श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ ‘बासरी…’- भाग ५ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆
(मागील भागात आपण पहिले – ऑपरेशन करणार्या डॉक्टरांचे रोज हॉस्पिटलमध्ये फोन येत होते. बापट बाईंची विचारपूस करत असताना त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळणार हे कळताच, मी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता येतो आहे, मी पेशंटला तपासतो आणि मगच डिस्चार्ज द्या असा डॉक्टरांचा निरोप आला. आता इथून पुढे)
सोमवार, ८ सप्टेंबर –
आज बापट बाईंना डिस्चार्ज मिळणार म्हणून हॉस्पिटलमध्ये पुन्हा सर्व तपासण्या झाल्या, सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. औषधे, घ्यायची काळजी, आहार याबद्दल सर्व माहिती दिली गेली. सकाळ पासून बापटांचे नातेवाईक भेटून जात होते. शुभेच्छा देत होते. बाई पुन्हा पुन्हा या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्सना, नर्सेसना, वॉर्डबॉयना धन्यवाद देत होत्या. त्या सर्वांनी बाईंची खूपच काळजी घेतली होती. ऑपरेशन करणारे डॉक्टर पाच वाजता यायचे होते तेव्हा त्या त्यांचे आभार मानणार होत्या.
संध्याकाळचे पाच वाजले आणि हॉस्पिटलसमोर डॉक्टरांची गाडी उभी राहीली. डॉक्टरांची पत्नीपण समवेत होती. दोघ दुसर्या मजल्यावरील हार्ट डिपार्टमेंटमध्ये आली. डॉ. रानडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्याशी दोन मिनिटे बोलून डॉक्टर आणि त्यांची पत्नी डॉ. रानडेंसह बापट बाईंच्या रुममध्ये आली. रुममध्ये बापट साहेब, त्यांची बहिण, भाचा-भाची सर्वजण होते. डॉक्टर आत आले आणि त्यांनी हळूच खिशातून काहीतरी बाहेर काढले. सर्वजण डॉक्टरांकडे पाहत होते. एवढ्यात डॉक्टरांनी बासरी आडवी करत ओठाकडे नेली आणि बासरीतून मधुर सुर बाहेर पडू लागले. रुममधील सर्व मंडळी डॉ. रानडे, नर्स, वॉर्डबॉय सर्वजण हे काय नवीन डॉक्टरांचं बासरी वादन असं म्हणत असताना, बापट बाई डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी हात अर्धवट वर घेत असताना बासरी तोंडात घेतलेले डॉक्टर त्यांच्या समोर आले. बाईंच्या डोळ्यासमोर अचानक मालवण, फोकांड्याचा पिंपळ, बासरीसाठी हट्ट धरणारा कृष्णा आठवला आणि तीच बासरी, बासरी तोंडात धरण्याची तीच पध्दत, तसेच वाजवलेले ते सुर कानात पडताच बापट बाई ओरडल्या –
कृष्णा ! कृष्णा !!
रडत रडत डॉक्टर त्यांच्या पायावर कोसळत म्हणाले – होय बाई, मीच तुमचा कृष्णा.
गंगा-जमुना डोळ्यातून वाहणार्या बापट बाई त्यांचे तोंड हातात धरत म्हणाल्या, ‘‘कुठे होतास रे बाळा ? वेड्यासारखी आयुष्यभर शोधत राहिले रे कृष्णा ! काही न सांगता गेलास रे बाळा’’
गदगदलेल्या स्वरात डॉक्टर बोलू लागले – ‘‘होय बाई, तुमच्या कृष्णाला क्षमा करा किंवा तुम्ही क्षमा करावी म्हणूनच एवढ्या वर्षांनी तुम्ही याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलात. बाई सिनेमात असे योगायोग असतात, भाऊ-भाऊ अनेक वर्षांनी भेटतात, आई मुलाची ताटातुट होते, पुन्हा भेटतात आपण अशा सिनेमांची चेष्टा करतो, पण खरोखरच असा योगायोग माझ्या आयुष्यात येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते, किती छान योगायोग हा !’’ डॉक्टर रडत रडत पुढे म्हणाले – डॉ. रानडे त्या दिवशी ऑपरेशन करताना पेशंटच्या चेहर्याकडे लक्ष गेले आणि मी दचकलोच. माझी आईच ऑपरेशन टेबलावर होती. ज्या हृदयात माझ्याबद्दल प्रेम, वात्सल्य काठोकाठ भरलेलं आहे, तेच हृदय मला फाडायचं होतं. सुरुवातीला माझे हात थरथरु लागले. मी इमोशनल होत गेलो. पण डॉक्टर रानडे तुम्ही मला टोचलत आणि माझ्या लक्षात आलं समोर ऑपरेशन करायचं आहे ते माझ्या आईचं नव्हे पेशंटचं. पेशंट आपलं शरीर आम्हा डॉक्टरावर विसंबून स्वाधीन करतो, त्या पेशंटला मला बरं करायचयं, आणि मग मी सफाईने ऑपरेशन केलं.’’
बापट बाई आणि त्यांच्या पायाकडे बसलेले शिंदे पाहून इतरांच्या काही लक्षात येत नव्हते. कोण आई ! कोण बाई ? एवढ्यात तिथे बसलेले बापट साहेब पुढे झाले. त्यांनी कृष्णाला ओळखले. ‘‘कृष्णा ! आम्ही किती शोधलं तुला. या तुझ्या बाईंना वेड लागायचं बाकी होतं, तू निदान एखादं कार्ड तरी पाठवायचं, कुठं होतास तू?’’
‘‘मी एक कार्ड पाठवलं होत काका, पण ते कार्ड पत्ता चुकीचा म्हणून परत आलं, मग मी बारावी पास होऊन मेडिकलला अॅडमिशन मिळाली हे सांगायला मालवणला गेलो होतो तेव्हा तुम्ही मालवण सोडलं होतं.’’
बापट काकांनी बापट बाईंच्या पायाकडे बसलेल्या डॉ. शिंदेना वर उचलल आणि बाईंच्याच बाजूला बसवलं.
‘‘खूप आनंद झाला रे कृष्णा, अवि अमेरिकेला असतो. या पुण्यात हे आणि मी. गेली काही वर्षे मधुमेह आणि प्रेशरने मला त्रस्त केलं. मला कंटाळा येतो रे कृष्णा, एक सारखी मालवणची आठवण येते. आपली शाळा, ते मुख्याध्यापक सामंत, तो सहावीचा वर्ग आणि शेवटच्या बाकावर निश्चल डोळ्यांनी समोर पाहणारा कृष्णा.’’
डॉ. शिंदे बोलू लागले – ‘‘डॉ. रानडे, आज तुम्हाला हा प्रसिध्द हार्टसर्जन डॉ. शिंदे दिसतो तो या माऊलीमुळे. माझी आई मला लहानपणीच सोडून गेली तेव्हा मी सैरभैर झालो होतो. तेव्हा या माऊलीने आपल्या तोंडातला घास मला भरवला. आपल्या मुलासारखंच मला वाढवलं. पण मी एवढा कृतघ्न की यांना न सांगता बाबाबरोबर गावी गेलो. पण बाई, काका माझा नाईलाज झाला हो, मी होतो केवढा जेमतेम अकरा वर्षाचा॰ आमच्या गाववाल्यांनी माझ्या बापाच लग्न ठरवलं आणि माझा बाप हुळहुळला. काही विचार न करता मालवण सोडूया म्हणाला, मी नाही म्हटलं तेव्हा मला बेदम मारलं आणि चार पाच भांडी गोणत्यात घालून एसटी पकडली. या परिस्थितीत मी पोटाकडून दडवून ठेवली ती ही बासरी. फोकांड्याच्या पिंपळाकडे आलेल्या एका बासरी विक्याकडून माझ्या मनात भरलेली ही बासरी या मातेने मला घेऊन दिली. तशीच बासरी यांच्या मुलाला अवि ला पण हवी होती. पण त्या बासरी विक्याकडे अशी एकच बासरी होती, अवि हट्ट करु लागला तेव्हा स्वतःच्या मुलाला अविला दोन चापट्या देऊन ही बासरी मला देणारी ही माझी माता. मालवण सोडताना ती बासरी तेवढी मी बरोबर घेतली.
आमच्या गावाकडे आल्यानंतर बाबाचे लग्न झाले आणि तो चेकाळलाच. माझ्या नवीन आईला मी नकोच होतो. पुन्हा एकदा दोन वेळच्या खाण्याची पंचाईत. पण बाबाने एक मोठी गोष्ट केली माझ्यासाठी॰ सातार्यात रयत शिक्षण संस्थेत नेऊन माझा दाखला दिला आणि आयुष्यात दुसर्यांदा मला आधार मिळाला. रयत संस्थेत वसतीगृहात राहिलो आणि शाळेत शिकलो. या संस्थेने मला घडवले. इथेही चांगला अभ्यास केला. शाळेत सतत पहिला येत राहिलो. या सातारा शाळेचे मुख्याध्यापक कदम साहेब यांनी प्रोत्साहन दिले. दहावी, बारावीत बोर्डात आलो आणि या कदम साहेबांमुळे मेडिकलला गेलो. या कदम साहेबांनी आपली मुलगी मला दिली आणि तीच माझी पत्नी डॉ. जयश्री. बाई ही तुमची सून जयश्री.
जयश्री येऊन बाईंच्या बाजूला बसली. बापट बाईंनी जयश्रीला जवळ घेतले. किती गोड सून माझी ! मी अविच्या मागे लागले आहे, लग्न कर लग्न कर, पण अजून तो मनावर घेत नाही. पण कृष्णा तू मला पहिली सून दिलीस.
बाई किती वर्षांनी तुम्ही दिसलात. आज खरं तर हवी तशी चांगली बासरी मी विकत घेऊ शकतो पण आजही रोज नियमितपणे हीच बासरी वाजवतो तुम्ही घेऊन दिलेली. ही बासरी माझ्यासाठी अमूल्य आहे आणि माझ्या आईने ती मला घेऊन दिली आहे.
डॉ. रानडे आणि हा हॉस्पिटल स्टाफ, तुम्हाला कदाचित हा फॅमिली ड्रामा वाटत असेल तर तसे नाही. माझ्या डोळ्यात आलेले हे अश्रू अस्सल आहेत. मोत्यासारखे.
‘‘होय रे कृष्णा, यात खोटेपणा कसा असेल. आणि कृष्णा मी तुझ्यासाठी फार केल असं समजू नकोस, मुख्याध्यापक सामंत म्हणाले होते, ‘‘बाई या पोरक्या पोराची आई होण्याचा प्रयत्न करा, तसा मी प्रयत्न केला.’’
‘‘प्रयत्न केला नाही, आईच झालात तुम्ही बाई.’’
‘‘होय रे कृष्णा, मी आईच तुझी.’’
‘‘तर मग बापट काका, आई तुम्ही आता माझ्या म्हणजे आपल्या घरी यायचं. तसं तुम्हाला या ऑपरेशननंतर डॉक्टरची गरज आहेच. आम्ही दोघंही तुमची काळजी घेऊ आणि आपल्या घरात मला आई बाबा हवेत. जयश्रीला पण सासू-सासरे हवेत. तेव्हा नाही म्हणू नका. आईबाबा आपल्या घरी चला.
‘‘कृष्णा आम्ही येतो तुझ्या बरोबर नाहीतरी आम्ही पुण्यात दोघंच राहून कंटाळलोय, आम्ही आपल्या घरी येऊ आणि कृष्णा, जयश्री माझी एक इच्छा आहे, आपण लवकरच मालवणला जाऊया. मला ती आपली शाळा, तो मालवणचा समुद्र, तो फोकांड्याचा पिंपळ, ते भरड आणि तू शाखेत जायचास ते नारायण मंदिर सर्व डोळे भरुन पहायचं आहे.’’
‘‘होय आई, मला पण मालवणला जायची केवढीतरी घाई झाली आहे. आणि आईबाबा नुसतं मालवणात जायचं नाही, मालवणात आपलं घर बांधायचं.’’
‘‘होय कृष्णा माझी पण इच्छा आहे, आयुष्याची अखेर त्या मालवणात व्हावी. त्या मालवणच्या मातीत माझ्या अस्थी विरघळाव्या.’’
‘‘होय आई, चला आपल्या घरी.’’
डॉ. शिंदेनी खूणा करताच बापट बाईंच्या बॅगा, औषधे वॉर्डबॉयने डॉक्टरांच्या गाडीत नेऊन ठेवले आणि डॉ. शिंदे आणि जयश्री शिंदे आई-बाबांना सांभाळत गाडीकडे घेऊन गेले. गाडी सुरु झाली आणि ड्रायव्हरने टेप चालू केली. बाबुजी सुधीर मोघेंचं गाण आळवत होते.
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश….
दरी खोर्यातून वाहे, एक प्रकाश प्रकाश….
एक प्रकाश प्रकाश…..
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈