डॉ. ज्योती गोडबोले

☆ नाक  दाबल्याशिवाय… भाग – २  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(शहाणपणा करून तिने तिच्या डॉक्टरकडे आधीच जाऊन  उपाय योजले, म्हणून निदान दिवस जाण्याची भीती तरी उरली नाही. ) – इथून पुढे — 

आईला विजूचं अत्यंत वाईट वाटे. पण सांगूनसुद्धा तिने ऐकले नाही, ते आता तिला भोगणे प्राप्त होते. गुणी मिळवती मुलगी आपली, आणि नुसता तिच्या जिवावर जगणारा तो नवरा बघून संताप होई आईचा. पण विजूला हे कुठे समजत होतं? तिचं नरेंद्रवर आंधळ्यासारखं प्रेम होतं. त्याला नवीन ड्रेस घे, त्याच्या पाकिटात गुपचूप  पैसेच ठेव, हे चालूच  होतं तिचं. दरम्यान  विजूला तिच्या घराचा ताबा मिळाला. छोटेसे का होईना, आज तिचे स्वतःचे घर झाले. टू रूम किचन का  होईना, आज हक्काचं घर झालं तिचं. पण त्याचे हप्ते आणि बाकी सर्व खर्च भागवताना नाकी नऊ येत होते विजूच्या.  

बँकेतली अगदी जवळची मैत्रीण  कला तिला म्हणाली, “ विजू,आरशात बघितलं आहेस का अलिकडे?

कशी दिसते आहेस अग? वजन किती कमी झालंय आणि किती ओढला आहे चेहरा. काय झालंय मला सांग. मी त्याशिवाय सोडणार नाही तुला. दोन वर्ष सुद्धा झाली नाही लग्नाला आणि ही दशा तुझी? कधी चांगले ड्रेस घालत नाहीस, कधी हॉटेलमध्ये येत नाहीस. मागच्या महिन्यात साधे दोन दिवसाचे पिकनिक होते तरी आली नाहीस. काय झालंय नक्की? आज मी बँक झाली की तुला घरी नेणार आहे. काहीही कारणे सांगायची नाहीत.” 

विजूला भरून आले. तिला कलाचा आग्रह मोडवेना. इतक्या गोष्टी होत्या सांगण्यासारख्या, पण विजू मनात कुढत होती. विजूला कलाने तिच्या घरी नेलेच. तिच्याचतर एवढी होती कला ! पण डोळे उघडे ठेवून केलेलं लग्न, त्यामुळे आपसूक जमलेली बेरीज आणि पदरात पडलेलं बिनचूक दान. क्षणभर विजूला कलाचा हेवाच वाटला. ही आपल्याहून दिसायला डावी, कशीबशी डिग्री मिळाली आणि नशीब म्हणून  बँकेत नोकरी मिळाली… आपल्या या विचारांची लाज वाटली विजूला. कला स्वभावाने मात्र फार चांगली आणि भाबडी होती. विजूबद्दल फार प्रेम होते तिला. लग्न करायचे ठरवल्यावरही पहिल्यांदा कलाने तिला सावध केले होते, की, ‘ बघ विजू, कुठेही स्थिर नसलेला हा मुलगा तुला काय सुख देणार? तुझी फरपट होईल ग ! अजून नीट विचार कर. अण्णांनी किती चांगला आणलाय तो डॉक्टर, कर की त्याच्याशी लग्न. सुखी होशील विजू तू !’ पण तेव्हा प्रेमाची.. त्यागाची धुंदी चढली होती ना डोळ्यावर ! आणि हा असा निष्क्रिय होत जाईल असं वाटलं तरी होतं का तेव्हा? 

कलाने छान पोहे करून आणले, जवळ बसली आणि म्हणाली, “ शांतपणे खा विजू. मग बोलूया आपण.” कितीतरी दिवसानी कोणीतरी असे आस्थेने गरमागरम खायला देत होते विजूला !

आईकडे  तिला  जावंसंच वाटायचं नाही. काय तेच तेच बोलायचं आणि रडून परत यायचं ! कलाने छान चहा दिला.आणि म्हणाली, “आता सगळं बोलून टाक विजू. अग प्रश्न असेल तिथे उत्तरंही असतात. आपणच शोधायची ती ! होईल सगळं छान ! अशी हरून नको जाऊ.” विजूने भडाभडा सगळं सांगून टाकलं कलाला ! कला आश्चर्यचकित झाली. “ विजू,काय ग हे ! एवढी हुशार शिकलेली मुलगी ना तू ? खुशाल त्याला पोसत बसली आहेस का? अग, त्यामुळे आणखीच ऐदी झालाय तो. मूर्ख आहेस का? असं अजिबात नको वागू ! मी सांगते ते ऐकणार आहेस का? तर बोलते.”  

“ सांग ना कला, म्हणून तर आलेय ना तुझ्याकडे? सगळ्या बाजूने कोंडी झालीय ग माझी. मला संसार मोडायचा नाही ,आणि पराभूत होऊन आईकडेही जायचं नाहीये.,पण मला एकटीला हे ओझे उचलेनासे झालेय ग आता ! “ विजू रडायला लागली. कला तिच्याजवळ बसली.

“ विजू, मी आहे ना तुला? वेडे, आधीच नाही का मला विश्वासात घ्यायचं? किती सहन करत बसलीस. एवढेही समजू नये का, की एखादा आपला जीव जाईपर्यंत फायदा घेतोय. थांब आता ! मी सांगते तसे केलेस तर वाचेल तुझा संसार. करशील का? त्यातून नाही हा उपाय योग्य ठरला तर पुढे बघू. आता धीट हो जरा. अशी मुळूमुळू राहू नकोस .ठणकावून सांग आजच नरेंद्रला, इथे राहायचं तर तुला नोकरी करावी लागेल. मला इतकी इतकी रक्कम द्यावीच लागेल. तरच इथे रहा, नाहीतर जा तुझ्या त्या खोलीत. जरा कठोर हो विजू. काय हे वागलीस वेडे ! तो सोकावलाय ग तुझ्या जिवावर मजा मारायला. तू मात्र दोन्ही बाजूनी जळते आहेस बाई ! मेणबत्ती दोन्हीकडून जळतेय बाळा ! असे स्वतःला जाळू नकोस. आपण त्याला नोकरी लावून देऊ या. माझ्या नवऱ्याच्या आहेत खूप ओळखी ! आधी तू नरेंद्रलाच प्रयत्न करायला लाव. आहे ना चांगला आर्टिस्ट? वापरू दे की ते सगळे स्किल !”…. 

कलाने विजूला खूप समजावले. विजूला धीर आला.  विजू घरी आली, तेव्हा नरेंद्र  खेकसला आणि  म्हणाला, “कुठे ग होतीस इतका वेळ? मला चहा दे आधी. आता यापुढे कधी करणार स्वयंपाक? एक काम धड नाही करत तू.” विजू म्हणाली, “आज मी खूप दमलेय. आता चहा तू कर आणि मलाही ठेव थोडा. आज हवं तर ब्रेड आण आणि खा. मला अजिबात भूक नाही. डोकं अतिशय दुखतंय माझं.” … विजू आतल्या खोलीत निघून गेली.

नरेंद्र रागाने बघतच बसला. हे काय एकदम? अशी नकार देणारी विजू प्रथमच बघितली होती त्याने. तणतणत चहा केला त्याने आणि विजूला नेऊन दिला. विजूला वाटलं, ‘ हे आपण आधीच का नाही केलं? आणि आता कलाने सांगितले तसे वागायला सुरवात  करायचीच. ह्या प्रयोगाने टिकला संसार तर टिकला, नाही तर देईन सोडून. आता अशी मेणबत्तीसारखी नाहीच जळणार. मूर्खपणा झाला माझा तो.’ 

दुसऱ्या दिवशी नरेंद्र म्हणाला, “ मला पैसे देऊन जा ग ! अजिबात नाहीत पाकिटात.” विजू  म्हणाली, “ मी काय सांगते ते नीट ऐक. आता फक्त दोनशे रुपये  देतेय.. पण ते शेवटचे ! यापुढे मी तुला पैसे देणार नाही. बाहेर पड आणि नोकरी शोधायला लाग. यापुढे घरात जर मला दरमहा पैसे दिले नाहीस तर मी  घरात तुला ठेवून घेणार नाहीये. खुशाल त्या जुन्या खोलीत जाऊन रहायचं. अरे किती पिळून घेशील मला? शरम वाटली पाहिजे थोडी. असा नव्हतास रे नरेंद्र तू ! मी प्रेम केलं ते या असल्या स्वार्थी नरेंद्रवर नाही. तुझ्या हातात आयतं सगळं  देऊन तुला आरामात ठेवत राहिले, हे चुकलंच माझं. यापुढे मी हे चालू देणार नाही. तुला जमणार नसेल तर मी सोडून देईन तुला. लोक काहीही म्हणोत. ते नाही येत माझा खर्च भागवायला.  जातेय मी. बाहेर वणवण केलीस की मग समजेल, नोकरी मिळणं किती अवघड आहे. जा ! आणि शेवटचं सांगते आहे .. आजपासून तुझा हा स्वैराचार मी अजिबात खपवून घेणारच नाही .. नाही म्हणजे नाही. “. 

  – क्रमशः भाग दुसरा

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments