श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆
गुड मॉर्निंग सर !
गुड मॉर्निंग ! या पाटणकर. कुठल्या गावाहून आलात?
‘कोकिजरे , तालुका – वैभववाडी’.
‘हा. म्हणजे सह्याद्री पट्टा. शिक्षण कोठे झाल?’
‘शाळा कोकिजरे, बी.एस.सी कणकवली कॉलेज, एम.एस.सी, कोल्हापूर, बी.एड.-गारगोटी’
ठीक. म्हणजे शिवाजी विद्यापीठ, तुमच एम.एस.सी ला फिजिक्स विषय होता ना?
’हो सर.’
‘नाही, विचारण्याच कारण म्हणजे आमच्या शाळेत फिजिक्सची व्हेकन्सी आहे आणि तुम्ही केमेस्ट्रि नायतर बायोलॉजी मध्ये एम.एस.सी केलं असेल.
‘नाही सर! मी फिजिक्स मध्ये एम.एस.सी केलय.’
‘शिकवण्याचा काही अनुभव? तेथे उपस्थित असलेल्या साळगांवकर मॅडम ने विचारले.
‘मॅडम, मी दोन वर्षे कणकवलीत एका क्लासमध्ये शिकवत होतो.’
‘मग तेथला जॉब का सोडला?’
‘पैसे फार मिळत नव्हते म्हणून….’ पाटणकर हळूच म्हणाले.
आमच्याकडे सुद्धा शिक्षण सेवक म्हणूनच जागा आहे बरं का. सरकारी ग्रॅण्ट नाही. त्यामुळे …. काय तो विचार करा.
पण पुढे मागे सरकारी ग्रॅण्ड मिळेल ना मॅडम.
हा आमचे प्रयत्न सुरुच असतात. पण सरकारचे नियम दिवसाला बदलतात. ग्रॅण्ट मिळाली तर तुमचा फायदा होईल.
हो सर.
अकरावी- बारावी फिजिक्स बरोबर प्रॅक्टिकल पण घ्यावा लागेल. शिवाय खेडेगावातील शाळा आहे. इथे प्रायव्हेट क्लास वगैरे नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी तसेच सुट्टीत जादा तास घ्यावे लागतील.
हो सर. माझी तयारी आहे.
मग ठीक आहे. मुख्याध्यापक जोंधळे आहेत. त्यांना भेटा . तुमची सर्टिफिकेट्स जमा करा आणि १० जून पासून वर्ग सुरु होतील. तेव्हा हजर व्हा.
पण सर, पगार किती मिळेल?
ते तुम्हाला, कोळंबकर नावाचे क्लार्क आहेत, ते सांगतील.
अशारितीने पाटणकरांचा इंटरव्ह्यू पार पडला. एम.एस.सी झाल्यानंतर दोन वर्षे नोकरीसाठी शोधाशोध करुन शेवटी या गावातील शाळेत अकरावी- बारावी साठी फिजिक्स शिक्षकाची जागा खाली आहे. हे पेपर मध्ये वाचल्यानंतर पाटणकरांनी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली.
चेअरमनांच्या ऑफिसमधून बाहेर पडुन पाटणकर मुख्याध्यापक जोंधळे सरांना शोधायला निघाले. जोंधळे सर त्यांच्या ऑफिसमध्ये मोबाईल मध्ये रंगात आले होते. दोन मिनिटे त्यांचे आपल्याकडे लक्ष जाते काय, हे पाटणकर पाहत राहिले. पण जोंधळे कसलासा सिनेमा पाहण्यात दंग होते. शेवटी पाटणकर त्यांच्या टेबलासमोर उभे राहिले.
सर, नमस्कार! मी नारायण पाटणकर. जोंधळे दचकले. मग सावरत म्हणाले, ‘बरं मग, मी काय करु?’
‘सर, मी हायर सेकंडरी मध्ये फिजिक्स विषयासाठी अर्ज केला होता. आताच चेअरमन साहेबांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यांनी तुम्हाला भेटायला सांगितले. ’
असं होय. इंटरव्ह्यू दिला काय आणि न्हाई दिला काय. तुम्हीच शिलेट होणार. का सांगा?
का?
कारण ह्या खेडेगावात सहा हजार रुपड्यात यांना कोण मास्तर भेटणार?
किती ? सहा हजार फत ?
मग, सहा लाख वाटले की काय? हा आता मला दीड लाख पगार हाय. सातवा आयोग बरं का.
पण, चेअरमन नी तुम्हाला भेटायला सांगितलय.
हा. भेटलात म्हणून सांगा. त्यो कोलंबकर क्लार्क हाय का बघा. त्याचेकडं सर्टिफिकेट जमा करा आणि नऊ तारखेला या. कारण आदल्या दिवशी मिटींग असते. मॅनेजमेंट आणि शिक्षक यांची.
पाटणकर बाहेर पडले आणि क्लार्क कोळंबकरला शोधू लागले. कोळंबकर मोबाईल मध्ये रमी लावत बसला होता. पाटणकर त्याच्या समोर उभे राहिले.
‘कोळंबकर मी पाटणकर.’ कोळंबकर रमीत व्यत्यय आला म्हणून वैतागला. त्याने चिडून विचारले, काय काम आहे?
इथं या शाळेत फिजिक्स शिकवण्यासाठी मी १० तारीख पासून येणार आहे. मुख्याध्यापकांनी तुम्हाला भेटायला सांगितले.
होय काय. बरा बरा. हेंका नवीन नवीन बकरो बरो गावता.
‘बकरो? ’
नायतर काय. सहा हजारात या खेडेगावात कोण येतलो? बरा ता जावंदे. तुमची सर्टिफिकेटा घेवन येवा. पाटणकर नोकरीस हजर होण्याआधीच हैराण झाला. बायकोला काय सांगणार? तिला काल म्हटले, फिजिक्स च्या शिक्षकाची नोकरी आहे. ति खूश. ती शिक्षकांचे हल्ली लाखात पगार ऐकून होती. तिला शिक्षण सेवक हा मधला प्रकार माहित नव्हता.
मोडक्या एम.एटी वर बसून फूर फूर करत पाटणकर आपल्या गावी निघाला. या गावाहून आपले गाव चाळीस किलोमीटर म्हणजे याच गावात बिर्हाड करावे लागणार. बिर्हाड केले की खर्च वाढणार. गावी चार माणसांत दोन माणसे खपून जात होती. आता खोलीचे भाडे, इलेट्रीसिटी, मुलासाठी दूध, सर्वच विकत. आणि हे सर्व सहा हजार रुपयात भागवायचे कसे? शाळेतून बाहेर पडल्यावर काही अंतरावर त्यांना लहानशी बाजारपेठ दिसली. पाटणकरांनी फटफटी थांबविली. एक किराणा दुकान, एक लहानसे चहाचे हॉटेल, एक पानपट्टी आणि एक लाकडी खुर्चीचे सलून. सलून पाहताच पाटणकर पुढे गेले. खरंतर हा आपला पारंपारिक धंदा. आजोबा, काका वडिलांनी हाच व्यवसाय केला. पण वडिलांनी एकतरी मुलगा शिकावा म्हणून पोटाला चिमटा घेऊन आपल्याला कोल्हापूरात शिकायला पाठवले. आपला मुलगा डबल ग्रॅज्युएट झाला म्हणून वडिलांना कृतकृत्य वाटले. ज्याला त्याला मुलाची हुशारी सांगत सुटले. त्यांना वाटलं ‘आपलो झील कॉलेजात शिकवतोलो. फाड फाड इंग्रजी बोलतोलो. चार चाकी गाडीतून फिरतोलो.’ पण आपण झालो शिक्षण सेवक.
पाटणकर त्यातल्या त्यात मोठ्या असलेल्या किराणा दुकानदाराकडे गेला. हा नवीनच माणूस दिसतोय म्हणून किराणा दुकानदाराने चौकशी सुरु केली.
‘खयसुन ईलात?’
‘मी पाटणकर. गांव कोकिसरे. ह्या शाळेत शिक्षक म्हणून ईलय.’
‘खयचो विषय?’
‘फिजिस. अकरावी -बारावी साठी.’
‘अरे बापरे! म्हणजे तुम्ही डबल ग्रॅज्युएट शिकला असतालात. आणि हय शिक्षण सेवक? सहा-सात हजारात गुंडाळतले.’
काय करतले. नोकरी खय गावता?
चेअरमन भेटलो की नाय? आणि दुसरा ता बायलमाणूस. साळगावकरीन. तेची मैत्रिण ती.
असेल. चेअरमन होते आणि त्या बाई पण होत्या. आणि हेडमास्तर जोंधळो जागो होतो का झोपलेला?े.
होते ना.
एक नंबर चिकट माणूस. पाच रुपये खर्च करुचो नाय. लाखाच्या वर पगार घेता. सगळो पैसो गावात धाडता. तिकडे लातूर काय उस्मानाबाद तिकडचो आसा तो. तिकडे बंगलो बांधल्यान. शेती घेतल्यान. पण आमच्या दुकानाची उधारी देना नाय. पण तुम्ही कोकिसर्यातून जावन येवन करतालात? खूप लांब पडताला.
हय रवाचाच लागताला ओ. क्लास वगैरे पण घेवक हवे असा चेअरमनांनी सांगितल्यानी.
सहा हजार रुपयात दिवसभर शिकवायचा आणि शनिवारी- रविवारी क्लास घ्यायचे. अरे मेल्यानू ह्या मास्तरांका २५ हजार पगार तरी देवा. तुम्ही रात्रीच्या पार्टेक आठ-दहा हजार घालवतात. बरा मास्तर, जागा खय बघितलास काय?
नाय, ओ. ताच विचारुक ईल्लय.
ह्या बघा आमचो मांगर आसा. बंद असता. तुमका जमला तर रवा.
पण भाडा?
– क्रमश: भाग १
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈