☆ जीवनरंग ☆ बोध कथा – वचनपूर्ती ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा ८. कीर्ती प्राप्तीचा मार्ग
पांचाल नगरात कोणी एक सुदर्शन नावाचा राजा होऊन गेला. त्याचा एक पुत्र होता. तो बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होता. राजाने सुसंस्कार करून त्याचे प्रेमाने लालन–पालन केले होते. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्या वर एक दिवस राजाला संबोधून तो म्हणाला, “आर्य, कीर्ती संपादन करण्याची माझी महत्वाकांक्षा आहे. कसे आचरण केल्यास मला कीर्ती प्राप्त होईल ते कथन करावे.”
त्यावर राजा म्हणाला, “ तू राज्य चालवत असताना प्रजेला कोणत्याही प्रकाराचे दु:ख होणार नाही याची काळजी घे. श्रीमंत व गरीब जनता यांचा योग्य प्रकारे विचार करून गरिबांना वेळोवेळी अन्न वस्त्र दान करून त्यांचे सर्वतोपरी रक्षण कर. त्यामुळे तुझी कीर्ति सर्वत्र पसरेल. श्रीमंतांना भरपूर दान करून कीर्ती प्राप्त होत नाही. यासाठी मेघाचा दृष्टांत लक्षात घे. जलाच्या दुर्भिक्ष्याने जेव्हा धान्य उगवत नाही, कोमेजून जाते अशा समयी जेव्हा मेघ बरसतो तेव्हा त्याची कीर्ती सर्वत्र गायली जाते. मात्र सागरात कितीही जलवर्षाव झाला, तरी मेघाची कीर्ती कोणी गात नाही. “
आपला हा पुत्र राज्य चालवण्यास सक्षम आहे हे जाणून राजाने अर्धे राज्य त्याला दिले. पुत्राने त्या राज्याचा स्वीकार करून राज्य शासनाचे नियम पाळून उत्तम प्रकारे राज्य केले. विशेषतः दरिद्री प्रजेचा पूर्णपणे विचार करून, त्यांना अन्न व वस्त्र देऊन अत्यंत आदराने त्यांचे पालन केले. त्यामुळे त्याची कीर्ती वृद्धिंगत झाली.
तात्पर्य – बुद्धीमान मंत्री राजदरबारी असले तर राज्याच्या रक्षणाची चिंता नसते.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी