डॉ. ज्योती गोडबोले

☆ संध्याछाया… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

कोणता तरी अगदी फालतू सिनेमा  टीव्हीवर लागला होता. निरर्थकपणे चॅनल बदलताना  सुधाचं लक्ष कशातच नव्हतं. उगीचच चाळा म्हणून ती  रिमोटची बटणे दाबत होती. मनात दुसरेच विचार घोळत होते..आज चार वाजता तिचा पुतण्या, त्याची बायको मुलं सगळे रहायला  येणार होते चार दिवस. सुधाला हल्ली हे सगळे नकोसे वाटायचे. 

तो लहान मुलांचा दंगा, तो पसारा, ते लोक गेले की आवरताना जीव  दमून जायचा तिचा.  पुन्हा जास्त स्वयंपाक, काही गोष्टी बाहेरून आणा, गोडधोड करा ! त्यात मदत कोणाचीही नाही,आणि येणारी मंदारची बायको तर आळशी आणि काहीच कामाची नाही !

आताशा सुधाला  ही उठबस होतच नसे. पण विश्वासला हे लोक येणार म्हटले की अगदी उत्साह यायचा आणि न झेपणारी शंभर कामे तो करायला धावायचा.. सुधाला हे अजिबात  पसंत  पडायचे नाही. आधीच एक तर ती संथ,थंड, होती. तिला उरक म्हणून नव्हता आणि मूलच न झाल्याने संसारात त्यासाठी कुठलीच तडजोड तिला कधी करावीच नाही लागली. तिचा नवरा  विश्वास आणि दीर विकास, दोघेच भाऊ. विकास आणि विश्वास मध्ये वयाचे अंतर खूप होते. सासूबाईंना खूप उशिरा झाला विकास– त्यांची अगदी चाळीशी उलटून गेल्यावर.  त्यामुळे कदाचित, त्यांचे विकासवर जास्तच प्रेम. विकास आणि त्याची बायको सविता मात्र आईजवळ राहिले कायम, ती असेपर्यंत ! सुधाचं सासूबाईंशी कधी  पटलं नाही आणि ती वेगळी राहू लागली. सासूबाईंचा रागच होता जरा सुधावर !  सविता मात्र सासूबाईंशी पटवून घेई. ती लाडकी होतीच सासूबाईंची !लाडक्या लेकाची बायको म्हणून !  विकासचं आईवर अतिशय प्रेम होतं आणि तो कधीही वेगळा राहिला नसता, म्हणूनही असेल कदाचित !

सुधाने मूल होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कोणातच दोष नसूनही तिला कधी दिवस गेलेच नाहीत. त्यामुळे तिचा आधीच घुमा,आतल्या गाठीचा असलेला स्वभाव आणखीच कडवट झाला. सुरवातीची सगळी हौस अशीच विरून गेली. तरीही विश्वास चांगल्या पोस्टवर होता, म्हणून ते दोघे अनेक परदेश प्रवास करून, खूप जग हिंडून आले होते. तेही विश्वासचीच हौस म्हणून ! सुधाला ती तरी कुठे हौस होती? परत आल्यावर  कोणी विचारलं असतं ना, तर आपण काय बघितलं हेही तिला नसतं सांगता आलं ! केवळ विश्वासचा आग्रह म्हणूनच तिने ते परदेश प्रवासही केले, तेही निरुत्साहानं ! सुधाचा एकूणच निरुत्साही   चेहरा, कशातच नसलेला उत्साह, तिला माणसे  जमवायला मारक ठरे. तिला मैत्रिणीही फार नव्हत्या आणि हिने कधी बाहेर पडून, चार लोकांत मिसळून, नोकरीही केली नाही.  वडिलोपार्जित वाडा होता,

त्याचा अर्धा भाग विश्वासला, अर्धा भाग विकासला अशी वाटणी आईवडील असतानाच झाली होती. आपल्या वाट्याला आलेल्या भागात विश्वासने दोन मजले बांधले होते, त्यालाही झाली तीस पस्तीस वर्ष. कोणासाठी आता परत नवीन बांधायचे आणि ठेवायचे? बिल्डर यायचे,त्यांना विश्वास परतवून लावायचा !.त्या जुन्या गढी सारख्या एकाकी, उदास घरात आणखीच  खिन्न वाटायचे, संध्याकाळ झाली की.  

विकासची बायको सविता, मुलगा  वागायला ठीक ठीक  होते. मुलगा मंदार  इंजिनीअर झाला आणि त्याने लग्नही केले. अचानक एक दिवस, मुंबईहून कारने परत येत असताना विकासला ऍक्सिडेंट झाला आणि विकास जागच्याजागी गेलाच. तरुण, फक्त पन्नाशीच उलटलेला मुलगा असा अचानक गेलेला बघून, आईवडिलांनी हायच खाल्ली. विकासचा मुलगा मंदार नुकताच  नोकरीला लागला होता. त्याची बायको गृहिणी आणि आईही घरातच असायची . वडिलांनी  काही फार पैसे मागे ठेवले नव्हते . या जुन्या वाड्यात रहायला नको म्हणून विकास केव्हाच बाहेर फ्लॅट घेऊन रहात होता तेवढीच काय ती त्याची कमाई. सगळा भार मंदारच्या खांद्यावर येऊन पडला. मंदार फारसा कर्तबगार तर नव्हताच. त्याची नोकरीही बेताची, बायकोही अगदी सामान्य कुटुंबातली आणि साधी बीकॉम, आणि कसलीही जिद्द नसलेलीच ! आजपर्यंत आई वडिलांनी  मंदारला एकुलता एक म्हणूनच वाढवले, जमेल तितके कौतुक केले, माफक लाड पुरवले इतकेच. कसाबसा डिप्लोमा करून त्याला जॉब मिळाला इतकंच. सगळ्या बाजूने अशी संकटे आली असताना, त्याचा विश्वासकाका नेहमी त्याच्या पाठीशी उभा असायचा. पण मंदार कधीही मोकळेपणाने त्याच्याशी बोलला नाही, की कधी त्याला सल्ले विचारले नाहीत त्याने. त्याचा वाड्यातील भागही तसाच ठेवला त्याने. त्याला तो विकताही येईना. असा अर्धाच भाग बिल्डर कसे घेणार? ते म्हणत, सम्पूर्ण वाडा द्या म्हणजे आम्हाला नीट बांधता येईल, तुम्हालाही आम्ही फ्लॅट्स, वर पैसेही देऊ. पण विश्वास त्याला कधीही  तयार नव्हता. त्याला हे  मान्यच नसायचे. त्या जुन्या, कोणीही नसलेल्या वाड्यात दोघेच नवरा बायको रहाताना बघून लोकांना आश्चर्यच वाटे. आणखी आणखीच तो वाडा जुनाट होत चालला. विश्वासचं मात्र मंदारवर निरपेक्ष प्रेम होतं. तो त्यांच्या घरी राहायला जायचा, त्यांना बोलावायचा. विश्वासची नोकरी चांगली होती,आणि काटकसरीची  राहणी असल्याने विश्वास पैसे बाळगून होता.  पुन्हा मुलं बाळं नसल्याने खर्च तरी कुठे होते? निरनिराळे छंद, वाचन, यात विश्वास स्वतःला रमवत असे. सुधाला कधी तेही जमले नाही.   सतत  घरात बसून बसून एकलकोंडी झाली होती सुधा. शिवाय  मूल नसल्याचे शल्य कायम होतेच. लोक काय म्हणतील, या भीतीने ती कधी कोणाच्या डोहाळजेवण,  बारसं अशा साध्यासुध्या समारंभालाही जायची नाही. कधी गावी माहेरी गेली, तर भाऊ भावजय म्हणत , “ ताई, कशा राहता बाई त्या गढी सारख्या वाड्यात तुम्ही? रात्री भीति नाही का हो वाटत? किती एकाकी आणि जुनं घर झालंय ते. भावजीना म्हण की, टाका विकून आणि बिल्डर देत असेल तर छान फ्लॅट तरी घ्या ! काय ताई ! बरोबरच्या लोकांची घरं बघ आणि तुमचा किल्ला बघ.जुना पुराणा ! “

सुधा भावाला म्हणाली, “अरे मी सांगून थकले बाबा. माझ्या नशिबी हेच जुनाट घर दिसतंय कायम. जाऊ दे ना. मग आमच्यात भांडणे  होतात आणि पुन्हा त्यातून निष्पन्न काहीही होत नाही. इथेच होणार आमचा शेवट. मला तर त्यात काही नवीन आणावं, कधी हौसेने सजवावे असं सुद्धा वाटत नाही. किती केलं तरी जुनाट ते जुनाटच. आणि नंतर तरी कोणाला द्यायचंय ते? जाऊ दे ना ! आप मेला जग बुडाला.”  विश्वासला मात्र मंदारची अतिशय मनापासून ओढ आणि माया होतीच. त्यांना तो प्रेमाने आपल्या घरी रहायला बोलावी, बाहेरून चांगले पदार्थ मागवी, त्यांच्या लहान मुलांशी खेळण्यात रमून जाई.

–क्रमशः भाग पहिला

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments