श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- “अश्विनी,मित्रांच्या आग्रहाने कधीतरी एक पेग घेतला म्हणून मी लगेच दारुड्या होत नाहीss”
अश्विनी संतापाने त्याच्याकडे पहात राहिली…
‘आता जे काही बोलायचे ते आत्ता न् याच क्षणी. नाहीतर नंतर बोलू म्हटलंस तर वेळ हातून निघून गेलेली असेल..’
तिने स्वत:ला बजावलं.)
” मला त्याबद्दल कांहीच बोलायचं नाहीये. वास काल रात्री आला होता पण आत्ता या क्षणापर्यंत मी गप्प बसले होतेच ना? अहो तुमचे आई-वडील आपल्या लग्नानंतर प्रथमच आपल्याकडे रहायला आलेत याचं तरी भान ठेवायचं. ‘तो आला की एकदम सगळे जेवायला बसू’ म्हणून रात्री कितीतरी वेळ ते दोघे ताटकळत वाट पाहत होते. आण्णांची रोजची झोपायची वेळ झाली तेव्हा मीच त्या दोघांना आग्रह करून जेवणं करुन घ्यायला लावलं. तुमच्या काळजीने ते धड जेवलेही नव्हते माहितीय.? मलाही ‘तू पण जेवून घे’ म्हणत राहिले पण मी थांबून राहिले ताटकळत. तुमची वाट पहात. तुमच्यासाठी. उपाशी. पण तुम्हाला त्याचं सोयरसुतक होतंच कुठं? तुम्ही आलात आणि वास लपवायचा म्हणून पाठ फिरून झोपून गेलात. मी जेवलेय की उपाशी आहे याची साधी चौकशी करायच्याही मनस्थितीत नव्हतात तुम्ही. आणि एकटंच बसून गारगोट्या झालेला भात खायच्या मन:स्थितीत मीसुद्धा. पण माझ्या जवळच्या तुमच्या ‘दुसऱ्या जीवाचं’ धन जपायचं होतं ना मला?मग उपाशी राहून कसं चाललं असतं? झकत दोन घास पोटात ढकलले आणि मगच झोपले.”
अश्विनीच्या तोंडून ‘दुसऱ्या जीवाचा’ उल्लेख ऐकून अविनाश त्याही मनस्थितीत आनंदला. त्याने अश्विनीला अलगद जवळ घेतलं. ही गोड बातमी डोळ्यांत असं पाणी आणून सांगायला लागली म्हणून अश्विनी मात्र हिरमुसलेलीच होती.
“अश्विनी, अशी चूक आता यापुढे माझ्याकडून पुन्हा कधीच….”
“तुमची चूक दाखवून द्यायला किंवा तुमच्याशी भांडायला हे सगळं मी बोलले नाहीय. पण आण्णा बोलतात, चुका दाखवतात म्हणत त्यांनाच तुम्ही मोडीत काढायला निघालात तेव्हा बोलावं लागलं. त्यांना असं डावलून तुमचा मार्ग कधीच सुखाचा होणार नाहीय. स्वतः काबाडकष्ट करून, जास्तीतजास्त चांगले संस्कार देत त्यांनी तुम्हाला वाढवलंय. जपलंय. ‘स्वतःचा फ्लॅट घेतल्याशिवाय मी लग्न करणार नाही’ म्हणून तुम्ही हटून बसला होतात, तेव्हा बँकेचं कर्ज गृहीत धरून कमी पडणारे सगळे पैसे हा फ्लॅट घ्यायच्या वेळी आण्णानीच एक रकमेने तुमच्या स्वाधीन केले होते हे तुम्हीच सांगितलं होतंत मला. आयुष्यभर कष्ट करून मिळवलेलं सगळं धन तुम्हाला देऊनही आजपर्यंत त्याचा साधा ओझरता उल्लेखही त्यांनी माझ्याजवळ कधी केला नाही.त्यांनी नाही आणि आईंनीही नाही. आपल्या दोन अडगळीच्या खोल्यातल्या संसारात दोघं तिकडे काटकसरीने रहातायत. आपण काय देतोय त्यांना या सगळ्याच्या बदल्यात? त्यांना प्रेम आणि आपुलकी या खेरीज दुसऱ्या कशाचीच आपल्याकडून अपेक्षा नाहीये आणि त्यांना देण्यासारखं यापेक्षा अधिक मौल्यवान आपल्याजवळही काही नाहीय.निदान ते तेवढं जरी मनापासून देऊ केलंत तरच आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान त्यांना मिळेल ना?”
अश्विनीचं बोलणं ऐकून अविनाश भारावून गेला. आण्णांचा हा आणि असा विचार त्याने कधी केलाच नव्हता. बालपणापासूनचे त्याच्या आयुष्यातले सगळेच प्रसंग या क्षणी त्याच्या नजरेसमोर तरळून गेले. प्रत्येक प्रसंगात प्रत्येक क्षणी आण्णांनी कौल दिला होता तो याच्याच मनासारखा! तो म्हणेल तसंच प्रत्येक वेळी ते करीत आलेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल अश्विनीशीच नव्हे तर आई आण्णांशीही आपण किती खोटं वागलो होतो याची जाणीव होताच अपराधीपणाची भावना त्याला सतावू लागली.
या अपराधीपणाची उघडपणे कबुली देण्याचं धाडस मात्र त्याच्याजवळ नव्हतं. पण त्याचं प्रायश्चित्त म्हणून तो आज्ञाधारक मुलासारखा उठला. आण्णांच्या खोलीकडे वळला.
”हे बघ. मी अडचणी,वाईट वेळा दबा धरून अचानक आधी न सांगता झडप घालतात म्हणतो ना ते असं. बघ ही बातमी.”
पेपर वाचता वाचता आण्णा आईंना सांगत होते. आईही उत्सुकतेने त्यांच्याजवळ सरकल्या. आण्णा ती बातमी आईंना मोठ्याने वाचून दाखवू लागले.
‘काल बॅंकेत लाॅकर-ऑपरेशनसाठी गेलेल्या नितीन पटेल आणि त्याच्या गर्भवती पत्नीला दागिन्यांच्या मोहापायी कुणीतरी किडनॅप केल्याचा संशय असल्याची तक्रार नितीन पटेलचे वडील बन्सीलाल पटेल यांनी पोलीस स्टेशनवर केली आहे’
ऐकून अविनाश हादरलाच. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा आत झेपावला. सकाळच्या गढूळ वातावरणात अविनाशने नेहमीसारखा पेपर वाचलाच नव्हता.
“आण्णा, बघू कोणती बातमी म्हणालात..”
बातमी वाचून तो सून्न झाला. हे असं,इतकं अघटित घडू शकतं? त्या दिवशी संध्याकाळी धावतपळत लॉकर ऑपरेशनसाठी बँकेत आलेले नितीन आणि त्याची बायको त्याला आठवत राहिले.आज ही बातमी वाचली आणि नुकताच भेटलेला कुणीतरी जवळचा, धडधाकट, चालता बोलता माणूस अचानक गेल्याचंच समजावं तसा अविनाश अस्वस्थ झाला.
रविवारची सगळी सकाळच नासून गेली. दुपार त्याच अवस्थेत. अखेर स्कूटर काढून तो एक-दोन स्टाफ मेंबर्सच्या घरी जाऊन आला पण जोडून सुट्ट्या म्हणून ते सर्वजण इथे तिथे बाहेरगावी गेलेले. मग दिलासा देण्यासाठी आपण नितीनच्या आई-वडिलांना भेटून येणे आवश्यक आहे असं त्याला वाटलं आणि त्याने स्कूटर पटेल यांच्या बंगल्याकडे वळवली.
नितीन पटेलच्या आईवडलांना भेटून तर तो अधिकच अस्वस्थ झाला. उतार वयात झालेल्या आणि म्हणूनच लाडाकोडात वाढवलेल्या आपल्या एकुलत्या एका मुलाच्या आणि सुनेच्या काळीज पोखरणाऱ्या काळजीने ते दोघेही वृद्ध व्याकुळ झालेले होते..! ‘आमचे सगळे ऐश्वर्य घ्या पण आमच्या मुलासूनेला सुखरुप परत करा’ म्हणत ते आकांत करीत होते..!!
त्यांना भेटून आल्यापासून तर अविनाश पार खचूनच गेला.
त्या रात्री अश्विनीच्या कुशीत शिरुन तो एखाद्या लहान मुलासारखा पडून राहिला. आईलाच घट्ट बिलगल्यासारखा. त्याच्या केसातून आपली बोटं फिरवत अश्विनी मनोमन जणू आपल्या गर्भातल्या बाळाचं जावळच कुरवाळत राहिली होती!
“अश्विनी…”
“अं?”
“मला सारखं वाटतंय गं अश्विनी, त्यादिवशी मी नितीन पटेलना वेळ संपल्याचं किंवा दुसरंच काहीतरी कारण सांगून त्यांना अटेंड करायलाच नको होतं. मग त्याला व्हाॅल्ट ऑपरेट करून दागिने काढून नेताच आले नसते आणि दागिन्यांच्या लोभाने त्यांना कोणी किडनॅपही केले नसते..”
अश्विनीला त्याच्या या लहान मुलासारख्या निष्पाप निरागस मनाचं हसूच आलं. एखाद्या लहान मुलाला समजवावं तसं ती म्हणाली,
“आता सगळं घडून गेल्यानंतर या सगळ्या जर-तरच्याच तर गोष्टी.खरं सांगू? आपल्या हातात खरंतर कांहीच नसतं. दान असं टाकायचं की तसं एवढंच आपण ठरवायचं. पण ते कसं पाडायचं ते फक्त ‘त्या’च्याच हातात तर असतं!
अश्विनी सहज म्हणून बोलली खरं, पण पुढे ते अनेक अर्थांनी खरं ठरणार होतं.कारण..? कारण नेमकं घडलं होतं ते वेगळंच..!!
त्यादिवशी नितीन आणि त्याची बायको व्हाॅल्ट ऑपरेट करायला गेल्यावर थोडं राहिलेलं काम हातावेगळं करून अविनाशने ड्रॉवर लाॅक करून घेतले होते आणि तो टॉयलेटला गेला होता. टॉयलेटला जाऊन आल्यावर व्हाॅल्टरूमची कॉल बेल त्याने दाबून पाहिली होती पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही, तेव्हा आपण टॉयलेटला जाऊन येईपर्यंत ते दोघे गेले असावेत त्या कल्पनेने पार्टीला जायच्या गडबडीत व्हाॅल्टरुम आणि नंतर बँक तशीच बंद करून तो निघून गेला होता..आणि…ते दोघे मात्र आत व्हाॅल्टमधेच अडकून पडलेले होते…!!
‘दागिन्यांच्या लोभाने त्यांना कुणीतरी किडनॅप केलेलं असावं’ या संशयाच्या आधारे पोलीस तपास त्या एकाच चुकीच्या दिशेने सुरू होता!
या घटनेला या क्षणी तीस तास उलटून गेलेत. सुटकेचे सारे निरर्थक प्रयत्न संपल्यानंतर थकलेले,गलितगात्र झालेले, भेदरलेले ते दोघे अन्नपाणी आणि मोकळ्या श्वासाविना आत घुसमटत पडून आहेत..!
अद्याप बँक पुन्हा उघडण्यासाठी पूर्ण ३४ तास सरायला हवेत.
या सगळ्या अघटितापासून अविनाश,अश्विनी, आई आणि आण्णा सगळेच निदान या क्षणी तरी लाखो योजने दूर आहेत..!
अविनाश अर्धवट झोपेत आणि अस्वस्थतेत याच अघटिताचा विचार करतोय. याच विचारांच्या भाऊगर्दीतून वाट काढत अचानक एक प्रश्न पुढे झेपावतो आणि एखाद्या तीक्ष्ण बाणासारखा त्याच्या अस्वस्थ मनात घुसतो.रुतून बसतो….!!
‘त्या दोघांना आपण व्हाॅल्टरुम मधून बाहेर पडताना अखेरचं पाहिलंच कुठं होतं?’ हाच तो प्रश्न!
त्या तीक्ष्ण बाणाच्या जखमेने विव्हळल्यासारखा अविनाश दचकून उठतो. पहातो तर अश्विनी शांत झोपलेली आणि मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली!
या अशा पूर्णतः निराधार भेदरलेल्या मनोवस्थेत त्याला तीव्रतेने आण्णांची आठवण होते. आधारासाठी,..मदतीसाठी तो त्यांच्या खोलीकडे झेपावतो.
… तिकडे नितीन आणि त्याची बायको श्वास कोंडल्या अवस्थेत पडून राहिलेत. तिच्या गर्भातली हालचाल हळूहळू मंदावत चाललीय. तिला आधार द्यायची नितीनची उमेद संपून गेलीय. एखाद्या क्रूर श्वापदासारखा दबा धरून बसलेला मृत्यू त्यांच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकू लागलाय. येणारा प्रत्येक क्षण या साऱ्यांचे भविष्य घडवत सरत चाललाय. या भविष्याच्या पोटात काय दडलेय ते फक्त ‘त्या’लाच माहीत आहे!
‘तो’ म्हणेल तसंच आता घडणार आहे!!
हे एखादं स्वप्न नव्हे की एखादा चित्रपट. वास्तव जग आहे हे. इथे या वास्तव जगात स्वप्न किंवा चित्रपटातल्यासारखा हमखास सुखान्त कुठून होणार?
वास्तव जगात सुखान्त होत नाहीथ असं नाही.ते होतात पण.. क्वचित कधीतरीच!!
– पूर्णविराम –
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈