श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ ‘मृत्यूपत्र…’- भाग 5 ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले – मला माझी माणसे हवीत. आता मला कोणी अडवायचे नाही. नाईकांचा अपघातात मृत्यु झाला पण त्यामुळे माझे डोळे उघडले. आता जर मी तुम्हाला जिवंत हवा असेन तर माझ्या मनाप्रमाणे वागायचं. वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा मान ठेवायचा.’’ आता  इथून पुढे -)

आशा गप्प होती. आपला नवरा या आजारपणात पुरता खचला आहे. त्याला परत चालता फिरता करायचा असेल तर त्याच्या मनाविरुध्द वागायचे नाही हे तिने ओळखले. मोहनरावांनी भोसले वकिलांना सांगून केस मागे घेण्याची तयारी दाखवली.

वसंता नलिनीचा मुलगा शंतनु बारावी पास करुन कणकवलीत लॉ कॉलेजला जाऊ लागला होता. लॉ च्या दोन्ही वर्षात तो कॉलेजमध्ये पहिला आला. सुरुवातीला तो गावाहून जाऊन येऊन करत होता. पण आता अभ्यास वाढला म्हणून आणि नाडकर्णी वकिलांकडे अनुभवासाठी काम करत होता म्हणून तो कणकवलीतच हॉस्टेलमध्ये राहू लागला. मोहन-वसंताची आई सुमतीबाई अधून मधून आजारी असायची. तिलापण कणकवलीत अधून मधून डॉक्टरांकडे न्यायला लागत होते. शंतनु आता बाईबाबांना म्हणत होता. आपण सर्व कणकवलीत भाड्याची जागा घेऊन राहूया.

मोहनरावांना आईला, वसंताला, बहिणीला भेटायचं होतं. कोर्टात जाऊन केस मागे घ्यायची होती. जवळ जवळ तीन वर्षांनी मोहनराव आणि आशा घरी आली. काका घरी येणार आहेत हे कळताच शंतनु पण गावी आला. बहिण यशोदा पण माहेरी आली. मोहनराव घरी आले ते आईच्या खोलीत गेले. आईच्या पाया पडले. वसंता पण तेथेच त्यांच्या मागोमाग आला. वसंताच्या पाठीवरुन हात फिरवला. आशाने बॅगेतून सासुबाईंसाठी साडी बाहेर काढली. वसंतासाठी पॅन्टशर्ट बाहेर काढले, नलिनीसाठी साडी बाहेर काढली. शंतनुसाठी मोबाईल बाहेर काढला. बहिणीसाठी साडी, बहिणीच्या मुलीला मोबाईल हे सर्व टेबलावर ठेवून मोहनराव बोलू लागला.

‘‘आई, वसंता, यशोदे माझा चुकलाच. मी तुमका नको नकोता बोल्लयं, यशोदा मागच्यावेळी बोलली ता खरा आसा. खरंतर मी घरातलो मोठो मुलगो. मी घरातली जबाबदारी घेवक होई होती. आईबाबांनी माका मोठो केलो, शिकवलो. पण तेची जाण ठेवलयं नाय मी. मी मुंबईक गेलय आणि सगळ्यांका विसारलयं. लग्नानंतर माका सासुरवाडीची लोका मोठी वाटाक लागली आणि गावची बावळट. मी सासुरवाडच्यासाठी खुप केलय पण माझ्या आईवडिलांका, भावाक, बहिणीक विसारलयं. माझी चुक माका कळली. माझ्या वडिलांनी मृत्युपत्र करुन माका जमिन देवक नाय म्हणून मी रागान बेभान झालयं. त्यामागचो वडिलांचो हेतू माझ्या लक्षात ईलो नाय. वडिलांका या जमिनीचो तुकडो पाडूचो नाय व्हतो. माझी एकुलती एक बहिण यशोदा – तिच्या घराकडे कधी गेलयं नाय. तिची कधी विचारपुस केली नाय. तिच्या चेडवाक कधी जवळ घेतलय नाय. माझी चुक माका कळली. मी पैशाच्या धुंदीत होतय. पण एक फटको बसलो. आजारपणात मरणातून वाचलयं. कारण आईबाबांचे आशिर्वाद पाठीशी होते. हॉस्पिटलमध्ये एक महिनो बिछान्यावर पडलयं आणि सगळा डोळ्यासमोर इला. मी खूप चुक केलयं. आई, वसंता, यशोदे माझा चुकला. मोठ्या मनान सगळा इसरा.’’ मोहनराव गदगदून रडत रडत बोलत होता. बाजूला आशापण गप्प राहून ऐकत होती. त्यांच्या आईचेपण डोळे ओले झाले होते. वसंता, नलिनी, यशोदापण भावूक झाली होती. एवढ्यात वीस-एकवीस वर्षाचा वसंताचा मुलगा शंतनु बोलू लागला.

‘‘मोहनकाका तुम्ही म्हणालात सगळा विसरा, पण आम्ही कसे विसरतलवं, आजोबा वारले तेव्हा मी बारावीत होतय. सतरा वर्षाचो. मृत्युपत्रात तुमच्या नावावर जमीन ठेवक नाय म्हणून तुम्ही आजी, बाबा, यशोदे आते हेंका काय काय बोल्लात. माझ्या आई-बाबांनी मुद्दाम तसा मृत्युपत्र आजोबांका करुक सांगल्यानी असो आरोप केलात. यशोदा आतेन जाब विचारल्यान तेव्हा तिचा थोबाड फोडूक निघालात. मी लहान होतय म्हणून गप्प रवलंय आणि माझी आई माका काही बोलूक देईना. ही आशा काकी म्हणाली आंब्याच्या बागेचे लाखो रुपये घेतास – सव्वीस कलमांचे लाखो रुपये येतत ? कलमा आधी एक वर्षाआड येतत. तेंका मोठा करुन काय करुचा लागता त्या शेतकर्‍याक माहित. बागेची साफसफाई, खत, किटकनाशका किती महाग झाली याची तुमका कल्पना नसतली. आणि हल्ली माकडांचो त्रास किती सुरु आसा. माकडा लहान लहान फळा अर्धी खाऊन नासधुस करतत. बागवाल्याक कसला उत्पन्न मिळतला ? माझे आजोबा आणि बाबा वर्षभर तेच्या मागे रवत म्हणून थोडे आंबे. ही आशा काकी मागे म्हणाली, तुम्ही सगळे आयत्या घरात रवतात. ह्या जुन्या घरांका सांभाळना म्हणजे काय दुसर्‍याक कळाचा नाय. किती कौला फुटतत, माकडा उडी मारुन फोडतत, लाकूड खराब होता, वाळवी लागता, पावसात कौला फुटून गळता. गावात रवल्याशिवाय ह्या कळाचा नाय. ह्या असल्या घराक कंटाळून लोकांनी स्लॅबची घरा बांधल्यानी. आमच्याकडे पैशे नाय म्हणून – आणि तुम्ही जर पैशाची मदत केला असतास तर आम्ही स्लॅबचा घर बांधला असता पण तुमका तशी बुध्दी होना नाय. गणपतीक दुसर्‍या दिवशी येतास आणि पुजेक बसतास. गणपतीची तयारी आधी पंधरा दिवस असता. गणपतीक येवक होया तर त्या तयारीक येवक होया. गावात आळशी माणसा रवतत अशी ही काकी म्हणाली, असू दे आम्ही आळशी. आता या पुढे या घरातलो मोठो मुलगो म्हणून ह्या घर, आंब्याची झाडा, शेती, सण, देवपूजा सगळा तुम्ही सांभाळा. मी, आईबाबांका आणि आजीक घेवन कणकवलीक जातय. ती तिकडे भाड्याची जागा बघलय. माझे बाबा गवंडी आसत तेंका थय काम मिळतला. आम्ही बिर्‍हाड केला तर माझ्या आईक थोडी विश्रांती गावात. या घरात लग्न होऊन इल्यापासून तिका विश्रांती कसली ती माहिती नाही. आजीक पण मी घेवन जातय. कारण तिका वारंवार कणकवलीचो डॉक्टर लागता. आमची गुरा आसत तेंका मी माझ्या मामाकडे पाठवलयं. कारण तुमच्याकडून तेंची देखभाल होवची नाय. माझे बाबाही अशी कामा करत करत पन्नासाव्या वर्षी म्हातारे झाले, आई पंचेचाळीसाव्या वर्षी म्हातारी झाली. तेनी आयुष्यात कधी विश्रांती घेवक नाय. या दोघांचा आयुष्य वाढवचा आसात तर या घर सोडूक व्हया आणि आम्ही कणकवलीक बिर्‍हाड करुक व्हया. तेवा तुम्ही आणि काकी ह्या घर सांभाळा. तसे तुमी आता रिटायर्ड आसात, तुमचो मुलगो अमेरिकेत गेलो हा. तुम्ही मुंबईक रवलास काय आणि हय रवलास काय फरक पडना नाय. आजच संध्याकाळी मी आई बाबा आणि आजीक घेवन जातय. आता एकदम गणपतीक येव. तुम्ही कसे तिसर्‍या दिवशी गणपतीक येवास. तुम्ही मोठे भाऊ वडिलानंतर या घरची जबाबदारी तुमची. या घरातले देव, त्यांची पूजा, सण सगळे मोठ्या भावानच करुचे आसतत. आजपासून ह्या घर तुमचाच, शेती फक्त तुमचीच, आंब्याची झाडा, काजूची झाडा फक्त तुमचीच.’’ एवढे भडाभडा बोलून शंतनु थांबला. मोहनराव आणि आशा आ वासुन ऐकत राहिली. एवढासा शंतनु मोठा केव्हा झाला हे कळलेच नाही. वसंता आणि नलिनी सुध्दा आपल्या मुलाकडे पाहत राहिली. या शंतनुला आपण अजून लहान लहान म्हणत होतो, पण खरंच जे आम्ही बोलू शकणार नव्हतो ते हा मुलगा बोलला. वसंताला वाटले आयुष्यभर मी या घरासाठी झटलो, एक दिवस विश्रांती नाही. शहरातल्या लोकांसारखे ना नाटक, ना सिनेमा. पण किंमत कोणाला आहे ? ही आशा वहिनी गावातले सगळे लोक आळशी असे म्हणून मोकळी झाली. खरचं शंतनु म्हणतोय तर जाऊया कणकवलीला. मी गवंडी काम करेन. नलिनीला विश्रांती मिळेल. नलिनी मनात विचार करत होती. कमाल आहे या मुलाची. मोठ्या काकांना मनातले बोलला. मला असे कधी बोलायला जमले नसते. घर सोडून कणकवलीला बिर्‍हाड करायचं म्हणतोय सोप आहे का ते ? एवढी वर्षे या घरात राहिले. चला आता बिर्‍हाड करुया. तो म्हणतोय तर जाऊ कणकवलीला. शंतनुचे बोलणे मोहनराव आणि आशा ऐकत होती. शंतनु एवढा मोठा झाला हे त्यांना माहितच नव्हते. तो खरच घर सोडून आईवडिलांना, आजीला घेऊन कणकवलीला जाईल असे त्यांना वाटत नव्हते. मोहनरावांना वाटत होते. आपल्याला आणि आशाला हे घर सांभाळणे जमायचे नाही. नलिनी दिवसभर राबराब राबत असते. आशाला थोडेच जमणार ? आशाला आता शहरात राहून सुखाची सवय झाली आहे. पण करणार काय ? मागच्या वेळी आपण आणि आपली बायको काय काय बोलून गेलो. आता आपणाला हे सर्व ऐकून घ्यावेच लागेल.

मोहनराव आणि आशा पाहत होती. खरेच नलिनी कपड्यांच्या पिशव्या भरत होती. वसंता तिला मदत करत होता. मध्येच नलिनीने दोघांचे जेवण आणून ठेवले आणि रात्रीसाठी तुम्हा दोघांसाठी जेवण ठेवले आहे असे सांगून गेली. नलिनी वसंताने भरलेल्या पिशव्या पाहून आशा बोलू लागली.

‘‘वसंत भावोजी, आमचं चुकलंच, आम्ही रागाच्या भरात बोलून गेलो. मी तुम्हाला आळशी म्हणाले, ऐतखाऊ म्हणाले, आंब्याचे एवढे पैसे खाता म्हणाली, चुकच झाली. आम्ही तुमच्या सगळ्यांवर दावा दाखल केला. त्याची शिक्षा आम्हाला मिळाली. माझा नवरा मरणाच्या दारातून परत आला. पण आता तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. मी शहरात राहिलेली. मला हे गावातील घर सांभाळता येणार नाही. गावातले सण, रितीरीवाज मला जमणार नाहीत. मी सासुबाईंना उलट-सुलट बोलले. सासुबाई मला क्षमा करा.’’ असे काहीबाही आशा मोहन बोलत होते. हात जोडत होते. डोळे पुसत होते. पण वसंता, नलिनी, यशोदेने तिकडे लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने त्यांनी बाहेर जायचे कपडे घातले एवढ्यात शंतनु टेम्पो घेऊन आला. त्यात शंतनुने आणि वसंताने मिळून सर्व सामान भरले. एक रिक्षा आली त्यात शंतनुची आजी, आईबाबा आणि आते बसली. टेम्पोबरोबर शंतनु बसला. सर्वांनी देवाला नमस्कार केला. घराकडे एकदा डोळे भरुन पाहिले. रिक्षा आणि टेम्पो कणकवलीच्या दिशेने निघाली.

बाहेर लोट्यावर बसून मोहनराव आणि आशा डोक्याला हात लावून हे सर्व पाहत होते आणि त्यांच्या समोरील टेबलावर त्यांनी मुंबईहून आणलेल्या साड्या, शर्टपॅन्टपीस, मोबाईल्स त्यांचेकडे पाहत होते……

समाप्त

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments