सुश्री शांभवी मंगेश जोशी
जीवनरंग
☆ ‘तो रस्ता, ती भेट…!.’- भाग २ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆
(मागील भागात आपण पाहिले – ‘‘ठीक आहे तर मग आता आपली ही शेवटची भेट. येते मी.’’ असं म्हणून खरंच प्रियम उठली. तिचा हात धरून बिपीननं तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा ठामपणा तिच्या चेहर्यावर दिसत होता. शेवटी बिपीननं मनातल्या मनात माफी मागून तिला सांगायला तयार झाला नाईलाजास्तव! तोही गुंतला होता प्रियममध्ये. आता इथून पुढे )
‘‘प्रियम् तुला माहितो ना, दोन वर्षापूर्वी पप्पा ट्रेकला गेले होते.’’
‘‘हंऽ’’
‘‘तेव्हा त्यांना एक गुरू भेटले होते.’’
‘‘काय सांगतोस?’’
‘‘हो खरं आहे. पप्पा नेहमी खूप सांगायचे त्याबद्दल भरभरून! आत्मा.. परमात्मा असं बरंच काही सांगितलं होतं गुरूंनी त्यांना. त्या गुरुजींच्या मते आपण स्वर्गवासी झालेल्या आत्म्यांशी संवाद साधू शकतो.’’
‘‘अर्थात् सरांचा त्यावर विश्वास बसेना. तेव्हा त्या गुरूंनी अनेक शास्त्रशुद्ध पुरावे त्यांना दाखवले.’’
‘‘बापरे!’’
‘‘हो, सारंच क्वाईट इंटरेस्टींग आहे.’’ ‘‘तेव्हापासून ही गूढविद्या म्हण.. अध्यात्मशास्त्र म्हण याची भौतिक शास्त्राशी सांगड घालून ते साध्य करण्यासाठी पप्पांनी अनेक प्रयोग केले. मीही त्यांना असिस्ट करतो. मलाही फार इंटरेस्टींग वाटतंय सारं. त्यात नुकतीच तुझी आई गेली तेव्हापासून तर ते हट्टालाच पेटले आहेत. आईच्या आत्म्याशी संवाद साधायला. अक्षरशः रात्रंदिवस त्यांना तोच ध्यास लागला आहे. आताही त्याच संदर्भात ते बंगलोरला गेले आहेत.’’
‘‘वॉव! ग्रेट मग काय अडचण आहे मग?’’
‘‘अगं अशा प्रयोगासाठी माध्यम म्हणून एखादी व्यक्ती आवश्यक असते. ती प्रॉपर व्यक्ती मिळत नाहीये, त्यामुळं हवे तसे रिझल्टस् मिळत नाहीत. सोल कनेक्शन होत नाहीये. सगळ्या टेस्ट जर पॉझिटिव्ह आल्या तर कदाचित रिझल्टस् मिळतील.’’
‘‘का बरं तुम्ही पैसे पण देता ना? त्या दिवशी चाललं होतं काहीतरी.’’
हो ना पैसे तर भरपूर देतो, पण आम्हाला पाहिजे तशी व्यक्ती मिळत नाहीये.’’
‘‘म्हणजे कशी?’’
त्यासाठी बर्याच तपासण्या आम्ही घेतो. त्यात शारीरिक, तशाच मानसिक तपासण्याही असतात. आम्हाला पाहिजे तसे रिझल्टस् मिळाले, तरच ती व्यक्ती पात्र ठरते.
‘‘एवढ्या कठीण असतात का त्या तपासण्या?’’
‘‘कठीण नाही, पण आम्हाला पाहिजे तसे रिझल्टस् मिळाले पाहिजेत.’’
‘‘ए बिपीन, माझ्या घे ना तपासण्या! मी तयार आहे.’’
बिपीन एकदम दचकलाच!
प्रियम असं काही म्हणेल तसं स्वप्नातही त्याला वाटलं नव्हतं. तो एकदम उठलाच. तिनं हाताला धरून त्याला बसवलं. तो संपूर्ण घामानं डबडबला होता.
‘‘प्रियम काय हे भलतंच?’’
‘‘अरे, एवढं काय झालं घाबरायला? मी पण रिटन देते ना. शिवाय मला पैसे पण नको.’’
‘‘प्रश्न पैश्यांचा नाही प्रियम्-’’ घाम पुसत, बिपीन तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. कोरडी पडलेली जीभ ओठांवरून फिरवत होता. पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटेनात. विशीच्या वयातही प्रियमला त्याच्या अवस्थेचं गांभीर्य कळण्याएवढी परिपक्वता नसली तरी तिचा निर्धार आणि जिद्द दोन्हीही पक्के होते. त्यामुळेच बिपीन मनातून हादरला होता. प्रियममध्ये मनाने गुंतल्यामुळे त्याची अवस्था फार बिकट झाली होती. तिला नाही म्हटलं, तर ती पुन्हा भेटणार नाही – हो म्हणावं तर तो नैतिक अपराध ठरेल – तेवढाच राष्ट्रीय गुन्हा!
उद्या सांगतो प्रियम्! पण खरोखर हा फार मोठा गुन्हा ठरेल. ज्यामुळे तुझ्या पपांच्या कारकीर्दीवरही ठपका येईल. प्लीज नीट विचार कर – समजून घे.
‘‘माझं ठरलंय बिपीन. तूच उद्या मला सगळं सांगणार आहेस नक्की. उद्या भेटू.’’
एवढं बोलून प्रियम् चालू लागली. अंधारात एकटीच! ती दृष्टीआड होईपर्यंत तिच्या पाठमोर्या आकृतीकडे ‘आ’ करून पहात जागीच थिजल्यासारखा उभा होता.
पाठीमागून येणार्या कारच्या प्रखर प्रकाशाने तो भानावर आला. दिसेनाशा झालेल्या प्रियमचा विचार करत घरी निघाला. न जाणो प्रियम आपल्या आयुष्यातून खरोखर दिसेनाशी झाली तर? नाही – ह्या विचाराने तो भयभीत झाला. नकळत अॅक्सलेटर जोरात फिरवला गेला. अवघ्या काही मिनिटात तो घरी येऊन पोहोचला. घरात येताच निश्चळ पुतळ्यासारखा बसून राहिला. उठण्याची इच्छाही नव्हती अन् त्राणही. त्याचा कधी डोळा लागला त्याला कळलंच नाही.
अचानक फोनच्या रिंगने त्याला जाग आली. रंगराजन सरांचाच फोन होता. सरांना समजलं की काय मी प्रयोगासंबंधी प्रियमशी बोलल्याचं? त्याचे पाय लटपटू लागले. फोन घ्यायला हातही उचलेना. रिंग बंद झाली. त्याने निश्वास सोडला. तेवढ्यात पुन्हा रिंग. त्याने लटपटत्या हातांनी फोन घेतला. तोंडातून ‘हॅलोऽ’ – काही बाहेर येईना.
‘‘कारे झोपला होतास की काय? जरा अर्जंट आहे म्हणून तुला फोन केला एवढ्या रात्री.’’
‘‘हो सर बोला ना.’’
‘‘अरे, तुला माहीत आहे ना मी इथे बँगलोरला आलो आहे. कालच खउड (इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिस्ट) च्या मीटिंगमध्ये मी आपल्या प्रयोगाबद्दल सविस्तर बोललो. सर्वजण फार प्रभावित झाले आहेत. मला यायला दोन दिवस तरी लागतील. पण तू शक्यतो तो प्रयोग पूर्ण करून त्याचे ऑब्सर्वेशन्स आणि रिझल्टस् नोंदवून घे. मी आल्यावर पुढे त्यावर काम करता येईल. कोणी भेटलं की मीडियम म्हणून योग्य व्यक्ती.’’‘‘नाही पण उद्या बघतो मी. एकजण आला होता बाळा.’’
‘‘ओ.के. ट्राय युवर लेव्हल बेस्ट.’’
या फोनवरून बिपीनने सोयीस्कर अर्थ लावला. इमर्जन्सी म्हणून प्रियमचा माध्यम म्हणून वापर करायचं त्यानं ठरवलं. तिला उद्या भेटू म्हणून मेसेज करून ठेवला.
आश्चर्य म्हणजे प्रियमच्या सर्व टेस्ट हव्या तशा आल्या. त्याच दिवशी त्याने प्रयोग सुरू केला.
प्रियमला ‘त्या’ खुर्चीवर बसवलं. सारं समजावून सांगितलं. ‘‘हे बघ प्रियम्, या खुर्चीवर मी बटण दाबलं की अनेक इलेक्ट्रोड्स अन् कनेक्शन्स तुझ्या शरीराशी, मेंदूशी जोडले जातील. काही आवाज आणि वेगळ्या संवेदना तुला जाणवतील. पण तू न घाबरता शांत रहा. घाबरलीस तर प्रयोग यशस्वी होणार नाही.’’
‘‘नाही नाही मला आईच्या आत्म्याला भेटायचं आहे. मी नाही घाबरणार.’’
‘‘शाब्बास! आता ह्या रिमोटच्या बटणांचं समजून घे. मी स्टार्ट म्हटलं की तुझ्या समोरच अडकवलेल्या या रिमोटचं पांढर्या रंगाचे 1 नं.चे बटण दाब.
– तुला जर कंटिन्यू करायचं असेल तर 2 नं.चे हिरव्या रंगाचे बटण दाब.
– तुला जर थोडं थांबायचं असेल तर 3 नं.चे पिवळ्या रंगाचे बटण दाब.
– तुला जर छान वाटत असेल तर 4 नं.चे निळ्या रंगाचे बटण दाब.
– आणि सर्वात शेवटचे – तुला जर त्वरीत थांबावे वाटले, तर 5 नं. चे बटण दाब. त्वरीत सर्व कनेक्शन्स बंद होऊन तू मुक्त होशील.’’ आता हे सगळं एकदा पक्कं डोळ्यात नोंद करून ठेव.
10 मिनिटांनी आपण प्रयोग सुरू करू. प्रियमने सारं डोळ्यात पक्कं केलं. कधी प्रयोग सुरू होऊन आईच्या आत्म्याला भेटता येईल म्हणून ती अधीर, उतावीळ झाली होती.
आणि प्रयोग सुरू झाला.
बिपीनने तिला एक लिक्वीड प्यायला दिलं. एक जाकीट घालायला दिलं, अन् खुर्चीवर बसवलं.
‘‘प्रियम् शांतपणे डोळे बंद करून घे. दोन मिनीट दीर्घ श्वास घे. शेवटचं विचारतो, तू तयार आहेस ना प्रयोगासाठी?’’
‘‘होय बिपीन. आपण सगळी कागदपत्रं भरली आहेत ना? मी संमतीदर्शक सही पण दिली आहे.’’
‘‘येस्सं! लेट अस स्टार्ट नाऊ प्रियम् – बी रेडी. ऑल द बेस्ट. म्हणून त्याने बटण चालू केले.’’
प्रियमनेही पांढर्या रंगाचे बटण दाबले.
लगेचच पाठोपाठ दोन नं. चे हिरव्या रंगाचे बटण दाबले आणि पिवळ्या रंगाचे बटण न दाबता निळ्या रंगाचे बटण दाबले. याचा अर्थ तिला छान वाटत होतं. तिच्या चेहेर्यावर अतिशय आनंदी असे भाव होते.
आता बिपीनही अत्यंत अधीर झाला. तिच्या मेंदूला लावलेल्या इलेक्ट्रोड्समुळे त्याला काही ग्राफिक्स आणि काही सांकेतिक आकड्यांमुळे माहिती मिळत होती.
अचानक प्रियमच्या चेहेर्यावर वेदना दिसू लागली ती घाबरल्यासारखीही वाटत होती.
तो ओरडला- ‘‘काय झालं प्रियम्? त्रास होतोय का? बंद करायचं का?’’
प्रियमने तत्क्षणी काळ्या रंगाचे 5 नं.चे बटण दाबले. बिपीननेही सर्व कनेक्शन्स जाकीट काढून तिला मोकळे केले.
तेवढ्या काही क्षणात प्रियमचा चेहेरा वेदनेने पिळवटून गेला होता. खुर्चीवरून उठत तिने धावत बिपीनला मिठी मारली अन् हमसून-हमसून रडू लागली.
बिपीन घाबरला.
‘‘काय झालं प्रियम्? तुला फार त्रास होतोय?’’
‘‘मला एक सांग बिपीन, गेलेल्या मृत व्यक्तींचेच आत्मे आपल्याला दिसतात ना?’’
‘‘हो’’
‘‘पण मग मला पपांचा आत्मा कसा दिसला?’’ अत्यंत व्याकुळपणे प्रश्न विचारून तिने हंबरडा फोडला.
त्याच क्षणी दूरदर्शनवर न्यूज आली. ‘‘ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. रंगराजन ह्यांचे निधन झाल्याची दुःखद वार्ता हाती आली आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या परिषदेसाठी ते बंगलोरला गेले होते. तिथून मुंबईला परत येताना विमान अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे त्यांची एकुलती एक कन्या आहे.”
– समाप्त –
© सौ. शांभवी मंगेश जोशी
संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003
फोन नं. 9673268040, [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈