श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ अल्लड… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(मागील भागात आपण पाहिले – मला खेळायला आवडतं आणि ही मोठी माणसं खेळतच नाहीत तर मी काय करु?मला नाईलाजास्तव लहान मुलांमध्ये खेळावं लागतं” … आता इथून पुढे)
प्रणव तिच्याजवळ गेला. तिचा चेहरा वर उचलून त्याने तिचे डोळे पुसले
“वेडाबाई कुठली! असं रडतात का?या मोठ्या माणसांना खरं तर कसं जगावं हे माहितच नसतं, म्हणून जो असा सुंदर जीवन जगतो त्याला ती नावं ठेवत असतात”
हर्षाला गोंधळली.तिला काही कळलं नाही.
“म्हणजे?”तिनं विचारलं
“तू लहान मुलांकडे बघितलंस?ती बघ कशी नेहमी आनंदी असतात.छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद वाटत असतो.एखादं खेळणं,पान,फुलं,पक्षी,चित्रं,चाँकलेट बघून ती हूरळून जातात.आपलं रडणं विसरुन ती लगेच हसायला लागतात.त्यांच्याजवळच्या प्रत्येक गोष्टीत ती आनंद शोधतात बरोबर ना?”
” हो”
” तू तशीच आहेस हर्षू.प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारी.आपल्या लग्नाला दहा वर्ष झालीत पण एवढ्या वर्षात मी तुला कधी निराश, उदास असं पाहिलंच नाही. झाली तरी काही क्षणापुरती.माझ्या आजारी आईचं तू सगळं व्यवस्थित केलंस पण कधी तुझ्या चेहऱ्यावर कंटाळा दिसला नाही. तू जे काही करतेस ते सगळं जीव ओतून. तू तुझ्यावरच्या जबाबदाऱ्यांचाही आनंद घेत असतेस. कितीही कष्ट पडोत तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद कधी मिटला नाही. मला बऱ्याचदा तुझा हेवा वाटतो.तुझ्यासारखं होण्याचा मी बऱ्याचदा प्रयत्न केला. पण नाही जमलं.कदाचित वयाच्या दहाव्या वर्षी वडील वारल्यामुळे अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मी खूप लहानपणीच प्रौढ होऊन गेलो आणि नंतर मला कधी लहान होऊन आयुष्याचा आनंद घेणं जमलंच नाही.चाँकलेट खातांना किंवा कुल्फी,आईस्क्रीम खातांना तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तसा आनंद मला कधी होत नाही. आपण स्वित्झर्लंडला गेलो.तिथलं निसर्गसौंदर्य पाहून तू हरखून गेलीस पण मला त्याचं फारसं कौतुक वाटलं नाही. याचं कारण तुझ्यातलं लहान मुल अजून जिवंत आहे हर्षू आणि माझ्यातलं ते कधीच मेलंय. तुझ्यातलं ते लहान मुल तसंच जिवंत राहू दे.अगदी तू म्हातारी होईपर्यंत. कारण सांगू? तू मला तशीच आवडतेस .अल्लड, अवखळ. तुला पाहिलं की माझा थकवा, माझा कंटाळा, माझी उदासीनता कुठल्या कुठे पळून जातात. तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या बालिश उत्साहाला पाहून माझ्यातही उत्साहाचा संचार होऊ लागतो”
प्रणव क्षणभर थांबला.
“आणि मला सांग. तू कामं तर मोठ्या माणसांसारखीच करतेस ना?तू स्वयंपाक उत्कृष्ट करतेस.घर छान सांभाळतेस.मुलांवर चांगले संस्कार करतेस.कंपनीत नोकरी करत असतांना तू कंपनीची बेस्ट एंप्लॉयी होतीस. तू कशातच कमी नाहीस.मात्र तुझ्यात आणि इतरांत हा फरक आहे की तू हे सगळं आनंदाने करतेस कारण तुझ्यातलं ते लहान उत्साही मुल तुला सतत सक्रीय, आनंदी ठेवतंय. खरं सांगू हर्षू,प्रत्येक माणसाने तुझ्यासारखंच असायला हवं पण मोठेपणाचा आव आणून माणसं जगतात आणि जीवनातल्या आनंदाला पारखी होतात”
त्याच्या तोंडून आपली स्तुती ऐकून हर्षा लाजली.मग ती अवघडली.आजपर्यंत तिला लोकांनी तिच्या बालिशपणावरुन टोमणेच मारले होते पण तिचा धीरगंभीर,अबोल नवरा चक्क तिचे गोडवे गात होता.तिला कसं रिअँक्ट व्हावं ते कळेना.
तेवढ्यात बाहेर कुठंतरी वीज कडाडली आणि त्यापाठोपाठ पावसाने जमीन ओली केल्याचा मंद सुवास सर्वत्र दरवळला.त्या वासाने हर्षा वेडावून गेली.या पहिल्या पावसात भिजायला तिला फार आवडायचं.
“आई पाऊस पडतोय.आम्ही पावसात खेळायला जाऊ?” बाहेरुन केतकीने विचारलं.
“हो.जा”तिला उत्तर देतादेता हर्षाने प्रणवकडे पाहून विचारलं.
“मी जाऊ?”
प्रणवने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.
“कुठे?”
“पावसात भिजायला?”
प्रणवच्या डोक्यात ती काय म्हणतेय ते पटकन शिरलं नाही. शिरलं तेव्हा तो मोठमोठ्याने हसायला लागला.
“काय झालं हसायला?”तिने निरागसपणे त्याला विचारलं.
तो न बोलता हसतच राहिला.
“अं?सांगा ना का हसताय?”
” काही नाही.तू जा”
हर्षा पटकन बाहेर आली.
“चला रे मुलांनो.आपण पावसात खेळू या”
प्रणव बाहेर आला.आपली बायको आणि मुलांना पावसात नाचतांना पाहून त्याला त्यांचा हेवा वाटला.का आपल्याला इतकं प्रौढत्वं यावं की या छोट्या छोट्या क्षणांचा आपल्याला आनंद घेता येवू नये याचं त्याला वैषम्य वाटू लागलं.”बाबा या ना पावसात भिजायला”
केतकी ओरडली.पण प्रणवचं संकोची,प्रौढ झालेलं मन त्याला पुढे जाऊ देत नव्हतं.तेवढ्यात हर्षा पुढे आली.प्रणवचा हात धरुन तिने त्याला अंगणात खेचलं.त्याचे दोन्ही हात धरुन ती त्याला नाचवायचा प्रयत्न करु लागली.तिच्यासारखं चांगलं त्याला नाचता येत नव्हतं पण ती जशी नाचत होती तसा तो नाचण्याचा प्रयत्न करु लागला.मग कसा कुणास ठाऊक त्याला तसं भिजण्यात आणि नाचण्यात खूप आनंद वाटू लागला.
पावसाची सर आली तशी निघून गेली.पण त्या पंधरावीस मिनिटात सगळ्या सृष्टीवर चैतन्य पसरवून गेली.हर्षा मुलांना घेऊन आत गेली.तिच्या पाठोपाठ प्रणवही आत आला.
“मुलांनो बाथरुममध्ये जाऊन कपडे बदलून घ्या”
मुलं बाथरुममध्ये गेल्यावर हर्षा प्रणवसाठी टाँवेल घेऊन आली. ओलेत्या कपड्यात आणि विस्कटलेल्या केसात ती खुप गोड दिसत होती.
“हे घ्या. डोकं पुसून घ्या आणि मुलांचं झालं की तुम्हीही कपडे बदलून घ्या “त्याच्या हातात टाँवेल देत ती म्हणाली.त्याने टाँवेल घेतांना तिचे हात धरले आणि तिला जवळ ओढलं.
“खूप मजा आली आज हर्षू पावसात भिजून.असंच मला शिकवत रहा आयुष्याचा आनंद घ्यायला.शिकवशील ना?”
प्रत्युत्तरात ती लाजून हसली तसं तिला अजून जवळ ओढत तो म्हणाला.
“माझी गोड गोड बायको. मला तू खूप आवडतेस”
– समाप्त –
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈