सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ सावित्री ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
सकाळी दहा-साडेदहा वेळ होती माधवजी डोळे मिटून आरामखुर्चीत बसले होते.
पत्नीच्या वियोगाचं दुःख त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे जाणवत होतं. माधवजींची मुलगी निशा आणि मुलगा मुकेश, बाजूलाच सोफ्यावर बसले होते.
नयनाबेनचं दहा दिवसांपूर्वीच निधन झालं होतं . ते कळल्यावर निशा आणि मुकेश दोघेही परदेशातून इकडे आले होते. पण आता त्यांना परतायचे वेध लागले होते. अचानक यावं लागल्याने ते एकेकटेच आले होते. त्यांचे कुटुंबीय तिकडेच होते.
नयनाबेन गेली चार वर्षे अंथरुणालाच खिळून होत्या. पॅरॅलिसिसमुळे त्यांच्या शरीराचा डावा भाग लुळा पडला होता. एका नातेवाईकाच्या लग्नाला जात असताना वऱ्हाडाच्या बसला अपघात झाला, नयनाबेनच्या मेंदूला मार बसला आणि हे अपंगत्व आलं. पण त्यावेळी दोन्ही मुलं काही येऊ शकली नव्हती अथवा नंतरही फिरकली नव्हती. फोनवरून कधीमधी बोलणं, चौकशी व्हायची फक्त.
माधवजींचं नयनाबेनवर मनापासून प्रेम होतं. तिच्या उपचारात त्यांनी कोणतीही हयगय केली नाही. तिच्या सेवेसाठी चोवीस तास बाई–वासंतीला ठेवलं होतं, तरी ते स्वतः देखील शक्य होईल ते तिच्यासाठी प्रेमानं करत होते. आपल्या ‘नयन ज्वेलर्स’ मध्ये जाण्याआधी, रोजचा चहा- नाश्ता, ते नयनाबेनच्या रूममध्येच घ्यायचे, तिच्याशी बोलत. सुदैवाने नयनाबेनच्या बोलण्यावर या आजाराचा फारसा परिणाम झाला नव्हता. बोलताना किंचित अडखळायला व्हायचं, एवढंच!
बहुतेक सगळे सगे-सोयरे येऊन भेटून गेले होते. त्यामुळे घरात आता वर्दळ नव्हती. दहा दिवस सुतक पाळण्याव्यतिरिक्त, कोणतंही कर्मकांड करण्याची रूढी माधवजींच्या समाजात नव्हतीच.
देशमुख वकिलांना आलेलं बघून मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. पण माधवजींना काही आश्चर्य वाटलं नाही, कारण ते त्यांचे जवळचे मित्र होते आणि दोन्ही कुटुंबांचा चांगला घरोबाही होता. ते मुकेशनं पुढे केलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले आणि त्यांनी आपल्या येण्याचं कारण सांगताच, मुलांइतकेच माधवजीही चकित झाले. नयनाबेननी मृत्युपत्र केलं होतं, आणि मुलांच्यासमोरच त्याचं वाचन व्हावं,यासाठी देशमुख वकील मुद्दाम आले होते. त्यांनी वासंतीलाही तिथे येऊन बसायला सांगितलं, तेव्हा वासंतीसकट सगळेच बुचकळ्यात पडले. पण देशमुख वकिलांचा मान राखून, ती तिथेच पण जरा दूर खुर्ची ओढून बसली.
देशमुख वकिलांनी बॅगेतून एक सीलबंद पाकीट बाहेर काढून सर्वांसमक्ष उघडले आणि वाचायला सुरुवात केली….
‘ मी गेल्या चार वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहे. माधवजींनी माझ्या उपचारात कोणतीच कसूर केली नाही. स्वतःही प्रेमाने माझी सेवा केली, म्हणूनच कदाचित मी इतके दिवस जिवंत राहिले. पण माझं आयुष्य संपत आलंय असं मला आतून जाणवतंय. माझ्या परिस्थितीत काहीच सुधारणा होत नाहीये. अश्या परावलंबी जिण्याचा खरं तर मला कंटाळाही आला आहे. पण माधवजींची प्रेम आणि वासंतीनं मनापासून केलेली सेवा मला जगायला लावते आहे. या जगाचा निरोप घेण्याआधी मला माझ्या मनातलं काही सांगायचं आहे.
साधारण तीन वर्षांपूर्वी वासंती आमच्याकडे आली. आमच्या शेजाऱ्यांच्या कामवालीच्या दूरच्या नात्यातली. साताऱ्याजवळ तिचं गाव.
तिला जवळचं कोणी नातेवाईक नाही, म्हणून ती पोटापाण्याचा उद्योग शोधायला इकडे आली. तशी दहावीपर्यंत शिकलेली. आम्हाला चोवीस तास रहाणारी बाई हवीच होती. म्हणून हिला ठेवून घेतलं.
वासंती अगदी प्रेमानं माझं सगळं करायची. शिवाय घरातली इतर कामंही ती स्वतःहून करते. ती खरंतर अबोलच, पण सतत बरोबर राहिल्याने माझ्याशी बोलू लागली. तिची कहाणी ऐकून मी तर सर्दच झाले.
तिचे वडील ती सातवीत असतानाच गेले. साप चावल्याचं निमित्त झालं आणि खेड्यात उपचार वेळेवर मिळू शकले नाहीत. घरची थोडीफार शेती पोटापाण्यापुरती. एकच भाऊ पाचेक वर्षांनी मोठा. तो शेती बघू लागला आणि आई घर सांभाळायची. हिची दहावीची परीक्षा झाली आणि एकाच मांडवात भाऊ आणि बहिणीचं लग्न उरकण्यात आलं.
वासंतीचा नवरा पण दहावीपर्यंत शिकलेला, घरची शेती आणि भाजीचा मळा होता. आई-वडील आणि ही दोघं असं छोटसं कुटुंब.. खाऊन-पिऊन सुखी. मोठी बहिण लग्न होऊन सासरी साताऱ्यात राहात होती. वासंतीचा नवरा मोटरसायकल घेऊन साताऱ्याला बाजारात जायचा. कधी भाजीचं बियाणं, खतं आणायला, कधी भाजीचे पैसे आणायला. मळ्यातली भाजी रोज साताऱ्याला टेंपोने पाठवली जायची.
आणि एक दिवस बाजारातून घरी येताना, त्याला ट्रकनी उडवलं. बाईकचाही चक्काचूर झाला आणि तो जागीच…
जेमतेम सहा महिने झाले होते लग्नाला. दिवसकार्य झाल्यावर रीत म्हणून भाऊ वासंतीला माहेरी घेऊन आला. आईसोबत, भावजयीनंही तिचं दुःख समजून महिनाभर सगळी खातिर केली. महिनाभरानंतर भाऊ तिला सासरी पोचवायला गेला, तर सासरच्यांनी तिला पांढऱ्या पायाची, अवलक्षणी म्हणून घरात घ्यायचंच नाकारलं.’ आमचा सोन्यासारखा मुलगा गेला आता आमचा हिचा काही संबंध नाही.’
ही भावासोबत परत आली. वर्ष होऊन गेलं तसं भावाने हिचं दुसरं लग्न करून देण्याचा प्रयत्न केला. पण आधीची हकीकत कळली की नकार यायचा. हिचा पायगुण वाईट म्हणून.
अश्या बाबतीत लोकं मागासलेलेच! नणंद कायमचीच इथं राहणार ,या विचारानं भावजयीचं वागणंही बदललं. घरातलं सगळं काम तर वासंती करतच होती. पण तरी भावजय काहीतरी खुसपट काढून वाद घालत होती. आई होती तोवर जरा तरी ठीक होतं. पण आई गेल्यावर तर घरात रोजच भांडणतंटा सुरू झाला. त्याला कंटाळून हिनं भावाचं घर सोडलं आणि इथे आली.
एवढ्या लहान वयात असं झाल्याने, बिचारीला काहीच हौसमौज करता आली नाही. विधवा म्हणून साधं फूल-गजरा माळायची पण चोरी.
माधवजी माझ्यासाठी न चुकता गजरा आणायचे मी आजारी होते तरीही. माझ्या केसात तो माळण्याआधी वास घेताना, वासंतीच्या चेहऱ्यावरचे भाव मी अनेकदा वाचले होते.
काल वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी, नेहमी प्रमाणे माधवजींनी माझ्या हातात नवीन साडी ठेवली. मी माधवजींनी म्हटलं, ‘ यावर्षी मला एक छानसं मंगळसूत्रही हवंय बरं का!’ त्यांना आश्चर्य वाटलं, कारण मी कधीच कोणत्या दागिन्याची मागणी आजवर केली नाही. पण संध्याकाळी येताना ते घेऊन आले. उद्या पूजा करताना घालेन, म्हणून मी त्यांना कपाटात ठेवायला दिलं. सकाळी माझी तब्येत एवढी बिघडली की मी फक्त पडल्याजागी हात जोडूनच पूजा केली. दरवर्षी या दिवशी दानधर्म करण्याचा माझा नेम. पण तोही चुकला. मी मनाशी काहीतरी ठरवलं,आणि देशमुख काकांना बोलावून त्यांचा सल्ला घेतला आणि नंतर मृत्यूपत्र बनवलं. कारण या जगातून जाण्याआधी मला माझा विचार प्रत्यक्षात आणणं शक्य नव्हतं,कायद्याच्या आडकाठीमुळे. म्हणून तुम्ही ते करावं अशी माझी शेवटची इच्छा आहे.
मी सौभाग्यदान करायचं ठरवलं आहे. माझी इच्छा आहे वासंती आणि माधवजी यांनी लग्न करून एकत्र रहावं. अर्थात त्या दोघांनी आनंदाने संमती दिली तरच. माधवजींचं वय बावन्न आणि वासंतीचं अडतीस. जरा वयात अंतर आहे. पण माधवजींची काळजी ती नीट घेवू शकेल. त्यांच्या आवडीनिवडी तिला नीट माहिती झाल्या आहेत तीन वर्षांत! ती त्यांना नक्कीच सुखात ठेवेल. माधवजींनीदेखील पुढील आयुष्य आनंदात, समाधानात घालवावं , एकटं राहू नये असं मला वाटतं.
दोन्ही मुलं तशीही परदेशातच राहात असल्याने, हे समजून घेतील , अशी मी अपेक्षा करते. निशा-मुकेशच्या शिक्षणासाठी, परदेशी जाण्यासाठी आणि लग्नातही जे द्यायचं ते देऊन झालं आहे. त्यामुळे माझं स्त्रीधन – सर्व दागदागिने वासंतीला द्यावे. जर तिची माधवजींशी लग्न करण्याची इच्छा नसेलच तर दुसरा एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न करून द्यावं आणि त्यासाठी माझं स्त्रीधन वापरावं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडे मागून त्याला जिवंत केलं होतं. मीही माझ्या सत्यवानाला-माधवजींना नवजीवन लाभावं यासाठीच विनंती करते आहे. ‘
‘…… मृत्यूपत्रावर तारीख होती सहा महिन्यांपूर्वीची… वटपौर्णिमा होती त्या दिवशी.
देशमुख वकिलांनी वाचन संपवलं.
वासंतीला हुंदका आवरता आला नाही. या आगळ्यावेगळ्या मृत्यूपत्रानं सगळ्यांना निःशब्द केलं होतं.
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈