदू लागलं.
बिपीनला कळेना काय करावं. त्यानं हातरुमाल तिच्यापुढं केला. ती आणखीनंच स्फुंदून स्फुंदून रडू लागली. तो थोडा पुढे झाला तर ती त्याच्या गळ्यातच पडली. कोसळली. बिपीनने निःशब्दपणे तिला आधार दिला. त्या क्षणापासून त्यांच्यातलं मानसिक अंतर मिटलं. मनाने ते खूप जवळ आले.
नंतर ते रोजच त्या कट्ट्यावर भेटू लागले. बघता बघता 6 महिने झाले असतील. बिपीनच्या सहवासानं तिचं दुःख थोडं हलकं झालं. एक दिवस बिपीनला तिने विचारलं, ‘‘त्या दिवशी तुझा काय प्रयोग चालू होता?’’
अचानक तो सावध झाला. त्यांच्यात कितीही जवळीक असली तरी तिला ते सांगणं नैतिकदृष्ट्या संमत नव्हतं. गुप्तता पाळणं भाग होतं. त्यानं ते कसंबसं टाळलं. पण रोजच प्रियम खोदून खोदून विचारत होती. रोज तो उद्यावर ढकलत होता.
पण आज! आज तिला ते नक्की विचारायचंच होतं. कोणत्याही परिस्थितीत. त्यासाठीच आज प्रियम चालली होती बिपीनला भेटायला. त्याच्या भेटीची ओढ होती. तेवढीच प्रयोगाबद्दल उत्सुकता. त्याच विचारात ती कट्ट्यापर्यंत येऊन पोहोचली होती. अत्यंत आतुरतेने त्याची वाट पाहत होती. थोड्याच वेळात तो तिच्या शेजारी येऊन बसला. काही क्षण तसेच गेले. एकमेकांचे अस्तित्व आणि जवळीक अनुभवण्यात.
‘‘सांगणार आहेस ना आज?’’ अचानक प्रियमनं विचारलं. नाही म्हटले तरी बिपीन सटपटलाच.
‘‘कसं सांगू प्रियम? अगं तुझ्या पप्पांचाच हा प्रयोग आहे. मी सांगितले तर तो मोठा गुन्हा ठरेल. ’’
‘‘तुझी शपथ! मी कुणालाही सांगणार नाही. तुझा विश्वास नाही का माझ्यावर?’’
‘‘तसं काही नाही गं, पण खरंच आम्ही तसं बाँडपेपरवर लिहून दिलेलं असतं. ’’ माझ्या मनाला ते पटत नाही.
‘‘ठीक आहे तर मग आता आपली ही शेवटची भेट. येते मी. ’’ असं म्हणून खरंच प्रियम उठली. तिचा हात धरून बिपीननं तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा ठामपणा तिच्या चेहर्यावर दिसत होता. शेवटी बिपीननं मनातल्या मनात माफी मागून तिला सांगायला तयार झाला नाईलाजास्तव! तोही गुंतला होता प्रियममध्ये.
क्रमश: – भाग १
© सौ. शांभवी मंगेश जोशी
संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003
फोन नं. 9673268040, [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈