सौ. प्रांजली लाळे

? जीवनरंग ?

☆ विवाह करार – भाग-2 ☆ सौ. प्रांजली लाळे

(पण असं खास भेटायचे म्हणजे जरा वेगळंच वाटले तिला..तिने खुप विचारांती कैवल्यला भेटायला येत असल्याचे सांगितले..) इथून पुढे —–

कैवल्यही जवळ जवळ अशाच मनस्थितीत होता..ओ.पी.डी.संपली..मनाला लागलेली हुरहूर..मनाला पडलेले अनामिक प्रश्न..आज सर्वच प्रश्नांची उत्तरे सापडवायचीच.. ह्यावर ठाम असलेला कैवल्य..मस्त तयार झाला..डेट सदृश्य भेटीसाठी…पीटर इंग्लंडचा त्याचा आवडता आकाशी शर्ट..मंद दरवळणारा परफ्युम..भारीच दिसत आहोत.. अशा आविर्भावात शिळ घालत गाडी निघाली ना काव्याला भेटायला!!

कैवल्य जरा वेळेच्या आधीच पोहचलेला…काय बोलायचं ह्या गोंधळात!!असाही मितभाषी असलेला..काय होणार आहे आता??कपाळावर आलेली किंचित घामाची टिपूसं  रुमालानी पुसली..

काव्या त्याच्या समोर येऊन उभी राहिली..स्वप्नवत वाटत होते..मस्त गुलाबी रंगाचा अनारकली..हलकासा मेकअप..कपाळावर छोटीशी चंद्रकोर..सादगीमेंही सुंदरता माननारी काव्या..

दोघेही एकमेकांना कधीही न पाहिल्याप्रमाणे पहात होते..दोघेही न बोलताही बरंच काही बोलून गेले..शब्दरुपं आले मुक्या भावनांना..असेच..

पहल कोणी करायची..ह्या गोंधळात असतानाच..कैवल्यने वेटरला आवाज दिला..मस्त मटर बटाटा कटलेट आणि मस्त वाफाळणारी कॉफी !! आता सुरुवात तर कैवल्यलाच करावी लागणार होती..कारण त्यानंच तर बोलावले होते काव्याला..मनातले बोलायला..

काव्याही आतुरतेने वाट पाहत होतीच..कशी आहेस गं?? छान दिसते आहेस..त्यानं असे म्हंटल्यावर मोरपीसं फिरल्यागत तिच्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली..थँक्यु..जुजबी बोलली..

आपली ओळख होऊन सात आठ महिने होतील..पण तुला पाहिल्या क्षणी मनात झालेली चलबिचल..अजूनही आठवतेय..तुझ्याशी बोलून अधिकच गुंतत गेलो..काल आईनं विषय काढल्यावर मनात काहूर उठलेय..ते मिटवायचंय गं आज..बस्स!!

मी काय बोलणार रे?? मीही तुझ्यात त्या क्षणीच गुंतलेले..प्रथम तुज पाहता जीव वेडावला..असेच झालेले…पण खरं सांगू लग्न या गोष्टीमधे गुंतायचे की नाही ह्या विवंचनेत आहे मी..

हो माझेही तेच म्हणणे आहे..एकमेकांना जाणून घेऊया..मग लग्नाचे पाहू..सहा महिन्यात जाणून घेऊ आपल्या आवडी, निवडी ,स्वभाव..मग आयुष्यभरासाठी एकत्र येऊ..काय वाटते तुला?? इति कैवल्य.

तिचे त्याच्यावर मनापासून प्रेम होते.तरी असा लग्न न करता एकत्र राहण्याचा विचार ती कदापि करणार नव्हती..हा तिचा स्वभावच नव्हता..रिबेलिअस होण्याचा !!

मला विचार करायला थोडा वेळ देशील का रे???

दोघांनी काहीच न बोलता कटलेटचा आणि कॉफीचा आस्वाद घेतला..या भेटीत दोघे उत्तरं मिळण्याऐवजी प्रश्नचिन्ह घेऊनच घरी परतले..

कैवल्य विचारांच्या तंद्रीतच घरी कधीचा पोहचला..काय असेल काव्याच्या मनात??काय हरकत आहे काही दिवस लिव्ह इन मध्ये राह्यला..आजकाल बरेच जणं असेच तर राहतात.एकमेकांना समजून घेण्यासाठी..वेळ तर हवाच..बरं ती नाही म्हंटली तर आयुष्य वाळवंटासम भासणार..ह्या विवंचनेत तो घरात प्रवेश करता झाला..आई नुकतीच बाहेर हॉलमध्ये येऊन बसलेली..इकडे तिकडे कुठेही लक्ष न देता कैवल्य त्याच्या खोलीत रवाना झाला..अगदी शुन्यात नजर लावून..हम्म..

इकडे काव्यानेही मनात काहीतरी ठरवूनच पुढच्या तयारीला लागली..कैवल्यला दोन दिवसात सांगायचे होते उत्तर..ती तिच्या निर्णयावर ठाम होती…पण कैवल्य अजूनही गोंधळलेला..टू बी ओर नॉट टू बी मधे अडकलेला..

दुसऱ्या दिवशी काव्यानं कैवल्यला फोन केला..आज भेटुया का?? कैवल्य जवळ जवळ उडालाच…हवाओंमें..कुठे..आणि का?? अरे थांब थांब..सांगते..माझी एक मैत्रीण आहे..तिला भेटायला जायचे आहे जरा..चालेल..दुपारी दवाखान्यात रुग्णांची वर्दळ कमी असते..तेव्हा जाऊया..ओके डन..

दुपारी काव्या आली..मोरपंखी कुर्ता..हलकासा मेकअप..नजर खिळवणारा तिचा प्रसन्न चेहरा..दिल खल्लास!!चल जाऊया का?? कुठे विचारायलाही वेळ न दवडता डॉ.कैवल्य काव्यामय झाल्यागत तिच्या मागे निघाले..खरंच प्रेम माणसाला बदलते..आमुलाग्र बदल घडतो माणसांत..क्या यही प्यार है?? आजच्या जीवनशैलीत प्रेम आणि शारिरीक आकर्षण ह्यात गफलत होते..त्याचा परिणाम खुप वाईट..

कैवल्य-काव्या एका आधुनिक गगनचुंबी इमारतीसमोर आले…अतिशय सुंदर इमारत..पुर्ण इमारत अति श्रीमंत लोकांची असावी असा कैवल्यचा प्राथमिक अंदाज..लिफ्टचे बटन दाबले..अकराव्या मजल्यावर दोघे पोहोचले..फ्लॅटचा दरवाजावरची बेल वाजवली..दरवाजा उघडताच त्यांना समवयस्क तरुणी समोर उभी !! विमनस्क,निस्तेज चेहऱ्याची..मूळची सुंदर असावी..मनातल्या मनात डॉक्टर साहेब पुटपुटले..या ना काव्या..

दोघेही प्रवेश करते झाले..मग सुरू झाल्या भरपूर गप्पा..बोलण्याच्या ओघात..त्या तरुणीचे नाव मधुरा असल्याचे कळले..ती तिच्या मित्राबरोबर इथेच राहतेय असे समजले..दोन वर्षे झालीत..आई बाबा भेटत नाहीत..अजूनही लग्न करण्याचा त्याचा मानस नाही..अजून तुला तेवढे ओळखतच नाही मी. असे म्हणणारा तो..हिला बायकोसारखे सर्व कामे सांगतो..हुकूमही सोडतो..पण लग्नसंस्थेवर विश्वासच नाही म्हणतो..पाच वर्षाचा करार संपल्यावर पाहू..मधूरा एक हुशार,तडफदार,आधुनिक विचारसरणीची मुलगी..आज एका चुकीच्या विचारामुळे एकटी पडली..समाजानं नाकारलेली..

पत्नी ही आयुष्यभराची साथीदार असते..पती हा हक्काचा जोडीदार असतो..हे त्यांच्या लक्षात न आल्यानं फक्त तात्पुरता विचार केल्याने पदरी फक्त निराशा आलेली..मधुरा निराशेच्या गर्तेत पुर्ण अडकलेली..तो केव्हाच आईबाबांकडे परतलेला..तिला कोणी पुन्हा स्विकारेल की नाही हे प्रश्नचिन्हं घेऊन वावरणारी..निराशाग्रस्त..मधुरा बोलतानाही दिग्मुढ वाटली..काव्यानं तिला जवळ घेतले..अगं काळजी करु नकोस सर्व काही ठिक होईल..बघूया..मी सर्व येणाऱ्या काळावर सोडलेय..हम्म..इति मधूरा..चल आम्ही निघतो गं..कैवल्य हे निश्चलपणे ऐकत होता..दोघेही निघाले..काहीच न बोलता बरंच काही समजून चुकलेले…

काव्याला आपले म्हणणे असेच पटवून द्यायला आवडायचे.प्रत्यक्ष अनुभवातुन…

कैवल्यच्या मनातले मळभही बरंचसं निवळलं..हळूहळू प्रश्नांची उत्तरंही मिळायला लागली..

त्याच्या आई बाबांचेही अरेंज म्यारेज..तीस वर्षांचा संसार..पण असे अजूनही वाटत नाही..मेड फॉर इच आदर असे..कधी दुःख तर कधी सुख..ऊन सावलीच्या खेळात त्यांचा संसार अधिक फुलला..पण तरीही कैवल्यला कुठेतरी सलत होते असं लग्न करणं वगैरे..नो रिस्क असं आयुष्य जगायचे होते ना !!

पण आयुष्यात रिस्क हवीच..कहानी में ट्वीस्ट होना ही चाहिए!!

आईशी बोलायलाच हवं असे ठरवून आईच्या खोलीत पोहचला..आईने वाचत असलेली कादंबरी बाजूला ठेवली..बोल माझ्या  राजा..काय वाटतय तुला..सांगशील का??

मनातलं साचलेले जर वेळेवर व्यक्त झाले नाही तर डबक्यागत तिथेच साचते..त्यावर कमळे नाहीत तर बुरशी उगवते!!आईशी बोलले की मन मोकळे होते असे त्याला नेहमी वाटायचं..आजही घडलेला प्रसंग त्यानं आईला सांगितला..आईनं ओळखले त्याच्या मनातल्या वादळाला..हे वादळ क्षमवायचा रामबाण उपाय म्हणजे माय लेकरांमधल्या संवादाची मैफिल!!

आई काव्यावर माझं खुप प्रेम आहे गं..पण ती आयुष्यभर साथ देईल का गं मला?? मला निभावता येतील का सर्व जबाबदाऱ्या लग्नानंतरच्या?

कैवल्या लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचे नव्हे तर दोन कुटुंबांचे मिलन असते..एकमेकांच्या मदतीने,विचाराने केलेला संसार म्हणजे लग्नं..काँन्ट्राक्ट म्यारेज हा फक्त करार आहे..प्रायोगिक तत्वावरचा!! जमले तर ठिक नाही तर दुसरे कोणीतरी!! एकमेकांच्या भावनांचा खेळखंडोबा कशासाठी करायचा?? बाळा लग्न झाल्यावर नवरा बायको दोघेही बंधनात अडकतात..ते बंधन असते प्रेमाचे,संस्काराचे!! काव्या चांगली मुलगी आहे.तिला माझी सून म्हणून घरी आण..पुन्हा एकदा विचार कर..तिच्याशी कायमचं नातं जोड..

खरं तर लग्नानंतर जोडीदाराचा स्वभाव समजायला त्याचा सहवास हवा..तो समजायला..काही लोकांना जोडीदाराचा स्वभाव समजण्यास क्षणही पुरतो..तर काहींना आयुष्य दवडावं लागते..हळू हळू नातं उमलू दे..नात्यांची वेल बहरु दे…

कैवल्या विवाह करार हा कागदोपत्री करण्यापेक्षा मनाने मनाशी बांधलेली खुणगाठ असावी प्रेमबंधनाची!! तुझे तुझे माझे माझे करायला हा बाहुला बाहुलीचा खेळ नव्हे..मला वाटते तुला आता समजलेच असेल मला काय म्हणायचेय ते..

कैवल्य स्थितप्रज्ञासारखा आईसमोर मुग्धं होऊन ऐकत होता..खरंच तर होते ते..काव्या त्याला आयुष्यभराची सहचारिणी म्हणून हवी होती..तो आता तिला फोन करणार होता संध्याकाळी..उद्या आईबाबांना घेऊन येतो तुझ्याकडे..तुझा हात मागायला..असं सांगणारा..गाणं गुणगुणतच तो त्याच्या खोलीत गेला..फिटे अंधाराचे जाळे..झाले मोकळे आकाशं..

–  समाप्त – 

संग्राहक :  सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments