श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 4 ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆
(मागील भागात आपण पाहिले – ‘‘मग आपण संपर्कात राहू. केस कशी चालते आहे हे मला कळवत रहा.’’ ‘निश्चित॰ कसलीच काळजी करु नका.’’ आता यापुढे – )
मोहनरावांनी फोन ठेवला आणि विजयी मुद्रेने पत्नीकडे पाहिले. आशापण खुश झाली. तिला सासुबाईला, दिराला, जावेला, नणंदेला धडा शिकवायचा होता.
दुसर्या दिवशी मोहनराव आणि आशा मुंबईस निघाली. मोहनरावांच्या सुचनेनुसार भोसले वकिलांनी सर्व कागदपत्रे तयार केले आणि त्यांच्या नोटीसा मोहनरावांची आई, भाऊ वसंता, बहिण यशोदा यांना पाठवल्या. आपल्या मुलाकडून कोर्टातर्पेâ अशी नोटीस आल्याने सुमतीबाईंना फार वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात राहून राहून अश्रू जमा होऊ लागले. आपल्या नवर्याने कोणत्या हेतूने मृत्युपत्र केले आणि त्याचा परिणाम कुटुंब फुटण्यात होईल याची त्यांना कल्पना नव्हती. उलट मोहन सर्व समजून घेईल असे त्यांना वाटत होते. या गावच्या थोड्याशा जमिनीसाठी त्याला स्वार्थ नसणार असे त्यांना वाटत होते. पण झाले उलटेच. वसंताला नोटीस मिळताक्षणी तो खिन्न झाला. काही झालं तरी आपण कोर्टात जाणार नाही किंवा वकिलपत्र देणार नाही असा त्याने निर्णय घेतला. पण त्यांची बहिण यशोदा तिला आपल्या मोठ्या भावाचा राग आला. वडिलांच्या इच्छेविरुध्द त्यांच्या मृत्युपत्राला तो आव्हान देतो आहे हे पाहून या केसमध्ये आपल्या भावाविरुध्द उभे रहायचे एवढेच नव्हे तर कुणालातरी वकिलपत्र देण्याचा तिने निर्णय घेतला. त्याप्रमाणे तिने आणि तिच्या नवर्याने कणकवलीतील एक तरुण पण हुशार वकिल पाहिला आणि कोर्टात उभा केला. मृत्युपत्राला आव्हान देणारी केस कोर्टात उभी राहिली पण कागदपत्र अपुरं, पत्ता अपुरा या कारणाने पुढच्या तारखा मिळत गेल्या. भोसले वकिल प्रत्येक तारखेचे मोहनरावांकडून पैसे उकळत होता. मोहनराव आणि आशा यांना वाटले होते दोन-तीन महिन्यात केसचा निकाला लागेल. पण केस लांबत गेली आणि अचानक कोल्हापूरच्या प्रमोद नाईकांचा मोहनरावांना फोन आला.
नाईक कणकवलीत होते आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. वडिलांच्या प्रॉपर्टीत त्यांचा हिस्सा मान्य केला होता. प्रमोदरावांच्या या फोनने मोहनराव खुश झाले. मोहनरावांना खात्री झाली की आपल्यालापण असाच निर्णय मिळणार कारण दोघांचे वकिल एकच होते. मोहनरावांनी मोठ्या आनंदाने ही बातमी आशाला सांगितली. दोघेही आनंदात मग्न झाले. आता सासुचे, नणंदेचे आणि दिराचे नाक कापायला उशिर होणार नाही याची तिला खात्री वाटू लागली. तिने तातडीने ही बातमी वडिलांना कळविली आणि लवकरच आपणास कोकणातली प्रॉपर्टी मिळेल याची खात्री तिने वडिलांना दिली. या आनंदाच्या बातमी निमित्त मोहनराव, आशा तिचा भाऊ उमेश आणि त्याची पत्नी सर्वजण मोठ्या हॉटेलात जेवायला गेले. सर्वजण खुशीत होते. हॉटेलमधून मोहनराव आणि आशा रात्रौ ११ च्या सुमारास घरी पोहोचले.
मोहनराव कपडे बदलत असताना अचानक त्यांचा फोन वाजला. कणकवलीहून भोसले वकिलांचा फोन होता. भोसले वकिलांनी एक भयानक बातमी मोहनरावांना कळविली – ‘‘संध्याकाळी सातवाजता कणकवलीहून कोल्हापूरला निघालेले प्रमोदराव नाईक यांच्या गाडीला बावडा घाटात समोरुन येणार्या खाजगी बसने धडक दिली आणि त्यात दोघही नवरा बायको ठार झाली.’’
ही बातमी ऐकताच मोहनराव किंचाळले, थरथरले. त्यांच्या घशाला कोरड पडली. संध्याकाळी चारच्या सुमारास प्रमोदरावांनी फोन करुन केस जिंकल्याची बातमी सांगितली आणि आपण त्यांचे अभिनंदन केले आणि आता सहा तासात दुसरी बातमी अपघातात नाईक नवरा बायको ठार झाल्याची. मोहनराव सुन्न झाले. त्यांनी आशाला कशीबशी ही बातमी सांगितली. आशाही घाबरली. मोहनरावांनी कपडे बदलले आणि ते कॉटवर पडले. त्यांना एकसारखे भोसले वकिलांनी फोनवर सांगितलेले कानात ऐकू येत होते. प्रमोद नाईकांनीपण आपल्या सारखेच वडिलांच्या मृत्युपत्रातील इच्छेला कोर्टात आव्हान दिले आणि केस जिंकून प्रमोदराव कोल्हापूरला जात होते आणि…. मोहनराव मनात म्हणत होते – आपण पण तेच करतोय. आपण पण वडिलांच्या मृत्युपत्राला कोर्टात आव्हान दिले आहे. केस सुरु आहे. आपण आपली जन्मदाती आई, पाठचा भाऊ आणि एकुलती एक बहिण यांना नोटीस पाठविली. आपली सख्खी माणसे त्यांना नोटीस पाठविली….. एक सारखे हे विचार मोहनरावांच्या डोक्यात घोंगावू लागले. मोहनरावांना दरदरून घाम सुटला. डाव्या पाठीत ठणके बसू लागले. छाती ठणकू लागली आणि मोहनराव बेशुध्द झाले.
बाथरुममधून बाहेर आलेल्या आशाने नवर्याकडे पाहिले, तिच्या लक्षात आले – नवर्याची तब्बेत बरोबर नाही. तिने एसी चालू केला. धावत जाऊन पाणी आणून तोंडात घातले. पण शुध्द येईना. तिने भाऊ उमेशला फोन केला आणि येताना अॅम्ब्युलन्स आणायला सांगितली. उमेशने तिला घरात सॉर्बिट्रेटची गोळी असेल तर जिभेखाली ठेवायला सांगितली. आशाने कपाटात शोधून सॉर्बिट्रेटची गोळी काढली आणि मोहनरावांच्या जिभेखाली ठेवली. दोन मिनिटानंतर मोहनराव श्वास घेऊ लागले. पंधरा मिनिटात उमेश अॅम्ब्युलन्स घेऊन आला आणि मोहनरावांना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले.
हिंदूजा हॉस्पिटलमध्ये सर्व तातडीच्या तपासण्या झाल्या. भराभर छातीत इंजेक्शने दिली गेली. दोन दिवसांनी मोहनरावांची एन्जीओग्राफी केली गेली आणि त्यांना बायपास करण्याची शिफारस केली. दोन दिवसांनी मोहनरावांची बायपास झाली. आशा विचार करत होती. गेल्या दहा दिवसात किती धावपळ झाली. कणकवलीतील त्या भोसले वकिलांनी कोल्हापूरच्या नाईकच्या अपघाताची बातमी सांगितली आणि आपला नवरा हादरला. केवळ नशिब म्हणून आपला नवरा वाचला.
बायपास नंतर मोहनरावांना आयसीयु मधून जनरलमध्ये आणले. पण मोहनराव खिन्न होते. आपण किरकोळ जमिनीसाठी आईवर, भावंडांवर केस केली. त्यांना नोटीसा पाठविल्या ही आयुष्यातली फार मोठी चुक केली असे त्यांना वाटत होते. त्यांच्या डोळ्यासमोर वडिल येत होते. गावातील महाजनांच्या बागेत अळी काढणे, कोळम्याने पाणी काढणे, झाडावर चढून आंबे, रतांबे काढणे अशी कामे करुन त्या मजूरीतून घरात साखर पावडर मीठ आणायचे. रोज कष्टाची कामे, बागेतली नारळ सुपारी घेऊन दहा मैलावरील कणकवलीच्या बाजारात चालत जायचे आणि येताना मुलांना खाऊ, शाळेची पुस्तके-वह्या आणायचे. आपण हुशार म्हणून आपल्याला कणकवलीला अभ्यासाला ठेवले. तेव्हा त्यांची आणि आईच्या जीवाची किती घालमेल झालेली. आईफक्त रडत होती पण बापाने आपल्याला गावात अडकवले नाही. उलट शिक्षण घेऊ दिले. मुंबईहून आपले पत्र आले नाही तर दोघांचा जीव वर खाली व्हायचा. भाऊ वसंता आपण कणकवलीला शिकत होतो तेव्हा एवढासा होता. मी गावी गेलो की मागून मागून असायचा. अजूनही आपण गावी गेलो की माझ्यासाठी काय चांगले मिळेल ते आणायचा. कधी शहाळी, चांगले मासे, आंबे. बहिण यशोदा तर सर्वांची लाडकी. नेहमी दादा दादा करत मागे मागे. सर्व माझीच माणसे. रक्ताची माणसे. एका आईच्या पोटातून सर्वांनी जन्म घेतला. पण गावच्या किरकोळ गुंठ्यातील जमिनीसाठी आपण कोर्टात गेलो. वडिलांचे पण काही चुकले नाहीच. एवढ्याशा जमिनीत दोन भाग पाडले तर प्रत्येकाला काय येणार ? वसंताला काय राहणार ? त्याची तिन माणसे आणि आई जगणार कसे ? आपण आई-वडिलांना कधी पैसे धाडले नाहीत की बहिणीला काही पाठविले नाही. आपण पत्नी आशा, मुलगा आणि सासुरवाडीच्या माणसांचा विचार करत राहिलो. आपली बुध्दी भ्रष्ट झाली होती. छे छे… आपले चुकलेच. आता बरे वाटले की गावी जायचे. आईच्या पायावर डोके ठेवायचे. वसंताच्या पाठीवर थाप द्यायची. बहिणीच्या घरी जाऊन तिची खुशाली घ्यायची आणि कोर्टातली केस मागे घ्यायची. त्याशिवाय आपल्याला चैन नाही की सुख नाही. आशा समोर येऊन बसली. म्हणाली – ‘‘कसाला विचार करताय?’’
‘‘मी फार मोठी चुक केली. तुझ्या आणि तुझ्या माहेरच्या माणसांच्या बुध्दीवर चाललो. माझ्या सख्ख्या रक्ताच्या माणसांना विसरलो. वडिलांना त्यांच्या आजारपणात हाक मारली नाही, मदत केली नाही. खरतर त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना मुंबईत आणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले असते तर ते अजून जगले असते. पण मला तशी बुध्दी झाली नाही. त्यांचे सर्व वसंता आणि नलिनीने केले. तोंड मिटून केले. माझ्या वडिलांचे आजारपण त्या दोघांनी काढले म्हणून खरतर मी त्यांचे आभार मानायला हवे होते. त्या ऐवजी मी वाट्टेल तसे बोललो. मी ही केस मागे घेणार आहे. मला नको जमिन. नको हिस्सा. मला माझी माणसे हवीत. आता मला कोणी अडवायचे नाही. नाईकांचा अपघातात मृत्यु झाला पण त्यामुळे माझे डोळे उघडले. आता जर मी तुम्हाला जिवंत हवा असेन तर माझ्या मनाप्रमाणे वागायचं. वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा मान ठेवायचा.’’
क्रमश: भाग ४
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈