श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – “हे बघ अश्विनी, अविनाश हुशार आहे.समंजस आहे.पणअतिशय घुमा आणि एककल्ली आहे. तूच आता त्याला वेळोवेळी समजून घ्यायचंस. तो चुकतोय असं वाटेल तेव्हा आधार देऊन त्याला सावरायचंस” बोलता बोलता आण्णांचा आवाज त्यांच्याही नकळत भरून आला…”)
“आण्णा, इतक्या गंभीरपणे तुम्ही विचार करावा असं खरंच काही नाहीये. काल बँकेत कामं आवरायला उशीर झाला आणि सगळेच बाहेर जेवायला गेले. दोन दिवस आपला फोन बंद आहे, एरवी त्यांनी निरोप दिला असता.”
अश्विनीला खरंतर स्वतःलाही हे जाणवत होतं की आपण आण्णांना बरं वाटावं म्हणून हे बोलतोय. तिने स्वतःला कसंबसं सावरलं आणि ती अविनाशला उठवायला गेली.
“बघितलंत? प्रत्येक गोष्टीत सूतावरुन स्वर्ग गाठता आणि उगीचच काळजी करता.तो एवढ्या लहान वयात बॅंकेत आॅफिसर म्हणून नोकरीला लागला,नवा संसार थाटला.कांही म्हणून तोशीश ठेवली नाहीय,ना कधी कसला घोर लावलायन् तुमच्या जीवाला. चार दिवस आलो आहोत त्याचं सुख पहायला तर कधी जवळ बसवून प्रेमानं कौतुकाची थाप दिलीयत कां त्याच्या पाठीवर? आजारपण असो नसो सतत आपले कडू औषधाचे डोस देत रहायचं. हे कर,ते करु नको.रांगतं बाळ आहे कां हो तो अजून ?अशाने तो कशाला तुमच्यासमोर येतोय न् तुमच्याशी मोकळेपणाने बोलतोय..?”
आण्णांना एकदम गहिवरून आलं. त्यांना खूप बोलायचं होतं, सांगायचं होतं. पण नेमके शब्द चाचपडत ते गप्प बसले….
‘आजवरचं आपलं आयुष्य म्हणजे सगळा खाचखळग्यातला प्रवास! पायपीट करता करता धडपडत,पडत, ठेचकाळत इथवर आलो.या नवसासायासाने जगल्या-वाचलेल्या एकुलत्या एका मुलाला तळहाताच्या फोडासारखं जपलं. वाढवलं. खंबीर आधार देणारे आई-वडील, समंजस बायको, भक्कम पगाराची नोकरी,या सगळ्यामुळे तो गाफील असल्यासारखा वागला तर त्याला मी सावध नाही का करायचं? माझ्या अनुभवांच्या शिदोरीतला एखादा घास तरी त्याच्यापर्यंत नाही का पोचवायचा? त्याला नाही भरवायचा?…’ ते स्वतःतच हरवले.
“अहो,..कसला विचार करताय?”
“तुला सांगू? आयुष्यात सुखाचे,आनंदाचे क्षण नेहमी नाचत-बागडत,हुंदडत येतात. गाजावाजा करत येतात. पण अडचणी आणि वाईट वेळा मात्र लपतछपत येतात. दबा धरून अचानक घाला घालतात. अशा वेळी नेमका हा जर गाफील राहिला तर…?”
“किती काळजी कराल त्याची?तो लहान आहे का हो आता?त्याचं त्याला सगळं छान समजतंय.मोठ्ठा साहेब झालाय तो.त्याला पांघरुणात लपवून ठेऊन त्याच्या जागी रोज तुम्ही जाऊन बसणार आहात का?आणि बसलात तसे,तरी ते व्याप तुम्हाला झेपणारायत का?मग त्याचं स्वत:चं आयुष्य,त्याचं म्हणून जसं येईल तसं जगू दे ना त्याचं त्याला.तुमचं सांगणं, विचार करणं मी समजू शकते हो. पण हे सगळं गोड गोळीसारखं दिलंत तर त्याला घ्यावंसं वाटेल ना? कडू औषध दिलंत तर तो झिडकारतच राहील. आणि याही पलीकडचं एक सांगू? या वयात कुणी आपणहोऊन मागितला तरच सल्ला द्यावा माणसानं. नाहीतर हरी हरी करीत स्वस्थ बसावं.”
————-
“अहोs,उठा बरं आता. आणि पटकन् तोंड धुऊन घ्या.मी तुमचा आणि आण्णांचा चहा ठेवतेय”
ऐकलं आणि आळसावलेली झोप झटकून अविनाश ताडकन् उठलाच.
“आण्णा मघाशीच फिरून आलेत ना गं?” तो त्रासिकपणे म्हणाला.
“हो”
“मग? त्यांचा अजून चहा झाला नाहीये?”
“पुन्हा घेतील अर्धा कप. त्या निमित्ताने तरी दोघं एकमेकांशी बोलत बसाल”
अविनाश छद्मीपणाने हसला.
“का हो?”
“त्यांच्याशी बोलायचं कधी असतं का गं कांही?.फक्त ते बोलतील ऐकायचंच तर असतं. ते किती चांगले, किती व्यवस्थित, किती काटेकोर, किती हुशार… आणि मी ?आळशी,धांदरट, गचाळ, मूर्ख… “
“किती लहान मुलासारखा विचार करता हो तुम्ही?” अश्विनीला त्याचं हसूच आलं.
“तुला हसायला काय जातंय? तू त्यांची मुलगी असतेस ना म्हणजे समजलं असतं.”
“समजायचंय काय त्यात? आवडलं असतं मला ते. चुकीचं किंवा काही वाईट कुठं सांगत असतात ते? काही सांगायचा, शिकवायचा एरवीही त्यांना हक्क आहेच ना?. तुम्ही उठा बरं आता. मी जातेय. या लगेच.
अविनाशला अश्विनीच्या या सरळपणाचा हेवा वाटत होता आणि कौतुकसुद्धा !
“हं.काय म्हणतेय बॅंक?”
“कांही नाही.ठीक आहे.”
“कशी चाललीय नोकरी?”
“छान.मजेत.”
“छान चालू दे.पण मजेत नको.हरघडी साक्षात् लक्ष्मीशी संबंध येतोय तुझा.ती अनेक मायावी रुपात तुझ्यासमोर येईल.त्या प्रत्येक वेळी तू कणखर आणि जागरुक असायला हवंस.”
त्याने होकारार्थी मान हलवली पण त्याची अस्वस्थता वाढत होतीच.
“अहो त्याला सकाळचा चहा तरी शांतपणे घेऊन देणार आहात का?”
“तो त्याच्या कानाने चहा पीत नाहीये ना? ऐकू येतंय ना त्याला चहा घेता घेता?”
“होय हो.पण आता त्याचं त्याला आवरु दे ना. त्याला आधीच उठायला उशीर झालाय ”
“मी तेच म्हणतोय. रात्रीची एवढी जागरणं करायचीच कशाला? वेळच्यावेळी घरी यावं. नियमित जेवण आणि ठराविक झोप घ्यावी. तरच शरीराचं यंत्र ठणठणीत राहील न् दामदुप्पट काम देईल. त्याच्या या अनियमित वागण्यामुळे निम्मी तब्येत खलास झालीय त्याची.”
“आण्णा, पण मी कामासाठीच तर…”
“योजनाबध्द रीतीने कामं केलीस, तर रात्री बारा बारा वाजेपर्यंत ताटकळायची आवश्यकता रहाणार नाही. एकत्र येऊन बाहेर जेवायला आणि चकाट्या फिटत बसायला बँकेच्या कामाचं निमित्त कशाला हवं?”
मनात साठत चाललेल्या संतापाचा आता स्फोट होणार हे जाणवताच चहा तसाच अर्धवट टाकून अविनाश उठलाच. तडक बेडरूममधे निघून गेला. कावरी बावरी झालेली अश्विनी त्याला समजवायला त्याच्यामागे धावली.. पण..
“थांब अश्विनी. जाऊ दे त्याला. अगं, तुला हे नवीन असेल पण त्याला कळायला लागल्यापासून आमचा हा लपंडावाचा खेळ असाच सुरू आहे आणि तेव्हापासून कितीही दम लागला, तरी डाव नेहमी असा माझ्यावरच येत रहाणाराय.”
तिची समजूत घालायला हे बोलताना ते वरकरणी हसत होते पण मनातून ते दुखावलेत हे त्या हसण्यातूनही अश्विनीला कळून चुकलं होतं!
—————-
“असं मधेच उठून कशाला आलात हो?”
“नसतो आलो तर अजून तासभर तरी त्यांचं प्रवचन संपलं नसतं.”
“हे फार होतंय हं”
“आता तूही मला..”
“आपलं लग्न झाल्यापासून गेले सहा महिने मी प्रत्येक पत्रातून त्या दोघांना आग्रहाने इकडे बोलवत होते तेव्हा कुठे यावेळी ते पहिल्यांदाच आलेत. ते इथे रहातील तितके दिवस त्यांना आनंदाने राहू द्या ना. तुम्ही शांत रहा आणि कृपा करून घरचं वातावरण बिघडवू नका. ते दुखावून किंवा कंटाळून निघून गेले ना तर मला चैन पडणार नाही सांगून ठेवते.” तिच्या डोळ्यांत टचकन् पाणीच आलं.
“मी भांडलोय का त्यांच्याशी? त्यांना कांही बोललोय तरी कां? “
“तुमचं हे काही न बोलणंच त्यांच्या जिव्हारी लागतं.”
“काहीही बोललो, काहीही सांगितलं तर ऐकून तरी घेतात का ते? वर त्यांचं म्हणून काहीतरी असतंच.तरीही तू त्यांचीच री ओढतेयस.”
“ते रागावून,चिडून, संतापून का़ही बोलले असते तर ते मलाच आवडलं नसतं. पण ते आपला प्रत्येक शब्द अतिशय शांतपणे मांडत असतील तर तुम्ही एक तर तो व्यवस्थितपणे खोडून तरी काढायला हवा किंवा तो मान्य करून स्वीकारायला तरी हवा “
“स्वीकारतेस काय? बँकेत तिथं किती कामं असतात हे यांना घरी बसून काय माहित?” त्याचा आवाज चढलाच.
“तुम्ही स्वतःचं समर्थन ठामपणे करू शकत नाही ना त्याचाच राग येतोय तुम्हाला.”
“म्हणजे मी..मी बँकेत झोपा काढतोय असं म्हणायचंय का तुला? “तो तारस्वरात ओरडला.
“हे बघा, हळू बोला. आण्णांना हे ऐकू जावं म्हणून ओरडून बोलत असाल तर सरळ त्यांच्या खोलीत जाऊनच बोला ना आणि अगदी खरं, प्रामाणिकपणानं सांगा त्यांना काल रात्री तुम्हाला यायला कां उशीर झाला होता ते आणि आलात तेव्हा तुमच्या तोंडाला कां आणि कसला वास येत होता तेसुध्दा… “
“अश्विनी?”
“येत होता ना? ” अश्विनीच्या घशाशी हुंदका दाटून आला.
“…… “
“मग एकत्र येऊन जेवायला आणि चकाट्या पिटायला बँकेचं काम तुम्ही निमित्त म्हणून वापरता असं आण्णा म्हणाले तेव्हा त्यांचा राग कां आला तुम्हाला? ते बोलले त्यात चुकीचं कांही नव्हतं याचाच ना? “
“अश्विनी, मित्रांच्या आग्रहाने कधीतरी एखाद्या पेग घेतला म्हणून मी लगेच दारुड्या होत नाहीss “
अश्विनी संतापाने त्याच्याकडे पहात राहिली.’ … ‘…आता जे कांहीं बोलायचं ते आत्ता न् या क्षणीच.नाहीतर नंतर बोलू म्हंटलंस तर वेळ हातातून निघून गेलेली असेल..’ तिने स्वत:ला बजावलं.
क्रमश:
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈