श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆
(मागील भागात आपण पाहिले –‘तुम्हाला मुलांना समुद्रावर मोकळ सोडायला कोणी सांगितल होत? आता काय जबाब देणार पालकांना? आता तेथल्या पोलिसांना तक्रार द्या. दुसरा काही उपाय दिसत नाही मला.’ अस म्हणून जोंधळेंनी खाड्कन फोन आपटला. – आता इथून पुढे)
पाटणकर घाबरले. चव्हाण मॅडम थरथरु लागल्या. कोण मुल आलेली नाहीत याची चौकशी करताना संस्थेच्या सदस्या साळगांवकर मॅडम यांची कन्या आलेली नव्हती. पाच वाजले तरी मुलं आली नाहीत. शेवटी पाटणकरांनी कळंगुट पोलिस स्टेशनला तक्रार दिली. दोघांची नावे आणि फोटो दिले. इन्स्पेटर ने जवळपास कुठल्या बिचवर सतरा-अठरा वर्षाची मुलं समुद्रात बुडाली होती काय ? याची चौकशी केली. सुदैवाने त्या दिवशी संपूर्ण गोव्यात कसलीही दुर्घटना झाली नव्हती. मग इन्सपेटरनी कळंगुट च्या आसपास सर्व हॉटेल्स, बीअर बार, लॉजेस मध्ये फोटो पाठवून चौकशी करण्याची ऑर्डर दिली. यावेळेपर्यंत गाडीत बसलेल्या मुलांनी आपापल्या घरी ही बातमी कळविली होती. त्यामुळे गावात सगळीकडे ही बातमी पसरली. पाटणकरांना आणि चव्हाण मॅडमना फोनवर सतत फोन येत होते. पण त्यांनी ते न घेण्याचे ठरविले.
पंधरा मिनीटांनी एका बार वाल्याचा मेसेज आला. सव्वा तीन वाजता एक मुलगा आणि एक मुली आपल्या बार मध्ये बीअर पीत बसली होती. मग ते टॅसीच्या शोधात रस्त्यावर फिरत होते. ताबडतोब शहरातील सर्व टॅसीवाल्यांची चौकशी झाली. रात्री आठ वाजता निरोप आला. एका टॅसीवाल्याने दोघांना कर्नाटक सीमेपर्यंत सोडल होत. तेथील आजूबाजूच्या लॉजवर चौकशी केली गेली आणि रात्री नऊ वाजता एका लॉज मध्ये हा मुलगा आणि मुली सापडली.
गावात जोरदार चर्चा सुरु झाल्या. त्यात साळगांवकर बाईंची मुलगी असल्याने जास्त खमंग चर्चा. एव्हाना गावातून दहा-बारा गाड्या माणसे भरुन कळंगुट पोलिस स्टेशन कडे आल्या होत्या. साळंगावकर बाई आणि तिचा नवरा पोलिस स्टेशनमध्ये आले आणि ते पाटणकरांना शिव्या घालू लागले. रात्री अकरा वाजता पोलिसांनी त्या मुलांना कळंगुट पोलिस स्टेशनवर आले. कळंगुटच्या आमदाराच्या मदतीने सर्व प्रकरण मिटवले आणि पालकांनी मुल आपल्या ताब्यात घेतली आणि रात्री बारा वाजता सहलीसाठी बाहेर पडलेली मुलं, पाटणकर सर, चव्हाण मॅडम आणि गावाकडून आलेल्या गाड्या गावाकडे निघाल्या. पाठीमागुन साळगांवकर मॅडम, साळगांवकर आणि त्यांच्या वाडीतील अनेकजण येत होते. साळगांवकर आणि साळगांवकर मॅडम दात ओठ खात होते. अख्या गावात तोंड दाखवायला जागा नव्हती आणि हे सर्व त्या पाटकरांमुळे. साळगांवकर बाई बडबडू लागल्या. तरी मी चेअरमनांना सांगत होते. ‘त्या मुर्ख माणसाला शाळेत घेऊ नका. पण चेअरमन म्हणाले सहा हजारात या गावात कोण येणार?’
साळगांवकर, शिव्या घालत बोलू लागला. त्या चेअरमनला मग बघतो. आधी या पाटणकराला बघतो. एकतर मुलांना बीचवर एक तास सोडला आणि मग पोलिस तक्रार करतो. केवढी बेअब्रु झाली माझी. नाही या पाटणकरला ठार मारला तर नावाचा साळगांवकर नाही.
‘अहो,त्याला ठार मारु नका हा. तुरुंगात जाल. मोडून ठेवा फत. आधीच या कार्टीची मला काळजी लागली. त्या पोराबरोबर पळून जात होती. आता हीची शाळा बंद. मुंबईला ताईकडे पाठविते हिला आणि लग्न करुन देते.’
मिराशींच्या घरात पण जोरात चर्चा सुरु होती. मिराशी बायकोला सांगत होते.
‘त्या साळगांवकराचा पॉर लय चालू आसा. तेच्या बापाशीक मी सांगलेलय ह्या कोणाकोणाबरोबर फिरत असता. तेचा लवकर लगीन लावन टाक पण झाला ता बरा झाला. साळगांवकरनीचो तोरो जरा कमी होतोलो. नाहीतरी चेअरमनांच्या संगतीत हीका वाटा होता सगळी शाळा आपल्या खिशात.’
एवढ्यात भयभीत झालेली पाटणकरांची बायकोवनिता आपल्या मुलाला कमरेवर मारुन आली. मिराशींना म्हणाली. ‘भावोजी, शाळेकडे माणसा जमली आसत. पाटणकरांका मोडून ठेवतलव असा बडबडतत. माका भीती वाटता. ’
‘वहिनी घाबरु नकात . मी कसा काय ता बघतयं. मी पण शाळेकडे जातय.’ अस म्हणून मिराशी आपल्या स्कूटरवर बसून शाळेकडे गेले. घाबरलेल्या वनिताने आपल्या भावाला कनेडीत फोन केला आणि त्याला ही बातमी सांगितली आणि साळगांवकरच्या वाडीतले लोक पाटणकरांना मारण्याची भाषा बोलत आहेत अशी बातमी दिली. भाऊ म्हणाला, वनिता घाबरू नकोस. मी दहा मिनिटात गाडी घेऊन निघतय.
रात्रौ अडीच वाजता सहलीची बस शाळेकडे पोहोचली. मुलांचे पालक शाळेकडे उभे होतेच. मुल पटापट उतरली आणि आपल्या पालकांकडे गेली. पाटणकर, चव्हाण बाई उतरले. बस पाठोपाठ साळगांवकरांची गाडी आली. दारु पिऊन टाईट झालेल्या साळगावकराने कमरेचा पट्टा काढला आणि तो पाटणकरांना बडवू लागला. सर्व पालक पाटणकर पट्टयाचा मार कसा खातात याची मजा घेत होते. एवढ्यात मिराशी पुढे आले आणि साळगावकरांनी उगारलेला पट्टा त्यांनी हवेतच हातात पकडला आणि खेचून घेतला. मिराशी ओरडून म्हणाला, ‘हरामखोर साळगांवकरा, या गरीब मास्तराक मारतस? तुझ्या पोरीन शेण खाल्ल्यान आणि त्या मास्तराक जबाबदार धरतस?’
‘मग? त्याने मुलांना बीचवर का सोडल? आणि मग पोलिस तक्रार का केली?’
‘अरे, मुलं सहलीला गेली होती ना? मनासारखं फिरु दे त्यांना म्हणून सोडली. बाकीची वीस मुलं वेळेत गाडीत आली. तुझा चेडू आणि तो फर्नाडिसाचो झील तेवढे पळाले ह्या दोघांका मी देवळाच्या पाठीमागे कितीवेळा बघलय. तुका सांगलेलय ह्या चडवार लक्ष ठेव. आता पाटणकरांवर हात उचलशीत तर मुळासकट उपटून टाकीन लक्षात ठेव.’
साळगांवकर जळफळत होता. पाटणकरांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होता. एवढ्यात कनेडीहून पाटणकरांचा मेहूणा दोन गाड्या भरुन माणसे घेऊन आला. पटापट दरवाजे उघडले गेले आणि हातात दांडे घेतलेले दहा जण बाहेर आलेत. पाटणकरांच्या मेहुण्याने हातात सुरा घेतला आणि पट्टा हातात घेतलेल्या साळगांवकराच्या मानेवर लावला.
‘वा रे मुडद्या, या गरीब शिक्षकावर हात टाकतस? कित्या तो शिक्षण सेवक आसा म्हणून? पैशानं गरीब आसा म्हणून? भानगडी केल्यान तुझ्या चेडवान आणि या पट्टयान मारतस या मास्तरास. थांब तुझो कोथळो बाहेर काढतय.’
पाटणकरांच्या मेहुण्याने सुरा पोटावर लावताच साळगांवकर रडू लागला. हातापाया पडू लागला. साळगांवकरांची मित्रमंडळी एवढी सगळी दांडे हातात घेतलेली माणसे बघून पळू लागली. मिराशी पुढे झाले आणि त्यांनी मेहुण्याला थांबविले. ‘रक्तपात करु नको बाबा. पोलिस मागे लागतले. एकवेळ सोड तेका.’
मेहुण्याने सुरा बाजूला केल्या आणि साळगांवकरांच्या दोन थोबाडीत दिल्या. बरोबरीच्या साथीदारानी दांड्यानी त्याच्या पाठीवर मारले. साळगांवकर गुरासारखा ओरडू लागला. मिराशीनी दोघांना दूर केले. मग मेव्हण्याने साळगांवकरांच्या मानेला धरले आणि उचलून पाटणकरांच्या पायावर घातले. पाया पड तेंच्या. अरे डबल ग्रॅज्युएट माणूस आसा तो. शिक्षण सेवक झालो म्हणून तुमका तेंची किंमत नाय. साळगावकर लंगडत लंगडत बाजूला झाला. मग मेहुणा पाटणकरांकडे वळला. पाटणकरांची पाठ, मान, दंड रक्ताने माखले होते.
‘चला भावोजी, तुमका डॉटरकडे नेऊन मलमपट्टी करुक होयी आणि आजपासून ह्या गाव आणि ही शिक्षण सेवकाची नोकरी सोडायची. तुम्ही कितीही हुशार असलात कितीही शिक्षण घेतलात तरी तुम्ही शिक्षण सेवक झालात की तुमची किंमत शून्य. ही असली नोकरी करण्यापेक्षा मी तुमका धंदो काढून देतय.’
मेहुण्याने पाटणकरांना गाडीत घेतले. वाटेत बहिणीच्या घरी जाऊन घरातील सर्व सामान आणि बहिणीला आणि तिच्या मुलाला घेऊन कणकवली गाठली.
पंधरा दिवसांनी कणकवलीत ‘पाटणकर हेअर कटींग सलून एसी’ सुरु झाला. पाटणकरांच्या मेहुण्याने आपला अनुभवी कारागिर सोबत दिला. हळूहळू पाटणकरांनी सर्व शिकून घेतले. दोन महिन्यांनी ते सलून मध्ये व्यवस्थित काम करु लागले. पाटणकर हेअर कटींग सलूनला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. एका वर्षात दुसरे सलून कणकवली स्टेशनजवळ काढले.
आता पाटणकर मजेत आहेत. व्यवसायात चांगले पैसे मिळवत आहे. बायको -मुलगा खूष आहेत. तरीपण पाटणकरांच्या झोपेत आर्किमिडीज, न्यूटन येतो. स्पेट्रम थिअरी येते. सरफेस टेंशन येते आणि मग अजून आपण शिक्षण सेवक असल्याचे त्यांच्या स्वप्नात येते आणि ते घाबरतात. मग जाग आल्यावर आपण पाटणकर हेअर कटींग सलून चे मालक असल्याचे तेंच्या लक्षात येते आणि ते कुशीवर वळतात आणि ते गाढ झोपी जातात.
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈