श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ आंबटगोड नातं…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
कुलकर्णी साहेबांचा पंचाहत्तरावा वाढदिवस आणि त्याचबरोबर त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा योग एकत्र जुळून आला. साहेबांच्या मुलांनी त्या निमित्ताने सूरज प्लाझा हॉलमध्ये एका समारंभाचं आयोजन केलं होतं. साहेबांच्याबरोबर मी चार वर्ष एकत्र काम केलं आहे. ते मला धाकटा भाऊच मानतात. आमचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. मला सपत्निक येण्याचे निमंत्रण नव्हे तर आज्ञा होती.
आम्ही उभयता समारंभाच्या आदल्या दिवशीच हजर झालो. त्यांची मुले विदेशाहून दहा दिवस अगोदरच ठाण्याला येऊन दाखल झाली. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी, रात्रीचं जेवण केटररकडून मागवलेलं होतं. साहेबांचे जवळचे नातेवाईक आणि इतर भावंडे बऱ्याच दिवसांनी एकत्र जमल्याने वारेमाप गप्पा सुरू होत्या. मध्येच कुणी तरी म्हणालं, “आपण गाण्याच्या भेंड्या खेळूयात का?”
सगळ्यांनी एकमुखाने कल्ला केला. आपोआप दोन गट पडले. साठ सत्तरच्या दशकातील सदाबहार गाणी एकेकाच्या पोतडीतून बाहेर निघत होती. सुरेख मैफल सजली होती. रात्र होत चालली होती तसा खेळ रंगत चालला होता. शेवटी गाण्याचे तेच अक्षर रिपीट व्हायला लागले. साहेबांच्या ग्रुपला ‘क’ अक्षर आलं. माझ्याकडे पाहून डोळे मिचकावत साहेबांनी गायला सुरूवात केली. ‘कहे ना कहे हम बहका करेंगे…’ सुधावहिनीनी आक्षेप घेतला. ‘ चिटींग करताय. रहें ना रहें.. असं आहे.’ मग सुधावहिनींनी ते गाणे गायलाच पाहिजे म्हणून सगळ्यांनी आग्रहच धरला. सुरूवातीला आढेवेढे घेत, सुधा वहिनीनी ‘रहें ना रहें हम, महका करेंगे बन के कली, बन के सबा, बाग-ए-वफ़ा में…..’ कित्ती गोड गायलं होतं की, व्वा !.. ‘ए’ अक्षर आल्यावर, सुधावहिनींच्याकडे पाहत साहेब गायला लागले, ‘ऐ मेरी जोहराजबीं, तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसीं और मैं जवॉं तुझपे क़ुर्बान मेरी जान, मेरी जाँ ये शोख़ियाँ, ये बाँकपन जो तुझमें है, कहीं नहीं….’ साहेबांचा रोमॅंटिक सूर लागला होता त्यांना कुणी टोकलं नाही. तेच शेवटचं गाणं ठरलं. रात्र बरीच झाली. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. लगेच पांगापांग झाली.
लॉनच्या मध्यभागात छानपैकी मांडव सजवलेला होता. साहेब आणि वहिनी नवदांपत्यासारखे नटले होते. अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. सनई चौघडे याचं छान कर्णमधुर संगीत वाजत होतं. साहेबांची कन्या कार्यक्रमाचे संयोजन करीत होती. उभयतांनी टाळ्यांच्या कडकडाटात एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले. जणू साहेबांचा आणि सुधा वहिनींचा पुन्हा एकदा विवाहसमारंभच होता.
रविवारी दुपारी समारंभ असल्याने साहेबांच्या जवळपासची शंभर एक माणसे अगत्याने आली होती. पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूंच्या बॉक्सेसचा नुसता ढीग लागलेला होता. मुलं, सुना आणि नातवंडे प्रफुल्लित वातावरणात समरसून गेली होती. जेवणाच्या मेन्यूत मोजकेच पण दर्जेदार आणि चविष्ट पदार्थ ठेवलेले होते. कार्यक्रम अतिशय सुरेख संपन्न झाला. कार्यक्रम झाल्यानंतर दोन दिवस साहेबांच्या मुलांची खरेदी चालू होती. मित्रांना भेटणे सुरू होते.
त्या दिवशी दिवसभर तापत राहिलेली सूर्याची किरणे आपला पसारा आवरत परत पावली जाण्याच्या तयारीत होती. संध्याकाळ धूसर होत चालली होती. मी आणि साहेब बाल्कनीत खुर्च्या टाकून बसलो होतो. आकाशात पक्ष्यांच्या झुंडी चिवचिवाट करत आपापल्या घरट्याकडे परतत होती. गेले आठ दहा दिवस गजबजत राहिलेलं साहेबांचे घर आज रिकामं होणार होतं. आपापल्या मुक्कामाकडे जाण्यासाठी मुलं, नातवंडं सामान पॅकिंग करण्यात गुंतलेली होती. सुधावहिनी मुलांना काय काय बांधून देता येईल यात गुंतलेल्या होत्या. एक एक करत दोन्ही मुले, कन्या नातवंडे “आई बाबा काळजी घ्या. येतो आम्ही.” असं म्हणून नमस्कार करीत टॅक्सीत बसून एअरपोर्टकडे निघत होते. सुट्या संपल्या होत्या. मुलांच्या शाळा होत्या. मुलां-नातवंडाना उभयतांनी हसत हसत निरोप दिला.
आपली मुलं विदेशात राहतात म्हणून मी साहेबांना कधी कुरकुरताना पाहिलं नाही. उलट ते म्हणायचे की आईवडिलांचं नातं हे मुलांच्या पायातली बेडी बनू नये. दरवर्षी साहेब आणि वहिनी दोघेही न चुकता दोन्ही मुलांच्याकडे आणि मुलीकडे जाऊन येतात. आम्हा दोघांना आणखी दोन दिवस मुक्कामाला राहण्याचा साहेबांचा प्रेमळ आदेश होता. मुले निघून जाताच, जड मनाने साहेब मला म्हणाले, “ वसंता, चल आपण जरा बाहेर जाऊन येऊ या.”
आम्ही बाहेर पडणार होतो त्याआधी साहेबांनी सुधा वहिनींची परवानगी मागितली, “अहो, वसंताला बाजारात जायचंय म्हणे, मला या म्हणतोय. आम्ही जाऊन येऊ काय?”
“बघा, जणू हे माझ्या परवानगीशिवाय कुठेच जात नाहीत ते. मी नाही म्हटलं तर जणू थांबणारच आहेत. या जाऊन.”
साहेबांनी बुक केलेली टॅक्सी बघता बघता दामिनी साडी सेंटरच्या समोर येऊन थांबली. दुकानात शिरल्यावर साहेबांनी एका पैठणीकडे बोट दाखवून तिथल्या सेल्समनला सांगितलं, “ती साडी पॅक करून द्या.” मी सहज विचारलं, “साहेब, कार्यक्रम तर संपला आहे. आता कुणासाठी घेताय ही पैठणी?”
ते हसत हसत म्हणाले, “अरे, ही पैठणी तुझ्या वहिनींसाठीच घेतोय. काय झालं, गेल्या आठवड्यात दोन्ही सुनांच्यासाठी आणि कन्येसाठी साड्या घ्यायला आलो होतो, तेव्हा तिने ही पैठणी पाहिली होती. किंमत पाहून तिने ती तशीच ठेवून दिली आणि सुनांसाठी घेतलेल्या वाणाचीच एक सिल्क साडी स्वत:साठी घेतली. दुकानातून निघताना ती त्याच पैठणीकडे पाहत होती, ह्यावर माझं लक्ष होतं. लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तिला सरप्राईझ द्यायचं ठरवलं आहे. काय वाटतं तुला?” मी काय बोलणार? साहेबांचे पेमेंट करून झाल्यावर आम्ही घराकडे परतलो.
चहा घेऊन आम्ही टीव्हीवर बातम्या पाहत बसलो होतो. किचनमधून भांड्यांचा आवाज येत होता. जणू आदळआपटच चालली होती. मी बायकोला म्हटलं, “ सविता, बघून येतेस काय, काय झालं ते? ”
“अहो वहिनी, तुम्ही आत जाऊ नका. थोड्या वेळात सगळं शांत होईल. मी तिला गेल्या पन्नास वर्षापासून ओळखतोय. आज मुलं निघून गेली आहेत ना, त्याचं दु:ख ती असं आदळआपट करून लपवू पाहतेय. ती आपलं मनातलं कधी कोणापुढे बोलेल तर ना?”.. साहेबांनी शांतपणे सांगितलं. खरंच थोड्या वेळानं सगळं शांत झालं.
थोड्या वेळानंतर, साहेबांनी वहिनींना हाक मारली, “अहो मॅडम, तुमचं काम झालं असेल तर एक मिनिट बाहेर येता काय? थोडंसं काम होतं.”
सुधावहिनी पदराला हात पुसत बाहेर आल्या. “ हं, बोला काय काम आहे? मला अजून सगळं घर आवरायचं आहे, रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे. लवकर सांगा.”
साहेबांनी हळूच पिशवीतून पैठणी काढून वहिनींच्या हातात दिली आणि मिश्किलपणे म्हणाले,
“ पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…… ही घे आपल्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाची तुला खास भेट !. आताच्या आता ही पैठणी नेसून ये. आज आपल्या चौघांना बाहेर जेवायला जायचं आहे.”
‘अहो, चला काही तरीच काय?’ असं म्हणत त्या चक्क लाजल्या. पैठणी न घेताच त्या आत गेल्या आणि थोड्याच वेळेत पदराआड लपवून आणलेलं एक बॉक्स साहेबांना देत म्हणाल्या, ” हे घ्या. तुम्हाला पुस्तकं वाचण्याचा छंद आहे ना? माझ्याकडून तुम्हाला हा घ्या किंडल रीडर !. मी पैजेतून जिंकलेल्या आणि माझ्या बचतीच्या पैशातून घेतला आहे, बरं का !” असं म्हणून पैठणी घेऊन वहिनी आत गेल्या.
– क्रमशः भाग पहिला.
© श्री व्यंकटेश देवनपल्ली.
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈