जीवनरंग
☆ “ओवाळणी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
आम्हाला तर तो एकुलता एकच वाटायचा…
खूप ऊशीरा समजलं…
त्याला एक बहीण होती म्हणून.
खरं तर लहानपणापासूनचे मित्र आम्ही.
आमच्या गँगमधे तोही..
अगदी पहिल्यापासून.
म्हणलं तर पहिलीपासून.
बराचसा अबोल.
घुम्या.
शब्दाला महाग..
एका वाक्यात ऊत्तरे द्या सारखं..
मोजकंच बोलायचा..
एकमेकांच्या घरी पडीक असायचो आम्ही.
त्याच्या घरचा पत्ता मात्र आम्हाला धड ठाऊक नव्हता.
घरचा विषय निघाला की तो अस्वस्थ व्हायचा..
चल तुझ्या घरी जाऊ म्हणलं की…
टचकन डोळ्यात पाणी यायचं त्याच्या..
आईला हे सांगितलं तर ती म्हणाली..
असू देत..
चांगला मुलगा आहे तो.
असतील काही अडचणी त्याच्या घरी.
आम्हालाही पटलं.
एकदा असाच तो घरी आलेला..
राखीपौर्णिमेचा दिवस होता.
माझ्या ताईने माझ्याबरोबर त्यालाही ओवाळलं.
प्रचंड खूष झाला तो.
दफ्तर ऊघडून कंपासीत घडी करून ठेवलेली,
दहा रुपयाची नोट त्यानं तबकात घातली…
अरे कशाला ?
असं कसं ?
ओवाळणी घालायलाच हवी..
दर वर्षी यायचा तो राखीपौर्णिमेला घरी.
माझी ताई त्यालाही ओवाळायची..
अगदी काॅलेजात जाईपर्यंत…
नंतर आम्हीच मुंबई सोडली..
त्याचा तर काही पत्ताच नाहीये आता.
खूप वर्षात गाठभेट नाही..
सध्या वेगळंच टेन्शनय.
आमच्या मेहुण्यांचं लिव्हर ट्रान्सप्लान्टचं आॅपरेशन करावं लागणार होतं..
काडीचंही व्यसन नाही तरीही..
भोग..
दुसरं काय ?
डोनरची वाट बघणं चालू होतं..
देव पावला म्हणायचा.
अगदी वेळेवर डोनर मिळाला..
एका बाईनं जाताजाता आॅर्गन डोनेट केलेले..
त्या देवीला मनापासून हात जोडले.
आणि जोगेश्वरीलाही.
कृपा असू दे !
सगळं व्यवस्थित पार पाडलं..
काही फाॅरमॅलिटीज कंम्प्लीट करायला,
मी आणि ताई हाॅस्पीटलमधे गेलेलो.
आणि अचानक तो समोर आला.
ईतक्या वर्षांनंतर…
लगेच ओळखलं मी..
कसानुसा हसला.
एकदम गळाभेट आणि अश्रुपात.
माझी बहीण गेली रे…
पाच मिनिटांनी सावरला.
आम्ही तिघं हाॅस्पीटलच्या कॅन्टीनमधे..
खरं सांगू ?
लाज वाटायची तुम्हाला घरी न्यायला..
तीन खोल्यांचं तर घर आमचं.
तिला कुठं लपवून ठेवणार ?
तुमच्या ताया किती हुशार…
माझी ताई मात्र…
मतिमंद होती रे ती…
नाही…
शहाणी होती ती..
माझ्यावर खूप जीव होता तिचा..
वेडपट मी होतो.
माझं ऐकायची ती..
तिची कुवत बेताची हे समजून घ्यायला मलाच वेळ लागला..
नंतर मात्र जीवापाड जपलं तिला.
माझ्या बायकोनेही मनापासून केलं सगळं तिचं.
चाळीस वर्षांची होईपर्यंत शाळेत जायची ती.
कागदी राख्या करायला शिकली होती.
दरवर्षी स्वतः केलेली राखी बांधायची माझ्या हातावर.
आत्ता गेली तेव्हा पंचावन्न वर्षांची होती.
जाताना म्हणाली,
मी देवबाप्पाकडे जाणार.
आईबाबांना भेटणार..
मज्जा येणार…
आमच्या हिनंच ठरवलं…
पटलं मलाही…
तीही लगेच तयार झाली.
जाताना आॅर्गन डोनेट केले तिने..
मला म्हणाली..
तू सांगशील तसं.
मी तयार आहे….
दुखणार नाही ना फार ?
काय,सांगू तिला ?
मरणानंतर सगळंच संपतं..
एकदम रेड्डी आहे मी..
जाताना ताई एवढंच म्हणाली
हसत हसत गेली..
खरं तर अजूनही जिवंतच असेलच ती..
अंशरूपात..
इथेच अॅडमीट होती शेवटचे दोन दिवस.
………..
पाच मिनटं कुणीच काही बोललं नाही.
ताईला लिंक लागली असावी बहुतेक..
सलाम तुझ्या ताईला,बायकोला, आणि तुला..
माझ्या ताटात जी ओवाळणी घातलीय ना तुम्ही..
ताईला बोलवेना..
खरंच…
ती शहाणीच होती..
तो मात्र वेड्यासारखा आमच्याकडे बघत बसलेला.
© कौस्तुभ केळकर नगरवाला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈