सुश्री संपदा जोगळेकर कुळकर्णी
जीवनरंग
☆ ‘‘धाग्या’वीण‘…’ ☆ सुश्री संपदा जोगळेकर कुळकर्णी ☆
(आजची कथा ‘धाग्या’वीण‘ सुश्री संपदा जोगळेकर कुळकर्णी’ यांची आहे. त्या लेखिका, दिग्दर्शिका, नृत्यांगना आणि अभिनेत्री आहेत. खालील चित्र हे प्राप्त चित्रावरून प्रेरित होऊन आकाश पोतदार यांनी काढलेले आहे.)
तुझी पोर्टरेट मला का आवडतात माहित्येय?
उत्तर जर कलात्मक नसेल,प्रॅक्टिकल असेल तर नको सांगूस.
ए काय रे कुचकटासारखं बोलतोयस ! मी सांगणार…मला तुझे डोळे आवडतात आणि तुझ्या प्रत्येक पोर्टरेटमधे मला तेच,तसेच दिसतात.
छान ! अहो सायन्स स्टुडंट,डोळे बायोलॅजिकली सारखेच असतात,फक्त त्याच्या आत आणि भोवती काय घडलय यावर त्याचं वेगळेपण असतं.हं! आता तू म्हणतेस तर कदाचित मी माझेच डोळे शोधत असतो बहुधा त्या कॅरेक्टर मधे किंवा मी अशीच कॅरेक्टर शोधतो.हम् म् म्…म्हणजे ‘कला’ नाहीच म्हणा आवडत आमची.
ए ! ही थट्टा असेल तर बास कर हं,तुला माहितेय ना? तू कलाकार आहेस आणि मी न’कलाकार.
हं..विज्ञानाच्या चष्म्यातून सतत फॅक्ट शोधणे…….
आज १० वर्षानंतर आयुष्याचं ‘फॅक्टच’ माझ्या कागदपत्राच्या रूपानं माझ्या हातात होतं. आधी डोळे, मग दोन्ही किडण्या आणि आता… हृदय आणि मग माझ्या रवीचं संपूर्ण शरीर मेडीकलच्या स्टुडंट्सच्या अभ्यासासाठी मी दान करणार. पेंटीग करताकरताच सांडलेल्या रंगाच्या दाट पाण्यावरून पाय घसरण्याचं निमित्त, थेट डोक्याच्या पार्श्वभागावरच दाणकन आपटला. किती काळ गेला होता मधे, किमान चार तास. तळपायाला विविध रंगांचा लेप होता तर डोक्याखाली मात्र लाल रंगाचा पाट वाहिला होता.मधल्या तासांमुळे बहुधा लालसर चॉकलेटी…डोंट नो….रंगांच्या बाबतीत सतत मला करेक्ट करणारा रवी आत्ता शुद्धीत होता कुठे ….नंतर तर तो शुद्धितच नाही आला. आता जो रवी ’कोमा’त आहे त्याला, त्याएका चित्रकाराला किती वर्ष अंधाराच्या काळ्या गर्द रंगात जगवत ठेवायचं? असा विचार केला, डॉक्टरांचे सल्ले घेतले.
वेगवेगळ्या ठिकाणची गरज ओळखून त्याला वेगळ्याजिवांशी धागे जुळवून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय.
माझा रवी कित्येकांच्या आयुष्यात आता उगवलाय.दिवसाच्या सगळ्या प्रहरांचे रंग तो रंगवत असेलच की.
क्लिनीकमधे येणाऱ्या प्रत्येकाचे डोळे मी निरखून बघत असते, बहुधा फॅक्टच शोधत असते, शोधत असते की या डोळ्यांचा आणि माझा काही बंध असेल का ? असाच “धाग्याविण”!
❤ ❤ ❤ ❤ ❤
टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री संपदा जोगळेकर कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.
चित्र साभार – फेसबुक पेज
©️ संपदा जोगळेकर कुलकर्णी
ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈