श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ ☆ तहान – भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

फादर फिलीप आणि सिस्टर मारीया यांच्याविषयी अपार कृतज्ञतेची भावना तिच्या मनात उचंबळून आली. आपल्या भावना व्यक्त करायला जस्मीन उठली. पण आज तिला बोलायला शब्द सापडेनात. ती इतकच म्हणाली,’ या क्रेशनं मला घडवले. या क्रेशबद्दल माझंही काही कर्तव्य आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी इथेच येईन. इथे राहूनच मी लोकसेवेचं कार्य करीन. लेप्रसीवर अधीक संशोधन करायचा आपला मानसही तिने बोलून दाखविला. पुन्हा विचारांच्या उदंड लाटा तिच्या मनात उसळल्या. ती दिवास्वप्न बघू लागली.

आपण परत आल्यावर एक छोटसं निकेतन निर्माण करायचं. महारोग्यांसाठी स्वच्छ नेटकी वसाहत आणि त्यामध्ये त्यांच्यासाठी एक अद्ययावत हॉस्पिटल. क्रेशाच्या आसपास कुणी ‘लेपर’ असता कामा नये. कुणी भीक मागता कामा नये. प्रत्येकाने आपल्या वसाहतीत काम करावं आणि पोटभर जेवावं.

प्रभू येशू आपल्या निश्चयावर दृढ राहण्याचं सामर्थ्य देवो. पण आपण येईपर्यंत चार-पाच वर्षे तरी जाणार. तोपर्यंत इथली कोण कोण जीवंत असतील. त्यात आपले आई -वडील असतील का?  आपल्या हातून त्यांची थोडी तरी सेवा घडेल का?

जस्मीनशी कुणी कुणी बोलत होतं. तिच्या बरोबरीच्या मैत्रिणी… तिच्या शाळेतल्या चिमखडया… सिस्टर्स, रूम पार्टनर … पण तिला काहीच ऐकू येत नव्हतं. हॉलमध्ये  समोर एक मोठं तैलचित्र लावलेलं होतं. त्या चित्रात प्रभू येशू कुणा स्त्रीला पाणी देत होता. खाली लिहिलेलं होतं, ‘त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला पुन्हा तहान लागत नाही.

तिला फादर फिलीपचं सरमन आठवलं. कुणा शरमोणी स्त्रीची कथा. त्या पापी स्त्रीला प्रभूने दर्शन दिलं. आपले आई-वडीलही पापी होते का? त्यांना पाणी कोण देणार? येशूने त्या पापी स्त्रीला जवळ केले…. जीवंत पाणी दिले. आध्यात्मिक पाणी… तिची तहान कायमची भागली. आपण तर प्रभू येशूने दिलेल्या पाण्यात डुंबत असतो. आकंठ. फादरनी  आपल्याला या पाण्याजवळ आणलं. पण तरीही आपल्याला तहान लागलीय. खूप तहान. घसा कोरडा पडलाय. जीव घाबरतोय, इतकी तहान….

क्रेशच्या बाहेर पडताना जस्मीनच्या मनावर या सार्‍या विचारांची गडद छाया होती. सुनीता तिला पुन्हा पुन्हा लवकर येण्याविषयी सांगत होती. ती जस्मीनबरोबर मुंबईपर्यंत जाणार आहे. जस्मीन टॅक्सीपर्यंत येते आणि बाकी सारे गेटजवळ. टॅक्सीचं दार उघडता उघडता तिला समोरच्या फुटपाथवर परिचित भिकारी दिसतात. आपले थोटे हात कपाळाशी नेऊन येणार्‍या–जाणार्‍यांची करुणा भाकणारे भिकारी. जस्मीन भिकार्‍यांपाशी येते. पर्समधल्या काही नोटा-नाणी ती प्रत्येकाच्या थाळ्यात, वाडग्यात टाकते आणि मनातल्या मनात म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, माझ्या कार्यात यश यावं, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. मला आशीर्वाद द्या.’

जस्मीन टॅक्सीत बसते. टॅक्सी सुरू होते. ती हात हलवते क्रेशच्या गेटच्याजवळ उभे असलेल्यांच्या दिशेने आणि त्याविरुद्ध फुटपाथवर बसलेल्या भिकार्‍यांच्या दिशेनेसुद्धा.

चार विझू विझू झालेले क्षीण डोळे टॅक्सी गेलेल्या दिशेकडे असहाय्यपणे पाहत राहतात.

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments